मिनेसाटा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी उत्तर-मध्य भागातील एक औद्योगिक व कृषिप्रधान राज्य. मिनेसोटा राज्याच्या उत्तरेस कॅनडाचे मॅनिटोबा व अँटिरिओ प्रांत, पूर्वेस सुपीरिअर सरोवर व अमेरिकेतील विस्कॉन्सिन, दक्षिणेस आयोवा आणि पश्चिमेस साउथ व नॉर्थ डकोटा ही राज्ये आहेत. आग्नेयीकडील विस्कॉन्सिन–मिनेसोटा आणि साउथ व नॉर्थ डकोटा या दरम्यानची सरहद्द रेड नदीने सीमित केलेली आहे. क्षेत्रफळ २,१८,६०१ चौ. किमी. पैकी १२,६७२ चौ. किमी. क्षेत्र जलाशयांखाली आहे. लोकसंख्या ४१,४५,६६७ (१९८३ अंदाज). सेंट पॉल (लोकसंख्या २,७०,२३०–१९८०) हे राजधानीचे ठिकाण असून सेंट पॉल-मिनीॲपोलिस या जुळ्या महानगरांच्या विकासासाठी एक स्वतंत्र समिती १९६७ च्या अधिनियमानुसार स्थापन करण्यात आली.

भूवर्णन : हिमयुगकाळात राज्याचा अगदी आग्नेय भाग वगळता बहुतेक सर्व भाग चार प्रचंड हिमनद्यांनी व्यापलेला होता. परिणामतः राज्यात असंख्य सरोवरे, नद्या, खोल दऱ्या, पाणस्थळे व दलदलीचे प्रदेश आणि ऊर्मिल मैदानांची निर्मिती झालेली दिसते. हिमनद्यांमुळेच हजारो सरोवरांची येथे निर्मिती झाली असून सरोवरांसाठीच हे राज्य विशेष प्रसिद्ध आहे. रेड नदीखोऱ्याचा प्रदेश हा सर्वांत सपाट भाग आहे, तर ईशान्य भाग अगदी ओबडधोबड आहे. प्राकृतिक दृष्ट्या राज्याचे मुख्य चार विभाग पडतात : (१) सुपीरिअर उच्च भूमी, (२) मध्यवर्ती सखल प्रदेश किंवा यंग ड्रिफ्ट प्लेन्स, (३) डिसेक्टेड टिल प्लेन्स (विच्छेदित कृषिप्रदेश) आणि (४) ड्रिफ्टलेस एरिया (विस्थापनरहित प्रदेश). सुपीरिअर उच्च भूमीने राज्याचा बराचसा ईशान्य भाग व्यापला असून ते कॅनडियन ढालप्रदेशाचे दक्षिण टोक आहे. प्राचीन तसेच कठीण खडकांच्या या प्रदेशात इतर प्रदेशांच्या तुलनेने हिमनद्यांचा फारच कमी परिणाम झालेला दिसतो. त्यामुळेच राज्याचा हा भाग उंच-सखल राहिला आहे. सुपीरिअर सरोवराच्या उत्तरेकडील भाग तर फारच खडबडीत आहे. सुपीरिअर उच्च भूमीचे बाणाकृती ईशान्य टोक ‘ॲरो हेड कंट्री’ म्हणून ओळखले जाते. येथेच राज्यातील सर्वोच्च उंचीची व किमान उंचीची ठिकाणे आहेत. येथील कुक परगण्यात ईगल मौंटन हे राज्यातील सर्वोच्च (७०१ मी.) शिखर आहे तर समुद्रसपाटीपासून १८३ मी. ही किमान उंची सुपीरिअर सरोवरकाठी आढळते. याशिवाय ईशान्य भागातील मसाबी रेंज (उंची ६११ मी.) आणि नैर्ऋत्य भागातील कोतो दे प्रेअरीझ (५९७ मी.) ही इतर जास्त उंचीची ठिकाणे आहेत. या उच्च भूमीच्या प्रदेशात बरेचसे लोहखनिज सापडते.

