मुखवटा-नृत्य : मुखवटे घालून नृत्य करण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. आदिम जमातींच्या धार्मिक विधींमध्ये देवदेवतांचे मुखवटे घालून नृत्ये केली जात. हा केवळ रंजनाचा प्रकार नव्हता तर त्या नर्तकाच्या रूपाने तो देव तिथे प्रकटतो, अशी आदिवासींची श्रद्धा त्यामागे असे. पश्चिम यूरोपमध्ये प्राचीन अश्मयुगकालीन गुहांच्या भिंतींवर मुखवटाधारी नर्तकांची चित्रे आढळतात. उदा., त्र्‌वा फ्रेअर या दक्षिण फ्रान्समधील मग्डेलेनिअनकालीन (इ. स. पू. सु. १५०००) गुहेमध्ये जी नर्तकाची आकृती आढळते, तिचे शिर हरिणाच्या कवटीने, तर शरीर हरिणाच्या कातड्याने आच्छादलेले दाखवले आहे. न्यू मेक्सिको व ॲरिझोना येथील इंडियन जमातींमध्ये अद्यापही या प्राचीन नर्तकाशी साधर्म्यदर्शक, हरिणाची शिंगे व कातडे धारण केलेले ‘कचिना’ नामक मुखवटाधारी नर्तक आढळतात. मुखवटाधारी नर्तकांची अवशिष्ट चित्रे फ्रान्समधील मिग गुहेमध्ये पहावयास मिळतात. मानवजातीच्या प्रारंभकाळात मुखवटे व वेशभूषा यांच्या साहाय्याने भोवतालच्या सर्पादी सजीव प्राण्यांची सोंगे घेण्याची जी प्रवृत्ती आढळते त्यातून नृत्याचा जन्म झाला असावा, असे अनुमान गुहेतल्या चित्रांतून काढता येते. प्राण्यांचे व मानवी मुखवटे घालूनही नृत्ये केली जात. काल्पनिक राक्षसी वा सैतानी वैचित्र्यपूर्ण मुखवट्यांची निर्मीती नवाश्मयुगात (इ. स. पू. सु. ८०००) झाली असावी. प्राचीन ईजिप्तमध्ये इ. स. पू. सु. १५०० च्या सुमारास धार्मिक उत्सवप्रसंगी केल्या जाणाऱ्या नृत्यात मुखवटे वापरीत. ग्रीसमध्ये डायोनायसस देवतेच्या प्रीत्यर्थ द्राक्षाच्या शारदीय हंगामात विमुक्त नाच केला जाई. त्यात ‘मेनॅड’ नामक स्त्रिया अंगात देवतेचा संचार होऊन झपाटलेल्या अवस्थेत नृत्य करीत व त्यानंतर पुरुष मुखवटे घालून नृत्य करीत. न्यू आयर्लंडमध्ये प्रतिवर्षी एक शोकविधी साजरा केला जातो. त्यात नर्तक काही मृत व्यक्तींचे मुखवटे धारण करतात. त्या विधीमध्ये मृताचा आत्मा येतो, अशी श्रद्धा आहे.

