मृदंग : भारतीय संगीतातले एक प्रमुख तालवाद्य. वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार त्याची गणना ‘अवनद्ध’ गटात म्हणजेच ज्यांचे मुख चामड्याचे आच्छादिलेले आहे अशा चर्मवाद्यांमध्ये होते. मृदंग हे नाव काही विशिष्ट घडणीच्या अनेक वाद्यांना जातिवाचक म्हणूनही दिले जाते. मृदंग हे तालवाद्य प्रामुख्याने बैठकीत वाजविले जाणारे आहे. म्हणूनच लोकसंगीतात वापरला जाणारा काठ्यांनी वाजवावयाचा ढोल मृदंगजातीमध्ये येत नाही.  

मृदंगाचा स्पष्ट उल्लेख वैदिक वाङ्‌मयातील शुक्लयजुर्वेद संहितेत त्याचप्रमाणे रामायण, महाभारत, जातककथा, कालिदासादिकांची नाटके, काव्ये इत्यादींमध्ये आहे. मृदंगाची रचना, वादनक्रिया, वादकाचे गुणदोष इत्यादींचे तपशीलवार वर्णन भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. अभिनवगुप्ताच्या मतानुसार ‘मृत अंग’ = मातीचे अंग (कोठी), ‘मृत’ = मेलेल्या प्राण्याचे चर्म आणि ‘मर्दन’ केल्यामुळे बनलेले अशी तीन मते ‘मृदंगा’ च्या व्युत्पत्तीबद्दल आहेत. मृदंगाचे आकार त्रिविध होत : ‘हारीतक’ म्हणजे हिरड्यासारखा म्हणजे कोठी मध्यभागी मोठ्या व्यासाची आणि दोन्ही तोंडांचा व्यास तुलनेने पुष्कळच कमी दुसरा ‘यवाकृति’ म्हणजे जवाच्या आकाराचा, मध्यभागाचा व्यास हारीतकाएवढा फुगीर नसलेला आणि ‘गोपुच्छरूप’ म्हणजे डावा व्यास मोठा, कोठी निमुळत्या व्यासाची आणि उजवा व्यास लहान असलेला. त्यांचे व्यास ‘ताल’ व ‘अंगुल’ या मानात दिलेले आहेत. यामुळेच नाट्यशास्त्राच्या काळी (इ. स. पू. ३०० ते इ. स. २००) आजचा प्रचलित मृदंग अस्तित्वात होता, यात शंका नाही. नाट्यशास्त्रामध्ये सर्व अवनद्ध वाद्यांना ‘पुष्करवाद्ये’ असे सामासिक नाव दिले असून त्यामध्ये अनेकविध मृदंग, पणव, दर्दर, मुरज, आलिंग्य, ऊर्ध्वक, आंकिक ही प्रमुख आणि झल्लरी, पटह वगैरे दुय्यम वाद्ये सांगितलेली आहेत. त्याचप्रमाणे मृदंग, मर्दल व मुरज या वाद्यत्रयीला ‘त्रिपुष्कर’ म्हटले आहे. ‘मुरज’ हे वाद्य म्हणजे मोठा ढोल आणि ‘मर्दल’ ही मोठी ढोलकी. ती आजही बंगाल, आसाम, ओरिसा, तराई इ. भागांमध्ये ‘मादल’ या नावाने प्रचलित आहे. आंध्र प्रदेशात तिला ‘मद्दलम्’ किंवा ‘माटलम्’ असे म्हणतात.

