मूत्रोत्सर्जक तंत्र : मूत्रोत्पादनाद्वारे शरीरातील द्रवीय त्याज्य पदार्थ गोळा करणे आणि त्यांचे उत्सर्जन करणे (शरीराबाहेर टाकणे) या क्रिया ज्या अवयव समुच्चयाकडून केल्या जातात, त्याला ‘मूत्रोत्सर्जक तंत्र’ म्हणतात. काही निरुपयोगी पदार्थांचे उत्सर्जन ⇨ घर्म ग्रंथी (घाम), ⇨ फुप्फुसे (वायू व जलबाष्प) आणि आंत्रमार्ग [आतड्यांनी बनणारा व अन्नद्रव्ये वाहून नेणारा मार्ग → मलोत्सर्ग] यांच्या मार्फतही होते. मूत्रोत्सर्जक तंत्रामध्ये दोन ⇨ वृक्क (मूत्रपिंडे), दोन मूत्रनलिका, एक मूत्राशय व एक मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. प्रस्तुत नोंदीत वृक्क सोडून इतर भागासंबंधी माहिती दिली आहे. मूत्रोत्सर्जक तंत्र आणि ⇨ जनन तंत्र यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. दोन्ही तंत्रांतील कार्य एकाच अवयवामार्फत केले जाते उदा., पुरुषातील मूत्रमार्ग फक्त मूत्र वाहून नेण्याचेच कार्य करीत नसून संभोगाच्या वेळी वीर्यवाहकही असतो. तंत्रांच्या हेतुसाध्यतेकरिता झालेल्या रचनात्मक मिश्रणामुळे दोहींचा विचार ‘मूत्र-जनन तंत्र’ किंवा ‘जनन-मूत्र तंत्र’ या नावाखालीही करतात. वैद्यकाच्या ‘मूत्रविज्ञान’ शाखेत पुरुषाच्या मूत्र-जनन तंत्राचा आणि स्त्रीच्या फक्त मूत्रोत्सर्जक तंत्राचा अभ्यास केला जातो.
प्रस्तुत नोंदीची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे : (१) मानवेतर प्राण्यांतील उत्सर्जन तंत्र, (२) भ्रूणविज्ञान, (३) शारीर, (४) शरीरक्रियाविज्ञान, (५) मूत्रोत्सर्जक तंत्राच्या विकृती.
मानवेतर प्राण्यांतील उत्सर्जन तंत्रे : (अ) अपृष्टवंशी प्राणी (पाठीचा कणा नसलेले प्राणी) : आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील प्राण्यांत संकोचशील रिक्तिका (लहान पोकळ्या) उत्सर्जनाचे कार्य करतात. चापटकृमींत व इतर काही अपृष्ठवंशी प्राण्यांत ज्वालाकोशिकांमध्ये (एक प्रकारच्या पोकळ पेशींमध्ये) उत्सर्जक अवयवांची वैशिष्ट्ये आढळतात. त्या मोठ्या व पोकळ कोशिका असून त्यांत ⇨ पक्ष्माभिकांचे (केसासारख्या वाढींचे) पुंजके असतात आणि त्यांच्या हालचालीमुळे द्रव निरुपयोगी पदार्थ उत्सर्जक नलिकांतून बाहेर टाकले जातात. वलीय (अनेलिडा) प्राणिसंघातील गांडूळ या प्राण्यात पक्ष्माभिका वृक्कक मुख (उत्सर्जक मुखे) देहगुहेतील (शरीरातील पोकळीतील) व रक्तवाहिन्यांतील त्याज्य पदार्थ वृक्कक रंध्रातून बाहेर टाकतात. कीटकवर्गीय मधमाशीचे मालपीगी नलिका (मार्चेल्लो मालपीगी या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नलिका) तिच्या शरीरद्रव्यातून निरुपयोगी पदार्थ गोळा करतात.
(आ) पृष्ठवंशी प्राणी : पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये यथाक्रमाने तीन वृक्क तयार होतात : (१) अग्रवृक्क, (२) मध्यवृक्क व (३) स्थायी वृक्क. अल्पवयीन भ्रूणात अग्रवृक्क अल्प नलिकांच्या स्वरूपात देहगुहेच्या अग्रपृष्ठीय भित्तीच्या आतील भागावर दिसू लागतो. अग्रवृक्कीय नलिका नावाच्या भागात या सर्व नलिका निःसारण करतात. लाळ्या मासा या प्राण्याशिवाय इतर सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये या नलिका अल्पजीवी असतात. या नंतरच्या अवस्थेत अधिक गुंतागुंत असलेल्या नलिकांचा मध्यवृक्क तयार होतो. मासे व उभयचर (पाण्यात व जमिनीवरही राहणाऱ्या) प्राण्यात मध्यवृक्क तसाच राहून अंतिम वृक्क कार्य करतो. अग्रवृक्कीय नलिकेचे मध्यवृक्कीय नलिकेत अथवा व्होल्फीयन (के. एफ्. व्होल्फ या जर्मन भ्रूणवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या) नलिकेत नामांतरण होऊन तिच्या मार्फतमूत्र अवस्करात (ज्यात गुदद्वार, जनन-कोशिका वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा शरीराच्या मागील भागातील कोष्ठात, मूत्रपूरिषात) वा शरीराबाहेर टाकले जाते. सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी व सस्तन प्राणी यांमध्ये तिसऱ्या प्रकारचा वृक्क मध्यवृक्काच्या मागच्या बाजूस तयार हातो. सूक्ष्मशारीरदृष्ट्या हा तिसरा वृक्क अधिक गुंतागुंतीचा आणि जटिल रचनेचा असतो परंतु अधिक कार्यक्षमही असतो. तो आपली स्वतंत्र निःसारण नलिका बनवतो व तिला मूत्रवाहिनी म्हणतात. पुल्लिंगी प्राण्यात मध्यवृक्कीय नलिकेपासून रेतोवाहिनी बनते आणि स्रील्लिंगी प्राण्यात तिचा अपकर्ष होतो. साप, मगर अथवा सुसर आणि पक्षी यांमध्ये मूत्राशय नसतो आणि मूत्रवाहिन्या मूत्र अवस्करात नेतात व तेथून ते मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.
भ्रूणविज्ञान : मानवी मूत्रोत्सर्जक तंत्राचा पुष्कळसा भाग विशेषकरून उत्सर्जक भाग मध्यस्थ मध्यस्तरापासून बनतो आणि संकलक अथवा मूत्र गोळा करणारा भाग आद्य अवस्करांच्या अंतःस्तरापासून बनतो. कनिष्ठ वर्गीय सस्तन प्राण्यांप्रमाणेच मानवातही वृक्क तीन प्रकारच्या अवस्थांतून निर्माण होतो. पहिल्या दोन अवस्था अग्रवृक्क व मध्यवृक्क अल्पकालीन असून नाहीशा होतात परंतु त्यांच्या नलिका जनन तंत्रात वापरल्या जातात. तिसरी अवस्था ‘पृश्चवृक्क’ या नावाने ओळखली जाते. तिची रचना अतिशय जटिल असून तीपासून अंतिम अवयव तयार होतो.
