मीठ : अन्नाला रुची यावी व खाद्यपदार्थाचा स्वाद वाढावा यांसाठी प्राचीन काळापासून मनुष्य वापरीत असलेला व प्राण्यांच्या आरोग्यास आवश्यक असलेला एक सुपरिचित पदार्थ. रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात. सोडियम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक अम्ल यांमध्ये रासायनिक विक्रिया होऊन बनणारे हे एक ⇨ लवण आहे. लवण वर्गातील हे एक सामान्य लवण असल्यामुळे याला इंग्रजीत ‘कॉमन सॉल्ट’ (सामान्य लवण) असेही म्हणतात. रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे. खनिजयुक्त झरे, खारी सरोवरे, समुद्राचे पाणी यांत विरघळलेल्या स्वरूपात, तसेच सैंधव या खनिज निक्षेपाच्या (साठ्याच्या) रूपात मीठ निसर्गात आढळते. [→ सैंधव सैंधवी घुमट].
गुणधर्म : शुद्ध मिठाचे स्फटिक बनतात. ते वर्णहीन व घनाकृती असतात. त्यामधून साधा दृश्य प्रकाश व जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) ही पार जाऊ शकतात. याची कठिनता २·५ मोस [→ कठिनता] विशिष्ट गुरूत्व २·१ ते २·६ प्रणमनांक (प्रकाशाचा निर्वातातील वेग व त्याचा माध्यमातील वेग यांचे गुणोत्तर) १·५५४ वितळबिंदू ८००°·८ से. उकळबिंदू १,४१३° से. व द्रवीभवनाची सुप्त उष्णता (१ ग्रॅ. घन अवस्थेतील पदार्थाचे द्रव अवस्थेत रूपांतर करण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता) १२३·५९ कॅलरी/ग्रॅ. आहे. मीठ थंड पाण्यात सहज विरघळते २०° से. तापमानास वजनी १०० भाग पाण्यात त्याची विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) ३५·८ भाग व १००° से. तापमानास ३९·२ भाग आहे. मिठाचा संतृप्त (कमाल प्रमाण असलेला) विद्राव १०८°·७ से. तापमानास उकळतो संतृप्त विद्रावाचे तापमान ०° से. तापमानाच्या खाली नेले असता NaCl·2H2O या संघटनाचे स्फटिक बनतात. बर्फामध्ये मीठ मिसळले असता बर्फाचा वितळबिंदू खाली जातो त्यामुळे शीतकारी गोठण मिश्रणात ते वापरतात. सुमारे २३% मीठ वापरल्यास तापमान −२१° से. इतके खाली जाते. [→ सोडियम].
इतिहास : भटके जीवन सोडून शेतीवर उपजीविका करू लागल्यापासून मनुष्य मिठाचा वापर करू लागला असावा. मीठ व सुगंधी पदार्थ यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या निमित्ताने दळणवळणाचे कित्येक मार्ग प्राचीन काळी अस्तित्वात आले. सूर्याच्या उष्णतेने अथवा इंधनाच्या उष्णतेने समुद्राचे पाणी आटवून मीठ तयार करण्याची कृती प्राचीन काळापासून माहीत आहे. भारतात वैदिक काळापासून या प्रकारे मीठ बनवीत. सुमारे ५००० वर्षांपूर्वी काही वनस्पती जाळून त्यांच्या राखेपासून मीठ तयार केल्याचे उल्लेख चिनी ग्रंथांत आढळतात. खाणीतून मीठ (सैंधव) खणून काढण्याचा उद्योग प्रथम ब्राँझ युगात (इ. स. पू. १४०० वर्षे) अस्तित्वात आला. भारतात अलेक्झांडर यांच्या स्वारीपूर्वी (इ. स. पू. सु. ३२७) खाणीतून मीठ काढीत असत. प्राचीन काळी ॲबिसिनिया, आफ्रिकेतील काही प्रांत व तिबेट येथे मिठाचा उपयोग चलन म्हणून केला जात असे. रोमन सैनिकांना वेतनाचा काही भाग मिठाच्या रूपाने दिला जाई. इंग्रजीतील ‘सॅलरी’ हा वेतनवाचक शब्द सॉल्ट (मीठ) यावरून आलेला आहे. भारतात सांभर सरोवरापासून मीठ मिळविण्याचा उद्योग इ. स. सहाव्या शतकात सुरू झाला.
मिठाचे उत्पादन व पुरवठा यांवर सरकारी नियंत्रण मौर्यांच्या काळी (इ. स. पू. ३३०) प्रथम आले असावे. त्या काळी उत्पादनाचा काही भाग सरकारला देऊन अथवा ठराविक रक्कम भरून मिठाच्या उत्पादनाचा परवाना मिळवावा लागे. मोगलांचा अंमल असताना मिठाच्या उत्पादनावर सरकारी कर द्यावा लागे परंतु मिठाचा व्यापार मात्र काही मक्तेदारांच्या हाती असे.
