मेघालय : भारताच्या २२ घटक राज्यांपैकी ईशान्य भागातील एक राज्य. क्षेत्रफळ २२,४२९ चौ. किमी. लोकसंख्या १३,३५,८१९ (१९८१). मेघालयाच्या उत्तरेस व पूर्वेस भारतातील आसाम राज्य, तर दक्षिणेस व पश्चिमेस बागंला देश आहे. शिलाँग हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण तसेच राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे (लोकसंख्या १,७३,०६४–१९८१). पूर्वीच्या आसाम राज्यातील गारो हिल्स आणि संयुक्त खासी व जैंतिया हिल्स जिल्ह्यांचे मिळून २१ जानेवारी १९७२ रोजी भारतीय संघराज्यातील एक राज्य म्हणून मेघालयाची स्थापना करण्यात आली.

भूवर्णन : मेघालयाचा बहुतांश भाग पर्वतीय असून तेथे गारो, खासी व जैंतिया या प्रसिद्ध टेकड्या आहेत. प्राकृतिक दृष्ट्या मेघालयाचे पुढीलप्रमाणे तीन विभाग पाडता येतात : (१) दक्षिणेकडील तीव्र उताराचा प्रदेश, (२) मध्यवर्ती पठारी प्रदेश व (३) उत्तरेकडील आसामच्या खोऱ्याकडील काहीसा मंद उताराचा प्रदेश. राज्यात पश्चिमेकडील मैदानी प्रदेशाकडून पूर्वेकडे प्रदेशाची उंची वाढत जाते. पश्चिमेकडील गारो टेकड्यांमध्ये असलेली ३०० मी. उंची पूर्वेकडे खासी टेकड्यांमध्ये १,८०० मी. पर्यंत वाढलेली दिसते. तेथून पूर्वेकडे असलेल्या जैतिया टेकड्यांमध्ये प्रदेशाची उंची किंचितशी कमी झालेली आहे. राजधानी शिलाँग ही मध्यवर्ती पठारी प्रदेशात वसलेली असून ‘शिलाँग पीक’ हे राज्यातील सर्वोच्च (१,९६५ मी.) ठिकाणही याच भागात आहे. या मध्यवर्ती पठारी प्रदेशाला शिलाँगचे पठार म्हणूनही ओळखले जाते. पश्चिमेकडे गारो टेकड्यांमधील नोक्रेक (१,४१२ मी.) हे राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचे उंच शिखर आहे. कोळसा, चुनखडक, सिलिमनाइट ही मेघालयात सापडणारी मुख्य खनिजे आहेत. त्यांशिवाय केओलीन, फेल्स्पार, बॉक्साइट, जिप्सम, अभ्रक, डोलोमाइट इ. खनिजांचेही थोडेबहुत साठे आहेत.

नद्या: मध्यवर्ती पठारी प्रदेश हाच राज्यातील नद्यांचा मुख्य जलविभाजक आहे. येथील पर्वतीय व पठारी प्रदेशांतून अनेक नद्या वाहताना आढळतात. नद्या पर्वतीय प्रदेशातून व खडकाळ पात्रांमधून वाहत असल्याने त्या द्रुतगती आहेत तसेच त्यांच्या पात्रांमध्ये ठिकठिकाणी धबधबे व द्रुतवाह निर्माण झालेले दिसतात. चेरापुंजी जवळच्या मॉसमाई येथील नोहस्नीगथिआंग धबधबा प्रेक्षणीय आहे. राज्याच्या गारो हिल्स जिल्ह्यात कृष्णाई (दायरिंग), कालू (जिरा), भुगई (बुगी), निताई (दारेंग) व सोमेश्वरी (सिमसंग) खासी हिल्स जिल्ह्यातून किनशी, ख्री, उमत्र्यू, उमनगॉट उमिआम मावफ्लांग व उमिआम रव्वान, तर जैतिंया हिल्स जिल्ह्यातून कोपिली, म्यिंटडू व ग्यिनटांग या नद्या डोंगराळ प्रदेशातून वाहत असल्यामुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत. शिलाँगपासून सु. १६ किमी. अंतरावर बडापानी लेक हे प्रेक्षणीय सरोवर असून उमिआम हा प्रसिद्ध जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प आहे.

हवामान : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे व ढग मेघालयाच्या पर्वतीय प्रदेशात घुसतात. येथील विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे बाष्पयुक्त वारे व ढग तेथेच अडविले जाऊन मेघालयाची पर्वतीय भूमी सतत मेघाच्छादित राहते म्हणूनच त्यास मेघालय (मेघांचे आलय) असे नाव पडले आहे. मेघालयाचे हवामान सौम्य स्वरूपाचे आहे. गारो हिल्समधील वार्षिक सरासरी कमाल आणि किमान तपमान अनुक्रमे ३४º से. व ४º से. असून खासी व जैतिंया हिल्समधील हेच प्रमाण अनुक्रमे २३·३º से. व १२º से. आहे. मेघालय हा जगातील सर्वांत आर्द्र विभाग समजला जात असून तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० ते १,२७० सेंमी. आहे. जगातील सर्वांत जास्त पर्जन्याची चेरापुंजी-मॉसिनराम ही ठिकाणे याच राज्यात खासी टेकड्यांच्या दक्षिण उतारावर असून या दोन ठिकाणांचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे १,३०० सेंमी. व १,८०० सेंमी. आहे. चेरापुंजीजवळील मॉसिनराम हे जगातील सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण आहे. पूर्वी येथे पर्जन्याची नोंद घेतली जात नसे, त्यामुळे चेरापुंजी हेच जगातील सर्वांत जास्त पर्जन्याचे ठिकाण म्हणून मानले जाई. तथापि मॉसिनराम येथील पर्जन्याची नोंद घेतली जाऊ लागल्यापासून चेरापुंजीपेक्षा मॉसिमराम येथे पर्जन्यवृष्टी अधिक होत असल्याचे आढळून आले. राजधानी शिलाँग येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २४१·५ सेंमी.आहे.