(आ) अग्रवृक्क : भ्रूणातील वृक्कजन रज्जूपासून तयार होणाऱ्या वृक्कखंडकांच्या युग्म मालिकेपासून अग्रवृक्काचे पुढील भाग तयार होतात.
अग्रवृक्कीय नलिका चौथ्या आठवड्यात दिसू लागतात. त्या देहगुहेशी वृक्कमुखाद्वारे जोडल्या जातात. वृक्कमुख वृक्कखंडकात तयार होते. या मुखाच्या देहगुहेकडील टोकावर केशवाहिन्यांचा वळसा असून त्यावर मध्यस्तरजनित उपकला (पातळ स्तराचे) आच्छादन असते. या संपूर्ण रचनेला ‘केशिका-गुच्छ’ म्हणतात. केशवाहिन्यांच्या वळशातून वाहणाऱ्या रक्तातील निरुपयोगी पदार्थ निस्यंदित होऊन (गाळले जाऊन) देहगुहेत व तेथून वृक्कमुखाद्वारे अग्रवृक्कीय नलिकेत येतात. या नलिकांची अंतिम टोके एका मोठ्या नलिकेस जोडलेली असतात व तिला अग्रवृक्कीय वाहिनी म्हणतात. ही वाहिनी पुच्छीय भागाकडे वाढत जाते आणि पश्चांत्राला मिळून अवस्कर बनतो. हे भाग तयार होत असतानाच अग्रवृक्क नलिका, उत्सर्जन मुख (वृक्क मुख) व केशिका-गुच्छ हे भाग अपकर्षित होत असतात. अग्रवृक्क ही अवस्था अल्पकाळच टिकते.
(आ)मध्यवृक्क : अग्रवृक्काच्या पुच्छीय भागातील वृक्कमुखीय उतकापासून (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समुहापासून) युग्मीय असलेला हा भाग बनतो. मध्यवृक्कीय नलिका अग्रवृक्कवाहिनी पुच्छीय भागाकडे वाढत असताना तिला मिळतात व तिचे मध्यवृक्कवाहिनीत रूपांतर होते. मध्यवृक्क नलिकांना वृक्कमुख नसते. मात्र अंतःस्थ केशिका-गुच्छ असतो. मध्यवृक्कीय नलिकेच्या बंद टोकामध्ये केशवाहिनीचे वलय अंतर्वलित होऊन हा केशिक-गुच्छ बनतो. यामुळे रक्तातील निरुपयोगी पदार्थ सरळ नलिकेत व तेथून मध्यवृक्कीय वाहिनीत जातात. ही वाहिनी अवस्करास जोडलेली असते व त्यात निरुपयोगी पदार्थ गोळा होतात. मध्यवृक्क आदिवृक्कापेक्षा अधिक कार्यक्षम असून अंतिम वृक्क तयार झाल्यानंतरही काही काळ कार्यरत असतो.
(इ) पश्चवृक्क अथवा अंतिम वृक्क : पश्चवृक्काची सुरुवात मध्यवृक्कीय वाहिनीच्या अंधवर्धाने (पिशवीसारख्या एका टोकाला बंद असलेल्या रचनेने) होते. हा अंधवर्ध वाढत जाऊन त्याच्या विभाजनापासून मूत्रवाहिनी, वृक्कद्रोण (वृक्काचा खोलगट भाग), मूत्रद्रोण व संग्राहक नलिका बनतात. वृक्काचा उरलेला भाग अंतःस्थ रक्तवाहिन्या, केशिका-गुच्छ व सूक्ष्मनलिका हे प्रसूकोशिकापुंज नावाच्या भ्रूणीय संयोजी ऊतकापासून तयार होतात.
अंधवर्धाला ‘मूत्रवाहिनी अंधवर्ध अथवा पश्चवृक्कीय अंधवर्ध’ म्हणतात व तो जसजसा वाढतो तसतसा शाखित होतो. त्याच्या स्तंभापासून पुढील भाग तयार होतात : (१) मूत्रवाहिनी, (२) वृक्कद्रोण, (३) बृहत् मूत्रद्रोण, (४) लघू मूत्रद्रोण, (५) पिंडिकानलिका, (६) वृक्क स्तूप (पिरॅमिड) आणि (७) सरळ संग्राहक नलिका.
पश्चवृक्कीय प्रसूकोशिका पुंज अंधवर्धाच्या बरोबरच वाढतो. अंधवर्धाच्या प्रत्येक विभाजना बरोबर या कोशिकांचेही तदनरूप विभाजन हाते व शेवटी त्यापासून वृक्क एकके तयार होतात. प्रत्येक वृक्कात जवळजवळ १०,००,००० वृक्क एकक तयार होतात. प्रत्येक वृक्क एकक वृक्काचे कार्यकारी वा स्रावक एकक असते आणि त्याच्या विशिष्ट रचनेमुळे रक्तातील निस्यंदाचे मूत्रात रुपांतरण होते. याच पुंज-कोशिकांपासून वृक्क संपुट अथवा वेष्ट आणि आधार ऊतक तयार होते.
मानवी वृक्क जसजसे वृद्धिंगत होते तसतसे ते खंडकमय असल्याचे स्पष्ट दिसते. प्रत्येक खंडकातील मूत्र मध्यकातील वृक्क स्तूपामध्ये गोळा होते. काही सस्तन प्राण्यांत फक्त एकच स्तूप असल्यामुळे खंडक नसतात व वृक्क एकसंध असतो. गुरे, अस्वल, सील (सागरी जलचर प्राणी) आणि देवमासा या प्राण्यांत भ्रूणीय खंडकमय अवस्था जन्मभर टिकते. मानवात पूर्ण वाढीबरोबर ही अवस्था हळूहळू दिसेनाशी होते व प्रौढावस्थेत ती अगदी अस्पष्ट असते.
शारीर : वृक्क, मूत्रवाहिनी, मूत्राशय व मूत्रमार्ग मिळून बनणाऱ्या मूत्रोत्सर्जक तंत्राच्या भागापैकी वृक्क ’ यावर स्वतंत्र नोंद असल्यामुळे प्रस्तुत नोंदीत उरलेल्या तीन भागांविषयीच माहिती दिली आहे.