मध्यवर्ती सखल प्रदेश किंवा यंग ड्रिफ्ट प्लेन्स हा राज्याचा दक्षिण, मध्य व पश्चिम भाग बराचसा ऊर्मिल मैदानी स्वरूपाचा आहे. हिमनद्यांच्या घर्षणाने हा प्रदेश सपाट, तर गाळाच्या संचयनामुळे सुपीक बनला आहे. राज्यातील तसेच देशातील अत्यंत समृद्ध कृषिक्षेत्र म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. या भागातच प्राचीन, लॉरेशन उच्च भूमीचा प्रदेश आहे. हा प्रदेश म्हणजे खंडातील सर्वांत महत्त्वाच्या मिसिसिपी नदी, रेड नदी व पंचमहासरोवरे आणि सेंट लॉरेन्स नदी या तीन जलप्रणाल्यांचा मुख्य जलविभाजक आहे. राज्यातील काही भाग मात्र वालुकामय व खडकाळ आहे. या प्रदेशात, विशेषतः राज्याच्या मध्य भागात, हिमनद्यांमुळे निर्माण झालेले हिमोढ आढळतात. या हिमोढीय भागात टेकड्या व सरोवरांचे प्रमाण बरेच आहे. याच प्रदेशाच्या अगदी उत्तर भागात ‘लेक ॲगसी’ हे प्रचंड सरोवर (लांबी १,१२५ किमी. व रुंदी ३२२ किमी.) होते. ते हिमयुग समाप्तीच्या काळात नाहीसे झाले. सांप्रतचे रेड नदी खोरे म्हणजेच पूर्वीच्या ‘लेक ॲगसी’चे क्षेत्र होय.

या राज्याच्या ईशान्य कोपऱ्यातील ‘डिसेक्टेड टिल प्लेन्स’ प्रदेशात हिमनद्यांमुळे गाळाच्या संचयनाचे जाड थर निर्माण झाले आहेत. या जमिनीत वाळू, रेती व चिकणमातीचे प्रमाण अधिक आहे. जलप्रवाहांनी या प्रदेशाचे बरेच खनन केलेले आहे. या प्रदेशातील काही सपाट भाग शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. राज्याच्या आग्नेय कोपऱ्यातील मिसिसिपी नदीच्या काठावरील ‘ड्रिफ्टलेस एरिया’ या चौथ्या प्राकृतिक विभागात हिमनदीचे कार्य अजिबात आढळत नाही. यातील पश्चिम भाग बराच सपाट आहे. वेगाने वाहणाऱ्या नद्यांमुळे हजारो वर्षांपासून येथील चुनखडीच्या प्रदेशात खोल दऱ्या निर्माण झालेल्या आहेत.

प्राचीन काळी हिमनगांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने येथील मृदा बनलेली आहे. राज्यातील व्हर्मिल्यन, मसाबी, कुयून प्रदेशांत प्रामुख्याने लोहधातुकाचे साठे आढळतात. अलीकडे चांगल्या प्रतीच्या नैसर्गिक खनिजांचे प्रमाण कमी झाले असून कनिष्ठ प्रतीची खनिजे (टॅकोनाइट) मिळतात. राज्यातील बेसुमार जंगलतोड, पशुपक्ष्यांची हत्या व मासेमारी यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा फार मोठा ऱ्हास झाला. १९३१ मध्ये राज्यात सुरु झालेल्या स्वतंत्र संधारण खात्यातर्फे मृदा, पशुपक्षी, मासेमारी, लाकूडतोड इत्यादींवर लक्ष ठेवण्यात येते. सांडपाणी, जलप्रदूषण, पाण्याचा उद्योगासाठी व शेतीसाठी उपयोग इ. बाबतींत निर्माण झालेल्या समस्यांवरही अनेक संस्था-संघटनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.