वनस्पती व प्राणी : विपुल पर्जन्यवृष्टीमुळे मेघालयात विस्तृत असे जंगलमय प्रदेश आढळतात. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८,५१,००० हे. क्षेत्र अरण्याखाली आहे. पाइन, साग, बांबू हे वनस्पतिप्रकार विपुल प्रमाणात आहेत. त्यांशिवाय बर्च, ओक, बीच, गुरग्रा, हळदू, डालू व कवठी चाफा हे वनस्पतिप्रकारही येथील जंगलांत आढळतात.

पूर्वी मेघालयात वन्य प्राणी पुष्कळ आढळत असत. अलीकडे त्यांची संख्या बरीच घटलेली आहे. येथील जंगलमय प्रदेशात हत्ती, वाघ, हरिण, सांबर, सोनेरी मांजर, हूलॉक, रानडुक्कर, रानरेडे, रानगवा, लांडगा, ससा, माकड, शेपटी नसलेले माकड, मुंगीखाऊ प्राणी, खार, साप हे प्राणी तसेच मोर, तितर, कबूतर, हॉर्नबिल, रानबदक, पोपट इ. पक्षी विपुल प्रमाणात पहावयास मिळतात.

चौधरी,  वसंत  


इतिहास व राज्यव्यवस्था : खासी, जैंतिया आणि गारो या प्रमुख जमातींचे हे राज्य भारतातील आदिवासी संस्कृतीच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्रह्मदेश आणि मिझो टेकड्या या ईशान्येकडील भागांतून मंगोलियन वंशाचे लोक प्राचीन काळी येथे येऊन राहिले तर आसाममध्ये दीर्घकाल सत्ता गाजविणाऱ्या आहोम लोकांमुळे हिंदू संस्कृतीचा प्रभाव या भागावर पडला. ब्रिटिश हिंदुस्थानात या भागात मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती धर्मप्रसारही करण्यात आला. मॉनख्मेर व तिबेटो-ब्रह्मी टोळ्या वरचेवर या भागात येत राहिल्या. मेघालयातील प्रमुख जमात खासी ही मॉनख्मेर वांशिक परंपरेतील असून त्याच परंपरेत या राज्यातील जैंतिया जमात मोडते. त्यांना प्नॉर असेही म्हणतात. या दोन्ही जमातींत अनेक समान अशा सामाजिक प्रथा आढळतात. खासी व प्नार बोलीभाषा पुष्कळ बाबतींत एकसारख्या आहेत. गारो जमात तिबेटो-ब्रह्मी परंपरेतील असून, हे लोक बोडो भाषा बोलतात. उत्तर काचार जिल्हा आणि त्रिपुरा यांतही ही भाषा आढळते.