नृत्यामध्ये मुखवट्यांचा वापर करण्याची प्रथा सार्वत्रिक व सार्वकालीन आहे. तिबेट व चीन येथे धार्मिक उत्सवप्रसंगी केल्या जाणाऱ्या लोकनृत्यांतून देवादिकांचे मुखवटे वापरले जात. थायलंडमध्ये ‘खोन’ नामक पुरातन नृत्यनाट्यातही मुखवट्यांचा वापर केला जात असे. त्यांचे कथकळी नृत्याशी साधर्म्य होते. पश्चिमी समाजात ‘मॅस्करेड’ नामक नृत्य विशेषेकरून प्रचलित होते. मॅस्करेड म्हणजे चित्रविचित्र मुखवटे व पोषाख घालून केले जाणारे नृत्य. केवळ मौजेखातर बनावट सोंगे घेऊन लोकांना फसवण्याचे गंमतीदार खेळ मॅस्करेड वा कार्निव्हल यांसारख्या नृत्योत्सवांतून आढळतात. आदिम धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुखवट्यांची ती उत्क्रांत अवस्था असावी. मॅस्करेड या नृत्यप्रकारात सामान्यतः ‘डॉमिनो’ वा अर्धमुखवटे (हाफ मास्क) वापरले जातात. त्यांत चेहऱ्याचा वरचा भाग झाकला जाऊन, खालचा तोंडाचा भाग उघडा ठेवला जातो. प्रबोधनकाळात इटलीमध्ये मुखवट्याचा वापर करून सादर केल्या जाणाऱ्या विनोदी नाटकांचा एक प्रकार रूढ होता. त्यातून हे अर्धमुखवटे विकसित झाले. ते बहुधा काळे असत पण क्वचित रंगवलेही जात. कपाळ, नाक व गाल यांवर चपखलपणे बसतील अशा प्रकारे ते मखमली वा रेशमी कापडापासून अथवा कागदलगद्यापासून बनवले जात. प्रबोधनकाळातच वाद्यसंगीताच्या तालावर मुखवट्यांची नृत्ये सरदार घराण्यात हौसेने केली जात. त्यांत स्त्रीपुरुष भाग घेत. त्यांपैकी ‘त्रिओन्फी’ हे नृत्य प्रसिद्ध होते ⇨ बॅले नृत्यातही मुखवटे वापरण्याची प्रथा सुरुवातीपासूनच विशेषत्वाने रूढ होती. बॅले सु. पंधराव्या शतकात राजदरबारी नृत्यांतून उगम पावले. या काळातील बॅले हा नेत्रदीपक रंजनप्रकार होता व त्यात इंग्लंडमध्ये ‘मॉरिस’ हे लोकप्रीय-मुखवटा-नृत्य आदिम नृत्याचा अवशेष होता. त्यात नर्तक वेगवेगळी सोंगे घेत व पायात घुंगरे बांधत. पशूंचे मुखवटेही ते धारण करीत. डब्ल्यू. टी. बेंडाने मॅस्करेडसाठी तयार केलेले मुखवटे मार्गारेट सेव्हर्न या नर्तकीने खास करून वापरले. पाब्लो पिकासो व फेर्ना लेझे यांनी पॅरिसमधील बॅलेसाठी घनवादी मुखवटे तयार केले होते.

भारतातही काही प्रदेशविशिष्ट लोकनृत्यांतून मुखवटे वापरण्याची प्रथा विशेषत्वाने दिसून येते. त्यांपैकी बिहारमधील सेराईकेला लोकांची ‘छाऊ’ व बंगालंमधील ‘गंभीरा’ ही मुखवटा-नृत्ये विशेष लक्षणीय आहेत. छाऊ व गंभीरा हे दोन्ही नृत्यप्रकार चैत्र-पर्व या उत्सवप्रसंगी करतात हा वार्षिकोत्सव चैत्र-संक्रातिकेच्या वेळी किंवा १३ एप्रिलच्या सुमारास होतो. हे दोन्ही नृत्यप्रकार एकाच प्रसंगी केले जात असले तरी त्यांच्यामध्ये लक्षणीय असा संबंध नाही.

गंभीरा नृत्य हे उत्तर बंगालच्या माल्डा जिल्ह्याचे म्हणून ओळखले जाते. भोवतालच्या प्रदेशात असलेल्या मुसलमानांसारख्या परधर्मीयांच्या वर्चस्वामुळे हिंदू धार्मिक रीतिरिवाजांवर आधारित असलेले, तसेच बंगाली संस्कृतीने व लोककथांनी समृद्ध असलेले हे नृत्य लक्षणीय अशी प्रगती करू शकले नाही. गंभीरा नृत्यामळे वापरले जाणारे मुखवटे हे पवित्र मानल्या जाणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून बनवले जातात. त्यामुळे ते अत्यंत जड असल्याने प्रदीर्घकालीन प्रयोगामध्ये हे मुखवटे वापरणे फार जिकीरीचे होते. हे नर्तकतालावर क्वचितच नाचतात. गंभीरा नृत्य हे नेहमी एकट्यानेच नाचले जाते. त्यात समूहनृत्याला वाव नाही. हे नृत्य करीत असता नर्तक पौराणिक देवादिकांची व्यक्तिमत्त्वे साकार करतात त्यामुळे त्यांच्यात दैवी शक्तीचा संचार होऊन ते नाचतात, अशी पुरातन श्रद्धा आहे.


