मुंबई : भारतातील एक प्रगत महानगर, अरबी समुद्र किनाऱ्यावरील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर व महाराष्ट्र राज्याची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ९०·०१ लक्ष (१९८१). क्षेत्रफळ ६०३ चौ. किमी. नवी दिल्लीच्या दक्षिण नैर्ऋत्येस १,१९१ किमी. वर, तर कलकत्त्याच्या पश्चिम नैर्ऋत्येस १,६४२ किमी. अंतरावर मुंबई वसलेले असून भारताचे प्रवेशद्वार म्हणून त्याला संबोधण्यात येते. लोकसंख्येच्या बाबतीत हे भारतातील कलकत्त्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, जगातील सर्वांत मोठ्या २५ महानगरांमध्ये मुंबईचा अठरावा क्रमांक लागतो (१९८१–८३). महामुंबई (बृहन्‌मुंबई) हा राज्यातील एक स्वतंत्र जिल्हाही असून राज्यातील एकूण ३० जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वांत लहान, पण लोकसंख्येच्या बाबतीत सर्वांत मोठा असा हा जिल्हा आहे. महामुंबईचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १८°५३ उ. ते १९ °१६ उ. व ७३°४६ पू. ते ७२° ५९पूर्व यांदरम्यान आहे. महामुंबईच्या उत्तरेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस व दक्षिणेस अरबी समुद्र, पूर्वेस ठाणे खाडी व तिच्या पूर्वेस ठाणे आणि रायगड हे जिल्हे आहेत.

भूवर्णन : मुंबई महानगर मुंबई बेट व साष्टी बेटाचा मोठा भाग मिळून तयार झाले आहे. मुंबई बेट हे मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम या मूळ सात बेटांचे एकत्रीकरण होऊन तयार झाले आहे. या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०–७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे कटक आहेत. त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील कटक मलबार पॉइंटपासून वरळीपर्यंत पसरला आहे. या कटकाची मलबार हिल येथील सस. पासून उंची ५५ मी. असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे. दुसरा कटक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे. या कटकामुळे व नरिमन पॉईंट (भूशिर) मुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे. या दोन्ही कटकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, अँटॉप इ. लहानलहान टेकड्या आहेत. या दोन्ही कटकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार व नरिमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

मुंबई बेटाच्या उत्तरेकडील साष्टी बेटाचा मध्यवर्ती भाग टेकड्यांनी (उदा.,कान्हेरीचे डोंगर, घाटकोपर टेकड्या) व्यापला आहे. या टेकड्यांमधून अनेक लहानलहान नद्या (मिठी, पोईसर, दहिसर इ.) उगम पावून समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे साष्टी बेटावर अरीय नदीप्रणाली निर्माण झाली आहे. पश्चिमेला मिठी नदी व माहिमची खाडी, पूर्वेला एका लहानशा नदीमुळे तसेच ठिकठिकाणच्या दलदलीच्या भागांमुळे मुंबई बेट साष्टी बेटापासून वेगळे झाले आहे. साष्टी बेट मुख्य भूभागापासून पश्चिमेला वसईची खाडी व पूर्वेला ठाण्याची खाडी यांनी अलग झाले आहे. मोसमी पूल (कॉजवे), सडका, लोहमार्ग, खाडीवरील पूल इत्यादींनी मुंबई व साष्टी ही दोन बेटे आता एकमेकांशी जोडली गेली आहेत. मुंबईचा मोठा भाग समुद्रात भर घालून तयार केला गेला आहे व आजही बॅक बे, माहिम इ, ठिकाणी भरावकार्य दिसते.

पश्चिम भारतातील इतर भागांप्रमाणेच येथे दक्षिण ट्रॅप आहेत. पण मुंबईत या खडकांची क्षैतिजरेखा भंग पावते व हे खडक पश्चिमेकडे ५ ° ते १५ ° झुकलेले आढळतात. ज्वालामुखीनिर्मित या खडकांचे सर्वांत तळातील थर रावळी टेकड्या, अँटॉप हिल, शिवडी येथे दिसतात. हा ब्लॅक जॅस्पर अगर चर्ट या प्रकारचा कठीण खडक आहे. या खडकांच्यावर ज्वालामुखीय कोणाष्माचा थर आहे. गोलनजी हिल (परळ) व शीवचा किल्ला तसेच कान्हेरीची लेणी यांत हे थर दिसतात. यावरचा थर म्हणजे बदामी कुहरयुक्त करडे ट्रॅप होत. हा थर बेटावर ठिकठिकाणी आढळतो. त्यावरचा थर मुंबईतील अंतरा-ट्रॅपी हा आहे. यात अनेक प्रकारच्या अश्मस्थी किंवा जीवाश्म सापडल्याने भूवैज्ञानिक इतिहास समजण्याचे हे एक उत्तम साधन आहे. मुंबईत हा थर अनेक ठिकाणी आढळतो. या थरावरचा बेसाल्टचा थर मलबार हिलवर दिसतो.

ट्रॅपची निर्मिती झाल्यानंतर झीज होण्याचा काळ सुरू झाला. याचबरोबर जमिनीवर समुद्राचे आक्रमण होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे सखल भाग पाण्याखाली बुडून खाड्या बनल्या. मुंबईजवळच्या गोराई, मनोरी, मालाड इ. खाड्या याच भूवैज्ञानिक घडामोडींच्या साक्षी आहेत.