(अ)मूत्रवाहिनी : प्रत्येक वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र स्नायुमय नलिका असून तिला ‘ मूत्रवाहिनी ’ म्हणतात. प्रत्येकाची लांबी सर्वसाधारणपणे २·५ ते ३० सेंमी. आणि व्यास ३–५ मिमी. असतो. वृक्कद्रोणापासून निघून मूत्राशयास जोडल्या जाईपर्यंत दोन्ही मूत्रवाहिन्या उदरगुहेत पर्युदराच्या (उदरभित्तींच्या आतील बाजूवर व उदरगुहेमधील अंतर्गत इंद्रियावर पसरलेल्या पातळ अस्तरासारख्या पटलाच्या) मागे असतात. मूत्रवाहिनीची अवकाशिका (अंतर्गत पोकळी किंवा मार्ग) तीन जागी अरुंद असते : (१) वृक्कद्रोणाशी जोडलेल्या जागी, (२) उदरगुहेतून श्रोणिगुहेत (घडाच्या तळाशी असणाऱ्या पोकळीत) शिरताना आणि (३) मूत्राशय-भित्तीतून जाताना. हा शेवटचा भाग सर्वांत अरुंद असतो. सूक्ष्मदर्शकीय तपासणीत मूत्रवाहिनीची भित्ती तीन थरांची बनलेली दिसते : (१) तंतुमय ऊतकाचे बाह्यावरण-पातळ थर (२) मधला जाड स्नायू थर-स्नायू कोशिका बहुसंख्य वर्तुळाकार आणि अल्प उभ्या रचलेल्या असतात (३) आतील श्लेष्मकलास्तर (बुळबुळीत पातळ अस्तर) अथवा उपकलास्तर-परिवर्ती उपकला कोशिकांचा पातळ थर. दर १० सेंकदास उत्पन्न होणाऱ्या क्रमसंकोच तरंगामुळे वृक्कद्रोणातून येणारे मूत्र मूत्राशयाकडे ढकलले जाते. शेवटच्या भागातून दर मिनिटास येणारे मूत्राचे १ ते ५ छोटे फवारे मूत्रवाहिनी रंध्रातून मूत्राशयात टाकीत असतात. अलीकडील संशोधनानुसार स्नायू थरातील स्नायू तंतूंची रचना सर्पिल असून काही घटिवत (घड्याळाच्या काट्यांच्या गतीच्या दिशेप्रमाणे) तर काही प्रतिघटिवत रचलेले असतात.
(आ)मूत्राशय : काही काळापर्यंत मूत्रसंचय करणाऱ्या स्नायुकलामय पिशवीला मूत्राशय म्हणतात. अर्भकावस्थेत हा अवयव प्रौढापेक्षा बराच वरच्या पातळीवर जवळ जवळ संपूर्ण उदरगुहेत असतो. वाढत्या वयाबरोबर हळूहळू खाली सरकत तो यौवनावस्थेत श्रोणिगुहेत उतरतो. मूत्राशय पुरुषात गुदाशयाच्या अग्रभागी असते व स्त्रियांत या दोहोमध्ये गर्भाशय असतो. मूत्राशयाची फुगण्याची क्षमता मोठी असते परंतु त्यातील मूत्राचे घनफळ २५० ते ३०० मिलि. पर्यंत गेले की, ते रिते होण्याच्या क्रिया सुरू होतात. या कारणामुळे मुत्राशयाचे आकारमान, शरीरातील जागा आणि आजूबाजूच्या इतर अवयवांशी असलेले शरीररचनात्मक संबंध अस्थिर असतात. रिकामे मूत्राशय चतुःपृष्ठीय असते व त्याचे वर्णनाकरिता (१) बुध्न किंवा तळ, (२) ग्रीवा (मानेसारखा भाग), (३) शिखर, (४) उर्ध्व पृष्ठभाग आणि (५) दोन अधःस्थ-पार्श्व पृष्ठभाग असे भाग पाडतात. बुध्न हा भाग त्रिकोणी असून पुरुषात गुदाशयाच्या अग्रभित्तीशी संलग्न असतो. दोन्हीच्या मधील भागाला गुद-मूत्राशय कोष्ठ म्हणतात. स्त्रियांत तो योनिमार्गाच्या अग्रभित्तीशी संलग्न असतो. बुध्न वस्तुतः तळाशी असणारा भाग, परंतु प्रत्यक्षात ग्रीवा सर्वांत खालचा आणि अधिक अचल भाग असतो. ग्रीवेत मूत्रमार्गाचे अंतःस्थ द्वार असते आणि मूत्राशय व गुदाशय यांच्या बदलणाऱ्या स्थितीस अनुरूप अशी अत्यल्प हालचाल ग्रीवा भागात होते. शिखर अग्रभागाकडे आणि जघनास्थी (जांघेच्या हाडाच्या) प्रतरसंधीच्या (मुळात भिन्न असलेल्या हाडांतील सांध्याच्या) वरच्या भागाकडे झुकलेले असते आणि त्यापासून मूत्राशय-नाभिरज्जू (मध्यस्थ नाभिबंध) निघतो व तो उदरभित्तीच्या पश्च पृष्ठभागावरून वर नाभीपर्यंत जाऊन जोडला जातो. या बंधाशिवाय आणखी काही बंध मूत्राशयास आधार देण्याचे कार्य करीत असावेत.
मूत्राशय भित्ती तीन थरांची बनलेली असते : (१) लसी-कला (अस्तरासारखे पटल), (२) स्नायुमय थर आणि (३) श्लेष्मकलास्तर. लसी-कला पर्युदराचाच भाग असून ती मूत्राशयाच्या पश्च -उर्ध्वस्थ पृष्ठभागाशी निगडीत असते म्हणजेच मूत्राशयाचा पुष्कळसा भाग पर्युदरबाह्य असतो. स्नायुमय थराला ‘मूत्र-निस्सारक स्नायू’ असे म्हणतात. यातील स्नायू तंतूंची रचनाही तीन थरांत असते. बाह्य व अंतःस्थ थर उभ्या तंतूंचा आणि मधला वर्तुळाकार तंतूंचा असतो. हा संपूर्ण थर (निस्सारक स्नायू) अरेखित (अनैच्छिक) स्नायूंचा असतो. अलिकडील संशोधनानुसार अरेखित स्नायुपुंज अनियमितपणे एकत्र विणलेले असतात. याशिवाय ग्रीवा भागात स्नायूचा वर्तुळाकार संकोचकही नसतो. ग्रीवा भागातील स्नायुपुंज कमानीसारखे रचलेले असून त्यांचे आकुंचन अंतःस्थ मूत्रमार्गद्वार उघडण्याची क्रिया करीत असावे. मूत्रवाहिनीचा शेवटचा २ सेंमी. लांबीचा भाग मूत्राशय भित्तीतून तिरपा गेलेला असतो. मूत्रोत्सर्गाच्या वेळी मूत्राशयात वाढणारा दाब या तिरप्या भागातील अवकाशिका बंद करीत असल्यामुळे मूत्रवाहिनीत मूत्राचे पश्चवहन होत नाही.
श्लेष्मकलास्तर फिकट गुलाबी रंगाचा असून वरच्या बाजूस मूत्रवाहिन्या व खालच्या बाजूस मूत्रमार्ग यांच्या श्लेष्मकलांशी एकसंघ असतो. मूत्राशय रिकामे असताना या अस्तराच्या घड्या पडून पन्हाळी तयार होतात. वरील दोन मूत्रवाहिन्यांची रंध्रे व खालचे एक अंतःस्थ मूत्रमार्गाद्वार यांमधील त्रिकोणी भागाला ‘मूत्राशय त्रिकोण’ म्हणतात. या ठिकाणी श्लेष्मकलास्तर स्नायू थराशी घट्ट व ताणून बसल्यामुळे त्याला घड्या नसतात.
