मृत्युमान : एखाद्या समाजामध्ये एका वर्षाच्या कालावधीत झालेल्या मृत्यूंचे त्याच कालावधीत जिवंत असणाऱ्या एकूण लोकसंख्येशी असणारे दरहजारी प्रमाण म्हणजेच स्थूल मृत्युप्रमाण वा मृत्युमान होय. (१) सरासरी आयुर्मानात (आयुर्मान अपेक्षेत) होणारे बदल व (२) भिन्न वयोगटांत झालेले लोकसंख्येचे वितरण, या दोन घटकांचा मृत्युमानावर प्रभाव पडत असतो. उदा., एखाद्या देशात वृद्धांची संख्या अधिक असेल, तर त्या देशातील सरासरी आयुर्मानाचे प्रमाण वाढलेले असूनही, तेथे मृत्युमान उच्च असू शकेल. गेल्या दोनशे वर्षांच्या कालावधीत ग्रेट ब्रिटनसारख्या देशात मृत्युमानामध्ये सातत्याने ऱ्हास वा घट होत असल्याचे दिसून आले आहे. १८०० मध्ये ग्रेट ब्रिटनमधील मृत्युमान अंदाजे दरहजारी २५ होते, १९८३ मध्ये ते निम्म्याहूनही कमी (दरहजारी ११·७) झाल्याचे आढळले आहे. १९८१ च्या जनगणना आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारतासारख्या विकसनशील देशांतील मृत्युमान १९७१ च्या मानाने दरहजारी १५·७ वरून १९८१ मध्ये दरहजारी १४·८ वर आले आहे. ते आणखीही खाली जाणे जरूर असले, तरी खरी घट जननमानात होणे निश्चितच आहे. १९७१ मध्ये जननमान दरहजारी ४१ होते, ते १९८१ मध्ये दरहजारी ३६ वर आले आहे. 

पहा : जनांकिकी लोकसंख्या.  

गद्रे, वि. रा.