राज्यात नद्या व सरोवरांची संख्या खूप असून १२,६७२ चौ. किमी. क्षेत्र जलाशयांखाली आहे. इतर कोणत्याही राज्यापेक्षा मिनेसोटा राज्यात मोठ्या प्रमाणावर जलसंपदा उपलब्ध आहे. एकूण जलाशयाखालील क्षेत्राच्या एक-तृतीयांश क्षेत्र सुपीरिअर सरोवराने, तर बाकीचे क्षेत्र सु. ११,००० सरोवरे, २५,००० किमी. लांबीचे जलप्रवाह व दलदलींचे प्रदेश यांनी व्यापले आहे. राज्याची बहुतांश सरहद्द ही नैसर्गिक जलाशयांनीच सीमित केलेली आढळते. राज्यात तीन प्रमुख जलप्रणाल्या असून, त्यांचे पाणी अनुक्रमे उत्तरेस हडसन उपसागर, पूर्वेस अटलांटिक महासागर व दक्षिणेस मेक्सिकोच्या आखातात जाऊन मिळते. मिसिसिपी, मिनसोटा, रेड, रेनी, सेंट क्रोई या राज्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. क्रो विंग, रूम, मिनेसोटा, सेंट क्रोई, कॅनन, झंब्रो व रूट ह्या मिसिसिपी नदीच्या, ब्लू अर्थ, कॉटनवुड, रेडवुड, चिपेवा, पम द तेअर व लॅकी पार्ल ह्या मिनेसोटा नदीच्या, रेड लेक, वाइल्ड राइस ह्या रेड नदीच्या, व्हर्मिल्यन, बिग फोर्क व लिटल फोर्क ह्या रेनी नदीच्या, तर केटल व स्नेक ह्या सेंट क्रोई नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. राज्याच्या ५७% क्षेत्राचे जलवहन मिसिसिपी नदी खोऱ्याने, ३४% क्षेत्राचे जलवहन रेड रिव्हर ऑफ द नॉर्थ व रेनी ह्या नद्यांनी, तर सु. ९% प्रदेशाचे जलवहन पंचमहासरोवरे-सेंट लॉरेन्स नदीकडे वहात जाणाऱ्या सेंट लूइस, पिजन आणि सुपीरिअर सरोवरांना मिळणाऱ्या अनेक लहान लहान नद्यांनी केलेले आहे.

महासरोवरांव्यतिरिक्त राज्यातील अनेक लहानमोठ्या सरोवरांपैकी चार हेक्टरांपेक्षा अधिक क्षेत्र असलेली सु. १५,३०० सरोवरे आहेत. संयुक्त संस्थानातील सर्वांत मोठ्या १६ खंडांतर्गत गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी लोअर रेड, अपर रेड, मिल लॅक्स, लीच व विनिबिगोशिश ही पाच मोठी सरोवरे मिनेसोटा राज्यात आहेत. रेड सरोवर (क्षेत्रफळ १,१४० चौ. किमी.) हे राज्यातील सर्वांत मोठे अंतर्गत सरोवर असून, त्याचे अपर रेड लेक व लोअर रेड लेक असे दोन भाग आहेत. लीच (४५१ चौ. किमी.), मिल लॅक्स (५१० चौ. किमी.) व विनिबिगोशिश (१९४ चौ. किमी.) ही प्रमुख सरोवरे आहेत. मिसिसिपी नदीचा उगम असलेले व तिला पाणीपुरवठा करणारे प्रमुख सरोवर म्हणून आइटॅस्का सरोवर विशेष प्रसिद्ध आहे.

नद्या व सरोवरांबरोबरच जलप्रपातांची संख्याही पुष्कळ असल्याने राज्याच्या सृष्टिसौंदर्यात अधिकच भर पडली आहे. मिनीॲपोलिसमधील १६ मी. उंचीचा मिनीहाहा धबधबा, मिनेसोटा- आँटॅरिओ सरहद्दीवरील ४१ मी. उंचीचा हाय फॉल्स धबधबा, कुक परगण्यातील कॅस्केड नदीवरील ३८ मी. उंचीचा कॅस्केड धबधबा हे जलप्रपात विशेष प्रसिद्ध आहेत.