मूत्राशय ५०० मिलि. पर्यंत भरल्यास सह्य असते परंतु त्याहून अधिक संचयाने भित्तीवर ताण पडून वेदना जाणवतात आणि त्या उदरभित्तीचा खालचा भाग, शिश्न व विटप (मांड्यांच्या मधला घडाचा तळ भाग) या भागांत जाणवतात.
(इ)मूत्रमार्ग : मूत्राशयापासून मूत्र वाहून नेणाऱ्या आणि ते शरीराबाहेर टाकणाऱ्या भागाला मूत्रमार्ग म्हणतात. पुरुष व स्त्री यांच्या मूत्रमार्गात फरक आहे.
पुरुषातील मुत्रमार्ग : १८ ते २० सेंमी. लांब मूत्रमार्ग अंतःस्थ मूत्रद्वारापासून शिश्नाच्या टोकावरील बाह्य मूत्रद्वारापर्यंत असतो. स्थानानुरूप त्याचे (१) ⇨ अष्ठीला ग्रंथीय, (२) कलामय अथवा कलामध्य आणि (३) रक्तधर पिंडीय असे तीन भाग वर्णितात.
(१) अष्ठीला ग्रंथीय भाग सर्वांत रुंद व विस्तारक्षम असून त्याची लांबी सर्वसाधारणपणे ३ सेंमी. असते. ग्रंथीच्या तळापासून शिखरापर्यंत तो सरळ खाली येतो आणि शिश्न शिथिल असताना दुहेरी वक्रतेपैकी पहिली वक्रता या मार्गात असते. ग्रंथीच्या पश्चभागापेक्षा मार्ग अग्रभागाजवळ असतो व त्याचा सर्वांत रुंद भाग मध्यावर असतो. आडवा छेद चंद्रकोरीसारखा असून बहिर्वक्रता अभ्युदरीय (खालच्या बाजूकडे) असते. मार्गाच्या पश्च भित्तीवर मध्यभागी उभा छोटा उंचवटा अथवा कंगोरा असतो व त्याला ‘मूत्रमार्ग कटक’म्हणतात. कटकाच्या मध्यभागी छोटी फुगोटी असते, तिला ‘शुक्र उन्नतांग’ म्हणतात आणि तिच्यावरील रेखा छिद्राजवळ स्खलनवाहिन्यांची रंध्रे असतात.
(२) कलामय अथवा कलामध्य भाग सर्वांत लहान, अत्यल्प विस्तारक्षम आणि बाह्य मूत्रद्वाराखेरीज करून सर्वांत अरुंद असतो. तो विटप कलेतून जात असल्यामुळे त्याला कलामध्य म्हणतात. या भागाच्या सभोवती मूत्रमार्ग संकोचक स्नायूचे काही तंतू असतात. आडवा छेद ताराकृती असतो.
(३) रक्तधर पिंडीतील भाग १५ सेंमी. लांब असून कलामध्य भागाच्या शेवटापासून शिश्नमण्यावरील बाह्य मूत्रद्वारापर्यंत असतो. त्याचा व्यास सु. ६ मिमी. असतो आणि सबंध मूत्रमार्ग अनुप्रस्थ (आडवा) असतो. शिश्नाच्या कंद भागातून जाणारा या मूत्रमार्गाचा भाग कंद मूत्रमार्ग म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी तो काहीसा विस्फारित असून तिथे कदांतर्गत खाच असते. शिश्नमणी भागातही विस्फारित भाग असून त्याला नौकाकार खाच म्हणतात.
बाह्य मूत्रद्वार हे एक उभे रेखाछिद्र असून ६ मिमी. लांब असते. मूत्रमार्गाभोवती दोन परिसंकोची (वलयासारखे नियंत्रक स्नायू) असतात. यांपैकी अंतःस्थ मूत्राशय परिसंकोची मूत्राशय ग्रीवेचे व अष्ठीला ग्रंथीतील मूत्रमार्गाचे नियंत्रण करतो. काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. दुसरा बाह्य परिसंकोची अथवा मूत्रमार्ग परिसंकोची कलामध्य भागासभोवती असतो. तो रेखित स्नायू तंतूचा बनलेला असतो व अर्भकावस्थेनंतर ऐच्छिक नियंत्रणाखाली असतो.
स्रीमधील मूत्रमार्ग : सर्वसाधारणपणे ४ सेंमी. लांब व ६ मिमी. व्यास असलेला स्रीमधील मूत्रमार्ग अंतःस्थ मूत्रमार्गद्वारापासून सुरू होतो. योनिमार्गाच्या अग्रभित्तीतून आच्छादन असल्याप्रमाणेअग्र अधःस्थ दिशेने जघनास्थी प्रतर संधीच्या पश्च बाजूने जाऊन विटप कला भेदून बाह्य मूत्रमार्गद्वारापाशी तो संपतो. हे बाह्य मूत्रमार्गद्वार एक अग्र-पश्च रेखाछिद्र असून त्याच्या कडा स्पष्ट असतात. हे रेखाछिद्र योनिद्वाराच्या अग्रभागी, भगशिश्नाच्या [पुरुषाच्या शिश्नाशी समजात असलेल्या उत्था नक्षम अवयवाच्या- जनन तंत्र] मागे २·५ सेंमी. अंतरावर असते. मूत्रोत्सर्गाखेरीज इतर वेळी मूत्रमार्गाच्या अग्र व पश्च भित्ती एकमेकींस चिकटलेल्या असतात व आतील श्लेष्मकलास्तरास उभ्या घड्या पडलेल्या असतात. पुरुष मूत्रमार्गापेक्षा स्त्रियांतील मूत्रमार्ग अधिक विस्फारक्षम असतो व त्यामुळे तपासणीसाठी आत सरकवण्याच्या उपकरणांचा (शलाका वगैरे) उपयोग करणे सोपे असते.
शरीरक्रियाविज्ञान : मूत्रोत्सर्जक तंत्राचे प्रमुख कार्य मूत्रोत्पादन असल्यामुळे आणि ते सर्वस्वी वृक्क या अवयवामार्फतच होत असल्यामुळे त्याविषयीची माहिती ⇨ वृक्क या नोंदीत दिली आहे. मूत्रोत्सर्जक तंत्रातील काही प्रमुख शरीरक्रियाविज्ञानविषयक माहिती येथे दिली आहे.
मूत्रोत्सर्ग : मूत्राशयात साचणारे मूत्र वेळोवेळी शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला मूत्रोत्सर्ग म्हणतात. प्रौढात ती ऐच्छिक नियंत्रणाखाली असते. तिची सुरुवात गर्भवासातील पाचव्या महिन्यात जेव्हा मूत्रोत्पादन सुरु होते तेव्हाच होते. जन्मानंतर वयाच्या अडीच वर्षांपर्यंत ही क्रिया पूर्णपणे प्रतिक्षेपी (बाह्य उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून आपोआप होणारी) व अनैच्छिक असते. त्यानंर हळूहळू ती ऐच्छिक नियंत्रणाखाली येऊ लागते व सर्वसाधारणपणे तिसऱ्या वर्षी पूर्ण नियंत्रित होते.
