मूल्यशास्त्र : (ॲक्सिऑलॉजी). मूल्य या शब्दाचा मुळचा अर्थ जरी ‘आर्थिक मूल्य’ हा असला, तरी ⇨ रूडॉल्फ लोत्से, आल्ब्रेख्त रिचेल इ. एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वचिंतकांनी त्याला व्यापक अर्थ दिला. त्या व्यापक अर्थाने, आजकाल वाङ्‌मयीन मूल्ये, जीवनमूल्ये, लोकशाहीमूल्ये अशा तऱ्हेचे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यालिहिण्यात येतात. या ठिकाणी ‘मूल्य’ शब्दाने नेमके काय निर्दिष्ट होते, मूल्य हा काही वस्तुगत धर्म आहे की मनुष्यकृत आरोपण आहे, मूल्यांची प्रतवारी लावून किंवा अन्य रीतीने त्यांची वर्गीकरणात्मक व्यवस्था लावता येईल काय इ. प्रश्रांची चर्चा ज्यात होते त्यास मूल्यशास्त्र अथवा मूल्यमीमांसा (थिअरी ऑफ व्हॅल्यू) म्हणतात.

  आयुष्यात एकसारखी आपण निवड करीत असतो, बरे ते घेतो आणि वाईट ते सोडून देतो. उदासीनपणे, केवळ साक्षीरूपाने राहणे हे मानवी जगण्याचे स्वरूप नव्हे. आयुष्य वासनेने व्याप्त असते. त्यामुळे अनुभवविषय केवळ ‘अस्तित्वात असतात’ असे नाही, तर ते प्रिय अथवा अप्रिय, चांगले अथवा वाईट असतात. पदार्थांचा हा चांगलेवाईटपणा म्हणजे त्यांचे मूल्य होय. मूल्य हे प्राप्तव्य असते, साध्य असते, प्रस्थापित करावयाचे असते. मूल्य पुरुषार्थ आहे, वस्त्वर्थ नव्हे. वस्तुस्थिती अशी आहे आणि तशी नाही, हा जसा अनुभवाचा एक अंश आहे तसाच ती अशी असावी आणि तशी नसावी, हा दुसरा एक अंश आहे. ‘आहे’ आणि ‘असावयास हवे’ यांतील हा प्रकार म्हणजे तथ्य (फॅक्ट) व मूल्य यांतील फरक होय. या अर्थाशी संबद्ध असा मूल्य याचा आणखीही एक अर्थ होतो. मूल्य म्हणजे पदार्थांची आस्वाद्यमानता, रसवत्ता अथवा रमणीयता. ‘या फुलाला अमुक इतक्या पाकळ्या आहेत, त्यांचे वजन अमुक आहे, त्यांची रंगछटा अमुक आहे…’ अशा तऱ्हेची आणखी काही विधाने करून त्या फुलाच्या संपूर्ण तथ्याचे निवेदन करता येईल. पण या यथातथ्य निवेदनानंतर त्या फुलाचे मूल्य अथवा आस्वाद्यमानता ही गोष्ट निराळीच राहते. मूल्य हे प्राप्तव्य आहे कारण ते आस्वाद्य आहे, अशा रीतीने त्या दोन अर्थाचा संबंध लावता येतो. मूल्यानुभव हा आपल्या प्रत्येक अनुभवखंडाचा घटक आहे. उष्णतामान हे ज्याप्रमाणे शीतता व उष्णता या दोहोंचेही मापन असते, त्याप्रमाणे मूल्यानुभवात शुभतेचा आणि अशुभतेचा, धनमूल्याचा आणि ऋणमूल्याचा समावेश होतो.

आपल्या तथ्य-अनुभवातून भौतिकी, रसायन यांसारखी वर्णनात्मक शास्त्रे निर्माण होतात. नीती, धर्म, कला, राज्यशासन इ. जीवनाच्या दालनांतून मूल्यानुभवाचे संघटन होते. त्या त्या संघटित मूल्यानुभवाची नीतिशास्त्र, राज्यशास्त्र इ. स्वतंत्र शास्त्रे आहेत. ती आदर्शात्मक शास्त्रे होत. सर्व आदर्शात्मक शास्त्रांच्या मुळाशी असलेली जी मूल्यसंकल्पना तिचा व्यापकपणे विचार करणारे शास्त्रविशेष म्हणजे मूल्यशास्त्र होय.

