मुद्दण : (२४ जानेवारी १८७०–१५ फेब्रुवारी १९०१). प्रसिद्ध कन्नड कवी व ग्रंथकार. उडिपी जवळच्या नंदळिके नावाच्या खेडयात जन्म. नंदळिके नारायणय्या हे मूळ नाव. मुद्दण हे त्यांचे काव्यनाम. लहानपणापासूनच गायन, भजन, कीर्तन, यक्षगान यांकडे त्यांचे लक्ष होते. तुळू व कन्नड भाषेत गाणी रचण्याकडेही त्यांचा कल होता. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कन्नड ट्रेनिंग शिक्षण संपविले. इंग्रजीचा अभ्यास घरीच केला. मद्रासमध्ये व्यायामाचे शिक्षण घेण्याकरिता ते गेले तेव्हा तुळू, कन्नड, तेलुगू, तमिळ, मलयाळम् या भाषांचा तुलनात्मक अभ्यास करून व किटेल-कोशाचाही उत्तम रीतीने अभ्यास करून या विविध भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. व्यायामशिक्षक म्हणून उडिपीच्या बोर्ड हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरीचा आरंभ केला (१८९६).
मळली सुब्बराव यांच्या सहवासामुळे मुद्दण यांनी संस्कृत रत्नावली नाटकाचा अभ्यास केला व रत्नावली कल्याण अर्थात दृढवर्मनकाळग नावाचे यक्षगान रचले. कुमारविजय अर्थात शूरपद्मासुरकाळग हे त्यांचे दुसरे यक्षगान. हे यक्षगान कन्नड साहित्यात अनन्यसाधारण मानले जाते. या यक्षगानातील काही गाणी त्या वेळच्या काही मराठी नाटकांतील गाण्यांच्या चालीवर लिहिलेली आहेत.
हुरळी वेंकटसुब्बय्या, एच्. नारायणराव व मळली सुब्बराव अशा तत्कालीन विद्वानांचा सहवास त्यांना लाभला. कन्नड महाकवी पंप, रत्न, लक्ष्मीश यांच्या काव्यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. त्यांनी अद्भुत रामायण (१८९५), श्रीरामपट्टाभिषेक (१८९६) आणि रामाश्वमेध अशी तीन काव्य रचलेली आहेत. त्यांपैकी रामाश्वमेध या काव्यामुळे मुद्दणांची कीर्ती कन्नड साहित्यात अजरामर झालेली आहे. त्यातील सरस संवाद व रोचक शैली यांचा प्रभाव कन्नड वाचकांच्या मनावर कायमचा पडलेला आहे. बी. वेंकटाचार्याच्या कादंबरीतील गद्य शैलीचा मुद्दणांच्या नितान्तसुंदर शैलीवर प्रभाव पडला असावा, असे अभ्यासक मानतात.
भगवद्गीतेचा व कन्नड रामायणाचा अनुवाद, कामशास्त्राविषयी ग्रंथ, गोदावरी नावाच्या एका काल्पनिक कादंबरीची काही प्रकरणे व संशोधनात्मक लेख त्यांनी लिहीले होते, असे सांगितले जाते. व्याकरण व निघंटु यांची रचना करण्याचाही त्यांचा मानस होता; पण क्षयरोगामुळे वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी ते निधन पावले. मुद्दण यांच्यापासूनच नव कन्नड वाङ्मयाची सुरुवात झाली असे मानले जाते. त्यांच्या वाङ्मयाने कन्नड वाचकांमध्ये नवी जाणीव निर्माण केली. पद्यापेक्षाही हृद्य गद्य लिहिण्याची त्यांची मनीषा संपूर्णपणे सफल झाल्याचे दिसते.
‘बेंगळूर कर्नाटक संघ’ (१९२६), ‘म्हैसूर विद्यापीठ’ (१९४३), मंगलोर प्रांतातील साहित्यिक (१९५४), ‘उडुपी महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज’ (१९७०) आणि ‘कन्नड अध्ययन संस्था-म्हैसूर विद्यापीठ’ (१९७०) या सर्वांनी मुद्दणांच्या काव्यावर व जीवनावर अभ्यासनीय ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. मुद्दणांचा विशेष गौरव व लौकिक मरणोत्तरच झाला.
बेंद्रे, वा. द.
छायाचित्र संदर्भ : https://nandalike.com/about-kavi-muddana/