पश्चिम बंगालच्या पश्चिम सीमेवर पुरूलिया जिल्ह्यात छाऊ नृत्य जोपासले गेले आहे. बिहारच्या सेराईकेला या सीमेवर या नृत्याचे आधुनिकीकरण झाले व ओरिसामध्ये त्याचा प्रसार झाला. हे तेथील लोकांच्या परंपरागत रीतिरिवाजांवर आधारित आहे. मयूरभंज व सेराईकेला या छाऊ नृत्याच्या दोन शाखा आहेत. त्यांतील एकमात्र फरक म्हणजे मयूरभंजमधील छाऊ नृत्यात मुखवटे वापरले जात नाहीत तर चेहरे रंगवले जातात. छाऊ नृत्यामध्ये प्रामुख्याने रामायण, महाभारत, पुराणे यांवर तर कधी धार्मिक लोककथांवर आधारित नृत्ये केली जातात. हे नृत्य एकट्याने किंवा दोघांनी मिळून केले जाते.

ओरिसामध्ये ‘छाऊ’ या शब्दाचे बनावट चेहरा म्हणजेच मुखवटा आणि युद्ध असे दोन अर्थ होतात. त्यामुळे छाऊ नृत्य म्हणजे मुखवटा-नृत्य किंवा रणनृत्य असे म्हणतात. नृत्यामधील पदन्यास व गती यांना ‘उफळी’ व ‘टोपका’ म्हणतात. या सर्व व्याख्या ओडिया भाषेत आहेत. गतीची खास अंगांनी दाखविली जाणारी विशिष्ट तऱ्हा म्हणजे टोपका आणि पायांच्या उत्स्फूर्त सुबक हालचाली म्हणजे उफळी. टोपका ९ असून उफळ्या २३ आहेत. या दोन्हींच्या अर्थपूर्ण संयोगातून निर्माण झालेली रचना म्हणजे ‘भांगी’. भांगीला संवादशक्ती किंवा विशिष्ट अर्थ असतो. छाऊ नृत्यात पायाभूत पदन्यासांचा व गतींचा जेव्हा अभिनय केला जातो, तेव्हा त्यांच्यातून स्त्रवत असलेला वीररस सामान्य प्रेक्षकालाही भावतो. नृत्यासाठी मुखवटे तयार करणे ही खास कौशल्याची बाब आहे. मुखवट्यातील सूक्ष्म बारकावे टिपण्यासाठी मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास करून त्यांचे व्यक्तिमत्त्वदर्शक मुखवटे तयार करण्यात येतात. अर्धनारीश्वराचा मुखवटा हा परंपरेनुसार चेहऱ्याचा अर्धा भाग शिव आणि अर्धा शक्ती अशा विभागणीने न करता एकच चेहरा करतात. त्याच्या कपाळावर तीन आडव्या रेषा दर्शवून पुरुषत्वदर्शक तिसरा डोळा दर्शविला जातो. परंतु ओठांची ठेवण अशी असते, की स्मितहास्यामधून प्रेमभावनेचा सहज प्रत्यय यावा. हे स्मित शक्तिनिदर्शक आहे. पूर्वी मातीचे मुखवटे वापरीत, पण त्यामुळे नर्तकाला अंगविक्षेपांमध्ये अडचण येई व श्वासोच्छ्‌वासासही त्रास होई. नंतर लाकडाचे मुखवटे वापरले जात, पण तेही सोईचे ठरले नाहीत. पुढे कागदी लगद्यापासून मुखवटे केले जाऊ लागले. त्यामुळे ते सहजतेने वापरता येत. आज अस्तित्वात असलेल्या या मुखवट्यांचा प्रसार १९३३ च्या सुमारास विशेषत्वाने झाला. राजा आदित्य प्रतापसिंह देव यांनी मुखवट्याच्या क्षेत्रात ही क्रांती घडवून आणली. सेराईकेला छाऊ नृत्यात चेहरा मुखवट्याने आच्छादलेला असल्याने ते ते भाव शरीराच्या चलन-वलनाने व त्याच्या अनुरोधाने झालेल्या मुखवट्यांच्या स्थित्यंतराने प्रकट केले जातात. सेराईकेला छाऊच्या व्याकरणात परस्परविरोधी मनोभाव संकेतांनी प्रकट करण्यासाठी ठराविक भांगीची योजना केलेली असते. सेराईकेला छाऊतील आंगिक अभिनयाचे जे स्वरूप आहे, ते इतर कोणत्याही भारतीय नृत्यसंप्रदायातील तसल्या स्वरुपाहून उच्च दर्जाचे असते. ते इतके अद्वितीय, संकेतबद्ध व भावसूचक आहे, की वाचिकाभिनय व मुखभिनय यांच्या अभावीदेखील भावसंवाहनाचे कार्य या नृत्यात पूर्णांशाने सिद्ध होत असते.

