मृत्पात्री : (पॉटरी). मातीची भांडी तयार करण्याची व ती भाजून अधिक टिकावू करण्याची कला अत्यंत प्राचीन व सार्वत्रिक आहे. या नोंदीत मृत्पात्री कलेल्या विकासाचे काही ठळक टप्पे दाखवले आहेत व संक्षेपाने जागतिक आढावा घेऊन या कलेची वैशिष्ट्ये दिग्दर्शित केलेली आहेत. जर्मन संशोधक बटगर याने इ. स. १७०९ च्या सुमारास काचरसीय मृत्पात्रांवरील (पोर्सलीन) ग्रंथ लिहून ह्या कलेला अग्न्यविद्या (सिरॅमिक्स) अशी शास्त्रीय संज्ञा दिली. पोर्सलीन हा शब्द वापरणारा पहिला माणूस म्हणजे ⇨ मार्को पोलो हा होय. मृत्पात्रीत पुढील प्रकार मोडतात : (१) काच भांडी (ग्लासवेयर) (२) पक्वमृदेची (टेरा कोटा) किंवा पृथिवीय किंवा खापराची पात्रे (३) का चिद् पृथिवीय (ग्लेझ्ड अर्दनवेयर) पात्रे (४) अश्मीकृत पात्रे (स्टोनवेयर) (५) काचीकृत मृत्पात्री (पोर्सलीन) (६) अग्निरोधक वस्तू (रिफ्रॅक्टरी वेयर).
वरीलपैकी पृथिवीय पात्रे वा खापराचे अवशेष जगात सर्वत्र पृथ्वीच्या पोटातील प्राचीन थरात सापडतात परंतु त्यांचा प्रारंभ अमुक प्रदेशात अमुक काळी झाला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पुरातत्त्वविदांनी उत्खननांतून प्राचीनतम संस्कृतीचे अवशेष असणारी मृदापात्रे अनेक संग्रहालयांतून जपून ठेवली आहेत. माणसाला अग्नीचा शोध लागला, मग त्याने वनचर प्राण्यांना नैसर्गिक गुहांतून हाकलून तेथे वस्ती केली आणि नंतर नद्यांच्या काठावरील मातीपासून आधी कच्ची भांडी व नंतर भाजलेली खापरी पात्रे तयार केली म्हणूनच खापराची पात्रे हे एक कालक्रम ठरविण्याचे महत्त्वाचे साधन ठरले आहे. नंतर काचिद् पात्रे (काचेचे आवरण असलेली चकचकीत भांडी) यांचा क्रम लागतो. पुढील ऐतिहासिक आढावा याच क्रमाने मांडलेला आहे :
(१)काचविद्या : शास्त्रीय परिभाषेत काच म्हणजे अति घनीभूत द्रव (सुपर कुल्ड लिक्विड) होय. ह्याचा विलयन बिंदू ५००० सेंटिग्रेडच्या वर असतो. ह्या कलेत भारत देश अग्रेसर मानला जातो. येथे काचमणी, बांगड्या इ. रूपांत ती कला वापरात होती आणि ताम्रचूर्णाने हिरवा रंग प्राप्त करणारी काच ही सौभाग्यवायनात वापरली जात असे. काचेच्या प्राचीन वस्तू भारतात नावडातोडी (नर्मदाखोरे उत्खनन), इंदूर, दंगवाडा, उज्जैन, कोशाम्बी, अहिच्छत्र, रूनीजा ते दक्षिण भारतात सर्वत्र (मौर्यपूर्वकालीन स्थानांत) पुरातत्त्वविदांना सापडली आहेत. काचेच्या मुद्रा पाटणा येथे एक, महेश्वर येथे एक व उज्जैन येथे तीन सापडल्या हेत. ताम्रचूर्णसंयोगाने झालेल्या हिरवट झिलईच्या विटा अनेक उत्खननात सापडल्या आहेत. आधुनिक कालात ही कला अनेक अंगांनी विकसित झाली आहे.
