वेदकाल : वेदकालीन इतिहासाचे मुख्य साधन वेदवाङ्‌मय हेच होय. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद, त्यांचे ब्राह्मणग्रंथ, त्यांच्या शेवटी घातलेली किंवा क्वचित्‌ स्वतंत्र अशी आरण्यके व उपनिषदे यांचा अंतर्भाव होतो. प्राचीन काळी या चारही वेदांच्या अनेक शाखा प्रचलित होत्या व त्यांचे ग्रंथही थोडयाफार फरकाने भिन्न होते. ⇨पतंजलीने आपल्या ⇨महाभाष्यात म्हटले आहे, की ऋग्वेदाच्या एकवीस शाखा, यजुर्वेदाच्या एकशे-एक शाखा, सामवेदाच्या सहस्र शाखा व अथर्ववेदाच्या नऊ शाखा प्रचलित आहेत. मात्र सामवेदाच्या सहस्र शाखा यांचा अर्थ सहस्र संहिता व ब्राह्मणे असा न करता सहस्रप्रकारची सामगायने असा केला तर सुसंगत ठरतो. यातील फारच थोडे वाङ्‌मय सध्या उपलब्ध आहे. ऋग्वेदाच्या संहितांपैकी शाकल संहिता ही सध्या मुख्यतः प्रचलित आहे. यजुर्वेदाचे कृष्ण व शुक्ल असे दोन मुख्य भेद आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या काठक, कपिष्ठल, मैत्रायणी आणि तैत्तिरीय अशा चार शाखा प्रसिध्द असून शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व आणि माध्यंदिन अशा दोन शाखा प्रचलित आहेत. सामवेदाच्या संहितांपैकी कौथुम, जैमिनीय व राणायनीय या तीन संहिता प्रसिध्द आहेत. अथर्ववेदाची शौनक व पैप्पलाद संहिता प्रसिध्द झाल्या असून दुसऱ्या पैप्पलाद संहितेची नवीन हस्तलिखिते अलीकडे सापडली आहेत. या सर्व वाड्मयाला श्रुती अशी संज्ञा आहे. कारण ते कोणी रचलेले नसून त्याचा साक्षात्कार ऋषींना झाला होता, अशी धार्मिक श्रध्दा आहे. याशिवाय वैदिक वाङ्‌मयात अंतर्भूत नसलेली पण त्या वाड्मयाच्या ज्ञानाकरिता उपयुक्त शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदःशास्त्र व ज्योतिषशास्त्र अशी सहा वेदांगे आहेत. हे सर्व वाङ्‌मय वेदकालीन इतिहास व संस्कृती यांच्या ज्ञानाकरिता अत्यंत उपयोगी आहे. [→ वेद व वेदांगे].    

वैदिक वाङ्‌मयात कोणत्याही कालनिर्देशपद्धतीचा उल्लेख नसल्यामुळे त्याचा काल काही विद्वानांनी अनुमानाने, तर इतर काहींनी त्या वाङ्‌मयातील ज्योतिषविषयक उल्लेखांवरुन ठरविण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचे निर्यण निश्चित रुपाचे मानले गेले नाहीत. अशा अनुमानांना निश्चित रुप प्राप्त होण्याकरिता उत्खननासारख्या उपोद्‌बलक प्रमाणांची जरुरी असते. सुदैवाने तसा पुरावा हूगो विंक्‌लर यांना ⇨आशिया मायनरमध्ये ⇨बोगाझकई येथे १९०६-१९०७ मध्ये केलेल्या उत्खननात सापडला आहे. तेथे सापडलेल्या विटेवरील कोरीव लेखात इंद्र, मित्र, वरुण आणि नासत्य (अश्विनौ) या वैदिक देवतांचा उल्लेख आहे. या लेखाचा काल ख्रिस्तपूर्व चौदावे शतक हा आहे. या लेखाने वैदिक कालावर कसा प्रकाश पडतो, याची चर्चा पुढे केलेली आहे.

प्रस्तुत लेख भारताबाहेर आशिया मायनरमध्ये सापडलेला असला, तरी सर्व वैदिक वाङ्‌मय मात्र भारतात उत्पन्न झाले याविषयी बहुतेक विद्वानांत एकवाक्यता आहे. म्हणून भारतातील उत्खननाचा पुरावा काय दाखवतो, हे पाहण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक बी. बी. लाल यांनी १९५०-५२ मध्ये दिल्लीच्या ईशान्येस सु. ९६ किमी. वर असलेल्या हस्तिनापूर या गावी उत्खनन केले. त्यावरुन तेथील अवशेष ख्रिस्तपूर्व ११०० ते ८०० या कालातील असावे, असे त्यांनी अनुमान केले. या पुराव्याचाही विचार वैदिक काल निश्चित करताना करावा लागेल.    

वैदिक वाङ्‌मय हे आर्यांचे वाङ्‌मय होय. त्यातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋग्वेद हा सप्तसिंधूंच्या प्रदेशात रचला होता, हे त्यातील उल्लेखांवरुन स्पष्ट दिसते पण आर्य मूळचे भारतातील की बाहेरुन भारतात आले, याविषयी विद्वानांचे ऐकमत्य नाही. बहुतेक विद्वानांना दुसरे मत मान्य आहे. ग्रीक, लॅटिन, गॉथिक, केल्टिक, संस्कृत, पर्शियन इ. भाषांतील पिता, माता, दुहिता इ. अगदी प्राथमिक कल्पनांचे वाचक शब्द पूर्वीच्या एका समान भाषेतून निघालेले दिसतात. ती भाषा बोलणारे लोक एकाच आर्य वंशाचे होते किंवा अनेक वंशांचे असून ते एका ठिकाणी राहत होते, याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. तसेच त्यांचे मूळचे निवासस्थान कोठे होते, याविषयीही भिन्नभिन्न मते आहेत. काहींच्या मते दक्षिण रशियात, तर काहींच्या मते ते मध्य आशियात होते. या प्रश्नाची सविस्तर चर्चा येथे करणे शक्य नाही, तथापि प्राचीन भारत आणि इराण येथे राहणारे लोक आर्य होत यात संशय नाही कारण त्यांच्या काही देवदेवता, धार्मिक विधी आणि संस्कृती समान आहेत. तसेच ते काही काळ एकत्र राहत असून नंतर त्यांची एक शाखा भारतात आली आणि दुसरी इराणमध्ये गेली असे दिसते. वरील सर्व बाबींचा विचार करता आर्यांच्या भारतातील आगमनाचा काल निश्चित करण्यास मदत होईल.    

वेदकालनिश्चितीसाठी वेदवाड्मयाचा काल ठरविला पाहिजे. याविषयी पहिला प्रयत्न जर्मन प्राच्यविद्यापंडित ⇨माक्स म्यूलर (१८२३-१९००) याने केला. त्याची विचारसरणी पुढीलप्रमाणे : वैदिक वाड्मयाचे मंत्र, संहिता आणि ब्राह्मण असे विभाग करता येतात. हे सर्व वाङ्‌मय बुध्दकालापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व ६०० पूर्वी अस्तित्वात आले होते, असे बौध्द वाङ्‌मयातील उल्लेखांवरुन स्पष्ट दिसते. यातील प्रत्येक विभागाला दोनशे वर्षांचा काल लागला असावा. म्हणून मंत्रकाल ख्रिस्तपूर्व १२०० ते १०००, संहिताकाल ख्रिस्तपूर्व १००० ते ८०० आणि ब्राह्मणकाल ख्रिस्तपूर्व ८०० ते ६०० असे विभाग ठरविता येतात. यानंतरचे सूत्रवाङ्‌मय बौध्दकालाच्या आरंभी रचलेले दिसते.    

माक्स म्यूलरने प्रत्येक कालखंडास दिलेली दोनशे वर्षांची मर्यादा ही केवळ अनुमान धपक्याची होती तथापि काही विद्वानांनी तीच निश्चित मानून ऋग्वेद मंत्रांच्या रचनेचा काल ख्रिस्तपूर्व १२०० ते १००० हा पक्का केला. याउलट ज्यू जर्मन विद्वान ⇨हेर्मान याकोबी (१८५०-१९३७) आणि ⇨लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) यांनी वेदवाङ्‌मयातील ज्योतिषविषयक उल्लेखांचे गणित करुन त्यावरुन ते वाङ्‌मय ख्रिस्तपूर्व ४५०० वर्षांइतके प्राचीन आहे, असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला. ओरायन या ग्रंथात टिळकांनी दाखविले आहे, की वेदकाळी वर्षारंभ वसंतसंपातात होत असे. त्या काळी मृगशीर्षात वसंतसंपात होई, असे त्या नक्षत्राच्या आग्रहायण या नावावरुन दिसते. ते नक्षत्र वर्षामध्ये पहिले होते. याच कालाचे दुसरे गमक “एषा ह संवत्सरस्य प्रथमा रात्रिः यत्‌ फाल्गुनी पौर्णमासी ।” हे शतपथ ब्राह्मणातील (६.२.२.१८) वचन होय. यावरुन फाल्गुनामध्ये वर्षारंभ होत असे, असे सिध्द होते. या मृगशीर्ष कालाची मर्यादा ख्रिस्तपूर्व ४००० ते २५०० पर्यंत होती. यापूर्वी पुनर्वसूत वसंतसंपात होत असे, असे तैत्तिरीय संहितेतील एका वचनामधून दिसते. त्याचा काल ख्रिस्तपूर्व ६००० ते ४००० हा येईल.

याकोबीने वेदकालाचे ध्रुवतारा हे आणखी एक प्रमाण दिले आहे. गृह्यसूत्रांत म्हटले आहे, की गृहप्रवेश केल्यावर पतीने पत्नीस ध्रुवतारा दाखवून त्याप्रमाणे पतिनिष्ठेत ध्रुव (निश्चल) राहण्याचे आवाहन करावे. अर्थात उत्तर ध्रुवाजवळ सहज दिसणारा मोठा तारा असेल तेव्हाच हे करणे शक्य होईल. संपातचलनाने या ताऱ्याचेही चलन होते. गृह्यसूत्रांत सांगितलेली रुढी उत्तर ध्रुवाजवळ थुबन (आल्फा ड्रॅकोनिस) हा तारा होता, त्या काळी म्हणजे ख्रिस्तपूर्व २७०० च्या सुमारास शक्य होती आणि ती परिस्थिती ५०० वर्षे टिकली. ऋग्वेदातील विवाहसूक्तात तिचा उल्लेख नाही. म्हणून त्या वेदाचा काल ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपूर्वीचा मानला पाहिजे.

शं. बा. दिक्षित यांनी शतपथ ब्राह्मणातील, कृत्तिका मात्र पूर्वदिशेपासून चळत नाहीत, अर्थात त्या विषुववृत्तावर आहेत, या अर्थाच्या विधानावरुन शतपथ ब्राह्मणाचा काल ख्रिस्तपूर्व ३००० असा निश्चित केला होता.

यूरोपीय विद्वानांना वैदिक वाड्मयाचे हे ख्रिस्तपूर्व ४५०० ते ३००० वर्षांचे काल मान्य झाले नाहीत. त्यांनी मागे उद्‌धृत केलेल्या वचनांचा निराळाच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.   

आशिया मायनरमध्ये सन १९०७ मध्ये बोगाझकई येथे हिटाइट आणि मितानी या दोन वंशांच्या राज्यांमध्ये झालेल्या तहाचा लेख सापडला होता. त्यामध्ये दोन्ही वंशांच्या राजांनी आपापल्या देवतांचे आवाहन केल्याचे दिसून येते. मितानीच्या राजाने मित्र, वरुण, इंद्र आणि नासत्य या देवांचा निर्देश केला आहे. मित्र आणि वरुण यांचा अनेकवचनी उल्लेख आहे. त्यावरुन ऋग्वेदातल्याप्रमाणे मित्रावरुणौ असे देवताद्वंद विवक्षित असावे. या लेखाचा काल ख्रिस्तपूर्व चौदावे शतक असा आहे.    