मृदंग आणि ⇨ पखावज ह्या आज प्रचारात असलेल्या वाद्यांमध्ये खूपच साधर्म्य आहे. ह्या वाद्याचा आकार पिंपवजा असतो. वादकाचे दोन्ही हात दोन्ही पुड्यांवर पोहोचून हवे तसे खेळू-फिरू शकतील एवढी कमाल मर्यादा आणि ५५ ते ६० सेंमी. ही किमान मर्यादा या वाद्याच्या लांबीची असते. त्या प्रमाणात डाव्या व उजव्या मुखांचे व्यास अनुक्रमे मोठे-लहान (२५ व १६ सेंमी.) ठेवतात. कोठीचा फुगवटा (ढोलकीप्रमाणे) मध्यावर नसून थोडा डाव्या बाजूस असतो (व्यास सु. ३० सेंमी.) व उजवी निमुळती होत गेलेली त्या प्रमाणात अधिक लांब असते. कोठी, अंग किंवा खोड हे रक्तचंदन, खैर, शिसवी, बीज, आबनूस इ. लाकडांपासून बनवितात. दोन्ही तोंडे बकऱ्याच्या समतल चामड्यांनी मढविली जातात. त्यांना चाटीकडून (किनारीकडून) पाडलेल्या प्रत्येक चोवीस छिद्रांमधून गजऱ्याच्या वीणेच्या मदतीने चामडी वाद्या ओवून ही दोन्ही आवरणे (पुड्या) ताणून बसविली जातात. चामडी वाद्यामधून आठ लाकडी गठ्ठे ओवलेले असतात. हे हातोडीच्या अथवा दगडी गोट्याच्या साहाय्याने वरखाली करून वाद्य आवश्यक स्वरात मिळविले जाते. उजव्या पुडीवर लोखंडाचा वस्त्रगाळ कीस, चिकट लाही, काळी शाई, सरस इ. पदार्थांचा वापर करून वर्तुळाकार थर घोटून बनविला जातो. डाव्या तोंडावर गव्हाच्या पिठाच्या कणकेचा थर वादनापूर्वी दिला जातो. रचनेच्या दृष्टीने कर्नाटकी मृदंगम् आणि इतर मृदंग किंवा पखावज यांमध्ये बाह्यतः दृश्य फरक दोन आहेत. कर्नाटकी मृदंगम्‌ला गठ्ठे नसतात. हा आकाराने लहान असतो. लांबी सामान्यतः ५० सेंमी. नळकांडेवजा कोठीचा फुगवटा मध्यभागी असून त्याचा व्यास सु. २२ ते २३ सेंमी. असतो. डाव्या आणि उजव्या पुडीचा व्यास सु. १८ ते २० सेंमी. असतो. उजव्या पुडीसाठी वापरलेले चामडे पखावजाच्या वा इतर मृदंगांच्या चामड्यापेक्षा दाट असते. तसेच किनारीचे वा चाटीचे आवरण मध्यावरील वर्तुळाकार शाईपर्यंत अर्धा सेंमी. अंतर सोडून ठेवलेले असते. या किनारीच्या चामडी आवरणात अंदाजे ५ सेंमी. लांबीच्या बांबूच्या तासलेल्या चार चपट्या काड्या खुपसून ठेवलेल्या असतात. जाड चामड्याच्या पुडीमुळे तसेच शाईपर्यंत नेलेल्या किनारीमुळे पखावजाच्या नादापेक्षा मृदंगम्‌चा नाद कमी आसदार असला, तरी या चपट्या काड्यांमुळे तो जवारीदार उमटतो.

पखावज व मृदंगम् (कर्नाटकी) यांच्या वादनपद्धतींमध्ये फरक आहे. मृदंगम्‌मध्ये उजव्या पंजाची खुली थाप मारीत नाहीत आणि बोटांनेच अधिक काम असते. त्याचप्रमाणे डाव्या पुडीवरसुद्धा हात पसरट ठेवला जात नसून बोटांचा वापर आघातांसाठी केला जातो. त्यामुळे वादनात वेग अधिक असून पखावजाची घनगंभीरता येत नाही. कर्नाटक मृदंगम् वादनपद्धतीच्या दोन महत्त्वपूर्ण शैली आहेत. एक म्हणजे, मृदंगवादकाने गवयाच्या अथवा तंतकाराच्या सुरांची संगत लयीला अनुसरून मृदंगाच्या सुरावटीतून करणे आणि गायक अथवा तंतकार ह्यांचा गायन वा वादनाच्या गतीने त्याची संगत करत राहणे, दुसरी घरंदाज शैली म्हणजे मृदंगवादक स्वरांचा पिच्छा कौशल्याने नेहमीच्या आवर्तनाबाहेर आड वाजवत पुरवतो.

कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या मैफलीत एखाद्या रागाचा पूर्ण विस्तार झाल्यावर किंवा पल्लवी (बंदीश) संपल्यावर मृदंगवादक एक लहानसे स्वतंत्र वादन करतो. त्यास द्राविडी भाषेत ‘अनियावर्तनम्’ असे म्हणतात. 

कर्नाटकी मृगंदम् वादकांमध्ये तंजावूर नारायणस्वामीअप्पा, कुंभकोणम् अळगुणांबी पिळ्ळै, पुदुकोट्टा दक्षीणामूर्ती पिळ्ळै, ‘मृदंगम्’ कोदंडराम अय्यर, पालघाट मणी अय्यर, पालघाट रघू, शिवरामन् उमलयापुरम्. येल्ला वेंकटेश्वरा राव इ. प्रसिद्ध होत. 

मुळगावकर, अरविंद