ब्रिटिशांनी १८८३ मध्ये खासी प्रदेशावर आपला अंमल बसविला. तत्पूर्वीच्या प्रदीर्घ काळात खासी-जैंतिया आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती टिकवून होत्या. सीएम्‌ या नावाने या जमातींचा मुखिया किंवा राजा ओळखला जातो. हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेच्या उदयकाळी सु. २५ च्या वर (काहींच्या मते सु. १७) मुखिया किंवा सीएम्‌ आपापल्या भागात सर्वाधिकारी होते. १८२४ पासून ब्रिटिशांनी सीएम्‌ शासनात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेशच्या आक्रमणाच्या वेळी जैंतिया जमातीचा राजा ऊ रामसिंह याने इंग्रजांची मदत मागितली. या संधीचा फायदा घेऊन इंग्रजांनी ब्रह्मी आक्रमण परतविले. मात्र या भागावर आणि राजाच्या सुरक्षेच्या नावाखाली कडक निर्बंध घातले. १८२९ मध्ये ब्रिटिश-खासी संघर्षात आरंभ झाला. इंग्रज अधिकारी डेव्हिड स्कॉट याने राणीकुदाय ते सिल्हेर असा मार्ग बनविण्याची योजना आखली. त्यासाठी नौंगल्खा येथील सीएम्‌ तिरोतसिंह याच्याकडे त्यांनी अनुमती मागितली. सुरुवातीला अनुमती देण्यात आली पण ब्रिटिशांचे प्रदेशविस्ताराचे मनसुबे लक्षात येताच तिरोतसिंहाने ब्रिटिशांना विरोध करण्यास सुरुवात केली. ४ वर्षे हा संघर्ष चालू होता. भेदनीतीचा अवलंब करून इंग्रजांनी एकेक सीएम्‌ प्रमुखाला अलग करून पराभूत केले. तिरोतसिंहाला डाक्का येथे आमरण कारावासात ठेवले. ब्रिटिशांनी १८६३ मध्ये जैंतियांचे राज्य खासी प्रदेशाशी जोडून खासी-जैंतिया असा प्रदेश निर्माण केला. कंपनी सरकारच्या अमंलात सीएम्‌कडे दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचे काम चाले. या प्रदेशात सडका तयार करण्याचे काम ब्रिटिशांनी केले. चुन्याच्या भट्ट्या, शेती, चराऊ कुरणे इ. मालमत्ता ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बळजबरीने ताब्यात घेतली. यास विरोध करणाऱ्याला मोठी शिक्षा करण्यात येई. ब्रिटिशांना विरोध न करणाऱ्या सीएम्‌चे स्वातंत्र्य, वरचेवर त्यांना सनद देऊन मान्य करण्यात येई व त्या सनदेत जाचक निर्बंध घातले जात. सीएम्‌च्या कक्षेबाहेरील प्रदेश इंग्रजांनी सरसकट आपल्या ताब्यात घेतला. सीएम्‌चे अधिकारक्षेत्र उत्तरोत्तर कमी होत गेले आणि त्यामुळे या भागात मोठा असंतोष निर्माण झाला. १८५३ मध्ये या भागातील लष्कर आणि नागरी प्रशासन अलग करण्यात आले. १८६४ मध्ये चेरापुंजी येथील राजधानी हलवून शिलाँगला नेण्यात आली. तसेच या भागाचा कारभार पाहण्यासाठी एक उपआयुक्त नेमण्यात आला. या उपआयुक्ताच्या अधिकारांबाबत सीएमध्ये फार मोठा असंतोष होता. १९२३ मध्ये ‘खासी राष्ट्रीय दरबार’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. खासींच्या या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात, गारो जमातीचे मुखियाही सहभागी झाले. वरील पक्षाने या समस्त प्रदेशाच्या शासनप्रशासनासाठी एक व्यापक संहिता तयार केली आणि तत्पूर्वीच्या ब्रिटिशांच्या सनदा आणि करार यांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. १९२१ मध्ये आसाम विधानसभेत एक प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार खासींना देण्यात आला तथापि मतदानाचा अधिकार फक्त शिलाँगमंधील नगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींनाच देण्यात आला. १९२७–२८ मध्ये सायमन आयोगासमोर खासींनी आसाम विधानसभेत २ प्रतिनिधी असावेत अशी मागणी केली. १९३५ च्या कायद्यानुसार आसाम प्रांतिक विधानसभेत खासींचे ३ प्रतिनिधी निवडण्यात आले. त्यात एक खासी महिलाही होती. आसाममधील सर्वाधिक शिक्षित असा समाज खासींचाच होता. निवडणुकीसाठी खासी प्रदेशाच्या निर्वाचन क्षेत्राची मोडतोड करण्यात येऊ नये, अशी खासींची मागणी होती. १९३४–३५ मध्ये खासी स्टेट फेडरेशन स्थापन झाले. आपल्या प्रश्नांच्या न्यायिक चौकशीची मागणी या संघटनेने केली. या मागणीचा रोख, येथील उपआयुक्ताच्या न्याय आणि प्रशासनविषयक अनियंत्रित अधिकाराविरुद्ध होता. १९३३ मध्ये संघटनेने नरेंद्र मंडळाची मदत मागितली परंतु ती मिळू शकली नाही.

