मुझफरपूर : भारताच्या बिहार राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,९०,४१६ (१९८१). हे पाटणा शहराच्या उत्तरेस सु. ५८ किमी. अंतरावर, बुरी गंडक नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे. अठराव्या शतकात मुझफरखान नावाच्या शेतकऱ्याने या नगराची स्थापना केली. १८६४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. पाटणा-नेपाळ मार्गावरील हे प्रमुख व्यापारी ठाणे असून, रस्ते व लोहमार्ग वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. भातसडीच्या गिरण्या, साखर, चाकू, सुऱ्या यांच्या निर्मितीचे तसेच अभियांत्रिकी वस्तुनिर्मितीचे कारखाने शहरात आहेत. शहरात बिहार विद्यापीठ (स्था. १९५२), अभियांत्रिकी, विधी व महिला महाविद्यालये तसेच इतर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थाही आहेत.
चौधरी, वसंत