साधनमूल्य (अथवा, परतोमूल्य) आणि साध्यमूल्य (अथवा, स्वतोमूल्य ) अशी एक स्थूल विभागणी मूल्यांच्या बाबतीत करतात. औषधोपचारांचे महत्त्व अथवा मूल्य साधनरूप आहे. त्याने मिळणाऱ्या आरोग्य या फलास मात्र साध्यमूल्य आहे. औषध कशाकरता? आरोग्याकरता. पण ‘आरोग्य कशाकरता’ असे विचारल्यास आरोग्यासाठी (म्हणजे, आरोग्य-अनुभवासाठी ) असे उत्तर देता येते. म्हणून आरोग्य हे साध्यमूल्य आहे. एखादे साध्यमूल्य दुसऱ्या मूल्याच्या अपेक्षेने साधनमूल्य ठरू शकते. आरोग्याची साधना ज्ञानार्जनासाठी अथवा परमार्थप्राप्तीसाठी आहे, अशी भूमिका घेणाऱ्याच्या बाबतीत आरोग्य हे केवळ साधनमूल्य राहू शकेल अथवा साध्यमूल्य आणि साधनमूल्य असे दुहेरी स्वरूपही त्याला येईल. प्रयोजनाधारित (टेलिऑलॉजिकल) अथवा प्राप्तव्याधारित नीतिशास्त्राच्या दृष्टीने साध्यमूल्य ही संकल्पना नीतिविचाराच्या मध्यवर्ती आहे. ⇨ जॉन ड्यूर्ईच्या मते सुट्या सुट्या साध्यमूल्यांच्या विचारापेक्षा एकूण आयुष्याची कल्याणमयता (गुड ऑन द होल) ही संकल्पना अधिक महत्त्वाची आहे. ⇨ इमॅन्युएल कांट यांची निरुपाधिक मूल्याची (गुड विदाउट क्वॉलिफिकेशन) कल्पना साध्यमूल्याहून थोडी वेगळी आहे. परिणाम, परिस्थिती आणि पार्श्वभूमी काहीही असली, तरी सद्‌वासनेच्या चांगुलपणास बाध येत नाही, म्हणून तिला निरुपाधिक मूल्य आहे असे कांट म्हणतात.

साध्यमूल्ये, कल्याण, निरुपाधिक मूल्य या सर्वांचा समावेश ‘अंतिम मूल्य’ या संकल्पनेत केल्यास मूल्यासंबंधीचे तात्त्विक प्रश्न हे अंतिम मूल्यांच्या बाबतीत उद्‌भवतात असे म्हणता येईल. ज्यांच्या प्राप्तीसाठी माणसाने झटावे असे खरे अंतिम मूल्य कोणत्या गोष्टींना आहे, हा त्यांपैकी एक प्रश्न. ⇨ एपिक्यूरस, ह्यूम,

जेरेमी बेंथॅम, ⇨ जे. एस्. मिल, सिज्विक इत्यादींनी केवळ सुखालाच अंतिम मूल्य आहे असे ठरविले [⟶ सुखवाद]. भारतीय परंपरेतसुद्धा सुख हेच सर्व प्राणिमात्रांचे परम प्राप्तव्य आहे असे मानले आहे मात्र ते नित्य व दुःखस्पर्शरहित असावे अशी अपेक्षा आहे. सुखाच्या ऐवजी आनंद अथवा समाधान यांना अंतिम मूल्य आहे, असे मानणारे सुखवाद्यांहून फार दूरचे नाहीत. ज्ञान, ईश्वराशी तादात्म्य, भक्ती, आत्मदर्शन, जीवनाची अभिवृद्धी इत्यादींपैकी कोणत्यातरी एकाला अंतिम मूल्य आहे, असे म्हणणारे तत्त्वचिंतक आणि तात्त्विक पंथ होऊन गेले. कोणत्यातरी एकाच गोष्टीस अंतिम मूल्य आहे असे नसून संगीत, साहित्य, ज्ञान, मित्रप्रेम, आत्माविष्कार, सुख, सौंदर्यानुभूती यांसारख्या अनेक गोष्टींना साध्यमूल्य असून त्या मूल्यांची प्रतवारी लावता येते व प्रत्येकाचे प्रमाणही मोजता येते, असा पक्ष ⇨ जी. ई. मुर, रॅशडॉल, रूडॉल्फ हार्टमान, आर्. बी. पेरी इत्यादींचा आहे. सत्य, सौंदर्य आणि मांगल्य यांना अंतिम मूल्याची पदवी देणारा ⇨ प्लेटो याच वर्गात मोडतो. व्यक्तीत्वाचा विकास याचा अर्थ या विविध मूल्यांचा जीवनात साक्षात्कार करून घेणे, असा करून व्यक्तीविकास हे अंतिम मूल्य आहे असेही म्हणता येते. संगीत, साहित्य इत्यादींना मूल्ये म्हणताना त्या त्या गोष्टींचा मानवी अनुभव असा अर्थ अध्याहृत धरावा, हे बहुतेकांना मान्य आहे.

