मुक्तिबोध, गजानन माधव : (१३ नोव्हेंबर १९१७–११ सप्टेंबर १९६४). आधुनिक काळातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत. गजानन मुक्तिबोधांचे पणजोबा वासुदेव हे जळगावचे मूळ रहिवासी. मूळ आडनाव कुलकर्णी. ते पुढे ग्वाल्हेर संस्थानात जाऊन राहिले. त्यांचे ‘मुक्तिबोध’ आडनाव कसे पडले, याबाबत काही आख्यायिक सांगितल्या जातात. मुक्तिबोधांचे वडिल पोलीस उप निरीक्षक होते. आईचे नाव पार्वतीबाई. दोन भावंडांच्या मृत्यूनंतर गजाननांचा श्योपूर येथे जन्म झाल्यामुळे त्यांचे लहानपणी खूपच लाड झाले. प्रसिद्ध मराठी कवी व समीक्षक शरच्‍चंद्र मुक्तिबोध हे त्यांचे बंधू.

उज्जैनच्या महाविद्यालयातून इंटरमीजिएट व इंदूरच्या होळकर महाविद्यालयातून १९३८ मध्ये ते बी. ए. झाले. १९५३ मध्ये हिंदी विषय घेऊन ते नागपूर विद्यापीठातून एम्. ए. झाले. प्रारंभी बडानगर येथे व नंतर शुजालपूर, उज्जैन, कलकत्ता, इंदूर, मुंबई, बंगलोर, बनारस, जबलपूर या ठिकाणी त्यांनी शिक्षक, आकाशवाणीत प्रोग्रॅमर, पत्रकार इ. नोकऱ्या केल्या. निर्वाहासाठी पाठयपुस्तके लिहिली. १९५८ पासून राजनांदगाव येथे दिग्विजय महाविद्यालयात प्राध्यापक.

कामायनी : एक पुनर्विचार (१९६१, समीक्षा), नई कविता का आत्मसंघर्ष तथा अन्य निबंध (१९६४, समीक्षा), नये साहित्यका सौंदर्यशास्त्र (समीक्षा), चाँद का मुँह टेढा है (१९६४, काव्यसंग्रह), एक साहित्यिक की डायरी (१९६४, साहित्यासंबंधी चिंतनपर निबंध), काठ का सपना (कथासंग्रह), विपात्र (लघुकादंबरी), सतह से उठता आदमी (कथासंग्रह), भूरी भूरी खाक धूल (काव्यसंग्रह) या त्यांच्या ग्रंथांपैकी बरेच ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. त्यांच्या अप्रकाशित व प्रकाशित सर्व साहित्याचे सहा खंड मुक्तिबोध रचनावली शीर्षकाने प्रकाशित झाले आहेत (१९८०).

