मुंक, काई : (१३ जानेवारी १८९८–४ जानेवारी १९४४). डॅनिश नाटककार. डेन्मार्कमधील मारीबो येथे जन्मला. कोपनहेगन विद्यापीठातून त्याने धर्मशास्त्र ह्या विषयाची पदवी घेतली. १९२४ पासून एका लहानशा पारिशचा (स्वतंत्र चर्च आणि धर्मोपदेशक असलेला, काउंटीचा उपविभाग) तो पास्टर झाला. विद्यार्थीदशेतच तो नाट्यलेखन करू लागला होता. हेरॉल्ड द किंग (लेखन १९२३–२४, प्रथम प्रयोग, १९२८, इं. भा. १९५३) हे त्याचे पहिले महत्त्वपूर्ण नाटक. त्यानंतर द वर्ड (लेखन १९२५, प्रथम प्रयोग, १९३२, इं. भा. १९५५), कांट (१९३१), ही सिट्स ॲट द मेल्टिंग पॉट (१९३८, इं. भा. १९४४) ह्यांसारखी नाटके त्याने लिहिली. विख्यात अस्तित्ववादी तत्त्वज्ञ सरेन किर्केगॉर आणि डॅनिश धर्मशास्त्रवेत्ता नीकोलाय फ्रीद्रिक सेव्हेरीन ग्रुंटव्हीग या दोन देशबांधवांच्या लेखनाचा आणि विचारांचा मोठा प्रभाव मुंकवर होता. ईश्वराचे सार्वभौमत्व सांगण्यासाठी त्याने नाट्यमाध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केला. ईश्वराच्या सत्तेविरुद्ध निष्फळपणे लढू पाहणारे हुकूमशहा त्याच्या नाटकांत दिसतात. ही सिट्स ॲट द मेल्टिंग पॉट मध्ये हिटलरी राजवटीतील ज्यूद्वेष हा विषय त्याने हाताळला आहे. १९४० मध्ये जर्मनांनी डेन्मार्कचा ताबा घेतल्यावर मुंक त्यांचा प्रतिकार करणाऱ्यांत सामील झाला. मुंकने अनेक प्रकारे त्यांना प्रखर विरोध केला. मुंकच्या नाट्यकृतींवर नाझींनी बंदी आणली. अखेरीस त्याला त्याच्या घराबाहेर काढून सिल्कबोर्गकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर जर्मनांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.
कुलकर्णी, अ. र.