हवामान : राज्याच्या खंडांतर्गत स्थानामुळे तपमानात बरीच विषमता आढळते. उन्हाळे व हिवाळे दोन्हीही तीव्र असतात. हिवाळे विशेष कडक असतात. वार्षिक सरासरी तपमान ६·७° से. असले, तरी काही परगण्यांत (किमान व कमाल तपमान अनुक्रमे) −३५° से. ते ४२° से. आढळते. जुलैमध्ये राज्याच्या उत्तर व दक्षिण भागांत सरासरी तपमान अनुक्रमे २०° से. व २३° से., तर जानेवारीमध्ये अनुक्रमे ते १७° से. व ९° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान आग्नेय व ईशान्य भागात ७५ सेंमी., तर वायव्य भागात ५१ सेंमी आहे. ऋतुनुसार सरासरी हिमवृष्टी पश्चिम भागात १०२ सेंमी, तर ईशान्य भागात १८० सेंमी होते. डिसेंबर मध्य ते मार्चच्या मध्यापर्यंत राज्याचा बराचसा भाग सतत बर्फाच्छादित असतो. राज्याच्या उत्तर भागात हिमतुषारमुक्त असे सरासरी ९० पेक्षा कमी दिवस, तर दक्षिण भागात ते १६० पेक्षा अधिक असतात.

वनस्पती व प्राणी : राज्याचे सु. ३५% क्षेत्र वनाच्छादित आहे. उत्तर भागात सूचिपूर्णी वृक्षांची अरण्ये आहेत. उत्तर भागात जॅक पाइन, व्हाइट पाइन, ॲस्पेन, बाल्सम फर, स्प्रूस, व्हाइट बर्च, ब्लॅकबेरी, लिली, रासबेरी, रू, अनिमोन, रानगुलाब, जिरॅनियम, हनिसकल, ब्लूबेरी इ. वनस्पती, तर दक्षिण भागात ऍश, ब्लॅक वॉलनट, एल्म, मॅपल, ओक हे वनस्पती प्रकार आढळतात. दक्षिण, पश्चिम आणि वायव्य भागांत वेगवेगळ्या रानफुलांच्या वनस्पती आढळतात.

पांढऱ्या शेपटीचे हरिण राज्यात सर्वत्र आढळते. याशिवाय काळे अस्वल, मूस, कॅरिबू, बीव्हर, बॉबकॅट, कोल्हा, गोफर, मिंक, चिचुंदरी, रॅकून, स्कंक इ. प्राणी आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : या प्रदेशात वीस हजार वर्षांपूर्वी मानववस्ती असावी. ‘मिनेसोटा मानव’ म्हणून निर्दिष्ट होणाऱ्या प्राचीन मानवाचा सांगाडा या भागात १९३१ मध्ये सापडला. नंतरची वस्ती इंडियन लोकांची होती. पुरातत्त्वज्ञांना ‘केन्‌सिंगटन रून स्टोन’ हा वादग्रस्त ठरलेला शिलालेख १८९८ मध्ये सापडला. त्यावरून व्हायकिंग टोळ्यांनी १६३२ मध्ये मिनेसोटाला भेट दिली, असे एक मत आहे. फ्रेंच प्रवासी या भागात प्रथम आले. फादर ल्वी हेनेपिन याने १६८० मध्ये विद्यमान मिनीॲपोलिसजवळील सेंट अँथनी धबधबा प्रथम पाहिला. पॅरिसच्या तहापूर्वी (१७६३) या राज्याचा मोठा प्रदेश फ्रेंच साम्राज्यात मोडत होता. नंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला. मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश स्पेनच्या सत्तेखाली असला, तरी प्रत्यक्षात ब्रिटिश व्यापारी आणि व्यापारी संस्था यांचेच त्यावर नियंत्रण होते. स्वतंत्र अमेरिकेत सुरुवातीला पूर्व मिनेसोटा आणि नंतर पश्चिम मिनेसोटा सामील झाले. १८१२ पर्यंत मात्र प्रत्यक्ष ब्रिटिशांचाच ताबा या भागावर होता. १८१९–२० मध्ये मिसिसिपी-मिनेसोटा नद्यांच्या संगमावर फोर्ट अँथनी (नंतरचे नाव फोर्ट स्नेलिंग) बांधण्यात आला. त्याच्या परिसरात शेती, पीठगिरण्या, लाकूड इ. उद्योग विकसित होऊ लागले. १८३७ मध्ये इंडियन लोकांकडून अमेरिकन शासनाने सेंट क्रोई व मिसिसिपी नद्यांदरम्यानची जागा खरेदी केली. त्यामुळे वसाहतीची वाढ वेगाने झाली. हे राज्य प्रारंभीच्या काळात मिशिगन, आयोवा व विस्कॉन्सिन या राज्यांच्या प्रदेशात मोडत असे मात्र १८४९ मध्ये स्वतंत्र मिनेसोटा प्रदेश अस्तित्वात आला आणि १८५८ मध्ये ३२ वे राज्य म्हणून मिनेसोटा अमेरिकन संघराज्यात समाविष्ट झाले. यादवी युद्धात हे संघराज्याच्या बाजूचेच होते. १८६२ मध्ये (डकोटा) इंडियनांचे मोठे बंड उद्‌भवले होते. त्याचा बीमोड करण्यात आला. हिमवादळ (१८७३), आर्थिक कोंडी (१८७३), प्लेगची साथ (१८७३–७८), पिठाच्या गिरणीतील स्फोट (१८७८) यासारख्या आपत्ती येऊनही राज्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेली.