भारतीय स्वातंत्र्यपूर्वकाळात सर्व खासी सीएम्‌ एकत्रित येऊन त्यानी ‘राष्ट्रीय दरबार’ ही संघटना स्थापन केली. एका स्वतंत्र पर्वतीय राज्याची मागणी करण्याची कल्पना होता परंतु जे. जे. निकोलस रॉयसारख्या नेत्यांनी ती बाजूला सारून भारतीय संघराज्यांतर्गत स्वायत्त राज्याची मागणी पुढे केली. भारतीय संविधान तयार होत असताना भारत सरकारने निकोलस रॉय यांच्या सूचनेनुसार एक उपसमिती नेमली. पर्वतीय प्रदेशाच्या समस्यांचा अभ्यास करून त्याची उन्नती आणि एकता यांसाठी सूचना करण्याचे काम या उपसमितीकडे सोपविले होते. बार्दोलोई उपसमिती म्हणून ती ओळखली जाते. या समितीने जिल्हासमित्या स्थापन करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे या भागात जिल्हासमित्या स्थापन झाल्या. १९५४ मध्ये तुरा शहरात विल्यमसन संगमा यांच्या नेतृत्वाखाली एक परिषद बोलावण्यात आली. या परिषदेत या पर्वतीय भागाचे आसामपासून अलग व स्वतंत्र राज्य निर्माण करावे, असा निर्णय घेण्यात आला. तथापि १९५६ मध्ये राज्यपुनर्रचना आयोगाने अशा स्वतंत्र पर्वतीय राज्याची मागणी मान्य केली नाही. यामुळे येथील जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला. आसाम राज्यातच हा भाग अंतर्भूत करण्यात आला. केंद्र सरकारच्या मध्यस्थीने १९५७ च्या निवडणुकीनंतर विल्यमसन संगमा यांस आदिम जाती कल्याणमंत्री म्हणून आसाम मंत्रिमंडळात घेण्यात आले परंतु १९६० आसाम शासनाने एका अधिनियमानुसार असमिया ही प्रांतिक भाषा म्हणून घोषित केली. त्यामुळेही लोकांत असंतोष निर्माण झाला. १९६० मध्ये मेघालयातील नेत्यांची हाफलोंग येथे बैठक होऊन तीत पुन्हा स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात आली. १९६१ मध्ये ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स स्थापन होऊन तुरा येथे या संघटनेमार्फत परिषद घेण्यात आली. १९६२ च्या निवडणुकीत खासी-गारो प्रदेशातील सर्व म्हणजे १२ जागा या संघटनेच्या उमेदवारांनी जिंकल्या तथापि त्यानंतरही स्वतंत्र राज्याची मागणी मान्य न झाल्याने, त्यापैकी ७ प्रतिनिधींनी विधानसभेचा राजीनामा दिला. ३१ मार्च १९६२ पासून थेट कृती (डायरेक्ट ॲक्शन) चा निर्णय पर्वतीय नेत्यांनी घेतला पण त्याच वेळी भारतावर चीनने आक्रमण केले व हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. १९६३ साली पोटनिवडणुका होऊन त्यात ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्सचे ६ उमेदवार निवडून आले. या समस्येच्या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्कॉटलंडच्या नमुन्यावर आसाम राज्याच्या अंतर्गत पर्वतीय प्रदेशाचे स्वायत्त शासन बनविण्याची सूचना केली होती. १९६५ मध्ये केंद्र सरकारतर्फे हरिभाऊ पाटसकर यांनी पर्वतीय नेत्यांशी नेहरू योजनेवर चर्चा केली परंतु ती योजना नेत्यांनी मान्य केली नाही. १९६६ मध्ये गुलझारिलाल नंदांनी आसाम अंतर्गत पर्वतीय क्षेत्रासाठी स्वतंत्र विधानसभा व मंत्रिमंडळ निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला पण तोही पर्वतीय नेत्यांनी फेटाळला. १९६७ च्या निवडणुकीत पर्वतीय नेत्यांनी स्वतंत्र राज्याच्या मागणीवरच निवडणुकीत भाग घेतला. जानेवारी १९६७ मध्ये आसामच्या पुनर्रचनेविषयी दिल्लीच्या बैठकीत विचार करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर १९६७ च्या विधानसभेच्या निवडणुकांवर पर्वतीय नेत्यांनी बहिष्कार घातला. आसामसकट एक संघराज्य निर्माण करावे, ही सूचना पर्वतीय नेत्यांनी फेटाळून लावली. या संदर्भात अशोक मेहता यांनी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली. २५ सप्टेंबर १९६७ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मेघालयाचे स्वंतत्र राज्य निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याप्रमाणे १९६९ साली भारतीय संसदेने आसाम पुनर्रचना (मेघालय) अधिनियम संमत केला. २ एप्रिल १९७० रोजी मेघालय हे स्वायत्त राज्य करण्यात आले व २१ जानेवारी १९७२ पासून भारतातील स्वतंत्र राज्य म्हणून ते अस्तित्वात आले.


मेघालय हे भारताच्या ईशान्य परिषदेचे (नॉर्थ-ईस्टर्न कौन्सिल) एक सदस्य आहे. राज्यात एकसदनी विधिमंडळ असून त्याची सदस्यसंख्या ६० आहे. खासी, जैंतिया आणि गारो या तीन प्रमुख प्रादेशिक विभागांचे अनुक्रमे २९, ७ व २४ असे प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेत असतात. राज्यातील विकासाचा वेग वाढविण्यासाठी आता या राज्यात पाच जिल्हे आणि दहा उपविभाग करण्यात आलेले आहेत. त्यांशिवाय ग्रामीण विभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यात एकूण २० समूह विकास-गट निर्माण करण्यात आले आहेत. पूर्व व पश्चिम खासी हिल्स तसेच पूर्व व पश्चिम गारो हिल्स आणि जैंतिया हिल्स असे पाच जिल्हे राज्यात आहेत. शिलाँग, नाँगस्टोइन, जोवई, तुरा व विल्यमनगर अशी जिल्ह्यांची अनुक्रमाने प्रमुख ठाणी आहेत. 

शिलाँग ही राज्याची राजधानी असून शिलाँग छावणी विभाग त्यातच मोडतो. शिलाँगचीच उपनगरे म्हणता येतील अशी पाच नगरे राज्यात आहेत. त्यांखेरीज चेरापुंजी हे सोहरा उपविभागाचे मुख्य ठाणे पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात आहे. बाघमारा हे पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील उपविभागाचे प्रमुख ठाणे आहे.  

न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने मेघालयाचा अंतर्भाव गौहाती उच्च न्यायालयाच्या कक्षेतच मोडतो. राज्यात स्वतंत्र लोकसेवा आयोग आहे. राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन विल्यमसन संगमा हे आहेत (१९८६).