मराठ्यांच्या अमदानीतही मिठापासून कररूपाने सरकारास पैसा मिळत असे. ब्रिटिश अंमलाच्या सुरूवातीस मीठ इंग्लंडातून आयात केले जाई. त्यानंतर आयात थांबली, तरी मिठाचे उत्पादन व वितरण ब्रिटिशांच्या हाती होते. मिठाचे उत्पादन देशात होऊ लागावे या दृष्टीने १९२० मध्ये प्रयत्न सुरू झाले आणि १९२६ मध्ये बंगालचा किनारा व इतर काही ठिकाणी मर्यादित प्रमाणावर मीठ उत्पादन करण्याचे परवाने देण्यात आले. १९२७ मध्ये सौराष्ट्रात द्वारकेजवळ मीठापूर येथे मीठ उत्पादनास सुरूवात झाली. मीठ उत्पादनासाठी शुल्क भरून परवाना घ्यावा लागे व सर्व उत्पादन सरकारास ठराविक भावाने विकावे लागे. सरकार त्यावर अबकारी कर व इतर खर्च लादून ते घाऊक व्यापाऱ्यांना विकीत असे. काही कालाने या पद्धतीत बदल करण्यात आला आणि परवाना-धारकांना अबकारी कर भरल्यावर मीठ थेट ग्राहकाला येऊ लागले. मिठाच्या उत्पादनावर असलेल्या या निर्बंधामुळे भारतीय उद्योगाची वाढ खुंटली होती म्हणून १९३० मध्ये मिठावरील कर रद्द करण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जनतेने उठाव केला (दांडी यात्रा). त्याची परिणती १९३१ मधील गांधी-आयर्विन करारामध्ये झाली. या करारान्वये मीठ उत्पादनास अनुकूल परिस्थिती असलेल्या खेड्यांना मीठ तयार करण्याची मुभा देण्यात आली. त्याच वर्षी एडनशिवाय इतर ठिकाणांहून भारतात आयात होणाऱ्या मिठावर कर बसवून स्वदेशी उद्योगास संरक्षण देण्याचे धोरण आखण्यात आले. त्याचा चांगला परिणाम होऊन मीठ उत्पादनात वाढ होऊ लागली. उत्तरोत्तर या धंद्यास अनेक सवलतीही देण्यात आल्या. १९३९ मध्ये मीठापूर येथे टाटा केमिकल्स कंपनीने मीठ व इतर सागरी रसायनांच्या उत्पादनास सुरुवात केली. १९५० च्या आसपास पूर्व किनाऱ्यावरील तुतिकोरिन, नागरकोईल (तमिळनाडू) येथेही मीठ उत्पादन होऊ लागले.
मीठ उद्योगाची पाहणी करण्यासाठी शासनाने मीठ विशेषज्ञांची एक समिती नेमली होती. तिच्या शिफारसीनुसार मीठ व सागरी रसायने यांचे उत्पादन वाढावे आणि त्यांचा दर्जाही सुधारावा या दृष्टीने संशोधन करण्यासाठी १९५४ मध्ये सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूटची भावनगर येथे स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे मीठ-उत्पादक, राज्य शासने, शासकीय मीठ खाते व मिठावर आधारलेले उद्योगधंदे यांचे सहकार्य शासनाने घडवून आणले. त्यामुळे मीठ उत्पादनात बरीच प्रगती झाली आहे. आता भारत स्वतःची गरज भागवून मीठ निर्यातही करू लागला आहे.
उपयोग : आहारात, औषधोपचारात व उद्योगधंद्यात असा तीन प्रकारे मिठाचा मनुष्यास उपयोग होतो. आपल्या शरीरातील विविध द्रवांत आणि कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) कमीजास्त प्रमाणात मीठ असते. शरीरातील अम्ल व क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे संयुग) यांच्यामधील संतुलन, कोशिकांची पारगम्यता(कोशिकावरणांतून विविध द्रव्ये पार जाऊ देण्याची क्षमता), जल समतोल, तंत्रिकांची (मज्जातंतूंची) संवेदनक्षमता व तर्षण दाब [ → तर्षण] यांचे नियंत्रण करण्यासाठी मीठ आवश्यक असते. अन्नपचनासाठी लागणाऱ्या हायड्रोक्लोरिक अम्लाची जठरात निर्मिती व्हावी यासाठी मीठ लागते. मूत्र व घाम यांमधून काही प्रमाणात मीठ बाहेर टाकले जाते आणि त्याची भरपाई करण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात मीठ असावे लागते. दररोज आहारात मनुष्य किती मीठ घेईल हे व्यक्तीची खाण्याची सवय व सभोवारची परिस्थिती यांवर अवलंबून असते. सामान्यतः मनुष्यास दररोज ५ ते १० ग्रॅ. मीठ पुरते आणि तेवढेच स्वयंपाकातील भाजीपाला व इतर खाद्यपदार्थ यांतून त्याला मिळते. उष्ण हवामानात घाम जास्त येत असल्यामुळे विशेषतः शारीरिक श्रम करणाऱ्या यापेक्षा जास्त मीठ खावे लागते. अतिशय घाम आल्यास, पुनःपुन्हा उलट्या झाल्यास, दीर्घकाळ अतिसाराची बाधा झाल्यास, भाजल्यास व मूत्रवर्धक औषध अनेक दिवस घेत राहिल्यास मिठाची गरज वाढू शकते. मिठाच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, शिसारी, अग्निमांद्य, स्नायूंची दुर्बलता व काही व्यक्तींत मानसिक गोंधळ संभवतो. शरीरात सोडियम आयनांचे (विद्युत् भारित अणूंचे) प्रमाण वाजवीपेक्षा जास्त झाल्यास शरीर पाणी साठवू लागते व त्यामुळे ⇨ शोफ होतो (शरीराला सूज येते). मीठ जास्त खाल्ल्याने रक्तदाबाचा विकारही बळावतो म्हणून शोफाची व रक्तदाबाची व्याधी असणाऱ्या व्यक्तींना मिठाच्या सेवनाचे नियंत्रण करावे लागते.
आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच अमेरिकन जनतेत रक्तदाबाचा प्रादुर्भाव झाला आहे, असा प्रचार अलीकडे करण्यात आला होता. काही आदिवासी लोकांच्या आहारात मीठ कमी असल्यामुळे रक्तदाबाची बाधा आढळत नाही असा पुरावाही देण्यात आला होता परंतु त्यानंतर झालेल्या संशोधनाने असे निष्पन्न झाले आहे की, आदिवासी जमातीत रक्तदाबाची बाधा कमी प्रमाणात असते कारण त्यांमध्ये लठ्ठपणा नसतो हे आहे. कारण लठ्ठपणा व रक्तदाब यांचा फार निकट संबंध असतो, हे सिद्ध झालेले आहे. रक्तदाबाचा विकार असणाऱ्या काही व्यक्तींमध्ये रेनीन या एंझाइमाचे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करण्याऱ्या प्रथिनाचे) प्रमाण जास्त असते अशा रोग्यांनाच फक्त मीठ कमी करण्याची आवश्यकता असे पण असे रोगी सु. ३० टक्केच असतात म्हणून लठ्ठपणा कमी करण्यासाठी रक्तदाबाची व्यथा असणाऱ्यांनी कमी कॅलरी असलेला आहार घेणे हे महत्त्वाचे आहे. मीठ कमी करण्याची गरज नाही.