हवामान : मुंबईचे हवामान उष्ण, दमट व सम आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान हवामान साधारण थंड, तर मार्च ते मे यांदरम्यान हवामान उष्ण असते. जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते, तर मॉन्सूनच्या ऑक्टोबर-डिसेंबर या काळात हवा उष्ण असते. मुंबईचे जानेवारीतील सरासरी तपमान १९° से., तर मे महिन्यात ते सरासरी ३३° से. असते. वार्षिक पर्जन्यमान १८० सेंमी. असून त्यांपैकी सु. ६० सेंमी. पर्जन्य जुलै महिन्यात पडतो.

नारळ, ताड, आंबा, चिंच, वड इ. वृक्षप्रकार या भागात आढळतात. साष्टी बेटावर पूर्वी वाघ, चित्ता, कोल्हा, हरिण हे प्राणी आढळत. त्यामुळे शिकारीसाठी हे बेट प्रसिद्ध होते.


नावाची उपपत्ती : मुंबई या नावासंबंधी विविध मते आढळतात. सालेटोर यांनी मिरात-इ-अहमदी या ग्रंथात आलेल्या ‘मनबाई’ या शब्दाच्या आधारे ‘मुंबाई’ या स्थानिक बौद्ध देवतेवरून मुंबई हे नाव पडले असावे, असे मत मांडले, परंतु हं. धी. सांकलिया यांनी ते खोडले आहे. मुगा नावाच्या कोळ्याने मुंबादेवीचे देऊळ बांधले ते मुंबईचे मूळ रूप असावे, असा एक तर्क आहे. मृण्मयी &gt मुमई &gt मुंबई अशी व्युत्पत्ती अ. द. पुसाळकर व वि. गो. दिघे या इतिहास संशोधकांनी दिली आहे. मोमाई ही सौराष्ट्रातील देवता एके काळी मुंबईत पूजिली जात होती, तीवरून मुंबई हे नाव आले असावे, असेही म्हटले जाते. महाअंबाबाई &gt मुंबई अशीही (भाषाशास्त्रदृष्ट्या चुकीची) व्युत्पत्ती पुढे केली जाते. मुंबादेवी या स्थानिक कोळ्यांच्या देवतेवरून मुंबई नाव आले, हे मत सामान्यपणे मान्य करण्यात येते. पोर्तुगीजांनी वापरलेल्या बाँ-बाइआ (उत्तम उपसागर) यावरून बाँबे हे नाव आले असावे हा तर्क फ्रायर व जोशी यांनी फेटाळला आहे. बॉम्बेम किंवा बून बे अशी नावे पोर्तुगीज येण्यापूर्वी वापरात होती, असे दिसून येते.

इतिहास : टॉलेमीने केलेला हेप्टानेशिया हा उल्लेख (इ. स. पू. १५०) बहुधा मुंबईचा असावा, अशी समजूत आहे. प्रागैतिहासिक काळातील येथील भूपृष्ठाच्या उलथापालथीचे निदर्शक असे बेडूक, खैर वृक्ष इत्यादींचे अवशेष येथे सापडले आहेत. विद्यमान बॅक बेच्या किनाऱ्यावर प्राचीन काळी मानवी वस्ती असावी, असे तेथे सापडलेल्या दगडी आयुधांच्या अवशेषांवरून दिसते. कोकणात आभीर व नंतर त्रैकूटक यांची सत्ता होती. इ. स. पाचव्या शतकातील त्रैकूटक राजा कृष्ण याची नाणी मुंबई व साष्टी बेटांवर सापडली आहेत. त्यानंतर कोकणातील मौर्य आणि नंतर चालुक्य यांच्या अंमलाखाली हा भाग होता. पुढे उ. कोकणचे राज्य राष्ट्र्कूटांकडून शिलाहारांकडे आले. शिलाहारांच्या काळातच (इ. स. ८००–१२६०) वाळकेश्वराची स्थापना झाली. पाठारे प्रभू, कायस्थ प्रभू, यजुर्वेदी ब्राह्मण त्या काळातच येथे आल्याचे दिसते. शिलाहारांचा सागरी युद्धात पराभव करून यादवांनी येथे आपला अंमल प्रस्थापित केला. रामदेवराव यादवानंतर वीस-पंचवीस वर्षातच मुंबईवरील हिंदू अंमल संपुष्टात आला.

कोळी समाज हा येथील प्राचीन समाज होय. मच्छगाव (माझगाव), कोळघाट (त्यावरून कुलाबा झाले), कुळवाड इ. नावे तसेच मांडवी, डोंगरी, माहीम, शीव येथील कोळीवाडे या गोष्टी त्याच्या निदर्शक आहेत. कोळ्यांबरोबरच शेती व मीठ उत्पादन करणारे आगरी, यादवकालीन उल्लेख असलेले व माडाची दारू काढणारे भंडारी, देशावरून आलेले माध्यंदिन शाखेचे ब्राह्मण इ. समाज यादवकाळातच येथे स्थायिक झाल्याचे दिसते. गावदेवी किंवा लीलावतीचे आणि खोतवाडीतील प्रभादेवीचे मूळ देऊळ याच काळातले असावे. पंधराव्या शतकात येथे गुजरातच्या सुलतानाचा अंमल होता. तत्कालीन भंडारी समाजाचा उठाव व मुंबईवरील त्याचा अल्पकालीन कब्जा, ही त्या काळातील विशेष बाब होती. पंधराव्या शतकात साष्टी बेटासाठी लढायाही झाल्या. सोळव्या शतकाच्या प्रारंभापासून पोर्तुगीजांनी त्यांत भाग घेतला. या कटकटींना कंटाळून १५३४ मध्ये गुजरातच्या सुलतानाने मुंबई आणि वसई पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली व तेथील मुसलमानी अंमल संपला. कोकणी मुसलमान वा नवैत मूळ माहीमचे रहिवासी. ते मुख्य मुंबईत पोर्तुगीजांबरोबर आले. नाखुदा म्हणून ते गलबतावर काम करीत. मुस्लिम अंमलास हिंदू मंदिरे नष्ट करण्यात आली.