आर्थिक स्थिती : शेती हेच येथील बहुंसख्य लोकांचे उपजीविकेचे साधन आहे. पर्वतीय प्रदेशामुळे कृषियोग्य जमीन कमी म्हणजे सु. १९,०९,९९४ हे. आहे. जलसिंचनाखाली त्यापैकी फक्त २७% जमीन आहे. ‘झूम’ शेतीची पद्धत परंपरेने चालत आलेली आहे. आणि ती शेतीच्या आधुनिकीकरणातील एक मोठी समस्या आहे. स्थायी स्वरूपाची शेती करण्यास लोकांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न राज्य शासनातर्फे केले जातात. राज्य शासनाची झूम नियंत्रण योजना मृद्‌संधारण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना सुधारित जमीनवाटप, खते, बियाणे, जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे इ. कामे केली जातात. विकसित जमीन सडकांशी जोडून शेतीउत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न होत आहे. राज्याच्या काही निवडक भागांत किमान ५० शेतकरी कुटुंबांकडून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयोगही केला जात आहे. बटाटे, तेझपाटा, ऊस, गळिताची धान्ये, कापूस, ताग, टॅपिओका, अंबाडी, सुपारी, आले, मिरी, हळद ही प्रमुख पिके असून काही निवडक भागांत भात, गहू आणि मका ही पिके घेतली जातात. खासी आणि जैंतिया हिल्स जिल्ह्यांत फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन होते. १९८४ साली राज्यातील पशुधन पुढीलप्रमाणे : मेंढ्या २१,००० म्हशी ३९,५९३ डुकरे १,५१,३१३ व इतर गुरे ४,७८,०००. आसाम राज्याला मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा या राज्यातर्फे करण्यात येतो. जोवई येथे दुग्धशाळा विस्तारकेंद्र असून त्यातून लोणी, तूप इ. दुग्धोत्पादने तयार करण्यात येतात. गोधनाच्या विकासासाठी राज्यात डेन्मार्कच्या मदतीने ८·२० लक्ष रूपयांचा एक फार मोठा इंडो-डॅनिश प्रकल्प सुरू करण्यात आला. फळांचे उत्पादन वाढविण्यासाठीही खास कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. लिंबूवर्गीय फळे, नासपती, सप्ताळू, अलुबुखार, अननस, सफरचंद, संत्री, केळी ही महत्त्वाची फळे होत आहे.

राज्यातील वनक्षेत्र सु. ८,५१,००० हे. आहे. त्यातून साल, हळदू, पाइन, बर्च, ओक, बीच इ. वृक्षविशेष आढळतात. इमारती आणि जळाऊ लाकूड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. राज्याच्या महसूलाचा वनोत्पादने हा मोठा आधार आहे. औद्योगिक आणि व्यापारी दृष्टीने वनविकास करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. 

राज्याचा औद्योगिक विकास फारसा झालेला नाही. राज्यात औद्योगिक विकास निगम स्थापन करण्यात आला आहे. खनिजसंपत्ती व वनोत्पादने यांवर आधारित उद्योगधंदे सुरू होत आहेत. राज्यात दगडी कोळसा, सिलिमनाइट, चुनखडक, डोलोमाइट, भाजकी माती, फेल्स्पार, काचमिश्रित वाळू इ. खनिजे सापडतात. देशातील ९५% सिलिमनाइट उत्पादन येथील खासी टेकड्यांच्या प्रदेशात मिळते. प्लायवुड, शीतपेये, खाद्यपेये व रसायने, खते इ. उद्योगांचे प्रकल्प खाजगी क्षेत्रात स्थापन झालेले आहेत. चेरापुंजी येथे शासनाचा सिमेंटनिर्मितीचा मोठा उद्योग आहे. तेथील दर दिवशीचे विद्यमान २५० टन उत्पादन ९३० टनापर्यंत वाढविण्याची योजना आहे.  

गारो आणि जैंतिया टेकड्यांत सिमेंटउत्पादनाचे छोटे कारखाने सुरू करण्याचे शासनाने ठरविल आहे. त्याशिवाय लाकूड कटाई, अन्नप्रक्रिया, कापसाच्या गासड्या बांधणे, बेकरी इ. उद्योगधंदे राज्यात आढळतात. यांशिवाय गवती चहा आणि आल्याचा अर्क काढणे इत्यादींवर आधारित उद्योगधंदे सुरू करण्याचे प्रस्ताव आहेत. गौहाती-शिलाँग मार्गावरील बर्नी हाट येथे एक औद्योगिक क्षेत्र आणि शिलाँग व मेंडीपाथर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचेही कार्य सुरू आहे. राज्यातील एकूण ६४४ लघु-औद्योगिक केंद्रापैकी खासी, गारो आणि जैंतिया भागांत अनुक्रमे ५४७, ४३ व ५४ केंद्रे आहेत.

छोट्या जलसिंचन प्रकल्पांचा लाभ राज्यातील सु. १८,५०० हे. शेतजमिनीला मिळतो. उपसा आणि इतर जलसिंचन योजनांचे प्रकल्पही हाती घेण्यात येत आहेत. राज्यात चार जलविद्युत् व एक औष्णिक प्रकल्प आहेत. त्यांशिवाय जैंतिया आणि खासी प्रदेशांत दोन प्रकल्प सुरू करण्यात नियोजन केले जात आहे. त्यांची एकूण निर्मितिक्षमता १,३२१ मेवॉ. ता. आहे. राज्यात पर्यटन उद्योगालाही वाव आहे.

लोक व समाजजीवन : राज्यातील खासी, जैंतिया आणि गारो या प्रमुख आदिवासी जमाती असून, त्यांपैकी खासी आणि जैंतिया यांच्यात बरेच साम्य आढळते. खासी-जैंतिया जमाती मंगोलियन वंशाच्या आहेत. डोंगराळ प्रदेशात फार प्राचीन काळापासून स्थायिक झालेल्या या जमातींचा बाह्य जगाशी फारसा संपर्क आला नाही. त्यामुळे आपली सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि प्रथा त्यांना टिकविता आल्या. खासी भाषा ही त्यांची स्वतंत्र भाषा असली, तरी तिला स्वतःची लिपी नाही. खासी जैंतियातील सिएम्-भोवती या त्यांच्या जमातीचे सर्वांगीण शासन आणि प्रशासन केंद्रित झालेले होते. मातृसत्ताक कुटुंबपद्धती त्यांच्यात रूढ आहे [⟶ खासी].