मिठासारखी चव असणाऱ्या व मिठाऐवजी वापरता येण्याची शक्यता असलेल्या ऑर्निथिलटॉरीन व तीन इतर संयुगांचे संश्लेषण (कृत्रिम रीतीने घटक एकत्र आणून संयुग बनविण्याची क्रिया) हीरोशीमा विद्यापीठातील तीन जपानी शास्त्रज्ञांनी केलेले आहे. या संयुगांत सोडियम नाही व ती पेप्टाइडे आहेत. ऑर्निथिलटॉरीन नेहमीच्या मिठापेक्षा दुप्पट खारट आहे. सध्या मिठाऐवजी वापरात असलेल्या पोटॅशियम क्लोराइडाची मागाहून राहणारी कडू चव या संयुगांच्या बाबतीत राहत नाही. रक्तदाबाधिक्य व इतर विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या दृष्टीने ही संयुगे आशादायक वाटत असली, तरी ही संयुगे आहारात वापरणे कितपत बिनधोक आहे व त्यांचा चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) कसा होतो, यासंबंधीच्या चाचण्या अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत.
ब्रोमाइडे, आयोडाइडे, फिनॉल व मर्क्यूरिक लवणे यांमुळे विषबाधा झाल्यास उपचारात मीठ वापरतात. मुरगळणे, ठेचकाळणे यांसारख्या दुखापतीस मिठाचा संतृप्त विद्राव शेक देण्यासाठी वापरतात. अतिसारासारख्या रोगात शरीरातील पाणी व त्याबरोबरच मीठ जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते म्हणून त्याची भरपाई करण्यासाठी रक्ताइतकाच तर्षण दाब असेल अशा विशिष्ट संहतीचा मिठाचा विद्राव शिरेतून शरीरात भरतात. त्यात सु. ०·८३% मीठ असते.
मानवाच्या व प्राण्यांच्या बऱ्याच रोगांत मीठ व मिठाचा पाण्यातील विद्राव औषध म्हणून फार प्राचीन काळापासून उपयोग करण्यात येतो. यासाठी मीठ तसेच वा इतर अन्य पदार्थांबरोबर वापरले जाते. बाह्य रोगांवर १–२% मीठ वा विद्राव प्रक्षालक (पृष्ठभाग साफ करणारा पदार्थ), ५% पर्यंत शामक व शीतक म्हणून, तर ५% व त्याहून जास्त प्रमाण असलेला मीठ विद्राव पूतिरोधक (पू होण्यास विरोध करणारा पदार्थ) म्हणून वापरतात. पोटात घेतल्यास मिठाची सौम्य मात्रा वायुहर, पाचक व पौष्टिक मध्यम मात्रा रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारी) इ. आणि उच्च मात्रा वांतिकारक व कृमिनाशक असते. जलविद्राव्य मीठ बस्ती, गुळणी, डुश (त्वचा वा योनिमार्ग, गर्भाशय आदी धुण्याची क्रिया) इत्यादींसाठीही वापरतात. गरम केलेले मीठ मुरगळणे, ठेचकाळणे यांसारख्या दुखापतींत दुखऱ्या भागावर लावल्यास तेथील वेदना थांबतात, तर सुजलेले सांधे इत्यादींवर लावल्यास सूज कमी होते. मीठ जखमेवर पिस्कारल्यास ते जखमेतील पाणी काढून टाकते व जखम लवकर बरी होण्यास मदत करते. सर्व प्रकारचे त्वचारोग, डोकेदुखी, नाक फुटणे व नेत्ररोगांवर मीठ उपयुक्त आहे. कार्बन मोनॉक्साइड, सिल्व्हर नायट्रेट, फिनॉल, ब्रोमीन, पारा आदी विषांवर उतारा म्हणून मीठ वापरले जाते. साखर वा मॅग्नेशियम सल्फेट यांबरोबर मीठ वापरल्यास जखमा बऱ्या होतात. मीठ आणि मॅग्नेशियम सल्फेट हे मिश्रण पोटात घेतल्यास त्याचा रेचक म्हणून उपयोग होतो. मीठ व ५% बाभळीचा डिंक यांचा उपयोग बेशुद्धी व झटके यांवर करतात. आयुर्वेदीय उपचारात मीठ अजवान, हिंग, नारळ इत्यादींबरोबर वापरण्यात येते.
अनेक खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी मीठ वापरले जाते उदा., लोणची, लोणी, मासे, मांस इत्यादी. काही पदार्थांची रूची वाढावी म्हणूनही उदा., फरसाण, खारे दाणे, पाव, बिस्किटे इत्यादींत मिठाचा उपयोग केला जातो.
मनुष्याप्रमाणे गुरेढोरे यांनाही मिठाची गरज असते.