पोर्तुगीज काळात धर्मप्रसार, चर्चवास्तूंची उभारणी आणि व्यापार यांसाठीचा मुंबईचा उपयोग करण्यात आला. ख्रिस्ती मठांना मोठ्या जमिनी देण्यात आल्या व जेझुइट पाद्र्यांकडे मुंबईचे प्रत्यक्ष नियंत्रण गेले. सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे इंग्रजांचे आगमन झाले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सुरतेबरोबरच मुंबईसारख्या दुसऱ्या बंदराची गरज होती. पोर्तुगीजांकडून ती विकत घेण्याचा प्रयत्नही कंपनीने केला. १६२९ मध्ये डचांच्या मदतीने इंग्रजांनी मुंबई लुटली होती.

इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्या इन्फंटा कॅथरिन यांच्या विवाहानिमित्त पोर्तुगीजांनी मुंबई ही इंग्रजांना आंदण म्हणून दिली (१६६१–६२). प्रत्यक्षात जानेवारी १६६५ मध्ये इंग्रजांना तिचा ताबा मिळाला. तथापि पोर्तुगीज, मोगल, सुरतेचे व्यापारी यांच्यातील संघर्षामुळे आणि उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने चार्ल्सने १६६८ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई भाड्याने दिली. जेराल्ड आंजिअर हा शिल्पकार होय. १६७२ मध्ये सुरतेहून मुंबईला त्याने मुख्य ठाणे हलविले. इंग्रजी कायदा व न्यायालये, टाकसाळ, रुग्णालय, छापखाना, नगररचना, स्थानिक समाजांच्या पंचायती, गुजराती बनिया व आर्मेनियन या व्यापारी समाजांना प्रोत्साहन, जमिनीच्या प्रश्नांची सोडवणूक इ. अनेक सुधारणा त्याने केल्या. त्याच्या निधनसमयी (१६७७) मुंबईची लोकसंख्या ६०,००० होती. पुढे रोगराई, अस्वच्छ व दूषित वातावरण आणि जंजिऱ्याच्या सिद्दीच्या मोहिमा यांमुळे मुंबईचा विकास थांबला. १६८९ मध्ये सिद्दीने शिवडी बेट घेतले, माझगावचा किल्ला जाळला व इतरत्र मोठा विध्वंस केला. १६८३ साली कॅप्टन रिचर्ड किगविन याने बंड करून मुंबईवर पुन्हा इंग्लंडच्या राजाच्या नावाने राज्य केले. पुढील वर्षी मात्र मुंबई पुन्हा कंपनीकडे आली. १६९८ साली इंग्लंडच्या राजाच्या कृपेने आणखी एक इंग्लिश कंपनी स्थापना होऊन या दोन्ही ब्रिटिश कंपन्यांत संघर्ष व स्पर्धा चालू राहिली. परंतु १७०३ मध्ये या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण झाले.


अठराव्या शतकातील मराठ्यांच्या अंमलात मुंबईला स्थैर्य लाभले. या काळातच हंफ्री कुकने येथे किल्ला (सांप्रत फोर्ट विभाग) बांधण्यास सुरुवात केली. चार्ल्स बून (कार.१७१५–२२) याने फोर्ट विभागाचा व गोदीचा विस्तार केला तसेच ‘बाँबे मरीन’ या आरमाराची स्थापना केली. त्यानंतर मुंबईत कोर्ट ऑफ ऑयर अँड टर्मिनर व मेयर्स कोर्ट यांची स्थापना झाली. १७४८ मध्ये नागरी बांधकामाचे नवे नियम करण्यात आले व १७५७ मध्ये सांडपाणी व्यवस्था सुरू झाली. १७६१ च्या सुमारास फोर्ट विभाग व्यापारी व सरकारी कामकाजाचे केंद्र ठरले. कुलाबा सोडल्यास मुंबई बेट त्यावेळी एकसंघ होते. भरतीच्या वेळी कुलाब्याचा संबंध तुटे. गव्हर्नर विल्यम हॉर्नबीने १७७२ नंतर मराठ्यांच्या अस्थिरतेचा फायदा घेऊन साष्टी बेट घेतले राघोबादादाशी तह करून करंजा, घारापूरी इ. लहानलहान बेटेही ताब्यात घेतली. वसईचा तह (१८०२) आणि नंतर १८१८ मध्ये पेशव्यांचा पराभव होऊन मुंबईवर इंग्रजी अंमल स्थापन झाला. त्यानंतर मुंबई प्रेसिडेन्सी किंवा इलाखा स्थापन करण्यात आला.