लघवी केल्यानंतर मूत्राशय पूर्ण रिकामे असून ग्रीवा बंद असते. या वेळी त्यातील अंतर्दाब शून्याच्या जवळपास असतो. मूत्रवाहिन्यांच्या सतत चालू असणाऱ्या क्रम संकोचामुळे मूत्र फवाऱ्यांच्या स्वरूपात ढकलले जात असते. मूत्राचे घनफळ वाढत असले, तरी अंतर्दाब मात्र वाढत नाही. मूत्राशय भित्तीतील मूत्र निस्सारक स्नायूच्या अंगभूत गुणधर्मामुळे अंतर्दाब हा मूत्रवाहिनीतील दाब व मूत्रमार्गाच्या बंद पश्चभागातील प्रतिबंधक शक्ती यांपेक्षा कधीही वाढत नाही.
मूत्राशयातील मूत्र संचय वाढत जातो तसतसा भित्तीवरील ताण वाढतो, तरीही अंतर्दाब जवळजवळ तेवढाच राहतो. या गुणधर्माला मूत्राशय त्राण म्हणतात व तो स्वायत्त म्हणजे तंत्रिका तंत्राशी (मज्जासंस्थेशी) संबंधित नसतो. भित्तीवर अतिशय ताण पडल्यास मूत्राशय ताण अल्प होतो आणि शोथ (दाहयुक्त सूज), थंड वातावरण व चिंता यामुळे तो वाढतो. मूत्राशयातील मूत्रसंचय वाढत असतानाही अंतर्दाब कमीच राहण्याचे कारण लाप्लास या फ्रेंच गणितज्ञांनी मांडलेल्या नियमावरून सहज समजते. या नियमाप्रमाणे पोकळ गोलातीलजलस्थितिक दाब (P→द्रायुयामिकी) त्याच्या भित्तीतील ताणाच्या (T) दुपटीला त्याच्या त्रिज्येने (R) भागून मिळतो (P = २T/R). जोपर्यंत मूत्राशय भित्ती ताण व मूत्राशय त्रिज्या एकसारखेच वाढतील तोपर्यंत मूत्राशय अंतर्दाब स्थिर राहील.
मूत्राशय भित्तीतील संवेदी तंत्रिका तंतूंच्या अंत्य पट्टिकांना पुरेसा ताण उद्दीपक असतो व तेथून निघणारे अपवाही आवेग श्रोणीय तंत्रिकांमार्फत मेरुरज्जूतील (केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या पाठीच्या मणक्यांतून जाणाऱ्या दोरीसारख्या भागातील) प्रतिक्षेपी मूत्रोत्सर्ग केंद्रापर्यंत पोहोचतात. हे केंद्र मेरुरज्जूतील त्रिक विभागात असते [→तंत्रिका तंत्र]. काही आवेग मेंदूतील प्रमस्तिष्क बाह्यकातील ऐच्छिक मूत्रोत्सर्ग केंद्रात पोहोचतात. मूत्राशयात मूत्र गोळा झाल्याची पहिली जाणीव १०० ते २५० मिलि. संचय होताच होते. याच सुमारास मेरुरज्जूतील प्रतिक्षेपी केंद्रावर मेंदूतील केंद्राकडून प्रतिबंधक आवेग येतात. या आवेगामुळे तेथून अपवाही आवेग निघणे थोपवले जाते. जरुरीपेक्षा जादा वेळ लघवी थोपवून धरल्यास प्रथम मूत्राशय भरल्याची जाणीव, नंतर अस्वस्थता व शेवटी वेदना होतात. योग्य संधी मिळताच मरुरज्जू केंद्रावरील ऐच्छिक प्रतिरोध काढला जाऊन मूत्रोत्सर्ग क्रिया आपोआप पूर्ण होते.
मेंदूतील प्रमस्तिष्क भागाशिवाय मस्तिष्क स्तंभ भागातही मूत्रोत्सर्ग सुलभ करणारी आणि प्रतिरोध करणारी केंद्रे आहेत. मूत्रोत्सर्ग एक मूलभूत प्रतिक्षेपी क्रिया असली, तरी वरिष्ठ केंद्रे तिच्या नियंत्रणाचे कार्य पुढीलप्रमाणे बजावतात : (१) प्रतिक्षेप सतत प्रतिरोधात ठेवून तो फक्त योग्य वेळी काढून घेणे. (२) प्रतिक्षेप कार्यान्वित झाल्यानंतर बाह्य मूत्राशय परिसंकोचीचे सतत जोरदार आकुंचन करून योग्य संधी मिळेपर्यंत मूत्रोत्सर्ग थोपवून धरणे. (३) योग्य वेळी सर्व सुलभ यंत्रणा कार्यान्वित करणे.
मूत्रोत्सर्ग क्रियेची सुरुवात विटप स्नायू व गुद उत्थापक स्नायू यांच्या शिथिलनापासून होते. त्याचवेळी मध्यपटल (उदर पोकळी व छातीची पोकळी यांच्यामध्ये असणारा स्नायूंचा पडदा) खाली येते. उदरभित्तीचे स्नायू आकुंचन पावतात उदरगुहा दाब वाढल्यामुळे मूत्राशय दाबात अप्रत्यक्ष वाढ हाते. हे कार्य मेंदूतील मूत्रोत्सर्ग सुलभ केंद्रामार्फत होते. फक्त मानवच मूत्राशयाच्या कोणत्याही प्रमाणात भरलेल्या अवस्थेत मूत्रोत्सर्ग करू शकतो.
मूत्रवाहिन्यांतून येणारे मूत्र गोळा करणे व ऐच्छिक मूत्रोत्सर्गाने रिते होणे यांशिवाय मूत्राशयास काही काळ मूत्रसंचयही करावालागतो याला मूत्र संयती म्हणतात. ही अवस्था मूत्रमार्गाच्या समीपस्थ ३ सेंमी. लांबीच्या भागातील अरेखित स्नायूंच्या ताणामुळे टिकवली जाते. मूत्रवाहनास प्रतिरोध करणारा दाब या भागाच्या मध्यावर सर्वाधिक असतो.