कातडी कमावण्यासाठी आणि अनेक उद्योगधंद्यांत प्रशीतनासाठी मिठाचा उपयोग केला जातो. चिनी मातीच्या भांड्यांना झिलई येण्यासाठी आणि एनॅमल-वस्तू करण्याच्या धंद्यात मीठ वापरले जाते. आयन-विनिमयाने अफेनद पाणी फेनद बनविताना वापरलेल्या आयन-विनिमयक रेझिनाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मीठ वापरतात [ → आयन-विनिमय]. याशिवाय वस्त्रोद्योगात व कागद-लगदा उत्पादनात, धातु-उद्योगात अभिवाह (धातू वा धातुक-कच्च्या रूपातील धातू-वितळविताना तयार होणाऱ्या द्रवाचा पातळपणा वाढविण्यासाठी व मलद्रव्ये त्याच्यातून धातुमळीच्या रूपात निघून जावी म्हणून त्यात टाकण्यात येणारा पदार्थ) म्हणून आणि खनिज तेल प्राप्तीसाठी छिद्रण करताना वापरावयाच्या पंक-मिश्रणात (चिखलमिश्रणात) तसेच शास्त्रीय उपकरणात सोडियम-प्रकाश मिळावा यासाठी मिठाचा वापर केला जातो.
अनेक औद्योगिक रसायनांची निर्मिती मिठापासून सुरू होते. सोडियम धातू, धुण्याचा व खाण्याचा सोडा, दाहक (कॉस्टिक) सोडा, क्लोरीन, डायड्रोक्लोरिक अम्ल व विरंजक (रंग घालविण्यासाठी वापरण्यात येणारे) चूर्ण ही त्यांपैकी महत्त्वाची रसायने होत.
उत्पादन पद्धती : समुद्राच्या पाण्याचे किंवा खाऱ्या जलाशयाच्या अथवा झऱ्याच्या खाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन करून, तसेच सैंधवाच्या खाणीतून खणून काढून मिठाचे उत्पादन केले जाते. काही देशांत गाळाच्या खडकांमध्ये मीठ सैंधवाच्या रूपाने आढळते. ते स्फटिकी, कणिदार किंवा शिलाखडांसारख्या घनरूपात असते. उथळ खाणीमधील सैंधव इतर खनिजांच्या खाणीप्रमाणे सुरूंग लावून सुटे करून वाहक पट्ट्याच्या साहाय्याने किंवा गाड्यावर लादून बाहेर काढले जाते. खाण खोल असेल, तर खोदकाम इतर खनिजांच्या खोल खाणींप्रमाणेच करतात. फार खोलवर असलेल्या खाणीतील मीठ मिळविण्यासाठी मिठाच्या थरापर्यंत छिद्रण करून त्यात समकेंद्री नळ (एकात एक बसणारे दोन नळ) बसवितात व त्यांतून पाणी आत सोडतात. सैंधव पाण्यात विरघळून जे खारे पाणी बनते ते पंपाने वर काढतात. त्याचे बाष्पीभवन केले म्हणजे मीठ मिळते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, अर्जेंटिना, मेक्सिको, चीन व रशिया या देशांत सैंधवाच्या खाणी आहेत. भारतात मंडीजवळ (हिमाचल प्रदेश) काही सैंधव खाणी आहेत पण त्यांचे उत्पादन फार थोडे आहे.
जागतिक मीठ उत्पादन मुख्यतः भूमीवरील खाऱ्या पाण्याच्या साठ्यांपासून होते असे उल्लेखनीय साठे म्हणजे मृत समुद्र (जॉर्डन व इझ्राएल यांच्या दरम्यान असलेले खारे सरोवर), अमेरिकेतील उटा राज्यातील ग्रेट सॉल्ट लेक, ब्रिटनमधील खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत. भारतातील असे साठे म्हणजे सांभर सरोवर, डिडवाना व पाचभद्रा येथील खाऱ्या पाण्याच्या विहिरी आणि तमिळनाडूमधील वेदारण्यम् व आदिरामपटनम् येथील खाऱ्या पाण्याचे जलाशय होत.
समुद्राच्या पाण्यापासून मिळविलेल्या मिठाचा क्रमांक जागतिक उत्पादनात शेवटचा लागतो. भारतात मात्र एकंदर उत्पादनापैकी सु. ७५%मीठ उत्पादन समुद्राच्या पाण्यापासून होते. बाष्पीभवन करण्यासाठी जेथे शक्य असेल तेथे सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करतात. इतरत्र इंधन जाळून बाष्पीभवन घडवितात.
सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन करण्याची पद्धत : समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविण्यासाठी अनुकूल हवामान आणि विस्तीर्ण व पाणी झिरपणार नाही अशी जमीन यांची आवश्यकता असते. कोरडी हवा व कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात मीठ पिकविणे सोपे असते. मिठागरात बांध घालून खाचरे बनविलेली असतात. त्यांतील काही खाचरांत भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत घेऊन साठवितात. अशा खाचराला ‘खजिना’ म्हणतात. त्यातील पाणी नंतर ‘तापवणी’ नामक खाचरात घेऊन त्याची घनता सु. १०° बाऊमे होईपर्यंत त्याचे बाष्पीभवन होऊ देतात. त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट व कॅल्शियम सल्फेट ही लवणे बाहेर पडतात. त्यानंतर पाणी ‘कोंडी’ नावाच्या खाचरात सोडतात व तेथे त्याची घनता २४° बाऊमे होईपर्यंत त्याचे बाष्पीभवन चालू देतात. यामुळे मिठाचा संतृप्त विद्राव बनून मीठ बाहेर पडू लागते. सु. ७७% मीठ बाहेर पडले म्हणजे ते काढून घेतात आणि उरलेला विद्राव (रेच) कोंडीतून बाहेर टाकतात. त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड इ. अनेक उपयुक्त सागरी लवणे असतात. ती काढून घेण्यासाठी रेच वापरतात [ → सागरी रसायने].
काही ठिकाणी खारे पाणी मिठागराच्या जमिनीत झिरपल्याने उत्पादनात तूट येते. यावर उपाय म्हणून तमिळनाडूत ध्रांगध्रा केमिकल वर्क्सने ४७·७ हे. क्षेत्राला पॉलिथिनाच्या तक्त्यांचे अस्तर लावण्याचा प्रयोग केला तेव्हा मिठाचे उत्पादन एका वर्षात ३८,००० टनांवरून ५७,५०० टनांवर गेले. मात्र यासाठी होणारा खर्च कितपत परवडतो याचा अभ्यास झालेला नाही.