(२) पक्वमृदा किंवा पृथिवीय पात्रे : जगात खापरीचे अस्तित्व पुरातत्त्वज्ञांना इ. स. पू.१२००० वर्षे इतक्या जुन्या काळात असल्याचे दिसून आले आहे. खापरीचे अवशेष प्राचीनतम भारतात कुल्ली, आम्री, नाल, सोधी, बाड, कालिबंगा येथे, तर ईजिप्तमध्ये नाईल नदीच्या खालच्या काठावर फायूम, नागदा येथे सापडले असून नंतर लाल खापरीवर पांढरे चित्रण तसेच पिवळ्यावर लालसर तपकिरी रंगात केलेले चित्रण आढळते. मध्यपूर्वेत जादत नस्त्र व स्यूसा येथे खापरी मिळाली परंतु क्रीट-ग्रीस-मीन या सामुद्रदेशात मिळाली नाहीत. यावरून खापरीची कला भारत व ईजिप्तमध्ये सर्वप्रथम विकसित झाली असावी, असे मानतात. पुढील पायरी म्हणजे धान्याच्या साठवण्यासाठी तीन पायांची उंच मृदा तसेच मानवी अवशेषांसाठी हाताने घडवलेली (कॉइल मेथड) जुळणीची भांडी ही होय. ही ब्रम्हगिरी, पिकलीहाल या भागात मिळाली आहेत. यानंतर चाकावर गोल भांडी होऊ लागली, ती सिंधू-खोऱ्यात व ईजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यात. त्यानंतर रंगकाम करण्याची विद्याही फार प्राचीन आहे. भट्टीत कोळशाचे प्रमाण वाढवून ज्वलन कमी झाले, तर ती लाल भांडी भट्टीतच काळी होतात. त्यांना मण्यांच्या माळांनी घासून चकाकी आणीत.
(३)काचिद् मृत्पात्रे : (ग्लेझड् अर्दनवेयर). हा गट यापुढील मानवी प्रगतीचा आहे. काचिद् किंवा झिलईयुक्त खापरीची पात्रे अधिक टिकाऊ, जलावरोधक व दिसावयास आकर्षक असतात त्यामुळे भाजल्यानंतर पांढऱ्या दिसणाऱ्या मातीपासून (चायना क्ले किंवा कॅओलीन) फुलदाण्या, कपबशा, थाळ्या या वस्तू तयार करतात. या मातीचे साठे आधी चीनमध्ये सापडले. त्यात काचाश्माचे चुर्ण मिसळून चिनी पात्रे तयार होत पण पुढे याच्या खाणी इंग्लंडमध्ये मिळाल्यानंतर या धंद्यांत इंग्लंडला अग्रेसरत्व लाभले. भारतात ही माती सापडल्यापासून या महत्त्वाच्या घटकाबाबत भारतही स्वावलंबी झाला आहे. नुसत्या चिनी मातीचे भांडे भाजल्यानंतर (बिस्किट फायरिंग) ते पाणी शोषणारे असते. ते पांढऱ्या झिलईत बुडवून पुन्हा भाजले म्हणजे जलरोधक, अधिक टिकाऊ व सुंदर दिसते. पांढऱ्या झिलईनंतर त्यावर हाताने चित्रण, एकरंगी छपाई किंवा बहुरंगी परिमुद्रांच्या (ट्रान्स्फर्स) साह्याने चित्रे काढली जातात व पुन्हा उष्णतेने ती एकरूप करण्यात येतात.
(४)अश्मीकृत मृत्पात्रे : भाजण्याची या पुढील प्रगती चीनमधील लोकांनी अधोवाही भट्ट्यात जळणाचा अधिक उपयोग करून साधली त्यामुळे मातीच अंशतः वितळून दगडाइतकी टिकाऊ होऊ लागली. खापरी चांगली तापल्यानंतर जर भट्टीत साधे मीठ झोकले तर त्याचा तप्तपात्राशी संयोग होऊन (साल्ट ग्लेझ्ड) जलरोधक अश्मीकृत पात्रे तयार होतात. या प्रकारात चटणी पात्रे, दगड्या, वाडगे, संडासाचे मोठे नळ, विजरोधक उपकरणे इ. मोडतात.