राज्यात रिपब्लिकन पक्षाचेच प्रभुत्व पूर्वीपासून आढळते. मात्र येथील शेतकरी संघटना प्रभावी असून शेतकरी कामगारांचा राजकीय पक्षही येथे उदयास आला. १९३० नंतरच्या काळात हा सत्ताधारी पक्ष होता. १९३८ नंतर येथे पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले.

येथील कारभार १८५८ च्या संविधानानुसार चालत असून त्यात आतापर्यंत ९४३ दुरुस्त्या झालेल्या आहेत. द्विसदनी विधिमंडळापैकी सिनेटमध्ये ६७ आणि प्रतिनिधीगृहात १३४ लोकनिर्वाचित सदस्य असतात. त्यांची मुदत अनुक्रमे ४ वर्षे व २ वर्षे असते. गव्हर्नर आणि ले. गर्व्हनर ४ वर्षांसाठी निवडले जातात. २ सिनेटर आणि ८ प्रतिनिधी केंद्रीय विधिमंडळात पाठविले जातात. राज्यात ८७ परगणे आहेत.

आर्थिक स्थिती : शेती, पशुपालन आणि अन्नप्रक्रिया हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे मोठे घटक आहेत. शेतीचे बहुतांश यांत्रिकीकरण झालेले असले, तरी विशाल कृषिक्षेत्राबरोबरच कुटुंबांची लहानलहान शेतेही राज्यात आहेत. राज्यातील एकूण जमिनीच्या ६०% जमीन शेतीखाली होती (१९८३). त्यापैकी १२% शेती ही कुळांच्या ताब्यात होती. १९८२ मध्ये शेती उत्पादनाचे मूल्य ३१३·२० कोटी डॉलर इतके होते. पशुसंवर्धनाचे उत्पादन मूल्य ३५४·१० कोटी डॉ. होते (१९८२). १९८३ मध्ये राज्याचा बीट साखर व तांदूळ यांच्या उत्पादनात सबंध देशात पहिला, तर गहू, सातू, सोयाबीन, राय, वैरण, दूधभुकटी, प्रक्रियित धान्यपदार्थ व टर्की यांच्या उत्पादनात दुसरा क्रमांक आला. मध, बटाटे, सूर्यफुलांचे बी हीही इतर शेती उत्पादने आहेत. राज्यातील पशुधन आकडेवारी पुढीलप्रमाणे (१९८४ आकडे हजारांमध्ये) : गुरे ३,६९० दुभत्या गायी ९१० मेंढ्या २५५ डुकरे ४,२७० कोंबड्या १३,९०० टर्की ४४३. मेंढ्यांच्या लोकरीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

वनविभागाचे ५५,४२,४९७ हे. असून त्यापैकी ५३·५% वनक्षेत्र सरकारी आहे. १९८२ मध्ये वनोत्पादनाचे मूल्य २५४·४० कोटी डॉलर होते.

हे राज्य अमेरिकेच्या मध्य-पश्चिम प्रदेशातील व्यापाराचे फार मोठे केंद्र असल्यामुळे घाऊक व किरकोळ व्यापार व त्यांच्या अनुषंगाने बँकिंग, भांडवल पुरवठा, विमा आणि विविध प्रकारचे सेवाउद्योग इत्यादींचा मोठा विकास या राज्यात झाला. उत्पादन उद्योग, व्यापार त्याचप्रमाणे विमा, बँकिंग यासारखे आर्थिक उद्योग आणि अनेकविध सेवा यांनी राज्याची अर्थव्यवस्था समृद्ध केली आहे.

