मेंडेल, मोखर सेफारिम : (२० नोव्हेंबर १८३५–८ डिसेंबर १९१७). रशियातील यिद्दिश साहित्यिक. खरे नाव शोलेम याकॉप अब्रामोव्हिच. ‘मोखर सेफारिम मेंडेल’ ह्या त्याने घेतलेल्या टोपणनावाचा अर्थ ‘पुस्तकविक्रेता मेंडेल’ असा होता. मिन्स्क प्रांतात कोपिल येथे त्याचा जन्म झाला. यिद्दिश भाषेला त्याने कलात्मक अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम बनवले. तसेच यिद्दिश साहित्यात दीर्घकथा, सामाजिक कांदबरी ह्यांसारखे गद्य साहित्यप्रकार आणले. ह्या कथात्मक साहित्यातून त्याने समकालीन ज्यूंच्या जीवनाचे उपरोधप्रचुर चित्रण केले आहे. लोकसाहित्याचे रंग आणि संपन्नता ह्यांचे संस्कार त्याच्या शैलीवर झालेले आहेत. एक वाङ्मयीन माध्यम म्हणून हिब्रू साहित्याचे पुनरुज्जीवन करण्यातही त्याने पुढाकार घेतला. त्याचे आरंभीचे साहित्य त्याने हिब्रू भाषेत लिहिले आहे. यिद्दिशमध्ये लिहिलेल्या द ट्रॅव्हल्स अँड ॲड्व्हेंचर्स ऑफ थेंजामिन द थर्ड (१८७५, इं.भा. १९४९) ह्या कादंबरीत रशियातील ज्यूंचे चित्रण त्याने केले आहे. Ha-avot we-ha vanim (१८६८) ही त्याने हिब्रू भाषेत लिहिलेली कादंबरी, त्याच्या प्रमुख साहित्यकृतींत अंतर्भूत आहे. आपले अनेक यिद्दिश ग्रंथही त्याने हिब्रूत अनुवादिले आहेत.
ओडेसा येथे तो निधन पावला.
कुलकर्णी,अ.र.