मृगशृंगे आणि शिंगे: ही काही खुरी प्राण्यांच्या डोक्यावर असून सामान्यतः त्यांची  एक जोडी असते. शिंगे हाडांची बनलेली असून ती कवटीपासून निघालेली असतात. सस्तन रोमंथी (रवंथ करणाऱ्या) प्राण्यांच्या तीन उपगणांपैकी समखुरी (पायाच्या खुरांची संख्या सम असलेल्या आर्टिओडॅक्टिला) उपगणातील प्राण्यांत ही प्रामुख्याने आढळतात. निरनिराळ्या कुलांतील प्राण्यांत शिंगाचे आकार निरनिराळे असतात, इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या जातींतही ते निरनिराळे असतात. हल्ली अस्तित्वात असणाऱ्या सस्तन समखुरी प्राण्यांत मृगशृंगे मृगकुलात (सर्व्हिडी कुलात), तर शिंगे गोकुलातील (बोव्हिडी कुलातील) गाय, मेंढी इ. प्राण्यांत आढळतात. अमेरिकेतील प्राँगबक या अँटिलोकॅप्रिडी कुलातील प्राण्यासही शिंगे असतात. या प्राण्यास प्राँगहॉर्न असेही म्हणतात. जिराफिडी या कुलातील जिराफ व ओकापी यांनाही शिंगे असतात. मृगशृंगे आणि शिंगे यांचा मुख्य उपयोग स्वयंरक्षणाकरिता व (विशेषतः विणीच्या हंगामात) शत्रूवर हल्ला चढविण्यासाठी होतो. पूर्ण वाढ झालेली मृगशृंगे केवळ उघड्या अस्थीचीच असून दरवर्षी गळून पडतात व त्यांच्या जागी नवीन उगवतात. शिंगांवर शृंगद्रव्याचे आवरण असून ती गळून पडत नाहीत. 

प्रकार : सस्तन समखुरी प्राण्यांत शिंगांचे चार प्रकार आढळतात. 

(१)मृगशिंगे : सामान्यतः ही नर मृगात आढळतात. रेनडियर या जातीच्या मृगात ती नराप्रमाणेच मादीलाही असतात. मृगांच्या वर्गीकरणात मृगशृंगाच्या रचनेस फार महत्त्व आहे. काही जातींत मुळास एक मुख्य शृंग असून त्याला शाखा असतात, तर काहींची शृंगे द्विशाखाक्रमी किंवा जटिल शाखक्रमी असतात.

आ. १ मृगशृंगाचा अनुदैर्घ्य (लांबीला समांतर) असणाऱ्या दिशेतील छेद : (अ) मखमली कातड्याने वेढलेले वाढ होत असलेले मृगशृंग (आ) गळून पडण्याच्या तयारीत असलेले पूर्ण वाढ झालेले मृगशृंग (इ) मृगशृंग गळून पडल्यावर शिल्लक राहणारा खुंट : (१) अस्थिमय गाभा, (२) मखमली कातडे, (३) देठ, (४) मृगशृंगाच्या बुडाशी असणारा घन अस्थिमय भाग, (५) अस्थिद्रव्याचे ज्या ठिकाणी शोषण सुरू होते तो भाग.