अठराव्या शतकाचा उत्तरार्ध हा मुंबईच्या विकासाचा मोठा टप्पा होय. या काळात शहराकडे धनिकांचा ओघ वाढला. माझगाव गोदीचा विस्तार तसेच शहराचे पूर्ण सर्वेक्षण करण्यात आले. १७७१ ते १७८४ च्या दरम्यान हॉर्नबी वेलार्ड मार्ग (विद्यमान लाला लजपतराय मार्ग) बांधण्यात आला. यूरोपीय लोकांकरिता विद्यमान वीर नरिमन मार्गाच्या बाजूला आणि तद्देशीय लोकांकरिता त्याच्या उत्तरेला जागा देण्यात आली. सांडपाण्याची पुनर्रचना करण्यात आली बाजार व करमणूक केंद्रे अस्तित्वात आली याच काळात पोलीसदलाची पुनर्रचना झाली. न्यायदानाची व्यवस्था रेकॉर्डर्स कोर्टतर्फे (१७९८) करण्यात आली. जस्टिस ऑफ ‘पीस’ (जे. पी.) हे पद शहराची देखभाल, मालमत्तेचे मूल्यमापन इ. साठी निर्माण केले. चाचेगिरीचाही बंदोबस्त करण्यात आला. १७८५ च्या सुमारास मुंबईची लोकसंख्या १ लाखावर होती.

कापडगिरण्यांची सुरुवात (१८५१), लोहमार्गाची सुरुवात (१८५३), सुएझ कालव्याचे उद्‌घाटन (१८६९), मुंबई ते एडनदरम्यानच्या केबल मार्गाची सोय या सर्वच कारणांनी मुंबईची भरभराट होऊ लागली. दरम्यान १८०३ च्या अग्निप्रलयात मुंबईचा तिसरा हिस्सा नष्ट झाला. त्यामुळेच उमरखाडी, भुलेश्वर, मांडवी इ. भागांचा नव्याने विकास होऊ शकला. त्याच वर्षी साष्टी व मुंबई  बेटे जोडणारा शीव मोसमी पूल तयार झाला. १८६२ साली किल्ला व भोवतीचा खंदक पाडून रस्ते व इमारतींसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. नंतर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, जुने सचिवालय, उच्च न्यायालय, एल्फिन्स्टन  महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ, बोरीबंदर स्थानक इ. प्रसिद्ध इमारती बांधल्या गेल्या. मुंबई नगरपालिकेची १८६५ मध्ये स्थापना झाली. विहार, पवई, तुळशी व तानसा या तलावांची पाणीपुरवठ्यासाठी योजना करणयात आली. १८५७ च्या उठावाच्या वेळी मुंबईत विशेष असे काहीच घडले नाही. या काळातच खोजा, मेमन, बोहरा, भाटिया, बेने इझ्राएली, कपोल बनिया इ. व्यापारी वर्ग मुंबईत आला. व्यापार व उद्योगधंदे यांच्या वाढीबरोबरच कोकण तसेच उत्तर-दक्षिण भारतातून मजूरवर्ग, कामगारवर्ग येथे येऊ लागला. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर (१८५७) शैक्षणिक केंद्र म्हणूनही मुंबईचा विकास होऊ लागला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीची सु. ३० वर्षे प्लेग, इन्फ्ल्यूएंझा, विषमज्वर इ. साथीचे रोग, दंगेधोपे शहरात झाले. तथापि कापड उद्योग, रसायने, चित्रपट, अभियांत्रिकी इ. व्यवसाय स्थापना होऊन वाढीस लागले. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईचा सर्वच दृष्टींनी विकास होत गेला. स्वतंत्र भारतात प्रथम मुंबई राज्याची, नंतर द्वैभाषिक मुंबई  राज्याची आणि १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून ती महाराष्ट्राची राजधानी झाली आहे.

प्रशाशन : मुंबईचे प्रशासन महानगरपालिकेतर्फे केले जाते. १८८८ च्या अधिनियमान्वये महानगरपालिका, तिच्या चार वैधानिक समित्या, महापालिकेचे आयुक्त आणि ‘बेस्ट’ (बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट-BEST) उपक्रमाचे महाप्रबंधक यांच्याकडे नागरी प्रशासनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. १९८४ मध्ये त्या अधिनियमामध्ये नवे कलम घालून महानगरपालिकेचे काम, पुढील महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांकडे सोपविण्यात आले होते. १९८५ मध्ये पुढील पाच वर्षांकरिता नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली. सध्या महानगरपालिकेत १४० लोकनिर्वाचित नगरसेवक आहेत.

महानगरपालिकेचे चर्चात्मक आणि कार्यकारी असे दोन भाग आहेत. चर्चात्मक भागात (१) महानगरपालिका, (२) स्थायी समित्या, (३) खास समित्या, (४) काही खास विषयांकरिता नेमलेल्या तज्ञांच्या समित्या आणि (५) वृक्ष प्राधिकरण हे विभाग मोडतात. कार्यकारी भागात प्रशासक, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, प्रमुख अभियंता, इतर विभागांचे प्रमुख ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाप्रबंधक येतात. शासनाच्या सोईकरिता शहरात २१ विभाग (वॉर्ड) आहेत.


