मिलवॉकी : अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील सर्वांत मोठे शहर. मिशिगन सरोवराच्या पश्चिम काठावर मिलवॉकी, मनॉमनी व किनिक्विनिक या तीन नद्यांच्या संगमावर तसेच शिकागोच्या उत्तरेस सु. १३० किमी. वर हे वसले आहे. लोकसंख्या ६,३६,२१२ (१९८०). जागतिक निर्यातीचे हे या भागातील प्रमुख बंदर आहे. मिलवॉकी हे देशातील सर्वांत मोठे बीरनिर्मितिकेंद्र असून अमेरिकेची ‘बीर राजधानी’ म्हणून ते ओळखले जाते. अवजड यंत्रसामग्री, विजेची उपकरणे, डीझेल व गॅसोलीन एंजिने, ट्रॅक्टर, बीरनिर्मिती, मोटारसायकली, प्रशीतन उपकरणे इ. महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे हे केंद्र आहे. इंडियनांच्या भाषेत ‘मिलिओक’ (मिलिओक > मिलवॉकी) म्हणजे ‘चांगली जमीन’ असा अर्थ आहे. १६७३ मध्ये येथे प्रथम फ्रेंच मिशनरी वसाहतकार आले. १७९५ च्या सुमारास येथे फर उद्योगाचे केंद्र उभारण्यात आले. १८३८ मध्ये येथील लहानमोठ्या वसाहतींच्या एकत्रीकरणातून मिलवॉकी शहराची स्थापना झाली आणि जलवाहतुकीचे केंद्र असलेले हे शहर औद्योगिक दृष्ट्या उत्तरोत्तर विकसित होत गेले. मद्यनिर्मिती, मांस डबाबंदीकरण हे सुरुवातीचे उद्योग होते. १८४८ नंतर आलेल्या जर्मन निर्वासितांमुळे शहराचा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विकास वेगाने झाला. यादवी युद्धानंतर येथे समाजवादी नेतृत्वाखालील प्रभावी कामगार चळवळही उदयास आली. शहरात विस्कॉन्सिन व माक्वेट ही दोन विद्यापीठे, अनके महाविद्यालये, कलाशिक्षण विद्यालय इ. शैक्षणिक सुविधा आहेत. फ्रॅंक लॉइड राईट याने बांधलेले चर्च येथे आहे. येथे अनेक उद्याने असून त्यांपैकी वॉशिग्टन पार्क, मिचेल पार्क इ. उल्लेखनिय आहेत. १९६० च्या दशकात येथे बरेच वांशिक संघर्ष निर्माण झाले. १९६० नंतर येथे गलिच्छ वस्ती निर्मूलन व अल्प किंमतीची घरे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. १९६८ मध्ये ११६ हे. क्षेत्र उद्योगधंदे, गृहनिवास इ. दृष्टींनी विकसित करण्याचा नागरी प्रकल्प हाती घेण्यात आला. राज्यातील सर्वांत उत्तुंग असे ४२ मजल्यांचे ‘फर्स्ट विस्कॉन्सिन सेंटर’ १९७३ मध्ये पूर्ण करण्यात आले. याचवर्षी येथे एक्स्पोझिशन व कन्व्हेन्शन सेंटर उघडण्यात आले.
जाधव, रा. ग.