मुक्तिबोध मृत्यूनंतर हिंदीतील एक युगनिर्माते कवी म्हणून मान्यता पावले. कारण त्यांची कविता संकलित रूपाने त्यांच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झाली. शिवाय सांस्कृतिक संदर्भाचा प्रचंड ठसा घेऊन निर्माण झालेल्या त्यांच्या कवितेचा हिंदीच्या साठनंतरच्या जनवादी प्रवृत्तींशी खूपच दुवा जुळला. त्यांची बहुसंख्य कविता आकाराने दीर्घ आहे याचे कारण त्यांतील सामाजिक-राजनैतिक-सांस्कृतिक विराट आशय हे होय. मुक्तिबोधांचा जीवनद्दष्टिकोन मार्क्सवादी विचारसारणीकडे झुकलेला असला, तरी ते सापेक्षतः कवीच्या स्वातंत्र्याचे आणि कवितेच्या स्वायत्तेतेचे समर्थक होते. जीवनानुभावाचे काव्यानुभवांत रुपांतरण होताना मनाच्या नेणिवेचा त्यात असलेला प्रचंड सहभाग त्यांनी मान्य केला आहे. एवढेच नव्हे तर कल्पिताचे वा फँटसीचे महत्त्वही त्यांना मान्य आहे. त्यांच्या स्वतःच्या कवितेत जीवनानुभव कल्पिताच्या अंगाने व्यक्त होतो. परिणामतः त्यात आशयाची विराटता येते व उपदेशाचा सपाटपणा नाहीसा होतो. काव्यानुभवाच्या अंतर्मुखी होण्यावर त्यांनी खूपच भर दिलेली आहे. जगातील विषमता, भ्रष्टाचार, अन्याय, पिळवणूक, मूल्यभ्रष्टता यांनी त्यांचे मन क्षुब्ध व व्यथित होते. याविरुद्ध ते विद्रोही भूमिकेतून सतत आवाज उठवितात, आक्रमक हल्ले चढवतात पण त्याच वेळी आपल्या मध्यमवर्गीय मनाच्या मर्यादांचा व उणिवांचा वेध घेताना त्यांचे मन आक्रंदत असते, आपलीच चिरफाड करीत असते. हा चिरफाडीचा स्वर फार दारुण व करुण असतो. त्यांच्या कवितेतील प्रचुर प्रतीकात्मकता प्रबुद्ध वाचकालाच समजू शकते. त्यांच्या कवितेतील सर्व वातावरण भय, वेदना, यातना, निराशा, हिंस्त्रता यांनी थरथरत असते. हिंदीमध्ये विरूपतेचा व भग्नतेचा (ग्रोटेस्क) अनुभव मुक्तिबोधांनी फार मोठ्या प्रमाणावर आणला. मात्र माणसाच्या उज्ज्वल भविष्यावरची त्यांची आस्था शोक्षणमुक्त समाजाचे अरुणकमल पहात असते.

मुक्तिबोधांच्या सर्वच कथा मध्यम वर्गाच्या मनाचे खरेखुरे दर्शन घडवतात. निराशा, आत्मवंचना, आत्मकेंद्रतता, मनोविकृती यांनी असहाय झालेले मध्यवर्गीय मन त्यांच्या कथांतून उभे राहते. त्यांच्या कथांत घटना, पात्रांचे विविध नमुने नसतात, तर त्यांत त्यांच्या संवेदनेचा गुंतागुंतीचा पट असतो.

मुक्तिबोधांची साहित्यदृष्टी विशुद्ध सौंदर्यवादी आणि कलावादी विचारांना विरोध करते. मात्र त्यांच्या साहित्यिक विचारांचा पाया त्यांच्या समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान, मानसशास्त्र यांच्या सखोल व्यासंगावर उभा आहे साहित्याचा उपयोग जनवादी आंदोलनांना गतिशील करण्यासाठी करावा या मताचे ते समर्थक आहेत. त्यांचे सर्जन प्रक्रियेसंबंधीचे विस्तृत चिंतन हिंदीमध्ये फारच महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यांनी कामायनी या जयशंकर प्रसादांच्या महाकाव्याचे विस्ताराने विश्वेषण करून त्यातील अनुभवाचा उलगडा भांडवलशाही समाजातील व्यक्तिवाद व सरंजामशाही समाजरचनेतील विलासिता यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीतून त्यांनी नवकवितेचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला. एक साहित्यिक की डायरीमध्ये समाज, जीवन, साहित्य व तत्कालीन युग यांच्या एकविधतेतून काही साहित्यक-सांस्कृतिक प्रश्नांचे चिंतन केले आहे. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : १. गौतम, लक्ष्मणदत्त, गजानन माधव मुक्तिबोध, दिल्ली, १९७२.

             २. चक्रधर, अशोक, मुक्तिबोध की काव्यप्रक्रिया, दिल्ली,१९७५.

             ३. जैन, नेमिचंद्र, संपा. मुक्तिबोध रचनावली, ६ खंड, दिल्ली १९८०.

             ४. विमल गंगा प्रसाद, संपा. मुक्तिबोध का रचनासंसार, दिल्ली, १९६९.

बांदिवडेकर, चंद्रकांत