मृगशृंगे ही कवटीची उपांगे होत. या शृंगांचा उगम कवटीच्या ललाटास्थीत (कपाळाच्या हाडात) होतो. ही शृंगे भरीव असतात, झपाट्याने वाढतात व थोड्या काळात पूर्णावस्थेत पोहोचतात. कवटीवर प्रथम शिंगाच्या तळाशी शृंगापासून काही अंतरावर एक हाडाचा उंचवटा तयार होतो व यामुळे कवटीवर देठासारखी एक रचना तयार होते आणि यावर शृंग आधारले जाते. हा उंचवटा संवेदनाक्षम कातडीने झाकलेला असतो व या भागास रक्तपुरवठा पुष्कळ असतो. हे कातडे मऊ, असून त्यावर मखमलीसारखे आखूड केस असतात व तिच्या आवरणाखाली शृंगाची वाढ होते. या अवस्थेत शृंग मऊ व नाजूक असतो. शृंगांची वाढ होण्यासाठी कॅल्शियमाचा पुरवठा रक्तातून होतो. ही वाढ झपाट्याने होते. शृंगाचा गाभा अस्थिमय असून हे शृंग कवटीवरच्या हाडाच्या उंचवट्यावर मजबूतपणे उभे असते. शृंगाची वाढ होत असतानाच त्याच्या मुळाशी अस्थिद्रव्य जमू लागते व यामुळे त्या भागाचा रक्त पुरवठा कमी होत जाऊन शेवटी पूर्णपणे थांबतो. परिणामी शृंगावरील कातडे वाळते व गळून पडते. या कातड्यास रक्तपुरवठा होत नसल्याने ते गळून पडताना रक्तस्त्राव होत नाही अथवा प्राण्याला तो वेदनामयही होत नाही. कवटीवरील देठावर पुन्हा नवीन कातडे येण्यास सुरूवात होते आणि याच सुमारास जुने शृंग गळून पडते व नवीन शृंग फुटण्यास प्रारंभ होतो. मृग दर वर्षी आपली जुनी शृंगे टाकतो. नव्या शृंगात पूर्वीपेक्षा एक-दोन फांद्या जास्त असतात.

 

जेव्हा मृग ऐन जवानीत असतो तेव्हा त्याच्या शृंगांचा पूर्ण विकास झालेला असतो. जसजसे त्याचे वय वाढत जाते तसतसा शृंगांचाही ऱ्हास होऊ लागतो. शृंगांच्या मुळाशी असलेले अस्थिद्रव्य कमी होऊ लागले की, शृंग गळण्याची प्रक्रिया सुरू होते. अस्थिद्रव्य कमी होऊ लागले की, मृग प्रक्षोभक होतो व झाडाच्या बुंध्यावर किंवा इतरत्र आपली शृंगे घासू लागतो त्यामुळे त्यांच्यावरील मखमली कातडी निघून जाण्यास सुरूवात होऊन ती हलू लागतात व परिणामी गळून पडतात. शृंगांची नैसर्गिक वाढ मृगास मिळणाऱ्या आहारावर (विशेषतः खनिजे व जीवनसत्त्वे यांवर) अवलंबून असते. शृंगांची वाढ व ती गळणे हे नराच्या शरीरात निर्माण होणाऱ्या लिंग-हॉर्मोनांवरही (प्रजोत्पादक ग्रंथींनी उत्सर्जित केलेल्या उत्तेजक स्त्रावांवरही) अवलंबून असते. खच्ची केलेल्या नरात शृंगांची वाढ नीट होत नाही. 


(२)गोकुलातील प्राण्यांची शिंगे : या कुलात नर व मादी या दोघांनाही शिंगे असतात. शिंगाचा गाभा हाडाचा असून त्यावर त्वचेचे आवरण असते. त्वचेच्या बाहेरच्या स्तराचे केराटिनीभवन झाल्यामुळे [केराटीन या संरक्षक प्रथिनात रूपांतर झाल्यामुळे → केराटिने] हे आवरण संरक्षणक्षम बनते. शिंगाचा आतील गाभा पोकळ असतो. शिंगांना शाखा किंवा फाटे फुटलेले नसतात. बाहेरचा केराटीनयुक्त स्तर सोडून बाकीचा सगळा भाग सजीव असल्यामुळे वाढ एकसारखी होत असते. बाहेरचा स्तर तळापासून उत्पन्न होतो आणि आतल्या गाभ्याचे हाड जसजसे वाढून लांब होत जाते तसतसा त्याच्या बरोबरीने हा स्तर पुढे वाढत जातो. शिंगास जरी शाखा फुटत नसल्या तरी ते वाकडे, वलयाकार अथवा पिळीव अशा आकाराचे वाढू शकते.