मूत्राशयाची प्राकृतिक (सर्वसाधारण) धारणक्षमता वय व मानसिक कारकांवर अवलंबून असतो. जन्मतः ती २० ते ५० मिलि. असते व पहिल्या वर्षी चौपट वाढते. प्रौढावस्थेत ती ६०० मिलि. पर्यंत वाढू शकते. ज्या व्यावसायिकांना मूत्रोत्सर्गाच्या योग्य सोई उपलब्ध नसतात व त्यामुळे मूत्र बराच वेळ थोपवून धरावे लागते त्यांच्यात धारणक्षमता वाढते. मूत्रोत्सर्गाची पहिली इच्छा ज्या वेळी होते त्या वेळी असलेल्या मूत्रापेक्षा सर्वसाधारणपणे दुप्पट मूत्रसंचय करण्यासाठी क्षमता प्रत्येकात असते. शरीररचनात्मक क्षमता एक लिटर असून त्या पुढे मात्र मूत्राशय फाटते. शरीरविज्ञानदृष्ट्या ही अवस्था कधीही उद्भवत नाही. पुरुषाच्या मूत्रधारेला नेहमी पीळ का असतो ही गोष्ट, शरीरक्रियाविज्ञानाशी संबधित नसलेली, कदाचित द्रायुगतिकीशी (द्रायूच्या-द्रव व वायू यांच्या-प्रवाहाचा आणि द्रायूची त्याच्या सीमांशी होणाऱ्या परस्परक्रिया यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राशी) संबंधित असणारी परंतु आरोग्यविज्ञानदृष्ट्या उपयुक्त निसर्ग योजना आहे, कारण त्यामुळे इतस्ततः फवाऱ्यामुळे उडणारे थेंब उडत नाहीत.
मूत्रोत्सर्जक तंत्राच्या विकृती : वृक्काच्या विकृतींविषयी ‘वृक्क’ या नोंदीत माहिती दिलेली आहे. तेथे (अ) आघातजन्य विकृती, (आ) मूत्रावरोध, (इ) सूक्ष्मजंतुजन्य रोग, (ई) अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेल्या गाठी), (उ) जन्मजात विकृति, (उ) असंयत मूत्रता यांविषयी माहिती दिली आहे.
(अ) आघातजन्य विकृती : (१) मूत्रवाहिनी : उदरगुहेत खोलवर असलेले स्थान, छोटे आकारमान व हालचालक्षमता या कारणांमुळे मूत्रवाहिनीला प्रत्यक्ष आघाताचा धोका अत्यल्प असतो. श्रोणीतील अवयवावरील शस्त्रक्रियेच्या वेळी १० ते १५% शस्त्रक्रियांमध्ये मूत्रवाहिनीस इजा होण्याची शक्यता असते. बहुधा मूत्राशयापासून ४ ते ६ सेंमी. अंतरावर श्रोणीतील मूत्रवाहिनीस दुखापत होते. परिणामी मूत्रवाहिनी रोध किंवा ⇨ नाडीव्रण तयार होतो. जेव्हा श्रोणीसंबंधित शस्त्रक्रिया करावयाची असते तेव्हा मूत्रवाहिनीचे स्थान अगोदर निश्चित केल्यास इजा टाळणे शक्य असते. त्याकरिता मूत्रवाहिनीदर्शन उपयुक्त असते. आघातजन्य विकृतीवर शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय योग्य असतो.
(२) मूत्राशय : रिकामे मूत्राशय जवळजवळ अभेद्य असते. भरलेल्या मूत्राशयास ओटीपोटावरील जोरदार आघाताने (उदा., लाथ बसणे), अस्थिभंगातील अस्थीच्या टोकामुळे गंभीर इजा होऊ शकते. श्रोणिअस्थिभंग हे मूत्राशयास आघात होण्याचे नेहमी आढळणारे कारण आहे. रिकामे मूत्राशय श्रोणिगुहेत असल्याने बाह्य आघातामुळे त्याला इजेचा धोका कमी असतो व भरलेले मूत्राशय उदरगुहेत आल्यामुळे इजेचा जादा धोका असतो. गंभीर विकृतीत मूत्र-परिस्रावाचा (भोवतालच्या उतकांत मूत्र शिरण्याचा) व त्यानंरच्या सूक्ष्मजंतु-संसर्गाचा धोका असतो. मूत्राशय विदारण (फाटणे) अंतःपुर्युदरी किंवा पर्युदर बाह्य असू शकते.
(३) मूत्रमार्ग : मूत्रमार्गाच्या अधिक अचल असलेल्या कलामध्ये व कंद मूत्रमार्ग या भागांना आघातजन्य विकृतीचा धोका असतो. कलामध्य भागास बहुधा श्रोणिअस्थिभंगामुळे इजा होते. पाय फाकलेल्या अवस्थेत विटप भागावर आदळल्यास कंद मूत्रमार्गास इजा होते. मूत्रमार्गाच्या शिश्न भागास धातूची दंडशलका घालताना इजाहोण्याचा संभव असतो. या आघातजन्य विकृतीमध्ये कलामध्य भागाचे पूर्ण विदारण गंभीर असते. कारण त्यापासून मूत्रमार्ग संकोचन ५०%, नपुसंकत्व ३०% आणि असंयत मूत्रता ५% असे उपद्रव उत्पन्न होण्याची शक्यता असते.
(आ)मूत्रावरोध : मूत्रप्रवाहात मूत्रवहन मार्गामध्ये कोठेही बिघाड उत्पन्न होण्याची शक्यता असते. कोणत्याही कारणाने झालेला अवरोध त्या ठिकाणच्या मागच्या भागात दाबाखाली असलेला मूत्रसंचय करतो व त्या भागाचे विस्फारण होते. शिवाय मूत्रोत्पादनात बदल होतात, त्या ठिकाणी सूक्ष्मजंतू संसर्ग आणि ⇨ मुतखडा निर्माण होण्यास संधी मिळते.
मूत्रोत्सर्जक तंत्राची नेहमी आढळणारी ही विकृती दोन प्रकारची असते : (१) तीव्र व (२) चिरकारी (दिर्घकालीन), तीव्र प्रकारात पाठ, पोट किंवा जांघ या ठिकाणी वेदना होणे हे प्रमुख लक्षण असते. मूत्रोत्सर्जन अल्प किंवा पूर्ण बंद होते. चिरकारी प्रकार हळूहळू प्रगत होणारा व लक्षणरहित असतो.
मूत्रावरोधाची जागा जर वृक्कद्रोण व मूत्रवाहिनीची सुरुवात या ठिकाणी असेल, तर वृक्कद्रोणाचा अतिविस्फार होऊन हळूहळू वृक्कमूलोतकाचा नाश होऊन जलवृक्क (वृक्कद्रोणात मूत्र साचून बनणारी द्रवयुक्त पुटी) तयार होतो. दुसऱ्या बाजूचा वृक्क कार्यक्षम राहून उत्सर्जन कार्यात व्यत्यय आल्याचे लवकर समजत नाही. कित्येक महिन्यांनंतर सुक्ष्मजंतू संसर्गाची लक्षणे व उदरगुहेत वृक्काच्या जागी तयार होणारा गोळा यांमुळे रोग असल्याचे लक्षात येते.
मूत्रोत्सर्जक मार्गातील खालच्या भागातील अवरोध (उदा., अष्ठिला ग्रंथिवृद्धी, जन्मजात विकृती वगैरे) द्विपार्श्व (दोन्ही बाजूंकडे) जलवृक्क व जलमूत्रवाहिनी (मूत्र साचून नेहमीपेक्षा आकारमान मोठे झालेली मूत्रवाहिनी) उत्पन्न करतो. इतर कारणांमध्ये मुतखडा, अर्बुदे, बाह्य दाब इत्यादींचा समावेश होतो. उपचारामध्ये योग्य शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो.