शहराचा व्याप लक्षात घेता महानगरपालिकेची उलाढालही मोठी आहे. सात जलाशयांतून रोज सरासरी २,१०० दशलक्ष लिटर पाणी पुरविले जाते. दीडशे सार्वजनिक दवाखाने, बावीस प्रसूतिगृहे, वीस साधारण रुग्णालये (७,७९६ खाटा), चार विशेष रुग्णालये, चार वैद्यकीय महाविद्यालये यांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. महानगरपालिकेच्या दवाखान्यांवर व प्रसूतिगृहांवर १९८४–८५ मध्ये १४,१३,७९,८०० रु. खर्च झाले. दहा भाषांची माध्यमे असणाऱ्या १,३३४ प्राथमिक व ५१ माध्यमिक शाळांव्यतिरिक्त ३०९ अनुदानप्राप्त शाळा, इतका शैक्षणिक सेवांचा व्याप आहे. शिक्षणावर ४१ कोटी रु. व अनुदानापोटी २ कोटी रु. खर्च झाले (१९८४–८५). त्याच वर्षी देवनार कत्तलखान्यावर ४·४४ कोटी रु. आणि मलनिःसारण व सांडपाणी निचरा यांकरिता २२·१८ कोटी रु. खर्च झाले. गलिच्छ वस्ती निर्मूलन, अभियांत्रिकी सेवा यांकरिता २२·३८ कोटी रु. खर्च केला गेला. ‘बेस्ट’ उपक्रमासंबंधीचा आर्थिक व्यवहार रु. २४३ कोटींच्या (खर्च व उत्पन्न दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत) घरात आहे. १९८४–८५ मध्ये महापालिकेचे उत्पन्न ७१०·८३ कोटी रु. व खर्च ६८९·३१ कोटी रु. होता.

विद्यमान मुंबईचे वर्णन पुढीलप्रमाणे करता येईल : (१) फोर्ट: पूर्व-पश्चिमेला अरबी समुद्र असलेला हा भाग म्हणजे मुंबईचे जणू हृदय होय. सरकारी कचेऱ्या, व्यापारी कंपन्यांची मुख्यालये, हॉटेले, विमान कंपन्या व जहाज वाहतूक कंपन्या यांची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मुंबई विद्यापीठ, चित्रपटगृहे इत्यादींची येथे गर्दी झाली आहे. बँकांची प्रमुख कार्यालये, दुकाने, निपटारा व अग्रेषण अभिकर्त्यांची कार्यालये, मुद्रणालयांसारख्या छोट्या उद्योगांचे झालेले केंद्रीकरण, उत्तुंग इमारतींनी गजबजलेले नरिमन पॉइंट ही येथील काही वैशिष्ट्ये होत. ब्रिटिश काळातील सार्वजनिक डाक कार्यालयासारख्या इमारती, शेअरबाजार व विदेश दूरसंचारभवन यांसारख्या उत्तुंग इमारती यांचे विलक्षण मिश्रण या भागात आढळते.

(२) बाजार : लो. टिळक मार्ग व शामळदास गांधी मार्ग यांच्या उत्तरेला व राजा राममोहन रॉय मार्ग, शौकत अली मार्ग, कामाठी पुऱ्याचे काही भाग, नागपाडा यांच्या दक्षिणेला तसेच पूर्वेला मध्य रेल्वे व पश्चिमेला पश्चिम रेल्वे यांनी बंदिस्त केलेल्या भागाला ‘बाजार’ म्हणणे योग्य ठरेल. जुम्मा मशिदीच्या आसपास, तसेच चकाला व भुलेश्वर येथे व्यापारी उलाढाली अधिक चालतात. पूर्वेच्या बाजूला (महमदअली रोड, इब्राहिम रहिमतुल्ला रोड) फर्निचर, यांत्रिक उपकरणे, अत्तरे, युनानी औषधे इ. व्यापार मुसलमानांकडे आहे. मांडवी, डोंगरी, दाणाबंदर (सर्व धान्य व मसाल्याचे पदार्थ), मुळजी जेठा मार्केट व मंगळदास मार्केट (सुती वस्त्रे), जव्हेरी बाजार (सोने-चांदी-हिरे, जडजवाहीर यांचा व्यापार) येथील व्यापार गुजराती समाजाच्या हातात एकवटला आहे. मुंबादेवी, तांबाकाटा, नागदेवी स्ट्रीट, शेख मेमन स्ट्रीट यांत एकाच वस्तूची दुकाने शेजारी लागून आहेत. लोहार चाळ. सुतार चाळ ही व्यापाराशी निगडित आणखी दोन नावे आहेत. प्रत्येक व्यापाराकरिता स्वतंत्र संघटना आहेत व व्यापारी संघटित आहेत. दुकानांखेरीज फेरीवाल्यांद्वारेही मोठी उलाढाल चालते. याच भागात मुंबईतील प्रसिद्ध वाड्या आढळतात. पोर्तुगीज व नंतर इंग्रज कारकीर्दीत फजिंदार, मोठे जमीनदार यांना ज्या जमिनी देण्यात आल्या होत्या, त्यांवर या वाड्या वसल्या. येथे खोताची वाडी, कॅव्हेल (दोन्ही ख्रिस्ती), फणसवाडी, गायवाडी वगैरे (हिंदु-मराठी), पोफळवाडी (हिंदु-गुजराती) अशा काही वस्त्या आहेत.