सरोवरातील अथवा खाऱ्या पाण्याच्या विहिरीतील पाण्यापासून मीठ काढण्याची कृती वरीलप्रमाणेच आहे. काही खाऱ्या पाण्यात मॅग्नेशियमची लवणे नसतात. उदा., सांभर सरोवराच्या पाण्यात मॅग्नेशियमाची लवणे नाहीत पण सोडियम सल्फेट व सोडियम कार्बोनेट यांचे अंश मोठ्या प्रमाणात आहेत.
इंधनाच्या उष्णतेने बाष्पीभवन करण्याच्या पद्धती : इंधनाच्या उष्णतेने मीठ उत्पादन करण्यासाठी पुढील पद्धती वापरल्या जातात.
उघड्या काहिलीची पद्धत : खारे पाणी पोलादाच्या उघड्या काहिलींमध्ये घेऊन ते दगडी कोळसा, लाकूड अथवा ज्वलनशील वायू वापरण्याच्या भट्टीच्या योगाने तापवितात. बारीक मीठ हवे असेल, तर खाऱ्या पाण्याच्या उकळबिंदूइतके तापमान ठेवतात व मीठ जसजसे बाहेर पडेल तसतसे काढून घेतात. जाडे मीठ बनविण्यासाठी तापमान यापेक्षा कमी ठेवून जमणारे मीठ आठवड्यांतून एकदाच वेगळे करतात. चीन व जपानमध्ये ही पद्धत वापरली जाते.
कणीकारक काहिलीची पद्धत: या पद्धतीत वापरण्याच्या टाकीमध्ये (काहिलीमध्ये) बुडापासून काही सेंमी. वर नळ्यांची वेटोळी बसविलेली असून त्यांतून वाफ सोडून उष्णता देण्याची व्यवस्था असते. टाकीमध्ये खारे पाणी घेऊन बाष्पीभवन होऊ दिले म्हणजे प्रथम तयार झालेले स्फटिक विद्रावावर तरंगतात व नंतर त्याखाली त्यांची पोकळ स्तूपाकृती वाढ होऊ लागते व अखेर स्फटिक तळाशी बसतात. तेथून ते यांत्रिक पद्धतीने मधून मधून काढून घेतले जातात.
निर्वांत काहिलीची पद्धत : या पद्धतीत खारे पाणी त्रिविध परिणामी बाष्पनपात्रामध्ये [→ बाष्पीकरण] वाफ खेळविलेल्या नळ्यांच्या योगाने निर्वात स्थितीत तापविले जाते. लवण स्फटिक काहिलीच्या खालच्या भागात जमतात, ते काढून घेतात व निर्वात गाळण पद्धतीने वेगळे केल्यावर वड्यांच्या रूपाने मिळतात. ते १७५° से. तापमानास तापवून वाळवितात. नंतर ते क्रमाक्रमाने छिद्रे लहान होत जाणाऱ्या चाळण्यांतून चाळून त्यांचे रवाळ मीठ, भोजन-मीठ (टेबल सॉल्ट) व स्वाद मीठ असे प्रकार वेगळे काढतात.
ऑलबर्जर पद्धत : याकरिता वापरावयाच्या उपकरणात मिठाच्या विद्रावावरील दाब क्रमाक्रमाने वाढवीत शेवटी तापमान १४३° से. होईल इतका वाढवितात व नंतर तो क्रमशः कमी करीत वातावरणाच्या दाबाइतका खाली आणतात. स्फटिकीभवन होऊ लागल्यावर विद्राव उघड्या काहिलींमध्ये घेऊन जास्त स्फटिकीकरण होऊ देतात व केंद्रोत्सारण पद्धतीने [ → केंद्रोत्सारण] मीठ वेगळे काढून कोरडे करतात. या पद्धतीने मीठ घनाकृती स्फटिक व पत्री यांच्या रूपांत मिळते.
प्रथम खारे पाणी गोठविणे व बनलेले बर्फ वेगळे काढल्यावर उरलेल्या संहत विद्रावाचे बाष्पीभवन करणे अशीही मीठ मिळविण्याची एक पद्धत आहे.
शुद्धीकरण : सूर्याच्या उष्णतेने बनविलेल्या सागरी मिठात माती, वाळूचे सूक्ष्म कण, मॅग्नेशियम व कॅल्शियम सल्फेटे आणि मॅग्नेशियम व पोटॅशियम क्लोराइडे यांची आणि सांभर सरोवरातील पाण्यापासून बनविलेल्या मिठात सोडियमाचे कार्बोनेट, बायकार्बोनेट व सल्फेट या पदार्थांची अशुद्धी असते. निरनिराळ्या उपयोगांसाठी लागणारे मीठ वेगवेगळ्या प्रकारांनी शुद्ध करून घ्यावे लागते.
मिठाच्या संहत विद्रावाने धुतल्यास अशुद्ध मीठ बरेच सुधारते. त्यासाठी चूर्ण केलेले अशुद्ध मीठ प्रथम अशा संहत विद्रावाबरोबर ढवळून नंतर साध्या पाण्याने धुतात. अविद्राव्य पदार्थ व मॅग्नेशियमची लवणे यामुळे निघून जातात परंतु कॅल्शियम सल्फेट तसेच राहते. ज्या ठिकाणी तेही दूर करावयाचे असेल तेथे मिठाच्या संहत विद्रावाने अशुद्ध मीठ धुतल्यावर ते प्रथम सोडियम हायड्रॉक्साइड व कॅल्शियम ऑक्साइड यांच्या किंवा सोडियम हायड्रॉक्साइड व सोडियम कार्बोनेट याच्या विद्रावांबरोबर मिसळतात आणि शेवटी बेरियम क्लोराइड वापरून कॅल्शियम सल्फेटरहित मीठ मिळवितात.
