मुसळी, काळी : (हिं., गु. काली मुसली हिं. मुसली कंद क. नेला तटिगडे सं. भूमितला, दीर्घ कंदिका, मुसली लॅ. कुर्कुलिगो ऑर्किऑइडस कुल- ॲमारिलिडेसी). ही लहान ⇨ ओषधी एक दलिकित (बीजात एकच दल असलेल्या) वर्गातील फुलझाडांपैकी [→वनस्पति, आवृतबीज उपविभाग], असून फिलीपीन्स, जावा व भारत (आसाम, प. द्वीपकल्प, बंगाल इ.) येथे सामान्यपणे सर्वत्र आढळते. पावसाळ्याच्या सुरुवातीस हिची लहान रोपटी उगवतात. या बहुवर्षायू (अनेक वर्षे लागणाऱ्या) वनस्पतीचे मूलझोड [जमिनीतील व मुळे धारण करणारे खोड →खोड], जाडजूड असते. मुळे लांबट व मांसल असतात. पाने बिनदेठाची, साधी, लांबट व भाल्यासारखी, पातळ, चुणीदार व १५-४५ x २·५ सेंमी. असून त्यांचा जमिनीवर झुबका दिसतो. फुलोऱ्याचा दांडा, आखूड, सपाट व जाड आणि पानांच्या आवरक (वेढणाऱ्या) तळात लपलेला असून त्यावर फुलोरा [मंजरी →पुष्पबंध], मे ते जूनमध्ये येतो. फुले लहान, सच्छद (तळाशी लहान उपांगे असलेली), पिवळी, फुलोऱ्याचा फक्त तळाजवळ द्विलींगी, इतरत्र सर्व पुल्लिंगी असतात. परिदले (फुलातील देठाजवळची पानासारखी सपाट दले) सहा व केसाळ आणि केसर दले (पुं-केसर) सहा व आखूड असतात. किंजपुट लहान, अधःस्थ आणि तीन कप्प्यांचा असून बीजके ६-८ असतात. परिदले व किंजपुट यांमध्ये लहान देठासारखा भाग असतो. पुं-पुष्पात फक्त सहा केसरदले असतात [→फूल]. लहान चंचुयुक्त बोंड फळ (१३ मिमि. लांब) जमिनीलगत असून त्यात १-४, काळी, चकचकीत, आयत आणि खाचदर बीजे असतात. नवीन उत्पत्ती अपप्ररोह (तळाशी जमिनीवर आडवी वाढणारी आखूड फांदी) व बीजे यांच्यामुळे होते. ह्या वनस्पतीची इतर सामान्य लक्षणे ⇨ ॲमारिलिडेसीत वा मुसली कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
मुसळीची काळी मुळे शक्तिवर्धक, वीर्यवर्धक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व उत्तेजक असून वातविकार, पित्तविकार, आमांश, संधिवात, उसण भरणे, कावीळ, मूळव्याध, दमा, कुत्र्याच्या चावण्याने (विषामुळे) आलेला जलद्वेष, रक्तस्त्राव इत्यादींवर उपयुक्त असतात. अतिसारावर ताकात मूळ उगाळून देतात. जखमेवर व कातडीच्या रोगांवर मुळांचे पोटीस बांधतात तसेच खोडाचे चूर्ण कापलेल्या भागात भरल्यास जखम भरून येते.काळी मुसळी : (१) फुलोऱ्यासह वनस्पती, (२) फूल.हिच्या प्रजातीतील दुसरी जाती (कु. रिकर्व्हेटा) बागेत शोभेकरिता लावतात. निसर्गतः ती नेपाळ ते बंगालपर्यंतच्या हिमालयी भागात आढळते. तिची पाने अधिक लांबरुंद असून पिवळ्या फुलांचा झुबका जमिनीजवळ लहान दांड्यावर येतो. पानातील धागा काढून रानटी जमातीतील लोक त्याचे कृत्रिम केस बनवितात तिची फळे खाद्य आहेत. भारतात या वनस्पतींच्या कुर्कलिगो या प्रजातीतील तीन जाती आढळतात. सफेद मुसळी हे नाव शतावरीच्या एका जातीला (ॲस्परॅगस ॲडसेन्डेन्स), तसेच ⇨ कुलाई (क्लोरोफायटम ट्युबरोजम) या वनस्पतीला पण वापरलेले आढळते.(चित्रपत्र ५६).पहा : लिलिएलीझ शतावरी.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol.II .New Delhi, 1950. Kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Part IV, New Delhi, 1975.
जगताप, अहिल्या पां. परांडेकर, शं. आ.
“