(३) श्रीमंतांची वस्ती : जुन्या मुंबईत परळ व भायखळा येथे श्रीमंतांची वस्ती होती. आज ती मलबार हिल व खंबाला हिल या मुंबई बेटावरील व वांद्रे (पश्चिम), पाली हिलकडील भाग व जुहू यांमध्ये आढळते. आल्हाददायक हवामान हे येथील प्रमुख आकर्षण आहे. मलबार हिल व खंबाला हिल येथे पूर्वी मोठ्या बंगल्यामध्ये माणसे रहात आज बहुतांशी त्यांची जागा उंच इमारतींनी घेतली आहे. जुहू व पाली हिल येथेही टुमदार बंगले व उंच इमारती एकत्रित आढळतात. या भागांमध्ये परदेशी वकिलांतील लोक, धनाढ्य व्यापारी, उद्योगपती, राजकारणी, चित्रपटसृष्टीतील कलावंत इ. प्रामुख्याने राहतात. या भागातील रहिवाशांची एक वेगळीच संस्कृती आहे व यांचा ओढा पाश्चिमात्य राहणी व विचारसरणी यांच्याकडे अधिक आहे. गेल्या वर्षांत दक्षिण मुंबईत कफ परेड भागातही जमिनीच्या किमंती आकाशाला भिडल्या व तेथे श्रीमंत वस्ती वाढली.

(४) औद्योगिक क्षेत्र व कमी उत्पन्नाच्या लोकांची वस्ती : बाजार भागाच्या उत्तरेला, दादरच्या दक्षिणेला व गोदीच्या पश्चिमेला हे क्षेत्र आहे. धूर ओकणाऱ्या कापडगिरण्या हे या भागाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. याखेरीज परळ, वरळी, ताडवाडी येथील औद्यौगिक वसाहतीतील विविध वस्तू बनविणारे कारखाने, शिवडीजवळचे रासायनिक कारखाने, माझगावमधील अभियांत्रिकी कारखाने इ. येथे आहेत. मध्य व पश्चिम रेल्वे यांच्या कर्मशाळा (परळ, महालक्ष्मी, लोअर परळ) येथेच मोडतात. जुन्या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्यांची निवासस्थाने चाळी- हे मुंबईचे खास वैशिष्ट्य होय. बहुतेक चाळकरी हे पूर्वी गिरणीत कामाला होते. आज चाळकऱ्यांमध्ये कामाची विविधता आढळते. येथील राहणीमान मात्र अतिशय दैन्यावस्थेचे आहे. सेनापतीबापट मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग येथे रस्त्याला लागून दोन्ही बाजूंना झोपडपट्ट्या आहेत.

(५) बंदर विभाग : मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर मुंबई बंदर आहे. हे थेट तुर्भे व बुचर बेटांपर्यंत पसरले आहे. दक्षिण टोकाला असलेली ससून गोदी आज मासेमारीकरिता मर्यादित राहिली आहे. अपोलो बंदरावरून पूर्वी परदेशी जाणाऱ्या बोटी सुटत असत. आज तेथून घारापुरीच्या छोट्या यांत्रिक बोटी सुटतात व आसपास नौकानयनही करता येते. बॅलार्ड पिअर हा परदेशी प्रवासी बोटी सुटण्याचा प्रमुख धक्का होय. देशांतर्गत प्रवासी वाहतूक भाऊच्या धक्क्यावरून चालते. अलेक्झांड्रा, इंदिरा (व्हिक्टोरिया) व प्रिन्सेस या तीन गोद्या मालवाहतुकीकरिता विशेष प्रसिद्ध आहेत. यांशिवाय मोदी, मॅलेट, कसारा, लकडी, न्यू टँक, हे हाजी, शिवडी इ. अनेक छोट्या बंदरांमधून अरबी नावांमार्फत (डाऊ) व्यापार सुरू असतो. तुर्भे व बुचर बेटावर तेल उतरविले जाते. याशिवाय भारतीय नौसेनेची माझगाव गोदी येथेच आहे. मांडवी, डोंगरी व कॉटन ग्रीन येथे मालाची गुदामे आहेत. अनेक वाहतूक कंपन्यांची कार्यालये येथे केंद्रित झाली आहेत. भारतातील बंदरांद्वारे होणाऱ्या आयातीमधील मुंबईचा वाटा ४३% आणि निर्यातीमधील वाटा २२% आहे. अशुद्ध तेलाच्या वाढत्या आयातीमुळे आकडा फुगला आहे. अशुद्ध तेलांव्यतिरिक्त लोखंड, पोलाद, तयार वस्तू इ. मुंबईतून येतात. मुंबई बंदराच्या पार्श्वप्रदेशात महाराष्ट्र, मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांचा काही भाग इत्यादींचा समावेश होतो. मुंबई गोदीवरचा ताण कमी करण्यासाठी न्हावा-शेवा प्रकल्प १९७१ मध्ये हाती घेण्यात आला आहे.


(६) मध्यमवर्गीय वस्तीचे भाग : या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये मुंबई सुधारणा न्यासाने (बाँबे इंप्रूव्हमेंट ट्रस्टने) माटुंग्याला निवासस्थाने बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. तो काही वर्षानंतर स्थगित करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास दादर, शीव, वडाळा उदयाला आले. मुंबईत सदनिका पद्धतीची सुरुवात झाली. गेल्या दोन दशकांत प्रभादेवी व वरळी येथे मध्यमवर्गीयांबरोबरच श्रीमंतांचीही वस्ती वाढत आहे. धारावी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी या भागाच्या उत्तरेला आहे.