भावनगर येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूटने मिठाच्या उत्पादनाची व शुद्धीकरणाची एक साधी व स्वस्त प्रक्रिया बसविली आहे. तीमध्ये प्रथम मिठाचा संतृप्त विद्राव बारीक वाळूच्या थरातून गाळून काढतात. यामुळे त्यातील संधारित (लोंबकळणारे) अविद्राव्य पदार्थ दूर होतात. त्यानंतर तो विद्राव स्फटिकीकरण काहिलीत नेतात. या काहिलीच्या आतील बाजूंना पॉलिथीन अथवा तत्सम पदार्थाचे तक्ते लावलेले असतात. तेथे सूर्याच्या उष्णतेने मिठाचे स्फटिकीकरण होऊ लागते. मिठाबरोबर कॅल्शियम सल्फेटही अवक्षेपित (अविद्राव्य साख्याच्या रूपात अलग होणे) होऊ नये यासाठी विद्राव मिठाने अतितृप्त होण्याच्या मर्यादेपेक्षाही पलीकडे गेलेल्या अवस्थेत असताना काहिलीत भरतात. त्यानंतर मीठ केंद्रोत्सारण यंत्राने वेगळे काढून विद्रावाइतक्याच पाण्याने धुवून काढतात. या पद्धतीने ९९·३% शुद्ध मीठ मिळते.
कोष्टक क्र. १. काही प्रमुख देशांचे मिठाचे उत्पादन (१९८०). |
|
देश |
उत्पादन (हजार टनांत) |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
३६,६०७ |
ऑस्ट्रेलिया |
५,३३५ |
इझ्राएल |
३,९९७ |
कॅनडा |
७,०२९ |
चीन |
१७,२८० |
जपान |
१,११२ |
नेदर्लंड्स |
३,४६४ |
प. जर्मनी |
१२,६५५ |
पू. जर्मनी |
३,१२८ |
पोलंड |
४,५३३ |
फ्रान्स |
७,१०३ |
ब्राझील |
२,९९४ |
ब्रिटन |
६,५८६ |
भारत |
८,००४ |
मेक्सिको |
५,९८७ |
रशिया |
१४,६०६ |
रूमानिया |
५,०३६ |
स्पेन |
३,५०९ |
जागतिक उत्पादन : १९८० मध्ये मिठाचे एकूण जागतिक उत्पादन १६,४७,२८,००० टन झाले होते. त्यातील काही प्रमुख देशांचे उत्पादन कोष्टक क्र.१ मध्ये दिले आहे.
भारतीय उद्योग : बाष्पीभवनास अनुकूल हवामान व पाणी न झिरपणारी जमीन उपलब्ध असल्यामुळे भारतीय मीठ उत्पादनाचा सु. ७५% भाग मिठागरात समुद्राच्या पाण्याचे अथवा खाऱ्या सरोवरांच्या व विहिरींच्या पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन करून केले जाते.
सौराष्ट्र व कच्छच्या किनाऱ्यावर मोठी मिठागरे असून त्यांपासून एकूण भारतीय उत्पादनाच्या सु.५२% उत्पादन होते. त्यानंतर तमिळनाडूचा (सु.१५%) क्रमांक लागतो. १९८० सालचे मिठाचे राज्यवार उत्पादन कोष्टक क्र.२ मध्ये दिले आहे.
कोष्टक क्र. २. भारतातील विविध राज्यांतील मिठाचे उत्पादन (१९८०). |
|
राज्य |
उत्पादन (टनांत) |
गुजरात |
४३,१२,९०० |
तमिळनाडू |
१६,०२,००० |
राजस्थान |
९,३७,२०० |
महाराष्ट्र |
४,९४,५०० |
आंध्र प्रदेश |
४,०४,२०० |
ओरिसा |
१,१८,००० |
गोवा, दमण व दीव |
१५,७०० |
कर्नाटक |
१४,९०० |
प. बंगाल |
१२,७०० |
हिमाचल प्रदेश |
४,७०० |
पाँडिचेरी |
३०० |
महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या महिन्यांत किनारपट्टीवर सु.२०० ते २५० सेंमी. पाऊस पडतो व तापमान २६–२९° से. आणि आर्द्रता ६०–७०% असल्यामुळे परिस्थिती मीठ उत्पादनास फारशी अनुकूल नाही. वसई, भाइंदर, उरण, पेण, भांडूप व शिरोडा येथे मिठागरे आहेत. येथे लहान लहान जमिनीच्या तुकड्यांवर उत्पादन केले जाते. कोकण किनाऱ्यावर जोराचा पाऊस असल्यामुळे व मिठागरांसाठी सोयीची जमीन नसल्यामुळे तेथे मिठाचे उत्पादन करणे महाग पडते. मुंबई शहराची वाढ अनिर्बंध होत असल्याने मुंबईजवळची काही मिठागरे बंद पडली आहेत व आणखीही काही बंद करावी लागतील. गुजरातमधून येणारे मीठ जास्त शुद्ध असून स्वस्त पडते.
मीठ उद्योगाखाली भारतात १९८२ मध्ये सु. ७५,५१८ हेक्टर जमीन होती. ४ हेक्टरांखालील १·७२%, ४ ते ४० हेक्टर १०·७३%, ४० हेक्टरांपेक्षा जास्त ७९·०२% व सहकारी विभागात ८·५३% अशी तिची वर्गवारी करण्यात आलेली होती. १९८२ मधील एकूण मीठ उत्पादनापैकी समुद्रापासून ७३·२८%, देशांतर्गत जलविभागापासून २४·३३%, खाऱ्या तलावापासून २·३३% व खनिज मीठ ०·०६% असे उत्पादन झाले. हे उत्पादन सार्वजनिक क्षेत्रातून ६·९९%, खाजगी क्षेत्रातून ६४·०४%, सहकारी क्षेत्रातून १०·३८% व विना परवाना क्षेत्रातून १८·५९% झाले. भारतातील गुजरात (क्षेत्र ५३·३१%, उत्पादन ५१·३३%), तमिळनाडू (१६·८६%, २५·१६%), राजस्थान (४·४५%, १०·१७%), महाराष्ट्र (११·४१%, ५·९८%)व आंध्र प्रदेश (८·२७%, ५·३०%) ही पाच राज्ये देशाच्या उत्पादनापैकी ९७.९४% उत्पादन करतात व या राज्यांतील क्षेत्र ९४·३२% आहे.