साहित्य, संगीत इत्यादींना जे मूल्य असते असे आपण म्हणतो ते त्यांचा अंगभूत धर्म असून रंग, गंध इ. भौतिक गुणधर्म जसे आपणास इंद्रियद्वारा समजतात त्याचप्रमाणे पदार्थांच्या मूल्य या अभौतिक गुणधर्माचे अंतःप्रज्ञेने, प्रतिभानाने आपणास साक्षात ज्ञान होते असे मुर, रॅशडॉल वगैरेंचे म्हणणे आहे. मूल्य हा वस्तुगत धर्म नसून आपण त्या त्या गोष्टीत रस घेतल्याने निर्माण होणारा संबंधात्मक धर्म आहे असे पेरी वगैरे निसर्गवादी म्हणतील. प्रवृत्तीचा विषय ते धनमूल्य आणि निवृत्तीचा विषय ते ऋणमूल्य असे हे म्हणणे आहे. या मताप्रमाणे ‘क्ष’ या गोष्टीला  ‘य’ या व्यक्तीच्या अपेक्षेने मूल्य आहे आणि ‘ज्ञ’ या व्यक्तीच्या अपेक्षेने मूल्य नाही असे होऊ शकते. मूल्याची ही व्यक्तीसापेक्षता टाळण्यासाठी ⇨ डेव्हिड ह्यूमसारखे तत्त्वचिंतक म्हणतात, की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या अनुकूल वा प्रतिकूल वृत्तीने मूल्ये ठरत नसतात त्यांचा आशय सामाजिक असतो. सामाजिक अनूभवामुळे ज्या गोष्टींबद्दल समाजातील बहुसंख्य लोकांमध्ये अनुकूल प्रवृत्ती उद्‌भवते, त्यांना धनमूल्य येते व ज्याविषयी प्रतिकूल वृत्ती निर्माण होते त्यांना ऋणमूल्य येते. मूल्यांची वास्तवता त्यांच्या सामाजिकतेत आहे. चार्ल्‌स स्टीव्हन्सन, एअर इ. आधुनिक भाववाद्यांच्या (इमोटिव्हिस्ट्स ) मते मूल्यवाक्ये निवेदक नसतात. ती कशाचाही बोध करून देत नाहीत. ‘वडील माणसास उलट उत्तर देणे हे अप्रशस्त आहे.’ ‘पातिव्रत्य हा श्रेष्ठ गुण आहे’ अशा तऱ्हेची मूल्य-वाक्ये केवळ वक्त्याची भावोर्मी प्रकट करतात. तसेच दुसऱ्याला उपदेश करावा, त्याचे मन वळवावे यांसारखे उद्देशही मूल्य-वाक्यांच्या वापरामागे असतात. हेअरच्या मताप्रमाणे मूल्य-वाक्ये अमुक एका गोष्टीची निवड करण्याविषयी भलावण करतात आणि त्या निवडीला काही निकष आहेत असेही सुचवीत असतात. या मतास ‘आदेशवाद’ असे म्हणता येईल.

पहा : नीतिशास्त्र सौंदर्यशास्त्र.

संदर्भ : 1. Dewey. John, Theory of Valuation, Chicago, 1939.

             2. Findlay, J. N. Values and Intentions, New York, 1961.               3. Hare, R. M. The Language of Morals. Oxford, 1952.             4. Perry, R. B. General Theory of Value, New York, 1926.

दीक्षित, श्री. ह.