मेघालयातील गारो जमात ही मूळची तिबेटमधील तोरुआ या प्रांताची रहिवासी असावी. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून प्राचीन काळापासून हे लोक कायम वस्तीच्या शोधात भटकत होते. पुढे या जमातीच्या अनेक शाखोपशाखा निर्माण झाल्या. एका आख्यायिकेनुसार त्यांचा अबोंगनोंगा हा नेता गारो टेकड्यांतील एका उत्तुंग शिखरप्रदेशात स्थायिक झाला. हे लोक तिबेटो-ब्रह्मी वांशिक गटातील आहेत.

मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमुळे मेघालयातील आदिवासी समाज आणि त्यांच्या प्रथा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या आहेत. आईकडून त्यांच्या आप्तजनांचा इतिहास पाहिला जातो. मालमत्तेचा वारसा आईकडून मुलीकडे जातो व विशेषतः सर्वांत धाकट्या मुलीला मोठा वाटा देण्यात येतो. धाकट्या मुलीच्या नवऱ्याला श्वशुरगृही राहून वृद्धापकाळी सासू-सासऱ्यांची देखभाल करावी लागते. गारो जमातीत मामाच्या मुलाशी लग्न करण्याची प्रथा आहे. सहा वर्षाखालील मुले-मुली व आईवडील एकाच घरात राहतात. मोठी मुले ‘नोकपांते’ नावाच्या युवागृहात राहतात. कुटुंबाच्या शेतीवर मात्र सर्वजण एकत्र काम करतात. महत्त्वाचे म्हणजे जमीनजुमला कसलेही वाटप व विभागणी न करता वारसाहक्काने मुलीला मिळतो.


या लोकांत मांसाहाराचे प्रमाण अधिक आहे. कोंबड्या, डुकरे आणि इतर गुरे ते पाळतात. गुरांचा उपयोग मांसाहारासाठी अधिक करतात. तादंळापासून तयार केलेली ‘बीर’ येथील पुरुषवर्गात विशेष आवडती आहे. अलिकडच्या काळात मात्र इतरही प्रकारचे मद्य सेवन केले जाते. सण व उत्सव प्रसंगी मद्यपान, समूहनृत्ये इत्यादींची प्रथा येथे आहे. गारो जमातीचा सुगीचा उत्सव खासी जमातीचा कृतज्ञता निदर्शक नृत्योत्सव आणि जैंतिया जमातीतील वार्षिक उत्सव विशेष प्रसिद्ध आहेत. पारंपरिक जडप्राणवादी श्रद्धा या लोकांत आढळते. तथापि गेल्या शतकापासून या भागात मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यात आला आणि येथील अनेक लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. कालमानानुसार या लोकांच्या राहणीमानात आधुनिकता येत चाललेली आहे. 

राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १९८१ च्या जनगणनेनुसार ३३·२२% होते. राज्यात शैक्षणिक संस्थाही वाढत आहेत. १९८२–८३ सालची शैक्षणिक आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : प्राथमिक शाळा ३,२४६ माध्यमिक शाळा ५७५ उच्च माध्यमिक २२५ पदव्युत्तर प्रशिक्षण महाविद्यालय १ धंदेशिक्षणाच्या शाळा १२५ सर्वसाधारण महाविद्यालये १३ विधी महाविद्यालये २ आणि विद्यापीठ १.

राज्यात वैद्यकीय सेवेची वाढ व विकास करण्यात येत आहे. १९७७–७८ ची या संदर्भातील आकडेवारी पुढीलप्रमाणे : शासकीय रूग्णालये ९ दवाखाने ५७ अवैद्यकीय सेवाकेंद्रे ३४ प्राथमिक आरोग्य सेवाकेंद्रे २६ रुग्णालयांतील उपलब्ध खाटा १,५०४ डॉक्टरांची संख्या २१० होती.

भाषा-साहित्य : खासी आणि गारो या भाषा उपभाषा आहेत. प्रदेशपरत्वे त्यांच्याच वेगवेगळ्या बोलीभाषाही रूढ झाल्या आहेत. खासी भाषा ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील तर गारो, बोडो इ. भाषा तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहांतील मानल्या जातात. या भाषांना अर्थातच स्वतःची लिपी नाही. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी या दोन्ही भाषांसाठी रोमन लिपीचा प्रयोग केला व आज रोमन लिपीच येथे वापरली जाते. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी या भाषेत एकोणिसाव्या शतकात बायबलचा ‘नवा करार’ (१८४१), प्रथम खासी प्रवेशिका, तसेच खासी-आंग्ल शब्दकोश यांसारखे वाङ्‌मय निर्माण केले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस खासी भाषेत स्थानिक लेखकांची पुस्तके तयार होऊ लागली. तत्पूर्वीचे खासी साहित्य मुख्यतः ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे आहे. खासी वाङ्‌मयीन संस्कृतीचे जनक ऊ जीबोन रांब हे होत. खासी धर्मावर त्यांनी पहिले पुस्तक खासी भाषेत लिहिले. १८९९ मध्ये शिलाँगमध्ये त्यांनी स्वतंत्र छापखाना काढला तसेच सेंग-खासी ही संस्था स्थापून अनेक पाठ्यपुस्तके तयार केली. सरकारी शाळा काढण्याची मागणी केली. दुसरे महत्त्वाचे लेखक ऊ रांबोनसिंह हे होत. खासी धर्म, उत्सव, लोककथा या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. खासी विनोदसाहित्याचे ते प्रवर्तक मानले जातात. शिवचरण रॉय यांनी खासी धर्मकल्पनांसंबंधी आधुनिक दृष्टीने विवेचन करणारी पुस्तके लिहिली. त्यांचा एक लघुकथासंग्रहही प्रसिद्ध आहे. काही वृत्तपत्रे आणि मासिकेही १८९५ ते १९१० दरम्यान सुरू करण्यात आली. व्ही. के. रॉय यांनी इतिहास, व्याकरण इ. विषयांसंबंधी पुस्तके लिहिली. राधीनसिंह बेदी हे आद्य खासी कवी. तथापि सोसेथाम हे १९२० नंतरचे मोठे खासी कवी व लेखक होत. निसर्गाचे, विशेषतः नदी-पर्वतांचे सुंदर मानुषीकरण त्यांच्या काव्यात आढळते. तसेच सामान्य लोकांची सुखदुःखेही त्यांच्या कवितेत व्यक्त होतात. इसापनीतीचा त्यांनी केलेला खासी अनुवाद विशेष प्रसिद्ध आहे. विसाव्या शतकातील इतर कवींत ऊ थाक्यू, पी. गातफोह, एच्, इलायस, वी. जी. बरेह इत्यादींची गणना होते.