मिठाचा धंदा बहुतांशी खाजगी मालकीचा आहे मीठाचे उत्पादन या धंद्याशी परंपरागत निगडित असलेल्या कामगारांच्या हातात आहे. हे कामगार मिठाच्या मोसमात मिठागरावर व पावसाळ्यात आपल्या शेतावर काम करतात. १९८२ मध्ये भारतात ५०० हून अधिक मीठ उत्पादक केंद्रे होती व त्यात सु. २१,००० कामगार होते.
मिठाचे उत्पादन दहा एकरांपेक्षा जास्त क्षेत्रात करावयाचे असेल, तर सरकारच्या मीठ खात्याकडून परवाना मिळवावा लागतो व विक्री करताना ४० किग्रॅ. वर ७ ते १४ पैसे पर्यंत उपकर भरावा लागतो. दहा एकरांपर्यंत क्षेत्र असल्यास कर माफी आहे किंवा सहकारी तत्त्वावर उत्पादन करणाऱ्या मिठागरांतील भागीदारांचे व्यक्तिगत क्षेत्र प्रत्येक १० एकरांपर्यंत असले तरी हा उपकर भरावा लागत नाही.
देशांतर्गत मिठाचे वाटप भारत सरकारच्या रेल्वे खात्याने व मीठ खात्याने तयार केलेल्या विभागीय पद्धतीने होते. मीठ उत्पादन केंद्रावरील किंमत क्विंटलला रू.१ पासून रू. ४ पर्यंत आहे. मंडीच्या मिठाची (सैंधवाची) किंमत बरीच जास्त म्हणजे क्विंटलला रू. ७ ते १२ आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मिठाची आयात करावी लागत असे. १९५४ पर्यंत ही आयात होत होती व त्यानंतर ती पूर्णपणे बंद झाली. १९५१ नंतर भारतातून मिठाची निर्यात होऊ लागली. ही निर्यात प्रामुख्याने जपान व अतिपूर्वेकडील देश, श्रीलंका, नेपाळ, आफ्रिकेतील देश, मध्य-पूर्व आशियातील देश इ. देशांना होते. कोष्टक क्र. ३ मध्ये भारतातील मिठाचे उत्पादन, आयात व निर्यात यांची आकडेवारी दिलेली आहे.
कोष्टक क्र. ३. भारतातील मिठाचे उत्पादन, आयात व निर्यात |
|||
वर्ष |
उत्पादन (हजार टनांत) |
आयात (हजार टनांत) |
निर्यात (हजार टनांत) |
१९४७ |
२,०२१·० |
३४८·० |
— |
१९५१ |
२,७४४·० |
५०·० |
११२·० |
१९६१ |
३,४८०·० |
— |
१५८·० |
१९७१ |
५,४२६·१ |
— |
३१९·० |
१९७९ |
७,०३७·० |
— |
२५०·० |
१९८० |
८,००४·० |
— |
उपलब्ध नाही |
१९८१ |
८,९२३·२ |
— |
उपलब्ध नाही |
मीठ उद्योगाच्या विकासासाठी केंद्र सरकारने भारतीय मीठ आयोग स्थापन केला आहे. त्याचे मुख्य कार्यालय जयपूर (राजस्थान) येथे आहे. मुंबई, मद्रास, अहमदाबाद व कलकत्ता येथे विभागीय कार्यालये असून पहिली तीन कार्यालये मीठ उपआयुक्त यांच्या अधिकाराखाली, तर कलकत्ता येथील विभागीय कार्यालय आणि जामनगर (गुजरात), काकिनाडा (आंध्र प्रदेश) व तुतिकोरिन (तमिळनाडू) ही उपविभागीय कार्यालये साहाय्यक मीठ आयुक्तांच्या अधिकाराखाली आहेत. यांशिवाय अधीक्षकांच्या अधिकाराखालील १३ मंडले आहेत.
भारतीय मिठाचे काही प्रकार: करकच, बरगरा, कप्पा, क्यार, पॅन, रेस्ता व वजनी ही काही भारतीय मीठांची नावे आहेत. करकच मीठ शुद्ध असून ते सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. बरगरा मीठ कच्छच्या रणातील आगरांमध्ये होते. त्याचे स्फटिक मोठे व कठीण असल्याने दूरवर पाठविण्यास हा प्रकार सोयीचा असतो. कप्पा मिठाच्या कणांचा आकार पोह्यासारखा असून ते वजनाला हलके असते. क्यार, पॅन व रेस्ता सांभर सरोवरातील पाण्यापासून होणाऱ्या मिठाला दिलेली आहेत. महाराष्ट्रात वजनी मीठ होते. ते वजनदार असून त्यात मातीचा अंश असल्याने ते अशुद्ध असते.
भारतीय मानक संस्थेने निरनिराळ्या उपयोगाकरिता वापरावयाच्या प्रकारात शुद्ध मीठ किती असले पाहिजे याची मानके (प्रमाणे) ठरविली आहेत. त्यांपैकी काही पुढे दिल्याप्रमाणे आहेत (शुद्ध मिठाची टक्केवारी कंसात दिली आहे) : भाजीपाला व फळे टिकविण्यासाठी (९९·७), लोण्यात मिसळण्यासाठी (९९·६), औषधांसाठी (९९·५), खनिज रासायनिक उद्योगधंद्यासाठी (९८), मासे टिकविण्यासाठी (९८), भोजनात वापरण्याचे सुप्रवाही (९७), खाण्यासाठी (९६), प्राण्यांकरिता चाटण्याच्या विटांच्या रूपात (८८).
