मुधोळ संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील कर्नाटक राज्यातील एक जुने संस्थान. क्षेत्रफळ ९४२·०४ चौ. किमी. लोकसंख्या सु. पाऊण लाख (१९४१) वार्षिक उत्पन्न ३ लाख प्रमुखाचे आडनाव घोरपडे. उत्तरेस जमखंडी संस्थान, पूर्वेस बागलकोट तालुका (विजापूर जिल्हा), पश्चिमेस गोकाक तालुका व बेळगाव जिल्ह्याचा काही भाग आणि दक्षिणेस कोल्हापूर संस्थान व विजापूर-बेळगाव जिल्हे या सीमा. संथानात ८१ खेडी असून त्यांपैकी एक सातारा संस्थानच्या अखत्यारीत होते. याशिवाय मुधोळ, ढवळेश्वर, जमगी, माचकनूर व लोकापूर हे पाच महाल होते. आदिलशाहाने घोरपडे सरदारांना दिलेल्या जहागिरीतून या संस्थानाचा उदय झाला. बाजी घोरपडे याने १६४८मध्ये शहाजी भोसल्यास कैद करण्यात आदिलशाहाला मदत केली. त्याचा वचपा शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये खवासखानच्या साह्यासाठी निघालेल्या बाजीचे सैन्य मधल्यामध्ये कापून घेतला. मुधोळचीही नासधूस झाली बाजी मात्र वाचला असावा. १६८६ मध्ये संस्थान औरंगजेबाच्या मांडलिकीत आले पण अठराव्या शतकात पेशव्यांचे प्रभुत्व संस्थानाने मान्य केले. बाजीचा मुलगा मालोजी घोरपडे याने आपल्या दीर्घ आयुष्यात निजाम, इंग्रज व म्हैसूरकर यांच्याविरुद्ध मर्दुमकी गाजवली. १८१८ मध्ये गोविंदराव घोरपडे अष्टीच्या लढाईत मारला गेला पण सात वर्षांनी त्याचा तोतया निघाला होता. धाकट्या वेंकटरावाला इंग्रजांनी सरंजामाऐवजी रू.२,६७२ वार्षिक खंडणी बसवून मान्यता दिली (१८१८). विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात संस्थानात आरोग्य, शिक्षण, नगरपालिका, पक्क्या सडका, डाक-तार इ. क्षेत्रांत सुधारणा झाल्या. संस्थानचे चार पलटणींचे सैन्य असून माजी राजेसाहेबांनी पहिल्या महायुद्धात जातीने भाग घेतला. १९४८ मध्ये संस्थान माजी मुंबई राज्यात व १ नोव्हेंबर १९५६ पासून कर्नाटक (म्हैसूर) राज्यात विलीन झाले.
कुलकर्णी, ना. ह.