मुखोपाध्याय, शैलजानंद : (१८ मार्च १९००–? १९७६). बंगाली साहित्यिक व चित्रपटनिर्माते. बरद्वान जिल्ह्यातील ओंडल गावी जन्म. शिक्षण बी. ए.
शैलजानंदांची एकूण शंभरावर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आमेर मंजरी (१९२३), कयलाकुठी (१९३०), दिन-मजुर (१९३२), शैलजानंदेर श्रेष्ठ गल्प (१९५४), स्वनिर्वाचित गल्प (२ भाग, १९५५) इ. त्यांचे कथासंग्रह होत. त्यांची पहिली कादंबरी माटिर घर (१९३१) ही होय. नंतर डाक्तार (१९४४), होमानल (१९४१), आजी शुभदिन (१९५६), झडो हवा, बाडलार मेये, लहो प्रणाम, अपराधी, रुपवती, गंगा यमुना, विजया इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. बंदी (१९४५), नंदिनी (१९४६) इ. त्यांची नाटके विशेष उल्लेखनीय होत.
शैलजानंदांनी राणीगंज येथील कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या संथाल (साँवताल), बाउडी, मजूर इत्यादींच्या जीवनावर जे लेखन केले, ते त्यांचे लेखन अभिनव अणि बंगाली वाचकांना चकित करणारे ठरले. शैलजानंद कल्लोल, कालि-ओ-कलम, प्रवासी, वंगवाणी, बिजली या नियतकालिकांत लिहीत असत. शैलजानंदांच्या साहित्याची इमारत सर्वांच्या परिचयाच्या वातावरणावर उभारलेली असून त्यात लेखकाचे अनुभव स्पष्टपणे व्यक्त झालेले आहेत. स्थळ, काळ, भाषा व परिस्थिती यांचे सौष्ठवपूर्ण दर्शन शैलजानंदांच्या साहित्यातून साकल्याने होत असल्याने होत असल्याने त्यांच्या कथा-कादंबऱ्या लोकादरास पात्र ठरल्या. बंगाली साहित्यात शैलजानंदांचे कथालेखन त्यातील वास्तवता आणि प्रादेशिकतेमुळे वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे मानले जाते.
कविवर्य काजी नज्रुल इस्लाम शैलजानंदांचे सहपाठी होते. त्या उभयतांचे साहित्य एकाच वेळी वंगीय मुसलमान साहित्य पत्रिकेस प्रसिद्ध होत असे.
कमतनूरकर, सरोजिनी
“