मुल्हेर : महाराष्ट्रातील शिवकालातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. तो नासिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात (सटाणा) मुल्हेर शहराच्या दक्षिणेस ३·२१ किमी. वर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची १,३१७ मी. आहे. येथे जाण्यासाठी मालेगाव-सटाणा-मुल्हेर अशी राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीची सोय आहे. हा सह्याद्रीच्या साल्हेर-मुल्हेर फाट्यावर मालेगावच्या वायव्येस सु. ६२ किमी.वर आहे. याचे मुल्हेर, मोरा व हातगड असे तीन भाग असून मुल्हेरलाच बालेकिल्ला असे दुसरे नाव आहे. किल्ल्याची अर्धी चढण संपल्यावर एक माची असून तीवर जुन्या घरांचे अवशेष व मशीद आहे. इथून पुढे जाताना निरनिराळे दरवाजे लागतात आणि एका विवरातून वर गेल्यानंतर बालेकिल्ला लागतो. या किल्ल्यास आवश्यक तेथे सर्व ठिकाणी तटबंदी आहे. बालेकिल्ल्यावर फत्ते-इ-लष्कर, रामप्रसाद व शिवप्रसाद अशा प्रत्येकी दोन मीटर लांबीच्या तोफा आहेत शिवाय कचेरी, भडंगनाथाचे मंदिर, सु. १५ टाकी व दोन दारूखाने आहेत तारिख-इ-फीरोझशाही, आईन-इ-अकबरी, तारिख-इ-दिलखुश इ. फार्सी ग्रंथांतून मुल्हेरची माहिती ज्ञात होते. मुल्हेरचा पहिला उल्लेख तारिख-इ-फीरोझशाही या ग्रंथात १३४० मध्ये आला असून त्यावेळी मुल्हेर आणि साल्हेर हे माणदेव नावाच्या एका सेनाधिकाऱ्याच्या ताब्यात होते. हा किल्ला शाहजहान बादशहाच्या वेळेपर्यंत बागुल वंशातील राजांच्या ताब्यात होता. इ. स. १६१० मध्ये इंग्रज प्रवासी फिंच म्हणतो की, ‘मुल्हेर व साल्हेर ही दोन्ही चांगली शहरे होती.’ शाहजहानच्या काळात औंरगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना त्याने प्रथम हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बागुल वंशी राजा भैरवसेनाने हा किल्ला कित्येक महिने मोठ्या शर्थीने लढविला पण शेवटी त्याला तो किल्ला औरंगजेबास देऊन शाहजहानची मनसबदारी पतकरावी लागली. औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव औरंगगड असे ठेवले. हा किल्ला घेण्याचे कामी भिकुजी चव्हाण, हंबीरराव मोहिते यांनी मोगलांना फार मदत केली होती. पुढे १६७२ च्या आगेमागे हे किल्ले छ. शिवाजींनी जिंकून घेतले. तत्पूर्वी १६६३ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळीही हे किल्ले शिवाजींच्या ताब्यात होते. शिवाजीनंतर हे किल्ले पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेले पण साल्हेर किल्ला मात्र मोगलांना लाच देऊनच हस्तगत करावा लागला. पुढे उत्तर पेशवाईत १७५० च्या सुमारास मुल्हेरसकट इतर किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. मराठी सत्तेच्या अवनतीनंतर १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी तेथील किल्लेदार रामचंद्र जनार्दन फडणीस यास माफी मिळाली.
खरे, ग. ह.