(७) उपनगरे : साष्टी बेटावरील उपनगरे १९५० नंतर गजबजू लागली. प्रथम वस्ती पश्चिम रेल्वेवरील उपनगरांत वसली. खार, सांताक्रूझ (पश्चिम) येथे श्रीमंत तर विलेपार्ले, सांताक्रूझ (पूर्व) व अंधेरी येथे खाजगी इमारतीबरोबरच जवाहरनगर, सिद्धार्थनगर यांसारख्या सरकारी वसाहती उदयाला आल्या. वर्सोवा, गोरेगाव (पश्चिम), मालाड (पश्चिम) यांसारख्या ठिकाणी खाड्या किंवा दलदली बुजवून निवासस्थाने बांधण्यात आली. मालाडनंतर बोरिवलीपर्यंत गुजराती व अन्य अमराठी भाषिकांची वस्ती वाढली. सदनिका, चाळ, बंगले अशा सर्व पद्धतींच्या इमारतींत माणसे राहू लागली. अंधेरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), जोगेश्वरी (पश्चिम) कांदिवली येथे उद्योगधंदे स्थापन झाले. गोरेगाव (पूर्व), जोगेश्वरी (पश्चिम), कांदिवली येथे उद्योगधंदे स्थापन झाले. गोरेगाव (पूर्व) येथे आरे गौळीवाडा स्थापन केलेल्या नगरांबरोबर खाजगी नगरेही (सुंदरनगर-मालाड आनंदनगर-दहिसर) वसू लागली.

मध्य रेल्वेवरील उपनगरे साधारण गेल्या दोन दशकांत बदलली. त्यापूर्वी जड अभियांत्रिकी उद्योग (कुर्ला व भांडूप यांदरम्यान) लालबहादूरशास्त्री मार्गावर ठाण मांडून बसले होते. चेंबूरला सिंधी निर्वासितांनी आपली वसाहत केली होती. शिवाय तेथे तेलशुद्धीकरण कारखानेही होते. मुंबईमध्ये लोकसंख्येची भरमसाट वाढ होऊ लागल्यावर ही उपनगरेही भरली. या उपनगरांमध्ये सरकारी नगरांचे प्रमाण अधिक आहे. उच्च मध्यमवर्गीय वस्ती चेंबूर, घाटकोपर इ. ठिकाणी आहे. भांडूप येथे अजूनही पूर्वेला इमारतींबरोबर मिठागरे दिसतात.

दोन्ही रेल्वेमार्गांवरील उपनगरांमध्ये दलदलीच्या जागा, डोंगरावरील उतार अशा अडचणीच्या भागांत झोपडपट्ट्या आढळतात.

वैशिष्ट्ये : आधुनिक भारताच्या जडणघडणीत मुंबई शहराचा वाटा मोठा आहे. अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक चळवळींचा प्रारंभ मुंबईत झाला. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ (१८०५), ‘स्ट्यूडन्ट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ (१८४८), ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ (१८५७), ‘प्रार्थना समाज’ (१८६७), ‘आर्य समाज’ (१८७५), ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ (१८७५), ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ (इंडियन नॅशनल काँग्रेस) चे पहिले अधिवेशन (१८८५), कामगार चळवळ (१८८५), ‘छोडो भारत आंदोलन’ (१९४२) इ. संस्था-घटना यांचे मुंबई हे माहेरघर ठरले. मुंबईने देशाला अनेक राजकीय नेते, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, विद्वान व संशोधक, लेखक, कलावंत यांची देणगी दिलेली आहे.

देशी-परदेशी व्यापार, निर्मितिउद्योग, नित्योपयोगी वस्तूंचे बाजार आणि आर्थिक व्यवहार या बाबतींत हे महानगर आघाडीवर असून देशाच्या अर्थकारणाची नस आहे. भारतीय रिझर्व्ह बँक व भारतीय स्टेट बँक यांची मुख्यालये येथेच आहेत. येथील शेअरबाजार हा देशाच्या आर्थिक चढउताराचा निदर्शक असतो. कापडउद्योगाचे हे केंद्र. त्याखेरीज अभियांत्रिकी, स्वयंचलित वाहने, छपाई, रसायने, रंग, खत, यांत्रिक उपकरणे, अन्नपदार्थ, रेशीम व कृत्रिम धागे, तेल साबण, प्लॅस्टिक, धातुकाम इ. उद्योगधंदे या महानगरात विकसित झाले आहेत. हिंदी चित्रपटव्यवसायाचे तर हे प्रमुख निर्मितिकेंद्रच आहे. जवळच्या बाँबे हायमधून मिळणारे नैसर्गिक वायू व खनिज तेल मुंबईतील परिष्करण कारखान्यांमध्ये पुढील प्रक्रियांसाठी नळांमार्गे आणले जाते.

भाभा अणुसंशोधन संस्था, हाफकिन संस्था, नेहरू खगोलालय, टाटा मूलभूत संशोधन संस्था यांसारखी देशाच्या वैज्ञानिक-तांत्रिक प्रगतीची निदर्शक अशी केंद्रेही शहरात आहेत. ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’, ‘आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अभ्यास संस्था’ इ. संस्था सामाजिक विज्ञान संशोधनात अग्रेसर आहेत.

