मोलर, पाउल मार्टिन: (२१ मार्च १७९४–१३ मार्च १८३८). डॅनिश कादंबरीकार व कवी. डेन्मार्कमधील नाकस्कोव्हजवळ जन्म. कोपहेगन विद्यापीठातून त्याने धर्मशास्त्राची पदवी घेतली. साहित्यक्षेत्रातील त्याची कामगिरी प्राचीन ग्रीक महाकवी होमर ह्याच्या साहित्यकृतींच्या भाषांतराने सुरू झाली. पुढे त्याचा ठरलेला विवाह मोडल्यामुळे तो एका डॅनिश जहाजावरून धर्मोपदेशक म्हणून चीनला गेला (१८१९–२१). या प्रवासात त्याने आपल्या काही उत्तम कविता लिहिल्या. या कवितांमध्ये डेन्मार्क आणि कोपनहेगनमधील जीवनासंबंधीची ओढ आणि हुरहूर व्यक्त झाली आहे. इंग्रज कवी बायरनच्या प्रभावाखाली त्याने एक अपूर्ण काव्य ‘लीव्हज फ्रॉम डेथस् डायरी’ (इं. शी.) देखील लिहिलेले आहे. तथापि त्याची सर्वांत प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे विद्यार्थिजीवनावर त्याने लिहिलेली पण अपूर्ण राहिलेली मनोविश्लेषणात्मक कादंबरी ‘दि ॲडव्हेंचर्स ऑफ डॅनिश स्ट्यूडंट’ (१८२४, इं. शी.) ही होय. समकालीन जीवन व घटनांची दखल घेणारी डॅनिश साहित्यातील ही पहिलीच कादंबरी. त्यामुळे डॅनिश साहित्याच्या इतिहासात ही कादंबरी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. ‘जीवनाशी संबंधित नसलेली कविता खोटी असते’ हा त्याचा वास्तववादी दृष्टिकोण त्याच्या सर्वच लेखनात दिसून येतो. यांखेरीज मोलरने तात्त्विक स्वरूपाचे निबंधही लिहिले आहेत. क्रिस्तियानिया (सध्याचे ऑस्लो) विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून त्याने १८२६ ते १८२८ या काळात काम केले. पुढे १८३१ पासून तो कोपहनहेगन येथे तत्त्वज्ञानाच्या अध्यासनपदी होता. या काळात विख्यात अस्तित्ववादी तत्त्वज्ञ सरेन किर्केगॉर हा त्याचा विद्यार्थी होता. मोलर कोपनहेगन येथेच निधन पावला.

कळमकर, य. शं.