या लेखाच्या पुराव्यासंबंधीही विद्वानांत मतभेद आहेत. सामान्यतः पाश्चात्त्य विद्वान याचा असा अर्थ करतात की, ख्रिस्तपूर्व चौदाव्या शतकात आर्य मेसोपोटेमियात (आधुनिक इराक) होते. नंतर आर्यांच्या दोन टोळ्यांमध्ये कलह उत्पन्न होऊन एक टोळी भारतात शिरली आणि दुसरी इराणात स्थायिक झाली पण असे मानल्यास मेसोपोटेमियातून आर्यांना भारताच्या प्रवेशास फक्त दोनशे वर्षांचा काल पुरला असे मानावे लागेल. ते अत्यंत असंभवनीय दिसते.⇨रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) यांचे मात असे होते की, आर्यांच्या काही टोळ्या फार प्राचीन काळी (इ.स.पू. २५०० च्या सुमारास) पंजाबात आल्या असाव्यात पण काही मेसोपोटेमियात ॲसिरियाच्या सान्निध्यात राहिल्या. त्यामुळे ऋग्वेदात आणि अथर्ववेदामध्ये देवांनी असुरांवर मिळविलेल्या विजयांचा आणि वर्चिन्‌, प्रिपू यांसारख्या असुराधिपतींना व त्यांच्या अनुयायांना ठार मारल्याचा उल्लेख आहे. या टोळ्या नंतर भारतात गेल्या असाव्यात. पुढे संहिता करण्याच्या वेळी सर्व टोळ्यांमध्ये प्रचलित असलेले मंत्र संगृहीत करण्यात आले असावेत.    

याकोबीचे मत याहून निराळे होते. त्याच्या मते मितानी हे आर्य नव्हते. आर्यांच्या सान्निध्याने प्रभावित होऊन त्यांनी त्यांची दैवते स्वीकारली असावी. ते इराणच्या पूर्व भागात राहत होते. तेथून आर्यांनी पंजाबात आक्रमण केले, तेव्हा मितानी टोळ्यांनी मेसोपोटेमिया काबीज करुन तेथे राज्य स्थापिले. तेव्हा बोगाझकई लेखावरुन वेदकालाची पूर्वमर्यादा इ. स. पू. १४०० पर्यंत आणण्याची जरुरी नाही आणि त्या लेखाच्या पुराव्याने आपण ठरविलेल्या वैदिककालाला बाध येत नाही.

सन १९२२ मध्ये ⇨मोहें-जो-दडो  येथे सापडलेल्या मुद्रांवरुन सिंधमधील प्रागैतिहासिक संस्कृतीचा शोध लागला. नंतर दोन वर्षांनी त्यांचे महत्त्व ध्यानात येऊन तेथे व नंतर पंजाबात⇨हडप्पा येथे उत्खनन करण्यात आले. त्यावरुन⇨सिंधू संस्कृतीचा काल ख्रिस्तपूर्व ३००० हा ठरविण्यात आला. नंतरच्या उत्खननावरुन या संस्कृतीचे अवशेष दक्षिणेस गुजरात व पूर्वेस उत्तर प्रदेश या भागांतही सापडले आहेत. या तथाकथित सिंधू संस्कृतीचा किंवा हडप्पा संस्कृतीचा वैदिक संस्कृतीशी कसा संबंध होता, याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. काहींच्या मते सिंधू संस्कृती वेदोत्तरकालीन आहे, तर इतरांच्या मते ती भारताची आद्य संस्कृती असून नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी तिचा उच्छेद करुन आपली राज्ये भारतात स्थापली. या विवाद्य प्रश्नांचा निर्णय करण्याकरिता बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णिलेल्या हस्तिनापूर नगरात उत्खनन केले. त्या उत्खनना वरुन त्यांनी पुढील निर्णय काढले : हडप्पा व मोहें-जो-दडो येथील समृध्द नगरे ख्रिस्तपूर्व १५०० च्या सुमारास नष्ट झाली. त्यानंतर आलेल्या आर्यांच्या संस्कृतीची विशिष्ट खूणही येथे सापडली. उदा., रंगीत भुरकट भांडी. या संस्कृतीचा काळ ख्रिस्तपूर्व ११०० ते ८०० असा मानला जातो.

प्रस्तुत निर्णय वर उल्लेखिलेल्या वाड्मयीन व कोरीव लेखांच्या प्रमाणांच्या विरुध्द जातात. हस्तिनापूर हे नगर वेदकालात अस्तित्वात नव्हते खरे, तरीही त्याच्या समृध्दीचा काल ख्रिस्तपूर्व ११०० इतका अलीकडचा असणे शक्य वाटत नाही. याबाबतीत पुराणांच्या पुराव्याचा परामर्श घेणे आवश्यक ठरेल.

पुराणात दिलेल्या राजवंशावळी जरी पूर्णपणे बरोबर नसल्या, तरी त्या परंपरागत प्रबळ पुराव्यावर आधारित आहेत, असे अ. स. अळतेकर यांनी सिध्द केले आहे. कारण त्यांत उल्लेखिलेल्या अनेक राजांची नावे वैदिक वाडमयात येतात आणि त्यावरुन ऋग्वेदाच्या विविध मंडलांतील मंत्रांच्या रचनेचा काल ठरविता येतो. पुराणांत म्हटले आहे, की ⇨परीक्षिताच्या जन्मापासून नंदराजाच्या अभिषेकापर्यंत सु. १०५० वर्षांचा काळ लोटला होता. नंदांच्या कारकीर्दीचा आरंभ ख्रिस्तपूर्व सु. ३६० या वर्षी झाला, तेव्हा भारतीय युध्दाचा काल ख्रिस्तपूर्व सु. १४०० हा येतो. याला बृहदारण्यकोपनिषदातील गुरुशिष्यपरंपरेचा आणि वंश ब्राह्मण व जैमिनीय उपनिषद ब्राह्मण यांतील वंशपरंपरेचा आधार आहे. तेव्हा भारतीय युध्दाचा हा काल मानण्यास हरकत नाही.

ऐतरेय ब्राह्मणात  म्हटले आहे की, पर्वत आणि नारद यांनी सहदेवपुत्र सोमक, सृंजयपुत्र सहदेव, देववृधपुत्र बभ्रू, विदर्भाचा भीम आणि गांधार देशाचा नग्नजित्‌ यांना नाराशंस सोम प्राशन करण्यास दिला पुराणांत या राजांनी नावे येतात. हे राजे भारतीय युध्दापूर्वी ३० पिढया होऊन गेले. प्रत्येक पिढी १५ वर्षांची मानल्यास हे राजे भारतीय युध्दापूर्वी ४५० वर्षे म्हणजे ख्रिस्तपूर्व सु. १८५० मध्ये राज्य करीत होते. सृंजय हा दाशराज्ञ युध्दातील राजा सुदास याच्यानंतर चार पिढयांनी होऊन गेला. तेव्हा सुदास हा ख्रिस्तपूर्व सु. १९०० मध्ये झाला असावा. या दाशराज्ञ युध्दाचे वर्णन करणारी सूक्ते ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात घातली आहेत.

याप्रमाणे वैदिक आणि पौराणिक वाङ्‌मयातील ऐतिहासिक व्यक्तींच्या उल्लेखांचा समन्वय करुन अळतेकर यांनी ऋग्वेदाच्या मंडलांतील मंत्रांच्या निर्मितीचा काल पुढीलप्रमाणे सुचविला आहे : दुसरे मंडल ख्रि. पू. २७००, तिसरे मंडल ख्रि. पू. २३०० ते १९००, चौथे मंडल ख्रि. पू. २००० ते १८००, पाचवे मंडल ख्रि. पू. २६०० ते २४०० इत्यादी. ऋग्वेदाची सर्व सूक्ते एकाच कालखंडात रचली नव्हती. त्यात पूर्वीच्या आणि नवीन ऋषींचा उल्लेख आहे. “वरील विवेचनाचा संदर्भ आणि पौराणिक परंपरा यांचा दाखला देऊन डॉ. वा. वि. मिराशी वैदिक वाडमयाचा काळ ख्रिस्तपूर्व २७०० ते १४०० धरण्यास हरकत नसावी, असे निश्चयपूर्वक सांगतात आणि ख्रिस्तपूर्व १४०० च्या सुमारास होऊन गेलेल्या कृष्ण-द्वैपायन व्यासांनी वेदांच्या संहिता बनविल्या. या परंपरागत आख्यायिकेशी हे काळ सुसंगत आहेत, असे अनुमान काढतात.” मात्र या मताशी आधुनिक संशोधन सहमत नाहीत.

वैदिक वाड्मयाचा विस्तार पाहता उपरिनिर्दिष्ट काल असंभवनीय वाटत नाही. हे वाङ्‌मय मौखिक शिक्षणपध्दतीने संरक्षिले जात होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वैदिक मंत्रांच्या निर्मितीपासून उपनिषदांच्या रचनेपर्यंतच्या दीर्घकाळात आर्य संस्कृतीचा प्रसार पंजाबपासून बिहार-पर्यंतच्याच भूखंडात झाला होता. तेव्हा त्या संस्कृतीला सबंध उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा बराच मोठा प्रदेश व्यापण्यास किती काल लागला असेल, याची कल्पना सहज करता येईल. ख्रिस्तपूर्व सातव्या- आठव्या शतकांतच आर्य संस्कृतीचा प्रसार दक्षिणेत होऊन तेथे बौधायन व आपस्तंब शाखांची स्थापना झाली होती, असे दिसते. वैदिक वाड्मयाचा आरंभ ख्रि. पू. १५०० किंवा १२०० च्या सुमारास झाला असे मानल्यास आर्य संस्कृतीच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रसारास पुरेसा काल राहत नाही. तेव्हा या विशाल वैदिक वाड्मयाचा आरंभ ख्रि. पू. सु. २५०० किंवा २००० मध्ये होऊन त्याचा शेवट ख्रि. पू. ७५० ते ५०० या कालात झाला असावा, असे⇨मॉरिझ विंटरनिट्‌स (१८६३-१९३७) या थोर प्राच्यविद्यापंडिताने म्हटले आहे.

हा काल मानल्यास आर्यांनी भारतात प्रवेश केल्यावर त्यांचा येथील रहिवाशांशी काही काळ संघर्ष झाला असावा आणि त्याचे वर्णन ऋग्वेदात यावे अशी सहजच अपेक्षा होती. ऋग्वेदात तसे उल्लेख आलेले आहेत. त्या वेदात आर्यांचे शत्रू म्हणून ज्या दासांचे किंवा दस्यूंचे वर्णन आले आहे, त्यांचे वर्ण, रुप, देव, धर्म, नगरे यांचे सिंधू संस्कृतीच्या अवशेषांच्या पुराव्याशी विलक्षण साम्य आहे, हे अभ्यासकांनी दाखविले आहे. तेव्हा त्या संस्कृतीचा पुरावाही वरील वेदकालाला पुष्टी देणारा असाच आहे.