(५)काचीकृत पात्रे : (पोर्सलीन) ही अग्नविद्येतील सर्वोत्तम निर्मिती होय. या वस्तू प्रथम १२९८ साली मार्को पोलोने यूरोपात आणल्या. पुढे १७०९ मध्ये बटगर या जर्मन शास्त्रज्ञाने मातीत अस्थिचूर्ण मिसळून ह्या पदार्थाची हुबेहूब निर्मिती केली. माणसाची हाडे फॉस्फेटच्या सेवनाने दृढतर होतात, तसाच परिणाम मृदा मिश्रणात हाडाची पूड घातल्याने होतो त्यामुळे पातळ, पारदर्शक व अधिक टिकाऊ पोर्सलीन निर्माण होते. वयाच्या पस्तिसाव्या वर्षीच ह्या संशोधकाचा अंत तुरुंगात १७१९ साली झाला. त्यानंतर फ्रीड्रिख द ग्रेटने त्याचा सबंध कारखाना लुटून कामगारांसकट बर्लिनमध्ये आणला व वाढविला. कलकत्त्याची बंगाल पॉटरी, दिल्लीची हितकारी पॉटरी, ठाणगढ येथील परशुराम पॉटरी व जामनगर येथील नवभारत पॉटरी ह्या या प्रकारात मोडतात. विद्युत्रोधक उपकरणे याच गटात येतात.
(६)अग्निरोधक मृत्पात्रे : धातू वितळविण्यासाठी मुशी आणि भट्ट्या तयार करण्यासाठी निरनिराळ्या आकारांच्या विटांची गरज असते. त्यासाठी मृदा-मिश्रणात ॲल्युमिना हा घटक वाढवावालागतो. आता तर वातावरणात घर्षणाने जी उष्णता निर्माण होते, तीपासून अंतराळ्यानांचे रक्षण करण्यासाठी नवीन उष्णतारोधक पदार्थही बनविण्यात आले आहेत.
ऐतिहासिक आढावा: पाश्चात्य संशोधकांनी ईजिप्तमधील मृत्पात्रीच्या प्राचीनतत्त्वावर खूपच भर दिला त्यामानाने भारतीय मृत्पात्रीची बरीच उपेक्षा केली. कालनिर्णयाच्या बाबतीत तर भारतीय कालक्रम हेतुतः फारच अलिकडे ओढलेले दिसतात. पुढील माहितीत पाश्चात्य लेखकांची कालगणना पश्चिमेकडील कलेच्या इतिहासात प्रमाण मानली असून भारतीय क्षेत्रात कालगणना निश्चित अशी दिलेली नाही, क्रम मात्र बरोबर दिला आहे. दक्षिण व मध्य अमेरिकेत इ. स. पू. ३७०० या काळातील जे अवशेष सापडले, त्यांमध्ये टोपलीसारखी वीण असलेली मृत्पात्री तसेच माणसे व मगरीची चित्रे सापडली आहेत.
ईजिप्त: मेंफिस येथे बहुधा विटा बनविण्यास इ. स. पू. ५००० ते ३००० दरम्यान प्रारंभ झालेला मानतात. पिरॅमिडमध्ये काचिद् (सिरॅमिक्स) पात्रे व काचिद् विटा सापडल्या असून त्यांच्या कृतींची चित्रणे भिंतीवर रंगविलेली आहेत. त्यांचे नमुने मोठ्या संग्रहालयांत असून निनेव्ह-बॅबिलनमधील अवशेष लूव्ह्र ह्या पॅरिसमधील संग्रहालयात आहेत. ही कला ॲसिरिया व बॅबिलनमध्येही पूर्णावस्थेत गेली होती, पण तिचे अवशेष आढळत नाहीत. इराणमध्ये झिलईची कला फार प्रगत झाली होती. या कलेला प्रथम ईजिप्तच्या फेअरो राजांचा आश्रय लाभला. त्यांनी अनेक देशांच्या कारागिरांना आश्रय दिला ह्या राजांना ईश्वरी अवतार मानल्यामुळे उत्तमोत्तम कलावस्तूंचा तेथे संग्रह झाला. थीव्ह कालात (इ. स. १७००) ह्या कलेची वाढ तेथे थांबली. ईजिप्तमधील मृतांच्या थडग्यात मिळालेल्या तोटींच्या झाऱ्या ह्या इ. स. पू. ७५०० या काळातील असाव्यात. बहुधा पौर्वात्य देशांच्या संपर्कामुळे ईजिप्तमधील उत्खननांत बैलांची चित्रेही आढळली असावी. काही पात्रांवर नावा, तर काहींवर फ्लेमिंगो पक्ष्यांची चित्रे आहेत. तेथे झिलईची भांडी मोठ्या प्रमाणावर तयार केला जात. इजीअन बेटे व सिरिया यांमधून गुलाम म्हणून पकडून आणलेल्या कारागिरांकडून ईजिप्तमधील कला वाढीस लागली. तूतांखामेनच्या थडग्यात कमळाच्या नक्षी आढळतात. ही भारताची देणगी असावी. दहाव्या वंशाच्या कारकीर्दीत तेथील मृत्पात्री कला अत्यंत विकसीत झाली होती. तत्कालीन काचपात्रावरील गडद निळा, किरमिजी, पिवळा, तपकिरी व हिरवा हे काचरंग पूर्णावस्थेत पोहोचलेले आणि आरेखने स्पष्ट व ठसठशीत आढळतात तथापि ईजिप्तमधील कलेत पारंपारिक गतानुगतिकत्व फार आढळते. [→ ईजिप्त].