(इ) सूक्ष्मजंतू संसर्ग : कोणत्याही वयात सूक्ष्मजंतू संसर्ग उद्भवण्याची शक्यता असते. श्वसनमार्गाखालोखाल मूत्रोत्सर्जक तंत्राच्या सूक्ष्मजंतूजन्य विकृतींचे प्रमाण असते. सूक्ष्मजंतूंचा शिरकाव आरोहाने (खालून वर) रक्त प्रवाहाद्वारे किंवा लसीकाप्रवाहातून (ऊतकांकडून रक्तात जाणाऱ्या व रक्तद्रवाशी साम्य असणाऱ्या द्रव पदार्थाच्या प्रवाहातून) होतो. पुष्कळ वेळा लक्षात न येणारी ही विकृती अव्युत्क्रमी वृक्कनाश करणारी असते. स्त्रियांमध्ये मूत्रोत्सर्जक तंत्राच्या खालच्या भागातील विकृतीस आंत्रमार्गातील सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. आखूड मूत्रमार्ग व आंत्रमार्गाची जवळीक यांशिवाय प्रसूतिपश्च मूत्राशयवर्ध्म (योनिभित्तीतून मूत्राशय बाहेर पडून होणारा अंतर्गळ) किंवा मूत्रामार्गवर्ध्म (योनिमार्गात तयार होणारा मूत्रमार्ग भित्तींचा अंधवर्ध्म) यामध्ये मूत्र राहून जंतु-संक्रामणास योग्य संधी मिळते. [→मूत्राशयशोथ].
मूत्रमार्गशोथ गोनोकोकाय सूक्ष्मजंतुजन्य असू शकतो व ⇨ परमा अथवा पूयप्रमेह या रोगाचे ते सुरुवातीचे लक्षण असू शकते. क्लॅमिडीया नावाचे सूक्ष्मजंतू पुरुषांतील २५ ते ६० % व स्त्रियांतील २०% मूत्रमार्गशोथास कारणीभूत असतात. संधिशोथ, नेत्रश्लेष्मशोथ (डोळे येणे) व मूत्रमार्गशोथ या त्रयीला (हान्स रिटर या जर्मन आरोग्यवैज्ञानिकांच्या नावावरून) रिटर लक्षणसमूह म्हणतात. सूक्ष्मजंतुजन्य रोगांवर वैद्यकीय सल्ल्यानुरूप औषध योजना करणेच योग्य असते.
(ई)अर्बुदे : मूत्रोत्सर्जक तंत्राच्या कोणत्याही भागात साधे किंवा मारक अर्बुद उत्पन्न होऊ शकते. त्यापैकी मूत्राशय अर्बुदाचे प्रमाण सर्वाधिक असते. चिरकारी मूत्राशयशोथास शिस्टोसोमा हिमॅटोबियम नावाच्या सूक्ष्मजीवांचा संसर्ग व औद्योगिक उत्पादनातील रसायनांचा संपर्क कारणीभूत असतात. रक्तमेह (मूत्रात रक्ताचा शिरकाव होणे) हे प्रमुख लक्षण असते. ९५% अर्बुदे मूत्राशयाच्या श्लेष्मकलास्तर कोशिकांची असतात. अमेरिकेत कर्करोगामुळे मरणाऱ्यांच्या एकूण संख्येत ३% लोक मूत्राशय कर्करोगाचे बळी असतात.
(उ)जन्मजात विकृती : मूत्रवाहिनी व मूत्राशय यांच्यात जन्मजात असंगतीमध्ये द्विभाजक, कुस्थिती, संकोचन, विस्फारण व अंधवर्ध यांचा समावेश होतो. उदर अग्रभित्तीच्या मध्यरेषेवरील जोड न झाल्यास मूत्राशय विवर्तित होऊन ते जघनास्थीच्या वर उघडते व मूत्रवाहिन्यांतील मूत्र तेथेच शरीराबाहेर पडते. बहुतेक सर्व प्रकारांत सूक्ष्मजंतू संसर्गाचा धोका असतो. गंभीर प्रकारच्या विकृतीत प्रौढावस्थेपूर्वीच मृत्यू येतो. साधारण स्वरूपाची असंगती शस्त्रक्रियेने सुधारता येते.
(ऊ) असंयत मूत्रता : रात्री अंथरुणात व दिवसा अंगावरील कपड्यात अनैच्छिक मूत्रोत्सर्ग (नकळत लघवी) होण्याला अनुक्रमे नैश व दैनिक असंयत मूत्रता म्हणतात. शरीरक्रियाविज्ञानदृष्ट्या सर्वसाधारणपणे वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत मूत्रोत्सर्ग ही पूर्णपणे अनैच्छिक प्रतिक्षेपी क्रिया असते परंतु त्यानंतर मेंदूतील वरिष्ठ केंद्राचे नियंत्रण प्रस्थापित होते. हे नियंत्रण केव्हा तयार व्हावे हे अनिच्छित असल्यामुळेच पाचव्या वर्षानंतर अनैच्छिक मूत्रोत्सर्ग चालूच राहिल्यास ती विकृती समजावी. नैश असंयत मूत्रता महिन्यातून एक किंवा अधिक वेळा ८% शाळकरी वयाच्या मुलांत आढळते. दैनिक प्रकार कमी प्रमाणात आढळतो परंतु तो गंभीर असतो. मुलींमध्ये पुष्कळ वेळा सूक्ष्मजंतू संसर्ग कारणीभूत असतो. नैश प्रकार मुलींपेक्षा मुलग्यांत अधिक आढळत असून यौवनावस्थेच्या सुमारास पुष्कळ वेळा नाहीसा होतो. बहुधा मातापित्यांपैकी एकास ही विकृती असते.
नैश मूत्रोत्सर्गाचे दोन प्रकार ओळखले जातात : (१) टिकाऊ अथवा चिरस्थायी व (२) प्रतिक्रामी. पहिल्यात मूल रात्री अंथरुणात दररोज मूत्रोत्सर्ग करण्याचे थांबलेलेच नसते आणि दुसऱ्यात काही रात्री कोरड्या गेल्यानंतर काही तणावजन्य परिस्थितीमुळे तो पुन्हा सुरू होतो. पुष्कळ वेळा प्रातर्विधीचे अपुरे किंवा अयोग्य प्रशिक्षण टिकाऊ प्रकारास कारणीभूत असते. मातापिता जेव्हा धाकदपटशाने मुलाकडून योग्य वर्तणुकीची अपेक्षा करतात तेव्हा मूल अबोधपणे अंथरूण ओले करुन बंड करते. इतर मानसिक ताण मूत्राशय नियंत्रण काबूत आणण्यात अडथळा आणतात.
प्रतिक्रामी प्रकारास घरबदल, घरातील झगडे, वादविवाद, नव्या भावंडाचा जन्म वा कुटुंबातील एखादी दुर्घटना कारणीभूत असतात.