ऋग्वेदकाली आर्यांचे निवासस्थान : ऋग्वेदात हिमालयाचा उल्लेख येतो. सोमाचे प्राप्तिस्थान म्हणून मुंजवताचा निर्देश येतो, ते काश्मीरच्या नैर्ऋत्येचे हिमालयाचे शिखर असावे असा तर्क आहे. ज्या सप्तसिधूंचा ऋग्वेदात उल्लेख आहे, त्यांमध्ये सिंधू नदी तसेच पंजाबात तिला मिळणाऱ्या शतद्रु वा शुतुद्रि (सतलज), विपाश्‌ वा विपाशा (बियास), परुष्णी (रावी), असिक्नी (चिनाब) आणि वितस्ता (झेलम) या पाच नद्या आणि सरस्वती (सध्याची भटनेरजवळ वाळवंटात लुप्त होणारी सरसुती) ह्यांचा अंतर्भाव होत असावा. यांशिवाय सिंधू नदीला पश्चिमेकडून मिळणाऱ्या कुभा (काबूल), क्रुमु (कुश्म) आणि गोमती (गोमल) यांचीही नावे ऋग्वेदात येतात. पूर्वेच्या गंगा, यमुना, दृषद्वती (घागरा) आणि शरयू यांचाही उल्लेख येतो. या सर्व नद्यांमध्ये सरस्वती ही नदी अत्यंत पवित्र गणली जाते. वेदकाली ती समुद्राला मिळत असे, असे तिच्या वर्णनावरुन दिसते.

तेव्हा  वेदातील या उल्लेखांवरुन त्या काळी आर्य अफगाणिस्तान, पंजाब, सिंध व राजपुताना यांचा काही प्रदेश, वायव्य प्रांत, काश्मीर आणि पूर्वेस शरयूचे खोरे या प्रदेशांत राहत होते, असे दिसते. या भागात, विशेषतः पंजाबात ऋग्वेदाच्या बहुतेक सूक्तांची रचना झाली असावी.

ऋग्वेदकाली आर्यांच्या अनेक वंशांची लहानलहान राज्ये वरील प्रदेशात राज्ये करीत होती. ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात तृत्सू भरतांचा राजा सुदास याचे दहा राजांशी झालेला ⇨दाशराज्ञ युध्दाचे वर्णन आले आहे. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांत पुरु, यदु, तुर्वश, अनु आणि द्रुह्यु हे मुख्य होते, त्यांना ऋग्वेदात पंचजन म्हटले आहे. याशिवाय त्यांना साहाय्य करणाऱ्या अलिन, पक्थ, भलानस, शिव आणि विषाणिन या टोळ्यांचा निर्देश आला आहे. त्या वायव्य-सीमा प्रदेशात वास्तव्य करीत असाव्यात. दाशराज्ञ युध्दात अज, शिग्रू  आणि यक्षू यांनीही भाग घेतला होता. ते आर्येतरवंशी असून त्यांची राज्ये पूर्वेकडील प्रदेशात असावीत.

दाशराज्ञ युध्द परुष्णीच्या (रावीच्या) तीरी झाले. त्यात विजयी झालेला सुदास हा भरतवंशी होता. या वंशाच्या राजांनी सरस्वती, दृषद्वती आणि आपया या नद्यांच्या काठी अनेक यज्ञ केले. त्यांचे राज्य सरस्वती व यमुना यांच्या काठच्या प्रदेशावर पसरले होते. पुरु त्यांच्याजवळच्या प्रदेशावर राज्य करीत होते. या दोन राजवंशांचे पुढे कुरुवंशात एकीकरण झाले. द्रुह्यु, तुर्वश आणि अनु हे असिक्नी आणि परुष्णी या नद्यांमधील प्रदेशात होते. सृंजयांचे राज्य पांचालावर असावे. याशिवाय चेदी, उशीनर, गंधारी वगैरेंचा उल्लेख ऋग्वेदात व ब्राह्मणवाङ्‌मयात येतो. दास आणि दस्यू हे आर्यांचे प्रतिपक्षी तत्कालीन मूळचे रहिवासी होते. याशिवाय पणी हेही आर्यांचे शत्रू होते. ते श्रीमंत पण अधार्मिक, यज्ञयाग न करणारे, लोभी, कंजूष, दुसऱ्यांचे गोधन चोरुन नेणारे असे होते. ते तत्कालीन आर्येतर व्यापारी असावे, असा तर्क आहे.

इतर संहिता, ब्राह्मणे आणि उपनिषदे यांच्या काळी आर्य संस्कृतीचा पूर्व, दक्षिण आणि उत्तर भारतात दूरवर प्रसार झालेला दिसतो. या कालात पूर्वीचे पुरु, अनु, द्रुह्यु, तुर्वश इ. वंश दिसत नाहीत. त्यांच्याजागी कुरुपांचाल, सात्वत, मत्स्य, शिबी, इक्ष्वाकू, भोज इ. राजवंश प्रसिध्दीस आलेले दिसतात. या कालात आर्यांनी अंतर्वेदी पूर्णपणे व्यापिली होती. भरत आणि विदेघ या राजवंशांनी यमुना, सरस्वती आणि सदानीरा यांच्या काठचा प्रदेश पादाक्रांत केला होता. पूर्वेकडचे कोसल, विदेह, मगध आणि अंग यांवर आक्रमण करुन आर्यांनी तेथे आपली राज्ये स्थापिली होती. याच कालात काशीही प्रसिध्दीस आली. वंगाचे नाव मात्र या कालाच्या वाङ्‌मयात येत नाही. उत्तरेस आर्य संस्कृतीचा प्रसार उत्तरकुरु (काश्मीर), उत्तरभद्र, बाल्हीक, महावृष, मूजवत या प्रदेशांत (हिमालयाच्या उत्तरभागात) झाला होता. दक्षिणेत विंध्य पर्वत आणि नर्मदा नदी ओलांडून आर्यांनी विदर्भात आपला अंमल बसविला होता. ऐतरेय ब्राह्मणात नारद आणि पर्वत यांच्याकडून विदर्भनृपती भीम याला सोमाच्या ऐवजी कोणती औषधी घेता येते, याची माहिती मिळाल्याचा उल्लेख आहे. आर्यांच्या प्रदेशाबाहेर असलेल्या आंध्र, पुंड्र, मूतिब, पुलिंद, शबर आणि निषाद या भारतातील मूळ रहिवाशांचाही उल्लेख ब्राह्मणग्रंथात येतो.

राजकीय इतिहास : ऋग्वेदकाली आर्यांनी व्यापलेल्या प्रदेशांत त्यांची लहानलहान राज्ये स्थापन झाली होती. दाशराज्ञ युध्दाच्या वेळी पंजाब व त्यालगतच्या प्रदेशांत दहा राजे राज्य करीत होते. त्यांच्या संघाशी भरतवंशी सुदासला युध्द करावे लागले, असे वर्णन आहे. ही राज्ये वांशिक होती, म्हणजे एकाच वंशाच्या लोकांनी विशिष्ट प्रदेश आक्रमून तेथे आपला अंमल बसविला होता. याशिवाय गणपती किंवा जेष्ठ (गणाचा मुख्य) याचा उल्लेख आढळतो. या गणातून पुढे गणराज्ये किंवा प्रजासत्ताकराज्ये उत्क्रांत झाली असावीत. राजसत्ता वंशपरंपरेने मिळत असे पण क्वचित्‌ एखाद्या वंशाचे लोक (विशः) राजकुलातून राजाची निवड करीत असत, असे काही मंत्रांवरुन दिसते. पुढे ब्राह्मणकाळी राजदैवतवादाची कल्पना उत्पन्न झालेली दिसते. शतपथ ब्राह्मणात (५.३.३.१२) म्हटले आहे, की राजन्य प्रजापतीचा प्रतिनिधी आहे म्हणून तो एकटा असला, तरी अनेकांवर राज्य करू शकतो.

ऋग्वेदकाली राज्ये लहान व समृध्द होती. तत्कालीन राजांनी आपल्या पुरोहितांना हजारो गाई, घोडे, रथ, सोन्याच्या लगडी, दास-दासी इ. दक्षिणा म्हणून दिल्याचे दानस्तुतीत वर्णन आले आहे. पुढे अनेक राज्यांचा संघ होऊन त्यांची सत्ता प्रबळ होऊ लागली. पुरु आणि भरत या वंशांचे एकीकरण होऊन त्यातून कुरु राज्य अस्तित्वात आले. तसेच तुर्वश आणि क्रिवि यांचे पांचालराज्य बनले. आर्यांची सत्ता दूरवर पसरल्यावर अनेक राज्ये निर्माण होऊन परस्परांवर आक्रमण करुन आपल्या राज्याची मर्यादा व समृध्दी वाढविण्याची महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली आणि त्याकरिता राजसूय व अश्वमेध यज्ञ करण्याची प्रथा पडली. तसेच साम्राज्यद्योतक विविध संज्ञा प्रचलित झाल्या. ऐतरेय ब्राह्मणात म्हटले आहे, की जो चारी दिशांच्या राजांना जिंकतो, त्याला सार्वभौम पदवी प्राप्त होते. ऐतरेय ब्राह्मणात राजसूय यज्ञ केलेल्या राजांची आणि शतपथ ब्राह्मणात अश्वमेध यज्ञ केलेल्या सम्राटांची नावे आली आहेत.

याप्रमाणे राजांची राज्ये व सत्ता वाढत होती मात्र ते सर्वस्वी अनियंत्रित नव्हते. राजपद सामान्यतः वंशपरंपरेने प्राप्त होत असे. तरी क्वचित्‌ प्रसंगी राज्यांतील लोक आपल्या अधिपतीची निवड करीत असत. राज्याभिषेकप्रसंगी प्रजेचा छळ केल्यास आपले पुण्य नष्ट होवो, अशी शपथ राजाला घ्यावी लागे. क्वचित्‌ प्रसंगी लोकांनी दुष्ट राजाला पदच्युत केल्याची उदाहरणे वैदिक वाङ्‌मयात दिली आहेत. सृंजयांनी दहा पिढया राज्य करणाऱ्या राजवंशातील दुष्टरीतु पौंसायन या राजाला देशातून हद्दपार केल्याचा उल्लेख आहे.

ऋग्वेदामध्ये राजावर नियंत्रण ठेवणाऱ्या सभा व समिती या संस्थांचा उल्लेख आढळतो. त्या पुढे ब्राह्मणकाळीही अस्तित्वात होत्या. शतपथ ब्राह्मणात त्यांना प्रजापतीच्या कन्या म्हटले आहे आणि त्यांचे सहकार्य आपणास प्राप्त व्हावे, अशी राजाची प्रार्थना उल्लेखिली आहे. या दोन संस्थांचे निश्चित स्वरुप व कार्यक्षेत्र कोणते होते, याविषयी स्पष्ट कल्पना करता येत नाही. तथापि समितीमध्ये सर्व प्रजेचा समावेश होत असे आणि तिचा अध्यक्ष राजा असे. तसेच तिच्यात राजकीय विषयांवर चर्चा होत असे, असे दिसते. याच्या उलट सभा या संस्थेमध्ये राज्यातील निवडक क्षत्रिय व धनिक लोकांचा आणि ब्राह्मणवर्गाचा समावेश होत असावा. तिच्या बैठकीमध्ये राज्यकारभाराची चर्चा होत असे. हिच्या सभागृहात न्यायदान, द्यूत, वादविवाद व करमणुकीचे कार्यक्रमही होत असत, असे दिसते. या संस्थांमध्ये सर्वांनी एकमताने कार्य करावे, अशी प्रार्थना ऋग्वेदाच्या अंतिम सूक्तात केली आहे.

त्या काळी पुरोहिताचे राजावर बरेच वर्चस्व होते. पुरोहित युध्दप्रसंगी राजाबरोबर असे. तो आपल्या मंत्रांनी विजय प्राप्त करुन देतो, अशी तत्कालीन श्रध्दा होती. दाशराज्ञ युध्दात भरतवंशी राजाचा प्रराभव होण्याचा प्रसंग आला असता, त्यांचा पुरोहित वसिष्ठ पुढे झाला आणि त्याच्या प्रार्थनामंत्रांनी राजाला विजयप्राप्ती झाली, असे त्या युध्दाच्या वर्णनात म्हटले आहे.