राज्यातील लाकूड उद्योगात सु. ४६,८०० लोक गुंतलेले आहेत. शेतीखालोखाल मांस आणि भाजीपाला डबाबंदीकरण, पिठाच्या गिरण्या आणि दुग्धोत्पादन हे उद्योग विशेष विकसित झाले आहेत. ‘ब्रेड अँड बटर’ असा या राज्याचा लौकिक आहे. कार्यालयीन सामग्री व संगणक त्याचप्रमाणे धातूच्या वस्तू, रसायने, मुद्रण आणि प्रकाशन, तेलशुद्धीकरण व कागदनिर्मिती हे इतर महत्त्वाचे उद्योग आहेत. सेंट पॉल-मिनीॲपोलिस या जुळ्या महानगरात आधुनिक उद्योगधंद्याची केंद्रे आढळतात. खाणउद्योग हाही, विशेषतः ईशान्य भागातील, महत्त्वाचा उद्योग आहे. लोहधातुक, बांधकामाचा दगड, विशेषतः ग्रॅनाइट, चुनखडक इ. खनिज उत्पादने राज्यात आढळतात. १९८२ मधील औद्योगिक उत्पन्नाचे मूल्य १,४३०·५० कोटी डॉलर होते. पर्यटन हाही येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे.

राज्यात १९८० मध्ये १९,४७३ किमी. लांबीचे रस्ते व ८,५५८ किमी. लांबीचे लोहमार्ग तसेच ५९३ विमानतळ होते. त्यांपैकी काही विमानतळ खाजगी मालकीचे आहेत.


लोक व समाजजीवन : राज्यातील विद्यमान समाजात ९७% यूरोपियन वंशाचे गोरे लोक, तर उर्वरित आफ्रिकन आणि अमेरिकन-इंडियन कृष्णवर्णीय लोक आहेत. राज्यातील आद्य वसाहतकार फ्रेंच, ब्रिटिश, स्कॉटिश, स्विस लोक होते. नंतर न्यू इंग्लंडमधून मोठ्या प्रमाणावर लोक आले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपातून मोठ्या प्रमाणावर जर्मन, आयरिश, नॉर्वेजियन आणि स्वीडिश लोक येथे आले. १९५० नंतर शहरातील लोकसंख्या वाढत गेली व १९७० पर्यंत एकूण लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश लोक शहरात स्थायिक झाले. त्यापैकी सु. ७०% लोक मिनीॲपोलिस आणि सेंट पॉल या दोन महानगरात आहेत. धार्मिक दृष्टीने विविध पंथीयांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : ल्यूथेरन ११,१२,४९५ रोमन कॅथलिक १०,६१,६१४ मेथडिस्ट २,१३,०८४ (१९७०).

राज्यात शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. १९८३ साली, १,५०४ सरकारी शाळांतून २,९७,१०२ प्राथमिक शाळांतील विद्यार्थी व ३,६२,०८४ माध्यमिक शालेय विद्यार्थी होते. त्याच वर्षी बालोद्यानांतील विद्यार्थिसंख्या ५२,५२८ होती. त्यांशिवाय ६०३ खाजगी विद्यालये असून त्यांतून बालोद्यान, प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ७,९२५ ५१,३९५ व ३२,९८२ होती. मिनेसोटा विद्यापीठात ५९,२९० विद्यार्थी होते (१९८२). यांशिवाय राज्यात १४ पब्लिक कम्युनिटी महाविद्यालये आहेत. राज्यातील ७ विद्यापीठांतून एकूण ४३,२७० विद्यार्थी शिकत होते (१९८२).

राज्यातील १७२ रुग्णालयात २०,७५२ खाटांची सोय होती (१९८३). याशिवाय राज्यात २ शुश्रूषागृहे असून १९८३ मध्ये त्यात ७७४ रुग्ण उपचार घेत होते. राज्यातील वृद्ध, अपंग आणि अंध व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम १९७४ सालापासून संघराज्याच्या अखत्यारीत आलेला आहे तथापि संघराज्याची तरतूद कमी पडल्याने राज्य शासनाने वरील व्यक्तींना आर्थिक साहाय्य देण्याचा पुरवणी कार्यक्रम अंमलात आणला आहे. या राज्यात अशा कार्यक्रमाखाली घरदुरुस्ती व तत्सम कौटुंबिक सुविधांसाठीही मदत देण्यात येते.