मृत्पात्री कलेची वाढ युफ्रेटीस व टायग्रिस या नद्यांच्या दुआबातील ⇨ मेसोपोटेमिया किंवा असुर देश येथे पुष्कळच झाली होती, पण सततच्या राज्यक्रांत्या व लुटालुटी यांमुळे तेथे त्यांचे अवशेष सापडत नाहीत. पुरामुळेही वस्त्या वाहून जात. उबैद काळात तेथे फक्त एकरंगी पात्रे तयार होत व त्यांवर दाट मृत्तिका रंगांनी कलाकुसर केली जाई. त्यानंतर जादत नस्त्र काळातील बहुरंगी भांडी सापडली आहेत. इ. स. ३००० वर्षांपूर्वीपासून येथून सुंदर मृत्पात्री निर्यात होत असत. भारतात अशोकपूर्व माहेश्वरी लिपी प्रचलित असताना येथील मातीच्या इष्टिकांवर कीलाकृती लिपी आढळते. ब्रिटिश म्यूझीयममधील एका इष्टिकेवर कीलाकृती लिपीत अर्टेझर्झीसचा मंत्री उर्माणू याच्या कराराचा मजकूर असून त्यावर माहेश्वरी लिपीत संस्कृत भाषेत साक्षी नोदल्या आहेत. हामुराबी या पराक्रमी राजाने (इ. स. पू १७९३–५०) शिल्पकलेला उत्तेजन दिले. बॅबिलोनियाने मृत्पात्रीच्या कलेला जी देणगी दिली, ती हफ्त-रंग-साझी (मेटॅलिक कलर) ही होय. [→ बॅबिलन बॅबिलोनिया].
भूमध्य सामुद्रीय देश : परकीय आक्रमणापासून सुरक्षित राहिलेल्या भूमध्य सामुद्रीय देशांनी आपला व्यापार वाढवीत वाढवीत ह्या देशांत नवीन कलाप्रकाराची वाढ केली. येथील लोकांवर धार्मिक परंपरेचा पगडा नाममात्र होता. त्यांचा ओढा स्वतंत्र स्वतंत्र, निसर्गाभिमुख पण यथादर्शी रेखनाकडे होता. त्यांच्या अलंकरणांत व रंगात विविधता आणि आरेखनात भौमितिक आकृतीबंध तसेच मासे, शंखशिंपले व अष्टपादादी जलचर प्राण्यांची विपुलता आढळते. नागमोडी आकारही ते निर्माण करीत. ⇨ क्रीट आणि जवळच्या बेटांमध्ये ‘कामारिस’ शैली फार प्रसिद्ध आहे. तिच्यात मनुष्याकृती व प्रसंगचित्रणाचा अभाव असून भांड्यांचे घाट डौलदार असतात तसेच फुलांच्या व इतर वस्तूंच्या नैसर्गिक आकारांचे त्यांनी अमूर्तीकरण केलेले आढळते. क्रीटच्या कलेचा ग्रीकांवर मोठआ प्रभाव पडला होता. येथील सोनार व जवाहिरे यांना मायीनियन लोकांनी आपल्या राज्यात नेले होते. यानंतर ग्रीक कलेचे नवयुग अवतरले. ग्रीक कलेचा वारसा इट्रुस्कनांनी [→ इट्रुस्कन संस्कृति (कला)] व नंतर रोमन लोकांनी [→ रोमन कला] घेतला आणि आपल्या कला त्यांनी परदेशात लांबपर्यंत पोहोचविल्या. या कालौघात ग्रीक कलेचे अवशेष फार टिकले नाहीत आणि त्यांच्या कलेची कल्पना त्यांचे साहित्य किंवा उपलब्ध मृत्पात्रांवरून करावी लागते. उत्खननात पुष्कळ पुष्पपात्रे मिळाली आहेत परंतु त्यांचा उपयोग मद्यपात्रे म्हणून होई. कालानुक्रमाने काळी, तांबडी व झिलईयुक्त मृदापात्रे असे त्यांचे तीन विभाग पडतात. त्याच्या मनुष्याकृतींवर ईजिप्ती परंपरेचा ठसा दिसतो. वास्तवाचा प्रवाह चित्रकलेत आणून सोडण्याचे काम ग्रीकांनीच केले. बाह्य रेषा स्पष्ट व स्वच्छ दाखविल्यामुळे त्यांच्या आकृती उठावदार दिसत व त्यात कोठेही विरूपता दिसत नसे [→ ग्रीक कला].