प्रजेचे संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य मानले जात असे. त्याकरिता प्रजेकडून त्याला ‘बलि’ किंवा नजराणा मिळे. आरंभी तो धान्यादिकांच्या रुपांत मिळत असावा पण पुढे त्याचे नियमित करात रुपांतर झालेले दिसते. पराजित शत्रूंना खंडणी द्यावी लागे. आर्येतरांचा पाडाव केल्यावर त्यांना दास केले जात असे. इतरांचा शूद्रवर्णात समावेश होई. त्यांच्याशी आर्यांचे शरीरसंबंध होऊन सामाजिक सामंज्यस निर्माण होण्यास मदत होई.

वैदिककालातील राजनैतिक कल्पना : ब्राह्मणकाळात प्रादेशिक राज्ये व साम्राज्ये स्थापन होऊ लागली, तेव्हा राजसत्तेचा उगम कसा झाला याविषयीच्या तात्त्विक चर्चेलाही सुरुवात झाली. ऐतरेय ब्राह्मणात  म्हटले आहे की, असुरांबरोबरच्या युध्दात आपला पराभव होतो याचे कारण त्यांच्यात राजा आहे आणि आपणात नाही हे असावे, असे ध्यानात येऊन देवांनी आपल्या राजाची निवड केली. याच ग्रंथात इतरत्र म्हटले आहे की, देवांनी इंद्राला आपला राजा केले. कारण तो सर्वांत बलवान, उत्साही, शूर आणि कार्यकुशल होता. यावरुन आरंभी लोकांनी आपल्या राजाची निवड कोणत्या हेतूने आणि कोणत्या तत्त्वांवर केली, याची कल्पना येते. तैत्तिरीय ब्राह्मणात म्हटले आहे की, इंद्र हा देवांत परमश्रेष्ठ नव्हता पण प्रजापतीने त्याला देवांचा राजा केले.

राजसत्तेची तिसरी उपपत्ती म्हणजे करारवाद. याचा स्पष्ट निर्देश वैदिक वाङ्‌मयात येत नसला, तरी त्याचेही बीज काही ठिकाणी आढळते. नंतरच्या अर्थशास्त्रांत मात्स्यन्यायाचा उल्लेख येतो. सृष्टीच्या आरंभी अराजक होते, तेव्हा मोठा मासा लहान माशाला गिळतो, त्याप्रमाणे बलवान हा दुर्बलांचा उच्छेद करीत असे. म्हणून लोकांनी आपल्यातील बलाढय इसमाला करभार देऊन आपले संरक्षण करण्याच्या अटीवर राजा केले, अशी या करारवादाची कल्पना आहे. वैदिक वाङ्‌मयातही राजाला करभार देणाऱ्या प्रजाजनांना ‘बलिह्रत्‌’ म्हटले आहे आणि त्यांचे रक्षण करणे, हे राज्याचे कर्तव्य मानले आहे.


सामाजिक आणि आर्थिक स्थिती : ऋग्वेदकाली पितृसत्ताक कुटुंबपध्दती प्रचलित होती. पित्याची कुटुंबातील सर्व घटकांवर अनियंत्रित सत्ता होती. एका सूक्तात (१.११६.१६) ऋज्राश्वाला त्याच्या पित्याने आंधळा केल्याचा उल्लेख आहे. तथापि सामान्यतः कुटुंबातील संबंध प्रेमाचे असत. विवाहसूक्तात नूतन वधूने सासू-सासरे, दीर-नणंदा वगैरेंवर प्रेमाने आपले राज्य (वर्चस्व) स्थापित करावे, असे म्हटले आहे. कुटुंबाच्या व्यवहारात आतिथ्याला फार महत्त्व होते. अतिथीच्या स्वागताला पंचमहायज्ञांमध्ये गणण्यात आले होते.  

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील पुरुषसूक्तात चातुर्वर्ण्याचा उल्लेख आहे परंतु ते मंडल इतर मंडलांच्या नंतरचे ठरले आहे. एका मंत्रात (ऋ. ९.१२.३) एक ऋषी म्हणतो, ‘मी कारागीर आहे, माझा बाप वैद्य असून माझी आई दळण दळते. याप्रमाणे आम्ही निरनिराळी कामे करुन द्रव्य मिळवतो.’ तेव्हा आर्यांत प्रथम जन्मावर आधारलेली जातिव्यवस्था प्रचलित नव्हती. पुढे आर्यांच्या राज्याचा विस्तार झाल्यावर युध्दाकरिता राखीव सेनेची, विशाल वेदवाङ्‌मयाच्या संरक्षणार्थ व दीर्घकालीन यज्ञांच्या अनुष्ठानार्थ पुरोहितवर्गाची, आणि व्यापार-उदीमाकरिता वैश्यवर्गाची जरुरी भासून क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य जाती अस्तित्वात आल्या. जिंकलेल्या आर्येतरांना शूद्र जातींत गणण्यात येऊन त्यांच्याकडे इतर वर्णांच्या सेवेचे काम देण्यात आले. या चातुर्वर्ण्याचा उल्लेख यजुर्वेदात येतो. तथापि त्याही काळी जातिव्यवस्था कडक नव्हती. अनुलोम विवाह दीर्घकाळपर्यंत प्रचलित होते. भोजननिर्बंध तर नव्हतेच. ⇨सत्यकाम जाबालाची  कथा उपनिषदात आली आहे, तीवरुन गुणांवरुन जातीचे अनुमान केले जात असे, असे स्पष्ट दिसते. एकंदरीत चारी वर्णांमध्ये सामंजस्य असून क्षत्रिय नवीन नवीन प्रदेश आक्रमून आपल्या राज्यांचा विस्तार करीत. ब्राह्मण वेदविद्येचे रक्षण व यज्ञयागांचे अनुष्ठान करुन आर्य संस्कृतीचा प्रसार करीत. वैश्य कृषी, पशुपालन, व्यापार-उदीम यांच्या योगे देशाची संपत्ती व लोकांच्या सुखसोयी वाढवीत आणि शूद्र त्यांना मदत करीत, असे मोठे चित्र वैदेक वाङ्‌मयात दृष्टीस पडते.

ऋग्वेदकाली स्त्रियांना पुष्कळच स्वातंत्र्य होते. अनेक स्त्रियांनी मंत्ररचना केली होती. काही स्त्रिया आमरण आपल्या पित्याच्या कुटुंबात अविवाहित राहत असत. इतरांचे विवाह त्या वयात आल्यानंतर त्यांच्या पसंतीने होत असत.⇨विवाहविधी  लहानसा असून वधूवरांनी अग्नीला प्रदक्षिणा केल्यावर तो पूर्ण झाला असे मानण्यात येई. नववधूला कुटुंबात प्रेमाने वागवण्यात येऊन कालांतराने तिचे साम्राज्य नातलगांवर प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत असे. कुटुंबात पितृसत्ताक पध्दती प्रचलित असल्यामुळे मुलींपेक्षा मुलांचे महत्त्व साहजिकच अधिक होते. शिवाय पुत्रांनाच पिंडदान करता येत असे. आर्य संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि प्रसारार्थ शूर पुरुषांची आवश्यकता असल्यामुळे अनेक मंत्रांत वीरपुत्रांच्या प्राप्तीकरिता देवांना प्रार्थना केली आहे.

सतीची चाल अस्तित्वात नसावी. ऋग्वेदाच्या एका सूक्तात (१०.१८.८) स्त्रीला मृत पतीच्या चितेवरुन उठून पाणिग्रहण करू इच्छिणाऱ्याची पत्नी होण्याविषयी आवाहन केले आहे.⇨नियोगाची  चाल अस्तित्वात होती. निपुत्रिक विधवेला पुत्रप्राप्तीसाठी आपल्या दिराशी संबंध ठेवता येत असे. स्त्रियांना उत्सवांत व नृत्यप्रसंगांत अनिर्बंधपणे भाग घेता येत असे.

नंतरच्या संहिता-ब्राह्मणकालात जातिव्यवस्था दृढतर होत गेली. समाजात अनेक धंदे अस्तित्वात येऊन त्यांच्या पोटजाती बनू लागल्या. अनुलोम विवाह चालू राहिले पण प्रतिलोम विवाहावर कडक निर्बंध घालण्यात आले. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा समाजातील दर्जा वाढत गेला ब्राह्मणांना त्यांची विद्वत्ता व पवित्र आचरण यांमुळे काही विशिष्ट मान व सवलती देण्याची प्रथा पडली. सत्यकाम जाबालाच्या कथेवरुन वंशशुध्दीला किती महत्त्व दिले जात होते, ते स्पष्ट दिसते. स्त्रियांच्या परिस्थितीत फारसा फरक झाला नाही पण विवाहविधीत सप्तपदीचा अंतर्भाव झाला. पत्नीला धार्मिक विधीत पतीबरोबर भाग घेता येत असे. पतीची ती अर्धांगी मानण्यात येई पण तिला हक्क मात्र काही नसत. विधवाविवाहबद्दल मात्र भिन्न मते होती.

ऋग्वेदकाली आर्थिक व्यवस्था कृषिप्रधान होती. कृषिव्यवस्थेतील आवश्यकतेमुळे गाई- बैलांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांच्या संख्येवरुन धनाची मोजदाद केली जात असे. यज्ञातील दक्षिणा गाईच्या रुपाने दिली जाई. गाईला काही मंत्रांत अघ्न्या (अहिंस्या) म्हटले आहे. त्यावरुन तिच्या पावित्र्याची कल्पना मूळ धरत होती असे दिसते. गाई – बैलांच्या कानांवर स्वामित्वदर्शक खुणा करीत असत.

ऋग्वेदकाली देशातल्या देशातच नव्हे, तर परदेशांशीही व्यापार होत असे. त्या काळातील आर्यांना समुद्राची माहिती होती किंवा काय, याविषयी काही विद्वानांना संयश वाटतो पण ऋग्वेदात समुद्राचे काही उल्लेख आले आहेत. अश्विनीकुमारांनी भुज्यूला ‘शतारित्र’ (शंभर वल्ह्यांच्या) जहाजाने समुद्रातून बाहेर काढल्याचे वर्णन ऋग्वेदात आले आहे. असे मोठे जहाज समुद्रपार करण्याकरिता उपयोगात आणले जात असावे, हे उघड आहे.

व्यापार बहुधा वस्तूंच्या रुपाने होत असे. किंमत गाईच्या रुपानेही देण्यात येई. एका सूक्तात शंभर निष्कांची दक्षिणा दिल्याचा उल्लेख आहे. त्यावरुन त्या काळी निष्क नाणी प्रचलित असावीत, असे अनुमान काहींनी केले आहे. तशी नाणी अद्यापि सापडली नाहीत तथापि सोन्याचा नाण्यासारखा उपयोग होत असावा.

ऋग्वेदात अनेक उद्योगधंद्यांचा प्रसंगोपात्त उल्लेख येतो. युध्दात किंवा शर्यतीत आवश्यक असणाऱ्या रथांचा तसेच शेतीकरिता लागणाऱ्या गाड्यांचा निर्माता रथकार किंवा सुतार याला मोठे महत्त्व होते. संसारोपयोगी अनेक वस्तू अयस्‌ (लोखंड वा पोलाद) धातूच्या बनविल्या जात. अयस्‌ शब्दाने कोणती धातू विवक्षित होती, याबद्दल मतभेद आहेत. काही ठिकाणी तरी त्याच्या काळ्या रंगाच्या उल्लेखावरुन लोखंड विवक्षित असावे. तसे असल्यास ऋग्वेदी संस्कृती हडप्पा संस्कृतीनंतरची याचा तो एक पुरावा होईल. कारण हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांत लोखंड सापडले नाही. याशिवाय मातीची भांडी तयार करणारे कुंभार, चामडी कमवणारे चर्मकार, चटया विणणारे बुरुड, सूत कातणारे आणि कापड विणणारे कोष्टी, अलंकार करणारे सोनार इत्यादिकांच्या धंद्याचे ऋग्वेदात उल्लेख येतात. अश्विनीकुमारांच्या सूक्तात त्यांनी केलेल्या आश्चर्यकारक शस्त्रक्रियेचे वर्णन येते. त्यावरुन आर्यांचे त्यामधील प्रावीण्य अजमावता येते.