आ. २. मृगशृंगांची वाढ व गळणे (व्हर्जिनिया मृग): (१) उन्हाळ्याच्या प्रारंभी नवी शृंगे उगवण्यास सुरवात होते, प्रथमतः देठ वर येतात (२) उन्हाळ्याच्या शेवटी मखमली कातडीच्या आवरणाखाली शृंगांची वाढ पूर्ण होते (३) मखमली कातडी सुकून गळून पडते व खालील शृंगांची तीक्ष्ण टोके दिसू लागतात (४) हिवाळ्यात मृगशृंगे गळून (सामान्यतः एका वेळेस एक) पडतात व त्यामुळे होणाऱ्या लहान जखमा चटकन बऱ्या होतात

गोकुळातील हरीण, कुरंग, एण (काळवीट) वगैरेंचा समावेश असणाऱ्या उपविभागातील प्राण्यांत शिंगे सामान्यतः लांब, कमीअधिक दंडगोलाकार व बहुधा वीणा या वाद्याच्या आकाराची असतात. त्यांच्यावर सामान्यतः वलयांच्या ठळक खुणा असतात. बैल, शेळ्या व मेंढ्या यांच्याप्रमाणे त्यांच्या शिंगात हवेच्या पोकळ्या असलेल्या पोकळ्याप्रमाणे संरचना नसून ती पूर्णपणे भरीव असतात. यांच्या माद्यांना शिंगे असतातच असे नाही.

(३)प्राँगहॉर्न : या प्राण्यांची एकच प्रजाती उत्तर अमेरिकेत अस्तित्वात आहे. अँटिलोकॅप्रा अमेरिकाना यास प्राँगहॉर्न अँटिलोप म्हणतात. या प्राण्याच्या नर व मादी दोघांसही शिंगे असतात. यांची शिंगे चापट असून त्यांवर केसांचे आवरण असते. विणीच्या हंगामानंतर शिंगांवरील हे आवरण टाकले जाते व नवीन आवरण येते. शिंगे सरळ असून पुढे झुकलेली व त्यांची टोके मागे वळलेली असतात. शिंगांची लांबी सरासरी २५ सेंमी. असते. शिंगांच्या वरच्या अर्ध्या भागातून लहान शाखा पुढे झुकलेली असते.

(४)जिराफ व ओकापी : या प्राण्यांची शिंगे इतर स्तनी प्राण्यांच्या शिंगांपेक्षा वेगळी आहेत. जन्मतःच या प्राण्यांच्या डोक्यावर उपास्थींच्या (कूर्चेच्या) गाठी असून त्यांवर त्वचेचे आवरण असते.

या गाठींची वाढ आयुष्यभर होत राहते. काही कालानंतर या गाठींचे अस्थिभवन होते. शिंगाचा गाभा कवटीपासून प्रथम निराळा असतो पण पुढे तो कवटीशी संलग्न होतो. जिराफात ही शिंगे डोळ्यामागच्या पार्श्वास्थीवर उगवतात, तर ओकापी या प्राण्यात ती ललाटास्थीवर डोळ्याच्या वरच्या भागावर असतात. या शिंगावर कातडे व केस यांचे आवरण असते. शिंगांची वाढ मादीपेक्षा नरात जास्त होते. ललाटास्थीच्या अग्रभागी जिराफाच्या डोक्यावर एक मध्यस्थित शिंगही असते.

विषमखुरी (पायाच्या खुरांची संख्या विषम असलेल्या) सस्तन प्राण्यांपैकी गेंड्यास शिंगे असतात. काही गेंड्यांना एकच असते, तर काहींना दोन असतात. शिंग नाकाच्या पृष्टाच्या मध्यरेषेवर असते. दोन शिंगे दिसली, तरी ती याच ठिकाणी पण एकामागे एक असतात. गेंड्याचे शिंग त्वचेच्या अधिचर्मीय स्तरापासून बनलेले असते. त्वचेवरील केसही याच्या रचनेत भाग घेतात व त्यामुळे ते तंतुमय असते. त्यात हाडाचा गाभा किंवा बाहेरचे शृंगी आवरण नसते. या शिंगाचा क्वचित प्रसंगी स्वसंरक्षणाकरिता उपयोग केला जातो. 