विद्यमान खासी साहित्यात पारंपरिक खासी संस्कृतीची अस्मिता प्रकट करण्यावर विशेष भर दिसतो. एच्. एच्. लिंडोह यांनी खैरम व चेरी या सीएमांचा इतिहास विस्तृतपणे लिहिला आहे. त्यांच्या दुसऱ्या पुस्तकांत खासी संस्कृतीच्या आध्यात्मिक व भौतिक विशेषांचे सखोल विवेचन आहे. डी. कोस्टा हे खासी संस्कृतीवरील आणखी एक उल्लेखनीय लेखक. प्राचीन नाटके, कथासाहित्य, महाकाव्ये, लोककथा, म्हणी व वाक्‌प्रचार यांचे संशोधन-प्रकाशन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्नार भाषेत फक्त एकच पुस्तक व्हेरिअर एल्विन यांनी लिहिले आहे.

काकेन्सन आणि दिवाणसिंह या बंधूंनी गारो लोकसाहित्यासंबंधी लेखन केले आहे. प्रा. खेबेट मोमीन सामाजिक नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. खोसांग या कवीने मौखिक परंपरेतील एका प्राचीन गारो महाकाव्याचे लेखन केले आहे. गारो प्रदेशात तीन महाकाव्ये परंपरेने गायिली जातात. गावोगावी जाऊन ही महाकाव्ये गाणारे लोक अगानगिपा म्हणून प्रसिद्ध आहेत. या पारंपरिक महाकाव्यांचे संशोधन-प्रकाशन करण्याचे कार्य आजही केले जाते.

कला : खासी जमातीच्या शिलास्मारकाचे अवशेष आसाममध्ये सर्वत्र पसरलेले आहेत. ही दगडी स्मारके मुख्यतः मृतांच्या संबंधी, जमातीत रूढ असलेल्या कल्पनांनुसार उभारलेली आहेत. त्याचप्रमाणे पांथस्थांनी आरामस्थाने म्हणूनही दगडी चौथरे उभारलेले आहेत. या पाषाणी स्मारकांशी या संस्कृतीच्या अनेक आख्यायिका निगडीत आहेत. सीएम्‌ किंवा मुखियांचे महाल, पूल आणि गढ्या इ. वास्तुविशेषांतून खासी संस्कृतीची वास्तुकला दिसून येते. सीएम्‌चे महाल दगडांचे असून, त्यात अनेक दालने असत. त्यांचे दरवाजे सोनेरी-चंदेरी, तसेच हिरव्या आणि पिवळ्या वेलबुटींनी सुशोभित केलेले असत. दरवाज्यांवर दगडी मूर्ती आणि झेंडे असत. हे झेंडे घेऊन नाचण्याची प्रथा येथील जमातीत होती. जमातीच्या सभा खुल्या मैदानात होत. सरदार किंवा वरिष्ठांसाठी तेथे दगडी आसने असत. पर्वतातील गुंफांमध्येही अशी आसने आढळतात. कामाख्या मंदिर एका गुहेत असून त्यात दगडी स्तंभ आणि मूर्ती होत्या. नंतर त्यांना हिंदू देवदेवतांचे स्वरूप देण्यात आले, असे म्हणतात. नाँगपोह, इयारीआजा, बोरखाट, जैंतियापूर व नर्टिआंग येथे जुन्या किल्ल्यांचे अवशेष आढळतात. चहूबांजूनी जलप्रवाह असलेला सज्जार नांगलीचा किल्ला प्राचीन खासी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. विविध प्रकारची दगडी स्मारके हे खासी कलापरंपरेचे खास वैशिष्ट्य असून अंत्यविधी, कौंटुबिक सण आणि उत्सव, शौर्य-वीराचे प्रसंग इत्यादींत ती उभारली जात. प्रचंड शक्ती आणि कौशल्य यांनी ही स्मारके उभारली आहेत. लोखंड वितळविण्यासाठी मोठे कातळ फोडून त्यात भट्ट्या तयार करीत. त्यासाठी नरबली देण्याची प्रथा होती. लोककथा आणि आख्यायिका यांनुसार या प्रत्येक गावात या पाषाणी स्मारकांना मोठे महत्त्व असे. शत्रूच्या आक्रमणकाळी ही शिलास्मारके मनुष्याप्रमाणे बोलत आणि लोकांना सूचना देत, असा समज आहे. मृतांच्या अस्थींवर दगडी छत्र्या उभ्या करीत. अशा छत्र्या ब्रह्मदेशपर्यंत आढळतात.

