मेंडेलेव्हियम : निसर्गात न सापडणारे, मानवनिर्मित (संश्लेषित-कृत्रिम रीतीने बनविलेले) धातुरूप, किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे) मूलद्रव्य रासायनिक चिन्ह Md अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) १०१ अणुभार २५६ आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्याच्या कोष्टकरूप मांडणीतील ⟶आवर्त सारणी] गट ३ ॲक्टिनाइड मोलेतील (अणुक्रमांक ९० ते १०३ असलेल्या मूलद्रव्यांच्या गटातील) बारावे व युरेनियमोत्तर मालेतील नववे मूलद्रव्य समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्यांच्या प्रकारांचे) द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) २४८ ते २५८ अर्धायुकाल (किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारे काल) काही सेकंदापासून सु. ५५ दिवसांपर्यंत, पैकी २५८ हा सर्वांत स्थिर समस्थानिक (अर्धायुकाल ५५ दिवस) आहे. विद्युत् विन्यास (अणूमधील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, ३२, ३१, ८, २ संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) २, ३.

इतिहास : मेंडेलेव्हियमाचा प्रत्यक्ष शोध लागण्यापूर्वी त्याला एकथुलियम असे नाव देऊन त्याचे आवर्त सारणीतील स्थान व त्याचे संभाव्य रासायनिक गुणधर्म यांविषयी भाकीत केले होते. प्रत्यक्षात कॅलिर्फोर्निया विद्यापीठाच्या बर्कली प्रयोगशाळेत ए. घिओर्सो. बी. जी.हार्व्ही  , जी.आर्‌.शोपॅन, एस्.जी. टॉम्पसन व जी.टी सीबॉर्ग या शास्त्रज्ञांनी १८ फेब्रुवारी १९५५ रोजी आइन्स्टाइनियम या ९९ अणुक्रमांच्या मूलद्रव्यावर हीलियम आयनांचा (विद्युत् भारित अणूंचा) भडिमार करून मेंडेलेव्हियम हे १०१ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य मिळविले.

99Es253 + 2He4 → 101Md256 +0n1

याचा अणुभार २५६ व अर्धायुकाल १·५ तास होता. आवर्त सारणीचे जनक दमित्री मेंडेलेव्ह यांच्या सन्मानार्थ या मूलद्रव्याला मेंडेलेव्हियम असे नाव देण्यात आले.

उपस्थिती व प्राप्ती : हे मूलद्रव्य निसर्गात सापडत नाही. विपुल मिळणाऱ्या व त्याच्या जवळपासचा अणुक्रमांक असलेल मूलद्रव्यावर विद्युत् भारित कणांचा मारा करून त्याचे उत्पादन करता येते. 

उदा., Es255 + He4 → Md258 + N1

अशा तऱ्हेच्या प्रयोगातून मिळणारी मूलद्रव्ये अत्यल्‌प अशी मिळतात. काही वेळा ती वजन करण्याइतपत देखील असत नाहीत. या मूलद्रव्याचे थोडे अणून निर्माण करण्यात यश आल्याने सुधारित नव आयन-विनिमय तंत्राद्वारे अलगीकरण व रासायनिक गुणधर्म शोधणे शक्य झाले. या तंत्रानुसार मेंडेलेव्हियम मिळवले व आयन-विनिमय वर्णलेखन तंत्राचा उपयोग करून त्याचे गुणधर्म अभ्यासण्यात आले [→ मूलद्रव्ये, मानवनिर्मित]. त्याची प्रमुख ऑक्सिडीभवन अवस्था 3+ आहे, असे सिद्ध झाले. तरी त्याची 2+ अशीही ऑक्सिडीभवन अवस्था असल्याचे आढळून आले. त्याचे गुणधर्म ॲक्टिनाइड श्रेणीतील विरल मृत्तिका मूलद्रव्यांसारखे विशेषतः त्याच्या गटातील थुलियम या मूलद्रव्यासारखे आहेत [→ थुलियम], तरी पण ॲक्टिनाइड श्रेणीतील इतर मूलद्रव्यांपेक्षा त्याचा रेझिनातील ऋणायन विनिमय वेगवेगळा असल्यामुळे त्याचे अभिज्ञान (अस्तित्व ओळखणे) व गुणधर्माचे निश्चितीकरण शक्य झाले. मात्र याची संयुगे माहीत नाहीत.

पहा : मूलद्रव्ये, मानवनिर्मित, युरेनियमोत्तर मूलद्रव्ये.

संदर्भ : Seaborg, G.T. Man-Made Transuranium Elements, Englewood Cliffs, N.J. 1963.

कारेकर, न.वि.