राज्यात सार्वजनिक ग्रंथालये, संग्रहालये, कलावीथी, रंगमंदिरे इ. सांस्कृतिक सुविधांचाही विकास झालेला आहे. राज्य शासनातर्फे ग्रंथालयसेवा विकसित करण्यात येत आहे. मिनीॲपोलिस सार्वजनिक ग्रंथालय, मिनेसोटा विद्यापीठाचे ग्रंथालय, सेंट पॉल येथील जेम्स जे. हिल संदर्भ ग्रंथालय उल्लेखनीय आहे. मिनीॲपोलिस येथील गथ्री रंगमंदिर, नाट्यप्रयोग व तत्सम कलांचे महत्त्वाचे केंद्र आहे. ‘मिनेसोटा सिंफनी ऑर्केस्ट्रा’ हा वाद्यवृंद संगीतक्षेत्रात नावाजलेला आहे. मिनीॲपोलिस येथे ललितकला संस्था आहेत. राज्यात दूरचित्रवाणी व नभोवाणी यांचा मोठाच विकास झालेला आहे. ट्रिब्यून, स्टार, पायोनियर प्रेसडिस्पॅच ही महत्त्वाची दैनिके मिनीॲपोलिस व सेंट पॉल या महानगरांतूनच प्रसिद्ध होतात.

राज्यात सु. १५,३०० सरोवरे आहेत. यांशिवाय २४,००० किमी. लांबीच्या नद्या आहेत. अशा निसर्गरमणीय परिसरात उद्याने आणि क्रीडांगणे यांचाही नियोजनपूर्वक विकास करण्यात आल्यामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळाला आहे. ‘व्हॉयजिअर्स नॅशनल पार्क’ चे क्षेत्र ८९,००० हेक्टर आहे. राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे सु. २०० उत्सव साजरे करण्यात येतात. उन्हाळ्यात जत्रा, उत्सव, गुरांचे आणि हस्तकला वस्तूंचे बाजार भरतात. सेंट पॉल येथील ‘मिनेसोटा स्टेट फेअर’ या दहा दिवसांच्या जत्रेने उत्सवाचा मोसम समाप्त होतो.

सेंट पॉल आणि मिनीॲपोलिस या प्रमुख शहरांव्यतिरिक्त डलूथ हे (९२,८११–१९८०) महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक केंद्र या राज्यात आहे. जगप्रसिद्ध मेयो क्लिनिक असलेले रॉचेस्टर (५७,८९०), टर्की- प्रक्रिया उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले विलमर (१५,८९५), वसाहतकालीन दंतकथेचा नायक पॉल बन्यन या लाकूडतोड्याचे व त्याच्या निळ्या रंगाच्या बैलाचे पुतळे असलेली ब्रेनर्ड व बमिजी ही नगरे, उत्तम ग्रॅनाईटासाठी लौकिक असलेले सेंट क्लाउड इ. उल्लेखनीय स्थळे राज्यात आहेत.

या राज्यातील प्रसिद्ध व्यक्तींत ह्यूबर्ट एच्‌. हम्फ्री हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष (१९६५–६९), मेल्‌व्हिन कॉल्व्हिन हे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते (१९६१), सिंक्लेअर लूईस हे साहित्याच्या नोबेल पुरस्काराचे पहिले अमेरिकन (१९३०), थॉर्स्टाइन व्हेब्लेन हे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, जगप्रसिद्ध मेयो क्लिनिकचे संस्थापक चार्ल्स मेयो व विल्यम मेयो आणि जगातील एक धनाढ्य तेलउद्योगपती जीन पॉल गेटी इत्यादी उल्लेखनीय आहेत.

संदर्भ : Folwell, William W. A. History of Minnesota, 4 Vols., St. Paul, 1956-1969.

जाधव, रा. ग.