दोन्ही प्रकारांत मूत्रोत्सर्जक तंत्राच्या शरीररचनात्मक विकृतींचे प्रमाण अत्यल्प असते. संपूर्ण शारीरिक तपासणी व मूत्रपरीक्षा यांशिवाय इतर परीक्षा (उदा., मूत्राशय दर्शन वगैरे) आवश्यक नसतात. उपचारापूर्वी विशिष्ट कारण समजणे जरूर असते. कौटुंबिक इतिहास व चालू आजारासंबंधी माहिती उपयुक्त असतात. मातापित्यांचे व पुष्कळ वेळा मोठ्या मुलांचे सहकार्य उपयुक्त ठरते. पुढील सर्वसाधारण सूचना अमलात आणता येतील : (१) मुलाचे सहकार्य मिळवून त्याला बरे होण्याविषयी उद्युक्त करणे. (२) समजू शकणाऱ्या मुलाच्या मूत्रोत्सर्गाची दैनंदिन नोंद ठेवून जी रात्र कोरडी जाईल तिचे कौतुक करून एखादे बक्षीस देणे जेवढ्या रात्री अधिक कोरड्या तेवढे मोठे बक्षीस. (३) मूल मोठे असल्यास स्वतःचे मलीन कपडे त्यास धुवावयास लावणे. (४) रात्रीच्या जेवणानंतर द्रव पदार्थ न पिऊ देणे. (५) झोपण्यापूर्वी मूत्रोत्सर्ग करावयास लावणे. (६) टाकून बोलणे, रागावणे व हिणवणे सर्वस्वी टाळणे.
औषधी उपचारामध्ये इमिप्रामीन २५ ते ५० मिग्रॅ. रात्री उपयुक्त आहे परंतु त्याचे काही आनुषंगी दुष्परिणाम असल्यामुळे ते वैद्यकीय सल्ला व देखरेखीशिवाय वापरू नये.
पन्नाशी उलटलेल्या वयस्कर व्यक्तींच्या एका पाहणीत ५०० पैकी ७० लोकांना असंयत मूत्रता असल्याचे आढळले होते. बहुतेकांमध्येमूत्राशय नियंत्रण दोषापेक्षा मूत्राशय दोष आढळला होता. जाणीव होण्यापूर्वीच मूत्रोत्सर्ग होण्याकडे मूत्राशयाची प्रवृत्ती बनली असावी. मूत्राशय भरल्याची संवेदना पोहोचण्यापूर्वीच परिसंकोची स्नायू शिथिल पडत असावेत. प्रौढ स्त्रिया पुरुषापेक्षा कमी वेळा मूत्रोत्सर्ग करतात असे म्हणतात. त्यांच्या मूत्राशय रचनेत कोणताही फरक नसून त्या मूत्रोत्सर्ग प्रतिक्षेपाचे अधिक दमन करू शकतात.
कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.
आयुर्वेदीय वर्णन : मूत्रावरोध : मूत्रावरोध ‘मूत्राघात’ या नावाने सुश्रुतांनी दिलेला आह त्यामध्ये वातकुंडलिका इ. १२ रोग दिलेले आहेत. ह्या ठिकाणी हा रोग ‘लघवी अडणे’ ह्या अर्थाने फक्त घेतलेला आहे. यावर चिकित्सा करताना बस्तीच्या भागात तेल लावून पोटिसाने शेक करून मूत्रमार्गामध्ये वातनाशक बस्ती द्यावे आणि अवगाह स्वेद द्यावा. उन्हाळ्यात होणाऱ्या काकडीच्या बियांचा मगज (गर) १ तोळा सैंधव घालून कांजीबरोबर द्यावा. सुरा नावाची दारू भरपूर पादेलोण घालून प्यावी किंवा गुळाची दारू प्यावी. मध व मांसाची चटणी खावी. मध व केशर शिळ्या पाण्याबरोबर प्यावे. सुरा नावाच्या दारूबरोबर डाळिंबाचा रस, वेलदोडे, जिरे, सुंठ व सैंधव घालून प्यावे, पित्ताचा संबंध असल्यास पृथक्पर्ण्यादि वर्ग व गोखरू ह्यांचे दूध सिद्ध करून मध व खडीसाखर घालून प्यावे. घोडा किंवा गाढव ह्यांच्या लिदेचा रस पाजावा. त्रिफला, बोरे ह्यांची चटणी किंचित सैंधव पाण्यात घालून प्यावी, मनुकांची चटणी किंवा रिंगणीचा रस शिळ्या पाण्याबरोबर पाजावा. आवळ्याच्या रसाबरोबर लहान वेलदोडे पाजावेत. अश्मरीची (मुतखड्याची) सर्व चिकित्सा करावी.
मूत्र विकार : मूत्र विकारांमध्ये मूत्राघात व मूत्रकृच्छ्र असे दोन मुख्य वर्ग पाडलेले आहेत. मूत्राघात वर आलेले आहेत, मूत्रकृच्छ्राचे वात, पित्त, कफ आणि सन्निपाताने विकार होतात. त्यातच अश्मरीही येते. अश्मरीच्या चिकित्सेकरिता ‘शल्य तंत्र व शल्यशालाक्य’ ही नोंद पहावी.
वात मूत्रकृच्छ्रामध्ये पाषाणभेद, गोखरू, कुंभ, शेरणी, रिंगणी ह्यांनी तेल, तूप, आणि नैवृत स्नेह सिद्ध करून ते पिण्यास द्यावे किंवा त्याचा स्नेहबस्ती द्यावा किंवा मूत्रमार्गामध्ये त्याचा बस्ती द्यावा किंवा नुसत्या गोखरूच्या रसात गूळ, सुंठ व दूध घालून ते दूध सिद्ध करून द्यावे. पित्तकृच्छ्र असेल तर तृणादि, उत्पलादि, काकोल्यादि गणांनी सिद्ध केलेले दूध किंवा तूप उपयुक्त होते. तसाच मूत्रद्वारात बस्ती द्यावा. उसाचा रस, दूध व द्राक्षादि यांच्याबरोबर रेचक द्यावे. कफजामध्ये सुरसादि, ऊषकादि, मुस्तादि, वरुणादि गणांमध्ये तेल सिद्ध करून किंवा पेज तयार करून पोटात द्यावी. त्रिदोष विकारात ज्या दोषाचे आधिक्य असेल, तर व्रण चिकित्सा करावी आणि अश्मरी असेल, तर अश्मरीची चिकित्सा करावी.
पटवर्धन, शुभदा अ.
पहा : उत्सर्जन मूत्र वृक्क.
संदर्भ : 1. Allan, F. D.Essentialsof Human Embryology,New York, 1960.
2.Beeson, P. B. McDermott, W., ED., Textbook of Medicine, Tokyo, 1975.
3. Guyton,A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.
4. Petersdorf,R. G.and others ED.,Harrison’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.
5. Warwick,R.,Williams,P.L. ED.,Gray’s Anatomy,Edinburgh, 1973.
6. Wyker, A. W. (Jr.) Gillenwater, J. Y. Method of Urology, New Delhi, 1975.
“