मध्ययुगीन यूरोपात मृत्पात्री कला परंपरागत स्वरूपाचीच राहिली. पुढे प्रबोधनकाळात लिओनार्दो दा व्हींची, रॅफॅएल, मायकेलअँजेलो यांच्या कलाकृतींमुळे एका नवयुगाचा प्रारंभ होऊन फ्लॉरेन्स व रोम ही कलाकेंद्रे प्रसिद्धीस आली.
मृद्भांड-कला ही चीनकडून मध्य आशियातून इटलीत गेली तर अरब व मूर लोकांनी ती स्पेनमध्ये नेली. प्रारंभी ख्रिस्ती लोकांत ह्या कलेची उपेक्षाच झाली परंतु पंधराव्या शतकात मात्र लूकादेल्ला रोब्ब्या याने मायोलिका ही एकदमच झिलईसकट मृद्भांडी भाजण्याची कला निर्माण केली आणि तिची वाढ फ्रान्समध्ये फ्राएन्झा येथे राजाश्रयाने होत गेली. जोसाया वेजवुड या इंग्रज कारागिराला १७६५ मध्ये इंग्लंडच्या राणीने आश्रय दिला तेव्हापासून ब्रिटिश मृत्पात्रीकलेला जोराची चालना मिळाली. जर्मनीत ⇨ ड्रेझ्डेन हे महत्त्वाचे केंद्र बनले, त्याच वेळी जपाननेही या कलेत फारच मोठी आघाडी मिळवली.
चीन : चिनी मृत्पात्रीचा इतिहास इ. स. पू. ३००० पर्यंत मागे जातो. त्याकाळात चीनमध्ये मातीची भांडी मातीच्या लोळ्या रचून करीत. तत्कालीन थांगचा घोडा व थडग्यातील मूर्ती उपलब्ध आहेत. पुढे चाऊ काळात अश्ममूर्ती व लाखेच्या कलेचा उदय झाला. इ. स. पू. २२१ ते २०६ या काळात माथेफिरू बादशाहाने मूर्तीभंजन व ग्रंथांच्या होळ्या केल्या असल्या तरी इ. स. पू. २०६ च्या सुमारास भारतातून आयात होणाऱ्या काचेची नक्कल करण्याच्या खटपटीतून पहिले काचीकृत (पोर्सलीन) पात्र तयार झाले [→ चीन (चिनीमातीची भांडी)]. या काचीकृत मृत्पात्रीला परिपूर्णता आली ती इ. स. ५८१ ते ६१८ या सुई वंशाच्या आणि इ. स. ६१९ ते ९७६ या थांग वंशाच्या कारकिर्दीमध्ये. यांपैकी दुसऱ्या कालखंडातच चीन हे जगातील सर्वांत मोठे साम्राज्य बनले. पुढे ९६० ते १५७९ ह्या कालखंडात चीन जगापासून अलिप्त राहिला. याच काळात तेथे एकरंगी काचिद् पात्रांच्या (ग्लेजड अर्दनवेयर) आकारात व मृद्रंग कलेत परिपूर्णता आली तसेच पोतांमध्येही सुधारणा झाली. चंगीझखानाच्या आक्रमणानंतर येथील सर्वच कलानिर्मितीला ओहोटी लागली.
इ. स. १६४४ ते १९१२ या प्रदीर्घ काळात जरी चिनी साम्राज्य अधोगतीला गेले. तरी तेथील कलांच्या क्षेत्रात मात्र सतत प्रगती होत राहिली. मृत्पात्री आयात करणारे फ्रान्स व जर्मनी हे देश या विद्येत पुढे येऊ लागले. पुढे जोसाया वेजवुड व ड्वाइट यांनी या विशिष्ट कलेत इंग्लंडला जगातील पहिल्या क्रमांकावर आणून बसवले.