ऋग्वेदकालीन संस्कृती मुख्यतः ग्रामीण होती. नागरी जीवनाचे उल्लेख त्या वेदात क्वचितच येतात. काही ठिकाणी नगरांच्या विध्वंसाचे वर्णन येते. ही नगरे तत्पूर्वकालीन आर्येतरांची असावीत. तत्कालीन घरे लाकडांची असावीत. रथ व गाडया यांचा परिवहनाकरिता उपयोग करीत. आर्यांना घोडयांची विशेष आवड होती. त्यांना ते रथाला जुंपत किंवा बसण्याकरिता त्यांचा उपयोग करीत. प्रवास निर्विघ्नपणे व्हावा, म्हणून ते इंद्र व पूषन्‌ देवांची प्रार्थना करीत.

ऋग्वेदात ‘कुल्या’ (कालवा) व ‘खनित्रिमाः अपः’ (खणलेल्या जलांचा) उल्लेख आहे. त्यावरुन कालवे व पाटबंधारे खणले जात असत, असे दिसते.

इतर रीतिरिवाज : ऋग्वेदात गीतवाद्यांचे अनेक उल्लेख आलेले आहेत. स्त्रिया नृत्य करीत असतच पण पुरुषही त्यात भाग घेत असावेत. काही संवाद सूक्तांवरुन यज्ञप्रसंगी नाटकांचेही प्रयोग होत असावेत, असा तर्क आहे. रथांच्या शर्यती व द्यूत ही मनोरंजनाची साधने होती. एका सूक्तात (१०.३४) द्यूतामुळे आलेल्या आपत्तींचे ह्रदयस्पर्शी वर्णन दिसते.

अन्नपान : ऋग्वेदकाली नित्यनैमित्तिक आहारातून दूध व दही-तूप यांचा प्रामुख्याने उपयोग होत असे. सातू दळून त्यात दूध, तूप इ. मिसळून अपूप (अनरसे) बनविण्यात येत. शाक व फळफळावळ यांचाही आहारात समावेश होई.

ऋग्वेदी आर्य मांसाहारी होते. बैल, मेंढे, बकरे यांच्या मांसाचा उपयोग, विशेषतः यज्ञयागाच्या प्रसंगी करण्यात येई. अश्वमेधात अश्वाची चपळता व शक्ती प्राप्त होण्याकरिता त्याच्या मांसाचा प्रसाद घेतला जात असे. गाईला अघ्न्या म्हटल्यामुळे गाईची हत्या क्वचितच होत असावी. यज्ञप्रसंगी सोमप्राशन केले जात असे. त्याने थोडी तरतरी येई तथापि सोम सुरेसारखा मादक नसे. सुरेच्या योगे अधार्मिकता व गुन्ह्याची प्रवृत्ती वाढते, म्हणून तिची निंदा केली आहे. मद्याचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात.

नंतरच्या ब्राह्मणग्रंथात व्रीही (तांदूळ), गोधूम (गहू) इ. धान्यांचा व अपूप, तिलौदन, करंभ, यवागू वगैरे धान्यांपासून केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे. दुधाच्याही दधि, आमिक्षा, पृषदाज्य, वाजिन इ. विविध पदार्थांचे निर्देश आढळतात. या काळात सोम दुर्मिळ झाल्यामुळे त्याच्याबद्दल पूतिका किंवा तीही न मिळाल्यास अर्जुनानीचा यज्ञामध्ये उपयोग करावा, असे पंचविंश ब्राह्मणा मध्ये सांगितले आहे.

ऋग्वेदकाली  वासस्‌ (अधोवस्त्र) आणि अधिवासस्‌ (उत्तरीय वस्त्र) अशी सामान्यतः दोनच वस्त्रे वापरण्यात येत. नंतरच्या संहितात नीवीचा (वस्त्रग्रन्थीचा) उल्लेख आढळतो. पेशस्‌ (भरतकाम केलेले वस्त्र) आणि द्रापि (पायघोळ अंगरखा) यांचाही उपयोग होई, सुंदर व रंगीबेरंगी वस्त्रे वापरण्याची स्त्री-पुरुषांना हौस होती, हे ‘सुवासस्‌’, ‘सुवसन’ इ. विशेषणांवरुन दिसते. नंतरच्या संहिताब्राह्मणग्रंथांत ऊर्णा (लोकर) आणि तार्प्य (रेशीम) यांच्या वस्त्रांचा उल्लेख आढळतो. स्त्री-पुरुष शिरोवस्त्र व उपानह्‌ (पादत्राणे) वापरीत असत. मरुत्‌ देवांच्या वर्णनात त्यांनी वापरलेल्या मृगचर्माचा उल्लेख आहे.

आर्यांना विविध अलंकार धारण करण्याची हौस होती. त्यांच्या ‘कर्णशोभन’ या कानात घालण्याच्या सोन्याच्या अलंकाराचे तसेच वधूच्या ‘कुरीर’ या डोक्यात घालण्याच्या भूषणाचे उल्लेख ऋग्वेदात आले आहेत. याशिवाय खादि (अंगठी) व निष्क (सोन्याचा हार) यांचाही निर्देश आढळतो. मणी (रत्न), रुक्म (वक्षोभूषण), पुष्पहार यांचाही शरीर भूषविण्याकरिता उपयोग केला जाई.

केशरचनेच्या विविध पध्दती होत्या. ऋग्वेदाच्या एका सूक्तात चतुष्कपर्दा (चार वेण्या घातलेल्या) युवतीचा उल्लेख आहे. वसिष्ठ ऋषी दक्षिणतः कपर्द (ज्यांचे केस उजवीकडे बांधलेले असत असे) होते असे वर्णन आहे. ऋग्वेदात  क्षुर (वस्तरा) याचाही उल्लेख आढळतो.


वैदिक धर्म व तत्त्वज्ञान : वैदिक वाङ्‌मयातील आद्य ग्रंथ ऋग्वेद. त्यामध्ये अनेक देवदेवतांना उद्देशून रचलेली सूक्ते आहेत. त्यांतील काही देवता निसर्गशक्तींच्या द्योतक आहेत. अग्नी, सूर्य, द्यौस्‌ (आकाश), वायू, अप्‌, उषस्‌, पृथ्वी या देवदेवतांना कोणते सृष्ट पदार्थ व सृष्टिव्यापार विवक्षित आहेत, ते त्यांच्या नावावरुन स्पष्ट दिसते. या मूळ देवतांच्या विविध स्वरुपांवरुन व कार्यांवरुन इतर काही देवदेवतांच्या कल्पना निर्माण झालेल्या दिसतात. उदा., सूर्याच्या प्रेरणा करण्याच्या कार्यावरुन ‘सवितृ’ आणि त्याच्या उज्ज्वल स्वरुपावरुन ‘विवस्वत्‌’ अशी नावे त्याला प्राप्त झाली असावीत. मित्र, विष्णू, पूषन्‌ ही नावेही सूर्यदेवाच्या विविध कार्यांची द्योतक आहेत. इतर काही देवदेवतांच्या (इंद्र, वरुण, रुद्र, अदिती, अश्विनौ इ.) मूळ स्वरुपाबद्दल विद्वानांमध्ये भिन्नभिन्न मते प्रचलित आहेत. तथापि वैदिक देवदेवतांपैकी बहुतेक निसर्गातील भव्य आणि उदात्त शक्तींच्या किंवा निसर्गाच्या आश्चर्यकारक व्यापारांच्या द्योतक आहेत. काही देवदेवता उदा., श्रध्दा, मन्यू इ. अमूर्त कल्पनांची रुपे आहेत, तर इतर काही (ऋभू, गंधर्व इ.) निम्नश्रेणीच्या आहेत.

यांपैकी काही देवता- उदा., द्यौस्‌- अत्यंत प्राचीन काळी भारतीय आणि यूरोपीय लोक एकत्र होते तेव्हाच्या आहेत तर इतर काही- उदा., अग्नी, मित्र यांसारख्या- भारतीय आणि इराणी लोकांना सारख्याच पूज्य आहेत.

वैदिक देवतांत इंद्र, अग्नी आणि सोम यांना प्राधान्य होते. इंद्रवर्णनपर सूक्ते सु. २५०, अग्निवर्णनपर सु. २०० आणि सोमवर्णनपर सु. १०० पेक्षा अधिक आहेत. इतर काही देवतांची- उदा., पर्जन्य व यम यांची सूक्ते तीन- चारच आहेत. वेदकाली वरुणालाही महत्त्व होते पण त्याची सूक्ते इंद्र, अग्नी आणि सोम यांच्या मानाने बरीच कमी आहेत. वरुण हा देव कोणत्या निसर्गव्यापाराचा द्योतक आहे, याविषयी मतभेद आहेत. पुष्कळांच्या मते तो ग्रीक यूरेनॉस अथवा यूरानसप्रमाणे व्यापक आकाशाचा द्योतक असावा. वरुणाच्या नियमाप्रमाणे सृष्टीतील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालतात, असे वर्णन आहे. तो सर्वज्ञ आहे, त्याच्यापासून कोणी काही लपवू शकत नाही, त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास तो कडक शासन करतो, त्याला खोटयाची अत्यंत चीड आहे, पण अपराध्यांनी पश्चात्ताप पावून त्याची करुणा भाकली असता तो त्यांना क्षमा करतो असे त्याचे वर्णन आहे. उत्तरकालीन भक्तीमार्गाची बीजे वरुणसूक्तात आढळतात.

वेदकाली  सर्व आर्य लोक आनंदी, उत्साही आणि आशावादी होते. त्यांचे देवही दीर्घायुष्य आणि समृध्दी देणारे असे कल्याणकारक होते. रुद्र देवाचे स्वरुप मात्र याहून निराळे होते. वैदिक सूक्तात त्याचे स्वरुप धनुष्यबाण धारण करणारा आणि क्रुध्द झाल्यास सर्वनाश करणारा असे वर्णिले आहे. संकटातून आपले रक्षण करावे आणि आपल्या लोकांचे व पश्वादिकांचे कल्याण करावे, याकरिता त्याची प्रार्थना केली आहे. व्याधींपासून मुक्त करणारा सर्वश्रेष्ठ वैद्य, असेही त्याचे वर्णन आहे.

ऋग्वेदामध्ये काही ठिकाणी देवांची संख्या तेहतीस दिली आहे आणि त्यांपैकी प्रत्येकी अकरा पृथ्वीवर, अंतरिक्षात आणि स्वर्गात असतात असे वर्णन आहे. या तीन स्थानातील देवही अनुक्रमे अग्नी, वायू किंवा इंद्र आणि सूर्य यांची रुपे होत, असेही मत प्रचलित होते आणि त्याचा उल्लेख ऋग्वेदात आलेला आढळतो.

ऋग्वेदातील अनेक सूक्तांत ऋषी ज्या देवतेची स्तुती करतो तीच सर्वश्रेष्ठ होय, असे वर्णन आढळते. या प्रवृत्तीला माक्स प्रवृत्तीला माक्स म्यूलरने हेनोथीझम (इष्ट देवतावाद) असे नाव दिले आहे. ही प्रवृत्ती उत्तरकालीन संस्कृत स्त्रोत्रांतही आढळते. याप्रमाणे अनेक देवतांची विशेषण, स्वरुपे आणि कार्ये एकाच प्रकारची झाल्यावर त्यांतून त्या सर्व देवता एकाच सत्‌तत्त्वाची विविध रूपे होत, अशी कल्पना उत्पन्न झाल्यास आश्चर्य नाही. तिचा आढळ ऋग्वेद १.१६४.४६ या ऋचेत ‘एकं सत्‌ विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहुः।’

अशा शब्दात होतो. याचाच विस्तार पुढे उपनिषत्कालात झाला.

सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचे स्वरुप काय, याची चर्चाही काही सूक्तांत आढळते. ऋग्वेद १०.३१.७ मध्ये ऋषी विचारतो , ‘ते  कोणते वन आणि तो कोणता वृक्ष होता, ज्यातून हे आकाश व ही पृथ्वी तासून निर्माण केली गेली?’ एका सूक्तात (१०.१२१) याचे उत्तर एकेश्वरीवादाने दिले आहे, की सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भ उत्पन्न झाला आणि त्याने पृथ्वी आणि द्यौस्‌ यांना उत्पन्न केले. याच्या उलट नासदीय सूक्तात (१०.१२९) वर्णिले आहे, की सृष्टीच्या पूर्वी सत्‌ही नव्हते आणि असत्‌ही नव्हते. मृत्यु नव्हता, मग अमृतत्व कोठले? रात्र आणि दिवस यांतला भेद कळण्यास साधन नव्हते. जे एकटे होते ते आपल्या शक्तीने स्फुरत होते, अंधःकार होता आणि सर्व पाणी अंधःकाराने व्याप्त होते तपाने ते एक तत्त्व प्रकट झाले. आरंभी मनाचे बीज जो काम (इच्छा) तो उत्पन्न झाला. हाच असतामध्ये सताचा संबंध होय, असे ज्ञात्यांनी निश्चित केले. याप्रमाणे वर्णन केल्यावर ऋषी विचारतो, हा सृष्टीचा पसारा कोठून उत्पन्न झाला हे कोण सांगणार? तो जगाचा अध्यक्ष तरी हे जाणीत असेल किंवा नसेल, कोणी सांगावे? या नासदीय सूक्तात ऋग्वेदकालीन तत्त्वज्ञानाची परमावधी झाली आहे.

ऋग्वेदातील पुरुषसूक्तात (१०.९०) सृष्टीची निराळीच उत्पत्ती वर्णिली आहे. सृष्टीच्या आरंभी सहस्र मस्तके, सहस्र डोळे, सहस्र पाय यांनी युक्त असा पुरुष होता. देवांनी त्याचा यज्ञ केला. त्यातून ही चराचर सृष्टी उत्पन्न झाली. त्यातूनच तिन्ही वेद व चार वर्ण निघाले. त्या पुरुषापासूनच चंद्र, सूर्य, इंद्र, अग्नी, भूमी, अंतरिक्ष, द्यौ इत्यादींची उत्पत्ती झाली. अशा रीतीने त्या पुरुषसूक्तात पृथ्वीची उत्पत्ती वर्णिली आहे.

ऋग्वेदात मायावादाची बीजे दिसतात का, हा प्रश्न वादग्रस्त झाला आहे. सामान्यतः ऋग्वेदात ‘माया’ हा शब्द अलौकिक शक्ती या अर्थाने येतो. इंद्र आपल्या मायेने अनेक रुपे धारण करतो, असे वर्णन आहे. असुरांच्याही मायेचा उल्लेख आहे. क्वचित्‌ (ऋ. १०.५४.२) माया शब्दाचा अर्थ अस्तित्वात नसलेले ‘असत्य’ असाही आढळतो. त्यातूनच पुढे मायावादाची उत्क्रांती झालेली दिसते.

ऋग्वेदातील सूक्तांचा विनियोग यज्ञयागादी क्रियाकर्मांत होत असला, तरी सर्व सूक्ते त्याकरिताच रचली होती असे नाही. त्यांतील अनेकांचा अशा यज्ञयागांशी संबंध दिसत नाही. याच्या उलट काही सूक्ते जातकर्म, विवाह यांसारखे संस्कार, कृषिकर्म वगैरेंकरिता रचलेली दिसतात. या गृह्यसंस्कारात प्रत्येक गृहस्थ जरुर तर पुरोहिताच्या साहय्याने स्वतः ती ती कर्मे करीत असे आणि त्या कृत्यांत या सूक्तांचा प्रार्थनेकरिता उपयोग केला जात असे. याशिवाय राजे व धनिक लोक मोठमोठे याग करीत. त्याकरिता दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या तिन्ही अग्नींची आणि अनेक ऋत्विजांची जरुरी लागे. अशा यज्ञांकरिता सोमसूक्ते, आप्रीसूक्ते इ. सूक्ते रचली होती. तथापि या कालात यज्ञयाग विधिपूर्वक केल्यास त्यायोगे देवांवर वर्चस्व प्रस्थापित करता येते, अशी कल्पना रुढ झाली नव्हती. ती पुढे ब्राह्मणकाळात दृष्टीस पडते.

ऋग्वेदातील सूक्तांइतकी नसली, तरी अथर्ववेदातील सूक्तेही फार प्राचीन आहेत पण त्यांचे स्वरुप निराळे आहे. अथर्ववेदाचे प्राचीन नाव अथर्वाङ्गिरस असे आहे. त्यामध्ये रोगादी आपत्तींपासून मुक्त होण्याकरिता उपयोगात आणलेल्या अथर्वन्‌ मंत्रांचा तसेच शत्रू, प्रतिस्पर्धी, मांत्रिक यांच्या नाशाकरिता उपयुक्त अशा अंगिरस मंत्रांचा अंतर्भाव होतो. या वेदात ऋग्वेदातील इंद्रादी देवतांच्याही प्रार्थना आहेत पण त्यांतील तत्त्वविचार उपनिषदांतल्याप्रमाणे प्रगल्भ झालेले दिसतात. अथर्ववेदातील मंत्रांचा मुख्य उद्देश जादूटोणा करणे हा असल्यामुळे पुष्कळ काळापर्यंत त्याची गणना इतर वेदांबरोबर करण्यात येत नसे. जगाच्या सर्व प्रदेशांत मंत्रांचा उपयोग जादूटोण्याकरिता केला जात असे, तसा तो वेदकाली करण्यात येत असला तर आश्चर्य नाही. तेव्हा या वेदात तत्कालीन सामान्य जनांतील निराळ्या धार्मिक कल्पनांचा आढळ होतो.

यजुर्वेद आणि सामवेद यांची रचना दृष्टी, पशु व सोमयागासारख्या यज्ञांकरिता केली होती. त्याकाळी यज्ञविधीचे एक मोठे शास्त्रच बनले होते. त्यातील सर्व कर्मे यथाविधी आणि अत्यंत काटेकोर पध्दतीने केली तरच त्यांचे फळ मिळते, अशी समजूत असल्यामुळे त्यातील बारीकसारीक गोष्टींनाही अत्यंत महत्त्व प्राप्त होऊन त्यांचे साभिप्रायत्व ब्राह्मणग्रंथात वर्णिले आहे.

महायज्ञांकरिता अनेक ऋत्विजांची आवश्यकता असे. त्यांचे चार वर्ग केले जात. त्यांमध्ये होता, उद्‌गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा असे चार मुख्य होते. होत्याने त्या त्या यज्ञांतील विविध कृत्यांना विहित असे ऋग्वेदातील मंत्र म्हणावयाचे असत. उद्‌गाता सामवेदातील विशिष्ट मंत्र गात असे. अध्वर्यू स्वतः यज्ञीय कृत्ये करीत, यजुर्वेदातील मंत्र म्हणत असे. ब्रह्मा त्या सर्व अनुष्ठानावर देखरेख ठेवून त्यांत कोठे चूक तर होत नाहीना, हे लक्षपूर्वक पाहत असे आणि चुकीमुळे काही दोष उत्पन्न झाल्यास त्याचे निवारण मंत्रपठनाने करीत असे. याकरिता त्याला तीनही वेदांचे सम्यग्ज्ञान आवश्यक असे.

ब्राह्मणकाळात यज्ञविधीला अत्यंत महत्त्व प्राप्त होऊन त्याच्या योगे ऋत्विजांना देवतांवरही वर्चस्व प्राप्त करुन घेऊन इष्टसिध्दी करता येते, ही समजूत प्रचलित झाली. या कालात इतर वैदिक देवतांपेक्षा प्रजापती, रुद्र व विष्णू यांना प्राधान्य आले. ब्राह्मणग्रंथांत प्रजापतीच्या स्वरुपाविषयी बरीच चर्चा आहे. प्रजापतीलाही शासन करण्याचे रुद्राचे सामर्थ्य वर्णिले आहे, तर विष्णूचे यज्ञाशी तादात्म्य प्रतिपादिले आहे. अनेक ठिकाणी देवासुरांच्या युध्दाचा उल्लेख करुन विशिष्ट विधींची उपपत्ती दाखविली आहे.

या कालात ⇨ब्रह्म  शब्दाच्या अर्थामध्ये उत्क्रांती झालेली आढळते. त्याचा मूळचा अर्थ प्रार्थनामंत्र, नंतर क्रमाने त्रयी विद्या आणि शेवटी सृष्टीचे मूळ तत्त्व असे त्याचे अर्थ झाले. या शेवटच्या कल्पनेचा विस्तार पुढे उपनिषदांत झाला.

अथर्ववेद आणि ब्राह्मणग्रंथ यांच्या काळात स्वर्ग, नरक, देवयान, पितृयान, कर्म, पुनर्जन्म इत्यादींच्या कल्पनांत बरीच उत्क्रांती झालेली आढळते. मृत मनुष्याला मरुद्‌गण यमलोकात नेतात, तेथे त्याला देह प्राप्त होऊन तो पितरांच्या सहवासात राहतो, पृथ्वीवरच्या नातलगांनी त्याला उद्देशून केलेल्या दानधर्माचा त्याला उपयोग होतो इ. कल्पना आढळतात. यातूनच पुढे श्राध्दसंस्थेचा उद्‌गम झाला. ऋग्वेदात अंधकारमय निर्ऋतीचा उल्लेख आहे. नंतरच्या काळात तिची परिणती राक्षसींनी व्यापलेल्या भयंकर नरकलोकात झालेली दिसते. आपापल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांचे फळ मनुष्यास प्राप्त होते आणि त्याकरिता अनेक जन्म घ्यावे लागतात, ही कल्पनाही या काळात उत्पन्न होऊन तिचा विस्तार पुढे उपनिषत्कालात झाला.

ब्राह्मणकाळात अत्यंत विस्तार पावलेल्या यज्ञाविधीविरुध्द प्रतिक्रिया उत्पन्न होऊन आरण्यकांची रचना झाली. त्यांमध्ये अरण्यात जाऊन राहणाऱ्यांनी करावयाच्या उपासनांचे वर्णन आहे. मनुष्याचे अंतिम ध्येय स्वर्गप्राप्ती नसून, अद्वैत तत्त्वाचा साक्षात्कार हे आहे आणि ते उपासना व तप यांनी प्राप्त करुन घेता येते, हे या ग्रंथांत प्रतिपादिले आहे. कर्ममार्गातील यज्ञयागांचे विश्लेषण तत्त्वज्ञानाच्या पातळीवर करणाऱ्या लोकांचे विचार उपनिषद ग्रंथांत ग्रथित केले आहेत. यांत आरंभी राजे लोक आणि क्षत्रियवर्ग यांनी पुढाकार घेतला होता पण पुढे अनेक ब्राह्मणांनीही भाग घेऊन महत्त्वाची भर टाकली.