समखुरी प्राण्यांमध्ये त्वचेने आच्छादिलेल्या अस्थीच्या उंचवट्यातून शिंगे उत्पन्न झाली. प्रथम ती जिराफाच्या शिंगासारखी असावीत. या स्थितीतून दोन परंपरा उत्पन्न झाल्या. एकीत त्वचा नाहीशी होऊन शिंगे गळून पडणे व त्या जागी नवीन शिंगे येणे असा मृगशृंगांचा प्रकार निर्माण झाला, तर दुसऱ्या प्रकारात मृदुत्वचेच्या आवरणाचे कठीण शृंगी पदार्थात रूपांतर झाले व यामुळे शिंगे नियमित काळाने गळून न पडता त्यांची वाढ होत राहिली व त्यांना शाखा फुटल्या नाहीत. या प्रकारच्या शिंगांचा गोकुळात विकास झाला. 


आ.३. गायीच्या शिंगाचा अनुदैर्घ्य छेद : (१) अतस्त्वचा,(२) अधिचर्म, (३) अस्थिमय गाभा, (४) शृंग द्रव्याचे आवरण.

शिंगांचे उपयोग : पुष्कळशा वस्तू बनविण्यासाठी मनुष्याने शिंगे वापरली आहेत. या कामाकरिता प्रामुख्याने गोकुलातील प्राण्यांची शिंगे वापरली जातात. प्राचीन ग्रंथांत शिंगांचा उल्लेख आहे. प्राचीन संस्कृतीतही शिंगांचा वापर झाल्याचे आढळते. गायी व बैल यांना समाजात महत्त्वाचे स्थान होते व त्यांची पूजा होत असे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर असलेली शिंगे महत्त्वाची मानली जात असत. फार पुरातन काळापासून मनुष्याने शिंगापासून कंगवे, फण्या, लहान कुप्या, पाणी पिण्याचे लहान प्याले, पानपात्र, चमचे, गुंड्या इ. वस्तू बनविल्या आहेत. पुष्कळ वेळा या वस्तूंवर उत्तम कोरीवकाम आणि नक्षीकाम केले जात असे. तसेच त्यांवर चांदीचे पत्रे बसवून नक्षीकाम केले जात असे. शिंगापासून फार प्राचीन काळी वाद्ये बनविली जात असत. मध्ययुगीन काळात युद्धाची घोषणा रणशिंग फुंकून केली जात असे. अगदी मुळातले ब्युगूल शिंग बैलाच्या शिंगापासून बनविले गेले.

आ. ४. काही प्राण्यांची मृगशृंगे : (१) गवा, (२) वन्य मेंढी (बिग हॉर्न), (३) प्राँगहॉर्न, (४) मूस, (५) रेनडियर.

आल्फ्रेड द ग्रेट यांच्या काळात वेळ मोजण्यासाठी मेणबत्ती वापरीत असत. या जळत्या मेणबत्तीस वारा लागू नये म्हणून तीभोवती पारदर्शक शिंगाचा पडदा ठेवला जात असे. पुढे अशा पारदर्शक शिंगाचा उपयोग कंदिलास चकाकी देण्यास करत असत. लष्करातील शिपाई शिंगाचे चिलखत वापरत असे व त्याच्या तलवारीची मूठ शिंगाची असे. लहान मुलांच्या प्राथमिक पुस्तकातले धडे कागदावर लिहून तो कागद लाकडाच्या फळीस चिकटविला जात असे व यावर पारदर्शक शिंगाची चादर पसरवीत असत. अशा पुस्तकास हॉर्नबुक म्हणत असत. गवा व यूरोपियन बैलांच्या शिंगापासून तुतारी बनवीत असत. रेड इंडियन, व्हायकिंग आदि लोकांमध्ये शिंगांचा उपयोग शिरोभूषणे म्हणून करीत असत.