चीनमधून दक्षिण कोरियामार्गे ही कला जपानी बेटांत शिरली. तेथे सुयुकी ही शैली निर्माण झाली. आठव्या शतकात जपानी मृत्पात्रीनिर्मितीची नारा व नंतर क्योटो ही केंद्रे प्रसिद्ध होती.
भारत : जागतिक कलेतिहासात यूरोपीय लेखकांकडून भारताला क्वचितच न्याय लाभला आहे. ईजिप्तच्या कलेवर पौर्वात्य कलांचा मोठा प्रभाव पडला तसेच ईजिप्तचे राजवंश आशियातूनच आले होते. असे अलीकडे बज, सेस इ. यूरोपीय अभ्यासक म्हणू लागले आहेत. भागवत पुराणात स्पष्टच उल्लेख आहे की, सातव्या वैवस्वत मन्वंतरापूर्वीच्या मन्वंतरांत कश्यप (कॅस्पिअन) समुद्र, आफ्रिका, इराण, तुर्कस्थान इ. देशांत भारतीय वसाहतकार गेले होते. वेदकालीन मृत्पात्रीचा वेध घेताना ‘दीप्ति’ म्हणजे पणती, ‘महावीर’ म्हणजे उतरंडीच्या आकाराचे बोळके, ‘मोघा’ म्हणजे उंच गळ्याचे भांडे, ‘सवतीवरी’ म्हणजे पाण्याचा डेरा, ‘एकघना’ म्हणजे लहान घागरी, ‘शराव’ म्हणजे परळनामक चौकोनी भांडे इत्यादींचे उल्लेख यजुर्वेदाच्या अठराव्या अध्यायात सापडतात त्याचप्रमाणे कृष्णयजुर्वेदाच्या पाचव्या अध्यायातील रूद्रसूक्ताच्या चमक विभागातील पाचव्या अनुवादात आलेल्या पुढील शब्दांवरून तत्कालीन मृत्पात्रीचा परिचय घडविता येतो. ते शब्द असे : ‘अश्मा’ (पेबल्स), ‘मृत्तिका’ (क्ले), ‘गिरय’ (सरफेस रॉक), ‘पर्वत’ (माँटेनस रॉक), ‘सिकता’ (सिलिका), ‘वनस्पतय’ (अल्कलाइन हर्ब्स) इत्यादी. यजुर्वेदाच्याच प्रथम अध्यायात मृदापात्रांची प्रशंसा, तेराव्या अध्यायात ‘इष्टका’ आणि ‘उखा’ (वेदी-चिती) यांच्या प्रशंसा आहेत, तर ‘सीनीवाली’ देवतेच्या पूजेच्या वेळी ‘शतछिद्र कुंभी’ या पात्रांची उतरंड रचतात, असे तेथे वर्णन आढळते. या सर्व वर्णनातून भारतीय मृत्पात्रीची कल्पना करणे शक्य होते.
सांकलियांच्या पुढाकाराखाली १९५८ मध्ये नावडातोडी (महेश्वर) येथील ऊत्खननात यज्ञशाला मिळाली होती हे त्यांनी १३ वर्षानंतर प्रकट केले. कालिबंगा येथे तीन यज्ञशाला सापडल्या आणि आता इनामगाव (महाराष्ट्र) व दंगवाडा (उज्जैन) येथे देऊळ, यज्ञकुंड व पात्रे सापडली आहेत. यानंतर मौर्यकालीन पात्रे उत्खननांत मिळाली आहेत. जॉर्ज बर्डवुड म्हणतो, की मौर्यकालापासून उज्जैन, ग्वाल्हेर, कनौज, चितोड, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल (नडिया), येथे काचिद् विटा सापडल्या आहेत. सिंधमध्ये (हल्ली पाकिस्तान) १०२० इसवीत उद्ध्वस्त झालेले ब्राह्मणाबाद उत्खनित केले, तर प्राचीन हिंदू कारागिरीवर प्रकाश पडेल असे विलियम फर्निवालने नमूद करून ठेवले आहे. मॅकॅनोची हा आपल्या प्रतिवृत्तात लिहितो की, सिंध-मुलतानमधील (हल्ली पाकिस्तान) काशीगर (काचकार) या विद्येत फार पारंगत होते, अशीच केंद्रे ठठ्ठा, जरूक, हाला व सिंध-हैदराबाद (हल्ली पाकिस्तान) ही होती. दक्षिणेतील मदुराईच्या पाण्याच्या झाऱ्या फार वैशिष्ट्यपूर्ण असत. बर्डवुड म्हणतो की, हिंदुस्थानातील मृदा पात्रे आकारात निसर्गाशी साम्य राखतात आणि