खासी मूर्तिकलेचे विषय म्हणजे मनुष्य, पशुपक्षी, फुलवेली किंवा जंगली परिसर हे होत. सोनफरजवळच्या गुंफेत देवनागरी लिपीतील कोरीव लेख, तसेच योद्धा, हत्ती आणि घोडेस्वार यांची चित्रे आहेत. जोवई शहराजवळ एका दाम्पत्याची शिल्पाकृती आहे, तीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. यांशिवाय हत्ती-घोड्यांच्या मूर्ती (सोनफर, सिंदेही) आणि रूपासोर येथे दोन भव्य मेंढ्यांच्या मूर्ती आहेत. खासींच्या  पारंपरिक चित्रकलेत मृत्पात्री आणि कपड्यावरील वेलबुटींची नक्षी विशेष उल्लेखनीय आहे. नित्योपयोगी अशा अनेक भांड्यांवर चित्रकाम केलेले आढळते. येथील दागदागिने, नृत्यसमयीचे मुगुट यांवरही चित्रविचित्र आकृत्यांचे चित्रण केल्याचे दिसते. मृतांच्या अस्थींवर टाकण्याच्या चादरींवर फूल, छत्री आणि प्राणी यांची चित्रे काढली जात. खासी घरांच्या दरवाज्यांवरही सचित्र रंगकाम केलेले आढळते.

नृत्य आणि संगीत हे खासी संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. गीत-गायन हे सामान्यतः वाद्यवादन आणि नृत्य यांच्याबरोबरच केले जाते. खासी व गारो जमातींची समूहनृत्ये खुल्या मैदानात होतात. खासी स्त्रीपुरुष वेगवेगळ्या रांगा करून नाचतात. ढोल, नगारे आणि पाइप यांसारखी वाद्ये साथीला असतात. विवाहित स्त्रिया नृत्यात भाग घेत नाहीत.


जैंतिया जमातीत युद्धनृत्य सामाजिक उत्सवप्रसंगी केले जाते. १८६२ मध्ये एकदा एका पोलिसाने हे युद्धनृत्य थांबविण्यास सांगितले, तेव्हा मोठे बंड झाले होते. सुगी किंवा वसंत ऋतू यांतही समूहनृत्ये केली जातात. बासरी आणि दोन तारांची वाद्ये वापरली जातात. अनेक प्रकारची नृत्ये या लोकांत रूढ आहेत. अलीकडे पश्चिमी संगीताचाही इथे प्रसार झाला आहे. गिटारवर गायन करण्याची आवड युवकवर्गात निर्माण झाली आहे. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी शिकवलेली भजनेही विशेष लोकप्रिय आहेत. गारो जमातीतील युद्धनृत्ये प्रसिद्ध आहेत.

‘नोंगक्रेम’ हा खासींचा राष्ट्रीय सण तथा नृत्योत्सव आहे. शिलाँगजवळच्या स्मिनेनामक गावात तो साजरा केला जातो. या नृत्योत्सवासाठी शुभ दिवस जमातप्रमुखांच्या चर्चेने ठरविण्यात येतो. धार्मिक, सामूहिक असे नृत्य केले जाते. मेघालयातील पारंपरित सांस्कृतिक जीवन आणि कलापरंपरा आता बदलत चालल्या आहेत.

प्रेक्षणीय स्थळे : गिरिप्रदेशातील हे राज्य निसर्गसौंदर्य आणि आदिवासी संस्कृतीची वैशिष्ट्ये यांमुळे पर्यटकांचे मोठेच आकर्षण ठरले आहे. उत्तुंग गिरिशिखरे, धबधबे व प्रपात, नागमोडी वळणाने खळखळत जाणाऱ्या नद्या आणि वेधक प्राणिजीवन या राज्यात सर्वत्रच आढळते. शिलाँग-गौहाती रस्त्यावरील तुतिआम सरोवर व त्यातील मासेमारीची सुविधा, किलँग रॉक (सु. २१३ मी. उंचीचा ग्रॅनाइट खडकाचा नैसर्गिक घुमट), चेरापुंजीजवळचा मॉसमाई येथील धबधबा, तेथून लगतच्याच मॉसमाई गुहा, नर्टिआंग येथील प्राचीन संस्कृतीची भव्य पाषाणस्मारके इ. स्थळे पर्यटकांची विशेष आकर्षणे ठरलेली आहेत. याशिवाय शिलाँग ही राजधानी व तिची उपनगरे तसेच तुरा व जोवई, विल्यमनगर, नाँगस्टोइन ही जिल्ह्याची प्रमुख ठाणी हीदेखील वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचा नागरी, औद्योगिक विकास होत आहे. 

जाधव, रा. ग.

मेघालय राज्याचा नकाशा व चेरापुंजी येथील बाजार-दृश्यपूर्वजांच्या स्मरणार्थ खासींनी उभारलेल्या अश्म-शिळाराजधानी शिलाँगमधील भूकंपप्रतिरोधक वैशिष्ट्यपूर्ण घरे