आयोडीनयुक्त मीठ : ⇨ गलगंड या विकाराला प्रतिकारक म्हणून हे उपयोगी पडते. भारतात असे मीठ सांभर व खाराघोड येथे हिंदुस्थान सॉल्ट् लि. हा कारखाना व कलकत्त्यास मीठ खाते तयार करते. मिठावर पोटॅशियम आयोडेटाचा फवारा मारून ते बनविले जाते. सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूटने कॅल्शियम आयोडेटाचा वापर करणारी जास्त कार्यक्षम पद्धत अलीकडे सिद्ध केली आहे. भारतास अशा मिठाची सु ५ लक्ष टनांची दरसाल गरज असते. भारतात अशा मिठाचे उत्पादन १९७१ मध्ये ७२,३६१ टन, १९७६ मध्ये १,६२,४९३ टन व १९८० मध्ये १,९९,००० टन झाले.
लोहयुक्त मीठ: आहारात असलेल्या लोहन्यूनतेमुळे उद्भवण्याऱ्या ⇨ पांडुरोगावर उपाय म्हणून हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेने लोहयुक्त मिठाचा उपयोग सर्वत्र करावा असे सुचविले आहे. मीठ हे काही थोड्याच ठिकाणी तयार केले जाते व ते सर्वत्र वापरले जाते त्यामुळे आहारातील लोहाच्या जोडीला लोहयुक्त मीठ वापरणे सोईचे होईल. याकरिता शास्त्रज्ञांनी लोहाचा आयर्न सल्फेटाच्या स्वरूपात वापर केला, कारण शरीरातील ऊतके (पेशी समूह) त्याचे सुलभ रीतीने अभिशोषण करू शकतात तथापि फेरस सल्फेटाने मिठाचा रंग बदलत असल्याने प्रत्येक ग्रॅम मिठात ३·५ मिग्रॅ.आर्थोफॉस्फोरिक अम्ल (त्यामुळे रंगात बदल होत नाही) व ५ मिग्रॅ. सोडियम अम्ल सल्फेट (लोहाचे अभिशोषण सुधारण्याकरिता) याचा उपयोग करतात. यामुळे आठ महिनेपर्यंत रंग न बदलता मिठाची गुणवत्ता टिकून राहते. गलगंड व पांडुरोग या दोहोंनाही एकाच वेळी प्रतिकार करण्यासाठी लोह व आयोडीन यांनी युक्त असे मीठ तयार करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत.
उपपदार्थ उत्पादन: समुद्राच्या पाण्यातून मीठ काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या विद्रावात कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम ब्रोमाइड व सोडियम सल्फेट आणि पोटॅशियम लवणे असतात. ती काढून घेणेही महत्त्वाचे असते. सांभर सरोवरातील उरलेल्या विद्रावापासून सोडियम सल्फेट, सोडियम कार्बोनेट व बायकार्बोनेट ही लवणे मिळतात.
खाराघोड येथील पायोनियर मॅग्नेशिया वर्क्स हा १९१५ साली स्थापन झालेला उपपदार्थ मिळविण्याचा पहिला भारतीय कारखाना होय. त्यानंतर १९३१ मध्ये ओखा सॉल्ट वर्क्स हा कारखाना निघाला. हाच त्यानंतर टाटा केमिकल्स लि. म्हणून प्रसिद्ध झाला. मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराइड व मॅग्नेशियम क्लोराइड हे उपपदार्थ यात काढले जात, तसेच मॅग्नेशियम ब्रोमाइडापासून ब्रोमीन तयार केले जाते. त्यानंतर कांडला येथे युनायटेड सॉल्ट वर्क्स अँड इंडस्ट्रीज, जामनगरला दिग्विजयसिंगजी सॉल्ट वर्क्स व हालर सॉल्ट अँड केमिकल वर्क्स आणि आदिरामपटनम् येथे मेत्तूर केमिकल अँड इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या कारखान्यांनी कॅल्शियम सल्फेट (जिप्सम) मिळविण्यास सुरुवात केली. सिमेंट उद्योगाची वाढ झाल्यामुळे जिप्समाची मागणीही वाढली आहे आणि समुद्राच्या शेष विद्रावापासून जिप्सम मिळण्याचे आणखीही काही कारखाने सुरू झाले. कुडा येथील महालक्ष्मी सॉल्ट वर्क्स, जाफराबाद येथील काठियावाड इंडस्ट्रीज लि. व नबाब सिदी महमदखान सॉल्ट वर्क्स, साबिया येथील नवानगर सॉल्ट व केमिकल इंडस्ट्रीज, तुतिकोरीन सॉल्ट रिफायनरीज लि. व मॅन्नॅरिएट अँड सन्स हे त्यांपैकी मुख्य होत.
इ. स. १९६९ मध्ये ६४,५१९ टन जिप्सम ७,७३८ टन मॅग्नेशियम क्लोराइड ३८ टन मॅग्नेशियम सल्फेट ३,४५५ टन सोडियम सल्फेट व ४८ टन पोटॅशियम क्लोराइड मिळविले गेले.
भावनगर येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च लॅबोरेटरीने शेष विद्रावातून उपपदार्थ मिळविण्याच्या काही कार्यक्षम प्रक्रिया बसविल्या आहेत.
पहा : सागरी रसायने.
संदर्भ : 1. Aggarwal, S. C. Salt industry in India, New Delhi, 1977.
2. Bhatt, M. P. Bokil, K. K. Salt Industry in India from Fifties to Eighties, A Brief Review, Salt Research and Industry, Vol. 18 No. 1. March, 1982.
3. C. S. I. R., The Wealth of India, Industrial Products, Part VIII, New Delhi, 1971.
4. Kaufmann, D. W. Sodium Chloride, New York, 1960.
दातार, दि. श्री. केळकर, गो. रा.
“