उपनिषदांत वेदान्त अशीही संज्ञा आहे कारण ती वेदकालाच्या अखेरीस रचली गेली आणि त्यात वेदांचे अत्युच्च ध्येय सांगितले आहे. त्यांतील काहींचा ब्राह्मणग्रंथात अंतर्भाव केला आहे, तर इतर स्वतंत्र आहेत. उपनिषदे एकाच काळी रचली गेली नव्हती. कालक्रमानुसार त्यांचे विभाग करता करता येतात पण त्याविषयी विद्वानांचे ऐकमत्य नाही. तथापि सामान्यतः पुढीलप्रमाणे विभाग पाडता येतील: (१) बृहदारण्यक, छांदोग्य, तैत्तिरीय, ऐतरेय  आणि कौषीतकी  यांतील भाषाशैली ब्राह्मणग्रंथाच्या धर्तीची असून ती गद्यात आहेत. (२) केन, काठक, ईश, श्वेताश्वतर, मुंडक आणि महानारायण यांतील केन गद्यपद्यमिश्रित असून बाकीची पद्यात आहेत. यांत औपनिषदिक तत्त्वज्ञान परिणतावस्थेत दिसते. (३)प्रश्न, मैत्रायणीय आणि माण्डूक्य ही गद्यात आहेत, तरी यांची भाषा अभिजात संस्कृत साहित्यातल्यासारखी आहे. (४) अथर्ववेदीय उपनिषदे ही अनेक आहेत. प्रमाणभूत यादीत यांची संख्या २७ दिली आहे. याशिवाय तत्तत्पंथीय अनेक उपनिषदे आहेत.

उपनिषदांत प्रतिपादिलेले ध्येय ज्ञानाच्या योगे जीवात्म्याचे परमात्म्यामध्ये मीलन होऊन संसारबंधनातून मुक्त होणे, हे होय. यज्ञयागांनी विनाशी स्वर्गादी फलेच प्राप्त होतात शाश्वत अमरत्व प्राप्त होण्याचे साधन तत्त्वज्ञानच होय, असे त्यात म्हटले आहे.

सर्व प्राचीन आणि प्रमाणभूत उपनिषदांचे तत्त्वज्ञान ‘तत्त्वमासि’ या एका महावाक्यात सामावले आहे. या सर्व बाह्य जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याचे कारण जे सर्वशक्तिमान तत्त्व आहे, त्याला उपनिषदांत ब्रह्म असे नाव दिले आहे तेच तत्त्व जीवात्मा होय, हे वरील महावाक्यात सांगितले आहे.

पण सर्वच उपनिषदांत बाह्य जगाचे केवळ भासमानत्व प्रतिपादिले नाही. काही उपनिषदांत सृष्टीची प्रक्रिया सांगितली आहे. छांदोग्य उपनिषदात  म्हटले आहे, की सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी एकच एक सत्तत्त्व होते. त्याला अनेक व्हावे अशी इच्छा झाली, तेव्हा त्याने तेजाची उत्पत्ती केली. त्याच्यापासून नंतर अप्‌ (बल) व पृथ्वी उत्पन्न झाली. प्रथम ही तीनच मूलभूते मानली होती. त्यांच्या त्रिवृत्करणाने (मिश्रणाने) सर्व सृष्टी उत्पन्न झाली, अशी सृष्टीची प्रक्रिया सांगितली आहे.

शतपथ ब्राह्मणात मनुष्याला मरणोत्तर परलोकात अनेक जन्म घ्यावे लागतात, असे म्हटले आहे. उपनिषदांत मनुष्याची मरणोत्तर स्थिती अनेक प्रकारची वर्णिली आहे. दररोज कोटयवधी लोक मरुन परलोकी जात असता, तो लोक जीवात्म्यांनी भरुन कसा जात नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे, की जे लोक आत्मज्ञान प्राप्त करुन घेत नाहीत आणि यज्ञयागादी किंवा दानादी पुण्यकृत्यही करत नाहीत, ते आपापल्या कर्मानुसार विविध योनींत जन्म घेतात. जशी एखाद्या गवताच्या काडीवरील जळू त्या गवताच्या टोकावर गेल्यावर दुसऱ्या काडीचा आधार घेऊन मग पहिल्या काडीला सोडून देते, त्याप्रमाणे अंतकाळी सामान्य जीव अन्य शरीराचा आश्रय घेऊन मग पहिल्या शरीराचा त्याग करतो. जे गृहस्थ यज्ञयागादी   धार्मिक कृत्ये किंवा वापी, आराम इ. पुण्यकृत्य करतात, ते मरणोत्तर पितृयानाने (पितरांच्या मार्गाने) चंद्रावर जातात आणि आपल्या पुण्याईने विविध प्रकारचे भोग भोगून पुण्याचा साठा संपल्यावर पृथ्वीवर जलवृष्टीद्वारा धान्यरुपाने उत्पन्न होऊन द्विजयोनीत जन्म घेतात ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, ते देवयानाने (देवांच्या मार्गाने) ब्रह्मलोकात जातात, ते पुन्हा परत येत नाहीत.

ज्याला आत्मज्ञान झाले आहे तो स्वतः ब्रह्मच होतो, असे एका संदर्भात म्हटले आहे. देहत्यागानंतर तो ब्रह्मरुप होतो. शंकराचार्यांच्या मते ही स्थिती निर्गुण ब्रह्माचे ज्ञान ज्याला झाले आहे, त्याची होय. त्याला देवयानाने जावे लागत नाही.

आत्मज्ञानाकरिता विशुध्द आचरणाची आणि सर्वसंगपरित्यागाची आवश्यकता उपनिषदांत अनेक ठिकाणी प्रतिपादली आहे. बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे, की जो मनुष्य शम, दम, उपरती, तितिक्षा आणि समाधी यांनी युक्त असेल त्यालाच आत्मज्ञान होते. आत्मज्ञानाकरिता वित्तैषणा, पुत्रैषणा, लोकैषणा यांचा त्याग करुन भिक्षाचर्य अवलंबिले पाहिजे असेही म्हटले आहे. कठोपनिषदातील नचिकेताच्या कथेत यमाने नचिकेताला त्याचे इच्छेनुसार दीर्घ आयुष्य, पुत्रपौत्र, हत्ती, घोडे, संपत्ती इ. सुखसाधने देऊ केली, तरी त्याने ती न स्वीकारता परलोकज्ञानाविषयी आपला आग्रह कायम ठेवला, असे सांगितले आहे आणि त्यायोगे आत्मज्ञानाला निरिच्छतेची आणि त्यागाची आवश्यकता प्रतिपादली आहे. तथापि सर्वच उपनिषदांत संन्यास धर्माचे प्रतिपादन केलेले आढळत नाही. उदा., ईशावस्योपनिषदात म्हटले आहे, की मनुष्याने कर्म करीत शंभर वर्षांचे आयुष्य जगण्याची इच्छा करावी.


बृहदारण्यक उपनिषदात (४.३-४) जीवात्म्याच्या विविध अवस्था- जाग्रत्‌, स्वप्न, सुषुप्ती, मृत्यु, पुनर्जन्म व मुक्ती या सुंदर रीतीने वर्णिल्या आहेत. स्वप्नस्थितीमध्ये जीव स्वतः निर्माण केलेले रथ, त्याला जोडलेले अश्व, रथमार्ग इ. पाहतो आणि नंतर जागृत होतो. सुषुप्तीमध्ये त्याचा काही काल प्राज्ञ आत्म्याशी संयोग होतो. त्यावेळी त्याला इतर कशाचेही भान राहत नाही. मुक्तीच्या अवस्थेमध्ये जीवात्मा परमात्म्याशी एकरुप होतो. ज्याप्रमाणे वारुळामध्ये सापाने टाकलेली कात असते, त्याप्रमाणे त्याचे शरीर येथे राहते पण त्या शरीराहून भिन्न आणि मृत्युरहित असा तो जीवात्मा ब्रह्माशी एकरुप होतो. माण्डूक्योपनिषदात जीवात्म्याची ही चौथी अवस्था वर्णिली आहे.

उपनिषदातील तत्त्वज्ञान काव्यमय भाषेत सांगितले आहे. त्यामुळे त्याचे आवाहन बुध्दीप्रमाणे ह्रदयालाही होते. उपनिषदांत विविध विषयांची तत्त्वचिकित्सा आहे. त्यांत कोणतेही परिणत असे सर्वांगपूर्ण दर्शन नाही पण त्यांत सर्व उत्तरकालीन दर्शनांची बीजे आहेत. वेदांताच्या⇨प्रस्थानत्रयीत त्यांना प्रमुख स्थान आहे. शंकर, मध्व, वल्लभ इ. उत्तरकालीन आचार्यांनी त्यांवर भाष्ये लिहून आपापली दर्शने त्यांच्यावर आधारित आहेत, असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. सांख्यादी इतर दर्शनेही आपल्या सिध्दांतांच्या समर्थनार्थ उपनिषदांची वाक्ये उद्‌धृत करतात.

शिक्षण : हे प्रचंड वाङ्‌मय ज्या शिक्षणसंस्थेतून निर्माण झाले, ती अत्यंत कार्यक्षम असली पाहिजे, हे उघड आहे. ऋग्वेदकालीन शिक्षणपध्दतीविषयी फारशी माहिती नाही. तथापि निष्ठेने वेदाध्ययन करणाऱ्या ब्रह्मचाऱ्याचा उल्लेख ऋग्वेदात (१०.१०९.५) आला आहे. तेथे त्याला देवांचे अंग मानले आहे. ऋग्वेदकाली अध्यापन मौखिक- पध्दतीने होत असे, हे मण्डूकसूक्तातील एका उपमेवरुन दिसते. त्या काळी लेखनकला ज्ञात नसावी कारण तिचे उल्लेख ऋग्वेदात आढळत नाहीत. हडप्पा संस्कृतीच्या लिपीवरुन पुढे ब्राह्मणकाळात आर्यांची ब्राह्मी लिपी तयार झाली असावी. तथापि वेदवाङ्‌मय अत्यंत शुध्द रुपात राहावे म्हणून त्याचे अध्यापन मौखिक- पध्दतीने आधुनिक काळापर्यंत चालू राहिले आहे.

ब्राह्मणकाळात वैदिक वाङ्‌मयाचा फार विस्तार झाल्यामुळे त्याच्या संरक्षणाकरिता ब्रह्मचर्याश्रमाची व्यवस्था करणे अवश्य झाले. ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करण्याचा ⇨उपनयन संस्कार अस्तित्वात आला. या संस्कारात म्हणावयाचे मंत्र अथर्ववेदात आले आहेत. तसेच त्यांत द्विजांनी दररोज करावयाच्या स्वाध्यायाचा (मंत्रपठनाचा) उल्लेख आहे. शतपथ ब्राम्हणात उपनयन संस्कारातील सर्व महत्वाच्या विशेषांचा-गुरुने ब्रह्मचाऱ्यास स्वीकारणे, त्याला संरक्षणार्थ वैदिक देवतांच्या हवाली करणे, ब्रह्मचाऱ्याने पाळावयाचे नियम आणि त्याचा वेश इत्यादिकांचा-निर्देश तेथे आहे.

हा संस्कार सर्व त्रैवर्णिकांना विहित असे. तसेच वेदाध्ययनार्थ तो पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही आवश्यक असे. संहिता व ब्राह्मणे यांच्या अध्ययनाकरिता स्वतंत्र चरणे (वेदशाखा केंद्रे) अस्तित्वात आली होती. त्यांमध्ये त्या त्या वेदशास्त्रीय वाङ्‌मयाचे अध्ययन-अध्यापन होत असे. अशा अनेक संहिता-चरणांचे आणि ब्राह्मण-चरणांचे उल्लेख आढळतात. तीच त्या काळची विद्यापीठे होत.