घोड्यांकडून ओढली जाणारी पहिली ट्रामवाहतूक मुंबईत ९ मे १८७४ रोजी सुरू झाली. पहिली विजेची ट्राम ७ मे १९०७ रोजी चालू झाली परंतु पुढे इतर जलद वाहतूक साधनांमुळे ३१ मे १९६४ रोजी मुंबईतील ट्राम वाहतूक बंद करण्यात आली. येथे सहार हा आंतरराष्ट्रीय, तर सांताक्रूझ हा देशांतर्गत विमानतळ आहे. पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या, बेस्ट कंपनीच्या बसगाड्या, ट्रॅक्सी तसेच खाजगी मोटारी इत्यादींनी या महानगरीची वाहतूक व्यवस्था चालते. मुंबई बंदर विश्वस्त मंडळाद्वारा बंदर व्यवस्थापनाचे काम पाहिले जाते. देशाच्या नौसेनेचे पश्चिम विभाग केंद्र (फ्लीट) येथे आहे.

सांस्कृतिक विविधता हे वैशिष्ट्य आहे. मुंबईतील मराठी माणसांनीच हे वैशिष्ट्य रुजविले व संवर्धित केले. महाराष्ट्रीय बहुसंख्य संस्कृतीचा पूर्ण ठसा या महानगरीवर आहे, तो वरील अर्थाने ! महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-वाङमयीन चळवळीचे उगमस्थान व कार्यक्षेत्रही मुंबईच आहे. देशी-परदेशी, विविध भाषिक, विविध धर्मपंथांचे लोक उद्योगव्यवसायांच्या निमित्ताने येथे स्थायिक झाले आहेत. या समाजातील व्यक्तींनीही मुंबईवर आपापल्या परीने आपला ठसा उमटविला आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, सिंधी, उर्दू इ. भाषांतील वृत्तपत्रे-नियतकालिके येथून निघतात. गुजराती भाषेतील मुंबई समाचार (स्था. १८२२) हे भारतातील सर्वांत जुने वृत्तपत्र आहे. मुंबईतील मराठी रंगभूमी विशेष प्रगत व प्रयोगशील असून, इंग्रजी, गुजराती, हिंदी नाटके, विविध संगीत महोत्सव, कला प्रदर्शने, नृत्ये आणि सभासंमेलने असे कार्यक्रम अखंडपणे मुंबईत चालू असतात. येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझीयम हे संग्रहालय व जहांगीर आर्ट गॅलरी ही कलावीथी उल्लेखनीय आहेत.


क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध असलेले वानखेडे स्टेडियम तसेच ब्रेबोर्न स्टेडियम (फुटबॉल, हॉकी), कूपरेज (फुटबॉल), वल्लभभाई पटेल स्टेडियम (व्यायामी व मैदानी खेळ) ही येथील प्रसिद्ध क्रीडामैदाने होत. भारतीय क्रीडाकेंद्र (दादर), कामगार क्रीडाकेंद्र (एल्‌फिन्स्टन रोड) ही भारतीय खेळांची प्रमुख केंद्रे होत. सर्व देशी-विदेशी खेळांत मुंबईचे संघ आघाडीवर असून क्रिकेटच्या क्षेत्रात मुंबई संघ देशात अग्रेसर आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक नामवंत खेळाडू मुंबइकरच आहेत. महालक्ष्मी येथील अश्वशर्यतींचे मैदान नमुनेदार मानले जाते. वर्षभर विविध खेळांच्या स्पर्धांनी मुंबई शहर गजबजलेले असते.

जिजामाता उद्यान व तेथील प्राणिसंग्रहालय (भायखळा), मलबार हिलवरील कमला नेहरू पार्क, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (पूर्वीचे कृष्णगिरी उपवन) तसेच मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहूची पुळण, ब्रीच कँडी ही पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश काळातील बोरीबंदर स्थानक (व्हिक्टोरिया टर्मिनस-व्ही. टी.), महानगरपालिका व सार्वजनिक डाक कार्यालय यांच्या इमारती, मुंबई विद्यापीठाची वास्तू व तीतील राजाबाई टॉवर या वास्तूंबरोबरच आधुनिक गगनचुंबी इमारतींपैकी विदेश दूरसंचार भवन, एअर इंडिया कार्यालय, उषाकिरण इ. आणि महाराष्ट्र विधानभवनाची वास्तू ह्या उल्लेखनीय आहेत. वांद्र्यांच्या टेकडीवरील माउंट मेरी चर्च, हाजी अली दर्गा तसेच मंबईच्या परिसरातील घारापुरी, कान्हेरी येथील गुंफा हीही पर्यटकांची आकर्षणे आहेत. गेटवे ऑफ इंडिया व तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा या महानगराच्या बदलत्या इतिहासाचे स्मरण करून देतात. 

संदर्भ : १. आचार्य, बा. बा. शिंगणे, मो. वि. मुंबईचा वृत्तांत, मुंबई, १९८०.

            २. माडगावकर, गो. ना. मुंबईचे वर्णन, मुंबई, १९६१.

पंडित, अविनाश


मुंबई (बृहन्मुंबई)

मुंबई (शहर)


मुंबादेवी 

सतराव्या शतकातील (१६७०) फोर्ट विभागाचे चित्र.

एकोणिसाव्या शतकातील (१८६२), चर्चगेट. कुलाबा मोसमी पूल (कॉजवे), सु. १८४०.
विद्यमान विधानभवन, मुंबई. विद्यमान विधानभवन, मुंबई.
अलेक्झांड्रा गोदीचे दृश्य, मुंबई. अशुद्ध तेलवाहक स्वयंचलित निर्वात तळ, बुचर बेट, मुंबई.