नेफा भागातही मुखवटा-नृत्ये प्रचलित आहेत. या नृत्यांना दिलेली नावेसुद्धा काव्यपूर्ण आहेत. तेथे प्रचलित असलेल्या अनेक मुखवटानृत्यांपैकी दोन प्रकार पुढीलप्रमाणे : (१) ‘सावा चाम’ म्हणजे हरिणाचे नृत्य. हे त्या ठिकाणी प्रचलित असलेल्या आख्यायिकेवर आधारित आहे. या आख्यायिकेप्रमाणे या हरिणाने बौद्ध धर्माचा प्रचार केला होता. यामध्ये नर्तक आपल्या चेहऱ्यावर हरिणाचे मुखवटे घालतात. (२) ‘सादा तोपो त्सेन’ हे नृत्य नावाप्रमाणेच अत्यंत विचित्र व आकर्षक आहे. यामध्ये वापरले जाणारे मुखवटे हे अमानवी शक्तीचे प्रतीकरूप होत. पोशाखांच्या भव्यतेमुळे व विविधतेमुळे नृत्यातील हालचाली फारशा लक्षात येत नाहीत. या नृत्यांचे सिक्कीम व भूतान येथील नृत्यांशी अगदी निकटचे साम्य आहे. काश्मीरमधील लडाखी लोकांचे धर्मविधीयुक्त मुखवटा-नृत्य हे दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींनी मिळविलेल्या विजयाचे प्रतीकदर्शक आहे. त्यातून निसर्गाविषयीची भययुक्त श्रद्धाच प्रकट होते. कर्नाटकात पिकाच्या कापणीनंतर घोडा नाच केला जातो. त्यात घोड्याचा नकली मुखवटा कमरेला बांधून नर्तक नाचतात. महाराष्ट्रामध्ये जी कोळी नृत्ये प्रचलित आहेत त्यांत ‘नकटा’ नामक एक विनोदी प्रकार आहे. त्यात कोळी, कोळीण आणि नकटा अशी तीन पात्रे असतात. नकट्याची वेशभूषा खास प्रकारची असून तो मुखवटा घालतो. त्याच्या सोंगात हास्यकारक अतिशयोक्ती असते. दशावतारी प्रकारांपैकी संकासूर नृत्यात नर्तक शंखाकृती मुखवटा घालतो [⟶ दशावतारी नाटके].

संदर्भ :Benda, W. T. Masks, New York, 1944.

इनामदार, श्री. दे. पार्वतीकुमार

सेराईकेला छाऊ नृत्यातील मुखवटाधारी शिव, बिहारी.'कृष्णनाट्टम'नृत्यातील मुखवटाधारी पंचमुख मुरासुर, केरळ