उपनिषत्काळातील आणि सूत्रकालातील शिक्षणाविषयी अधिक माहिती मिळते. पूर्वी वेदविद्येच्या अध्ययनाकरिता उपनयन आवश्यक मानले जात होते तेव्हा ते अगदी सुटसुटीत होते. मुलगा हातात समिधा घेऊन आला म्हणजे गुरु त्याला त्यांचे अग्नीमध्ये हवन करावयास सांगून, त्याला वेदविद्या शिकविण्यास आरंभ करी. दुसऱ्या गुरुकडे अध्ययनास जाण्याच्या वेळी मुलाला पुन्हा उपनयन करावे लागे. ही परिस्थिती उपनिषत्कालीही चालू होती, असे छांदोग्योपनिषदावरुन (५.११.७) दिसते. गृहस्थाश्रमी वयस्क विद्यार्थ्याचेही अशा प्रसंगी उपनयन होत असे पण पुढे उपनयन हा एकदाच करण्याचा एक देहसंस्कार मानण्यात येऊन तो सर्व त्रैवर्णिकांच्या बाबतीत आवश्यक झाला. त्यायोगे त्यांचा दुसरा जन्म होतो, असे मानले जात असे आणि त्यांना द्विज संज्ञा प्राप्त होई. सूत्रकालात उपनयनाचे विस्तृत नियम करण्यात आले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णांच्या मुलांचे अनुक्रमे ८, ११ आणि १२ या वर्षी उपनयन केले जाई. त्याने धारण करण्याचे अधोवस्त्र, उत्तरीय किंवा चर्ममेखला व हातात धरावयाचा दंड हेही वर्णपरत्वे भिन्नभिन्न असत.

ब्रह्मचाऱ्याला गुरुगृही राहून विद्या संपादन करावी लागे. समिधा आणणे, अग्नीला हवन करणे, गुरुगृही पडली ती कामे करणे, भिक्षा मागणे आणि संयत रीतीने राहून विद्यार्जन करणे ही त्याची कर्तव्ये असत. सदैव गुरुच्या सान्निध्यात असल्याने त्याचे धार्मिक व नैतिक शिक्षण उत्कृष्टपणे होत असे. विद्यार्थ्याला शिक्षणशुल्क द्यावे लागत नसे पण विद्याभ्यास संपल्यावर तो आपल्या शक्तीप्रमाणे गुरुदक्षिणा देई. गुरू विद्यार्थ्यावर पुत्रवत्‌ प्रेम करी. मातापित्याप्रमाणे गुरुलाही देव मानण्याचा त्याला उदेश केला जात असे. गुरुही प्रांजलपणे त्याला सांगत असत, की तू आमच्या सुचरिताचेच अनुकरण कर, दुष्कृत्याचे करू नको. एकंदरीत गुरुशिष्यांचे संबंध सलोख्याचे असत.

विद्यार्थी घेताना तो सद्‌वर्तनी, दक्ष, इंद्रियनिग्रही, विनीत आहे हे पाहिले जात असे. अध्यापनाचे विषय विविध असत. वेदाध्ययनाला अर्थातच प्राधान्य असे. ब्राह्मण विद्यार्थी वयाच्या आठ ते अठ्ठेचाळीस वर्षांपर्यंत एक ते चार वेदांचे अध्ययन करीत. काही तर नैष्ठिक ब्रह्मचारी राहून आपले सर्व आयुष्य अध्ययनात घालवीत. क्षत्रिय आणि वैश्य अर्थातच फार वेदाभ्यास करीत नसत. क्षत्रियांना युध्दशास्त्राचे आणि प्रशासनाचे व वैश्यांना कृषी, पशुपालन आणि वाणिज्य यांचे शिक्षण योग्य गुरुकडून मिळे.

तत्कालीन अध्यापनाच्या विविध विषयांची यादी छांदोग्योपनिषदात (७.१.२) आली आहे. त्यांपैकी काहींचे निश्चित स्वरुप आता समजत नाही. तथापि मुख्य विषयांत वेद, इतिहास, पुराणे, ब्रह्मविद्या, व्याकरण, पित्र्य (श्राध्दकल्प), राशी (गणित), निधी (कालज्ञान), तर्कशास्त्र, एकायन (नीतिशास्त्र), देवविद्या, भूतविद्या, नक्षत्रविद्या (ज्योतिष), सर्पविद्या, देवजनविद्या (नृत्यगीतकला) इ. असत.

अध्यापनाला आरंभ (उपाकर्म) श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात होऊन ते साडेचार ते साडेसहा महिने चाले आणि नंतर त्याची समाप्ती होत असे. नंतरच्या काळात वेदांशिवाय इतर विषयांचे व शास्त्रांचे अध्यापन चाले. अध्ययनकालातही प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदा, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या व इतर काही अनाध्यायाचे दिवस मानले जात.

शिक्षण संपल्यावर समावर्तन विधी करण्यात येई. त्या दिवशी ब्रह्मचाऱ्यांचे दोन प्रहरी मेखला, अजिन, दंड वगैरे ब्रह्मचर्याश्रमाच्या निदर्शक वस्तूंचा त्याग करावयाचा असे. त्याप्रसंगी स्वतः गुरु त्याला सुगंधी पाण्याने स्नान घाली आणि ब्रह्मचर्याश्रमांत ज्या वस्तू वापरण्याची विद्यार्थ्याला परवानगी नसे त्या म्हणजे दागिने, पुष्पमाला, जोडे, छत्री या त्याला वापरण्यास देई. मग होम होई. अशा रीतीने झालेल्या स्नातकाचा सत्कार होई. त्या काळी ‘मधुपर्क’ हा सत्काराचा मुख्य प्रकार होता.

वेदाध्ययन संपल्यावर विद्यार्थ्याला आचार्य जो उपदेश करी, तो तैत्तिरीयोपनिषदात (१.११) दिला आहे. त्यामध्ये सत्यभाषण, धर्माचरण, स्वाध्याय, देवपितृकार्याचे अनुष्ठान, माता, पिता व आचार्य यांविषयी पूज्यभाव, सदाचरण, त्याग इत्यादिकांवर भर दिला जात असे आणि यानंतर आचार्याला गुरुदक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची विद्यार्थ्याला अनुमती देण्यात येई.

वेदकालात शिक्षणाचे ध्येय अत्यंत उच्च होते. विद्यार्थ्यांच्या शीलसंवर्धनाकडे आणि गुणपरिपोषाकडे विशेष लक्ष देण्यात येई. तत्त्वनिर्णयाला अत्यंत महत्त्व दिले जात असे. त्यामध्ये जातींतील श्रेष्ठ- कनिष्ठ भाव मानला जात नसे. तत्त्वजिज्ञासेने अनेक ब्राह्मण क्षत्रियांकडे ज्ञानप्राप्तीकरिता गेल्याची ब्राह्मण व उपनिषद ग्रंथांत उदाहरणे आहेत. जानश्रुती राजा एका शकटाच्या खाली (गाडीखाली) खरुज खाजवीत असलेल्या रैक्वाकडे गेला आणि त्याला हजार गाई, सुवर्ण निष्क, रथ, तो राहत असलेला गाव आणि आपली कन्या देऊन त्याच्यापासून तत्त्वज्ञानप्राप्त करता झाला, अशी कथा छांदोग्योपनिषदात आली आहे. जनकासारखे राजे आध्यात्मिक विषयांच्या चर्चेकरिता परिषदा भरवीत आणि त्यात श्रेष्ठ ठरेल त्या तत्त्वज्ञास उदार दाने देत असत, असे बृहदारण्यकोपनिषदावरुन दिसते. अध्यात्मविषयाच्या चर्चेत स्त्रियाही भाग घेत. जनकाच्या सभेत गार्गी- वाचक्नवी हीने याज्ञवल्क्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरे दिली आहेत.

विज्ञान व कला : वेदकालीन स्थापत्य व शिल्पकलेचे अवशेष अद्यापि सापडले नाहीत. हस्तिनापूर येथील उत्खननात घरांचे अवशेष सापडले आहेत खरे पण त्यांवरुन त्यांच्या आकाराविषयी आणि त्यांतील खोल्यांविषयी स्पष्ट अशी माहिती मिळत नाही. त्याकरिता विस्तृत प्रमाणावर उत्खनन झाले पाहिजे. सापडलेल्या अवशेषांत घरे कच्च्या विटांची व काही भिंती मातीचा गिलावा केलेल्या कुडाच्या आढळल्या. तेथे भाजलेल्या विटेचा तुकडाही आढळला होता. या उत्खननावरुन वेदकालीन गृहादिकांविषयी निश्चित अनुमान करता येत नाही म्हणून वाङ्‌मयीन पुराव्यावरच भिस्त ठेवली पाहिजे, हे उघड आहे. ऋग्वेदातील संस्कृती प्राधान्यतः ग्रामीण आहे. त्यात नागरी जीवनाचे उल्लेख सहसा येत नाहीत. इंद्राने पुरांचा विध्वंस केल्याचे वर्णन आहे पण ती पुरे आर्येतरांची असावी. आर्यांची घरे लाकडाची व बांबूची असत. नंतरच्या वाङ्‌मयात हर्म्यांचा (हवेल्या) उल्लेख आढळतो. त्याही लाकडाच्या बनविलेल्या पण अनेक खोल्यांच्या असाव्यात. तैत्तिरीय आरण्यकात  धनधानी (भांडागार) चा उल्लेख आहे. ती जास्त मजबूत असावी. अशा हर्म्यातही पत्नीसदनाचा (अंतःपुराचा) उल्लेख अथर्ववेदात आला आहे.

रस्ते, पूल, चतुष्पथ यांचे उल्लेख या वाङ्‌मयात येतात. शेतीकरिता कालवे खोदीत असत. अश्विनीकुमारांच्या वर्णनात त्यांच्या विशाल जहाजांचा तसेच त्यांच्या आश्चर्यकारक शस्ज्ञक्रियेचाही उल्लेख येतो.

सामवेदातील सुक्ते यज्ञप्रसंगी गावयाची असत. त्यावरून गानकलेची प्रगती आजमावता येते. ऋग्वेदात व नंतरच्या वैदिक वाङ्‌मयात विविध वाद्यांचे तसेच काही नृत्यांचेही उल्लेख आहेत. ऋग्वेदातील संवादसुक्तांवरून त्या काळी नाट्यकलाही अवगत होती ,असे दिसते. शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेत शैलूष (नट) याचा पुरुषमेधाच्या बलींच्या यादीत अंतर्भाव केला आहे. महानारायणीय उपनिषदातही  स्वत:ची वेशभूषा करणाऱ्या नटाचा उल्लेख आहे.

पहा: अथर्ववेद आरण्यके व उपनिषदे ऋग्वेद यजुर्वेद वेद व वेदांगे सामवेद.

संदर्भ : 1. Altekar, A. S. State and Government in Ancient India, Bombay, 1949.

           2. Bhandarkar, R. G. Collected Works, Vol. I, Poona, 1922.

           3. Frawley, David, Gods, Sages and Kings: Vedic Secrets of Ancient Civilisation, Salt Lake City, 1991.

           4. Jacobi, H. On the Antiquity of Vedic Culture, Delhi, 1909.

           5. Macdonell, Arthur A. A History of Sanskrit Literature, Delhi, 1961.

           6. Majumdar, R. C. Pusalkar, A. D. Eds. The History and Culture of the Indian People,

                  The Vedic Age, Vol. I, London, 1990.

           7. Muller, Max, The Sacred Books of the East, Vol. I and XV, Delhi, 1965.

           8. Tilak, B. G. Orion, Bombay, 1913.

         ९. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९९६.

          १०. दप्तरी, के. ल. उपनिषदर्थव्याख्या, २ भाग, नागपूर, १९५९-६२.

          ११. देशमुख, प्र. रा. सिंधु संस्कृति, ऋग्वेद व हिंदू संस्कृति, वाई, १९६६.

          १२. बेलसरे, के. वि. उपनिषदांचा अभ्यास, पुणे, १९६५.

          १३. मेहेंदळे, म. अ. प्राचीन भारत: समाज आणि संस्कृती, वाई, २००१.

          १४. सातवळेकर, श्री. दा. संपा. ऋग्वेदसंहिता, औंध, १९४०.

मिराशी, वा. वि.