साधेपणा, उपयुक्तता, गृहशोभा व हस्तकौशल्य यांत ती जगात अद्वितीय ठरली आहेत. भारतात प्राचीन काळापासून मृत्पात्रीची केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत : पंजाब-अमृतसर, होशियारपूर, कांग्रा, कोहाट, लुधियाना, आझमगढ उत्तर प्रदेश निझामाबाद, वाराणसी, खुर्जा, चुनार बिहार-पाटणा (हे कृत्रिम बिद्रीसदृश कारागिरीबद्दल विशेष प्रसिद्ध आहे) बंगाल-सूरजगढ (भागलपूर), बेऱ्हमपूर मध्य प्रदेश-ग्वाल्हेर राजस्थान-कोटा (रंगविलेली मृत्पात्री) आणि अमरोही (मुलामा दिलेली मृत्पात्री) गुजरात-अहमदाबाद आणि सुरत आंध्र-हैदराबाद कर्नाटक-खानापूर तमिळनाडूतील मदुराई, केरळ-त्रावणकोर इत्यादी.
ईस्ट इंडिया कंपनीने १८३९ मध्ये रेल्वेएंजिन-भट्ट्या वगैरेंसाठी कलकत्ता मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत कोलगंजच्या (बिहार) मातीचे संशोधन करून काचीकृत मृत्पात्रीचे प्रयोग केले व पत्थर घाट येथे १८६० मध्ये पहिला कारखाना काढला. इ. स. १८७२ मध्ये मुंबईच्या सर ज. जी कलामहाविद्यालयाच्या [→ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट] आवारात टेरी यांनी मृदापात्र-विभाग सुरू केला व किपलिंगच्या मदतीने भट्टी बांधली परंतु कच्चा माल इंग्लंडहून आयात होई. इंग्लंडमध्ये मुद्दाम अभ्यास करून आल्यावर १८९५ साली अर्नेस्ट फर्न्स यांनी ज. जी. कलामहाविद्यालयाच्या आवारात सर जॉर्ज क्लार्क स्टुडिओ काढला. तो १९२२ साली बंद झाला परंतु महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने व जे. जे. कलामहाविद्यालयाचे तत्कालीन डीन शंकर पळशीकर यांच्या प्रोत्साहनामुळे १९७२ साली ल. श्री.वाकणकर यांनी तेथे पुन्हा मृत्पात्रीचे वर्ग सुरू केले. खादी ग्रामोद्योगाच्या साह्याने भद्रावती (चंद्रपूर-महाराष्ट्र) येथील कृष्णमूर्ती मिरमिरा यांचे रीजनल पॉटरी सेंटर हे फार महत्त्वाचे कार्य करीत असून मिरमिरा यांनी इंडियन पॉटरी (१९७३) हे पुस्तकही प्रसिद्ध केले आहे. १९७८ मध्ये त्यांनी काचिद् पात्रे आणि पांढऱ्या चिनी मातीच्या उत्पादनास प्रारंभ केला आणि कुंभकार वर्गात एकप्रकारे नवजीवन निर्माण केले.
पहा : ग्रामोद्योग; भारत (हस्तव्यवसाय); महाराष्ट्र (हस्तव्यवसाय); मृत्तिका उद्योग; लाखकाम; हस्तव्यवसाय.
संदर्भ : 1. Cox, Warren E. Pottery and Porcelain, Vol. I, New York, 1963.
2. Garner, Harry, Oriental Blue and White, London.
3. Jenner and Kent, Ceramics, London, 1962.
4. Mirmira, S. K. Indian Pottery, Bhadrawati, 1973.
5. Popper, P. Ed., Special Ceramics : 1964, New York, 1965.
6. Roy, Burman, B. K. Ed. Pottery at Kumbharwada : Bombay, New Delhi, 1961.
7. Singh, H. N. History and Archaeology of Black and Red Ware, Delhi, 1982.
8. Tait, Hugh, Porcelain, London, 1963.
९. देव, शां. भा. महाराष्ट्रातील उत्खनने, मुंबई, १९६२.
वाकणकर, ल. श्री.
चित्रपत्र :