आठव्या शतकात ओरिसात बांधलेल्या काही मंदिरांत शिंगापासून तयार केलेल्या देवमूर्ती आढळतात. माडिया आदिवासींत लग्नाच्या वेळी शिंगांचे मुगूट वापरले जातात. वंजारा, बैगा, गौहू इ. आदिवासींतही विशिष्ट प्रसंगी शिंग वापरले जाते. 

सोळाव्या व सतराव्या शतकांत राजस्थानात ‘तेलपुरा पानिया’ या नावाचा कंगवा प्रसिद्ध होता. हा शिंगाचा बनविलेला असून यात तेल ठेवण्याची व्यवस्था होती. या काळात कंगवे, चमचे, दागिन्याच्या पेट्या, फुलदाण्या, प्राण्यांच्या प्रतिकृती, तलवारीच्या मुठी इ. शिंगांच्या वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत होती. अलीकडे यूरोप व अमेरिकेतही यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. 

 

या वस्तू मुख्यतः गायी-म्हशींच्या शिंगाच्या बनतात. त्यामुळे कच्चामाल खेड्यांत उपलब्ध होत असल्याने हा एक महत्त्वाचा कुटिरोद्योग आहे. या धंद्यास लागणारी साधनेही फार नाहीत त्यामुळे फार मोठे भांडवल लागत नाही. शिंगे कापून आतील हाडापासून कंगवे, बटने वगैरे वस्तू बनविल्या जातात. शिंगास उष्णता देऊन, दाबयंत्राने चपटी करून व योग्य तो आकार देऊन इतर वस्तू तयार करतात. यांत तंबाखू ओढण्याचे पाइप, फोटोफ्रेम, पेनस्टँड, काठीच्या मुठी वगैरे अनेक वस्तूंचा समावेश आहे. भारतात काही ठिकाणे शिंगांच्या काही विशिष्ट वस्तूंबद्दल प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील शिंगांचे दागिने, बडोद्याचे चमचे, राजकोटचे कंगवे, कर्नाटकचे छत्रीचे दांडे व मुठी, रत्नागिरी आणि सावंतवाडीतील शिंगांच्या वस्तू, केरळमधील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रसिद्ध आहेत. भारतातील इतर राज्यांतही कुटिरोद्योग म्हणून काम पुष्कळ ठिकाणी चालते.

 

मृगशृंगांचा उपयोग चाकू, सुऱ्या, कात्री इ. कटलरी सामानांच्या मुठी तसेच छत्र्या, काठ्या यांच्या मुठी व सामान्यतः चित्रविचित्र कलाकुसरयुक्त पात्रे घडविण्यासाठी करतात. निरनिराळ्या परिस्थितींत त्यांचा आकार व चमक बदलत नसल्यामुळे कटलरीमधील त्यांचा वापर वाढत आहे. आयुर्वेदात मृगशृंगांचा वापर चूर्ण व लेप या स्वरूपांत मज्जातंतू आणि रक्त यांना पुष्टिदायक म्हणून व श्वसनमार्गाच्या विकारांमध्ये करतात. 

पहा : कुटिरोद्योग गाय ग्रामोद्योग जिराफ मृग हरिण. 

संदर्भ : 1. Chattopadhyaya, Kamaladevi, Handicraft of India. New Delhi, 1975.

               2. Mehta. R. J. Handicrafts and Industrial Arts of India, Bombay, 1960.

               3. Walker, E. P. Mammals of the World, Vol. II, Baltimore, 1964.

कर्वे, ज. नी. इनामदार, ना. भा. भोईटे, प्र. बा.