मिनस्येंगर : मध्ययुगीन जर्मन प्रेमकवी. त्यांच्या प्रेमकवितेला मिनसाँग असे संबोधिले जाते. सु. ११७० ते १२३० ह्या कालखंडात मध्य आणि दक्षिण जर्मनीत ती बहरली. जर्मन साहित्यातील तिचा प्रभाव मात्र चौदाव्या शतकापर्यंत दिसून येतो.

मिनस्येंगर हे मुख्यतः राजकुळातले, उच्च सरदारकुळातले किंवा राजाच्या मंत्र्यापैकी असत. मात्र विविध सरदारांच्या सेवकांनी आणि अन्य सामान्य नागरिकांनीही मिनसाँग ह्या प्रकारात मोडणारी प्रेमकविता लिहिलेली आढळते.

‘मिनसाँग’ हे सरदारांचे, प्रेमभावना व्यक्त करण्याचे, प्रभावी माध्यम होते. दरबारात हजर असलेल्या एखाद्या सरदारपत्नीवरचे आपले प्रेम, तिचा नामोल्लेख न करता, ‘मिनसाँग’ मधून ते व्यक्त करीत मिनसाँगमध्ये तिची स्तुती असे. आपल्या प्रेमाची कबुली, प्रियेचे नाव न घेता, तिच्या पतीच्या उपस्थितीत आणि भर दरबारात देण्यासाठी कवीला आपली काव्यरचना अत्यंत काळजीपूर्वक करावी लागे. शिवाय मिनसाँग रचिणाऱ्या प्रेमिकाला प्रेमपूर्ती अभिप्रेत नसे. त्याचे प्रेम असलेल्या स्त्रीचे अस्पष्ट स्मित, एखादा कटाक्ष किंवा तिने नुसताच मानेने दर्शविलेला होकार त्याला प्रेमाचा दाखला म्हणून पुरेसा होई. सरदार आणि त्याची काव्यातील प्रिया ह्यांच्यातील प्रेम आत्मिक आणि प्रतीकात्मक स्वरुपाचे असे. तरीही अप्राप्य प्रेमाविषयीचा तक्रारीचा सूर ह्या प्रकारच्या कवितेत आढळतोच. गरुड आणि ससाणा ह्यांचा ह्या काव्यातील प्रतिमासृष्टीत प्रामुख्याने अंतर्भाव असल्याचे दिसून येते. सरदारांना हवासा वाटणारा आत्मविश्वास, तसेच त्यांना महत्त्वाचे वाटणारे स्थैर्य आणि सुरक्षितता ह्यांची ती प्रतीके होत. अनेकदा दोन किंवा अधिक मिनस्येंगर एकमेकांच्या विरोधात उभे राहून प्रेमकाव्यांची जुगलबंदी घडवून आणीत. द्वंद्व युद्धाचाच हा एक सौम्य आणि वाङ्‌मयीन प्रकार. विविध राजांच्या वा ड्यूकपदी असलेल्यांच्या दरबारांतून मिनस्येंगरांची कदर केली जाई त्यांना आश्रय मिळे.

मिनसाँगच्या रचनेत, आरंभीच्या काळात लोकगीतांचा सहजपणा आणि सोपेपणा होता तथापि पुढे तंत्रकौशल्य आणि सफाई ह्यांकडे विशेष लक्ष पुरविले जाऊ लागले. रचनेच्या दृष्टीने पाहता असे दिसते, की मिनसाँगच्या प्रत्येक कडव्यात नऊ ओळी असतात. त्यापैकी पहिली व तिसरी आणि दुसरी व चौथी ओळ यमकाने जोडली जात असे. अशाच प्रकारे शेवटच्या चार ओळी यमकबद्ध असत. पाचवी ओळ मात्र यमकाने जोडली जात नसे. अनेकदा कडव्यानुसार वृत्तही बदलत असे.

फ्रीड्रिख फोन हाइनझन, हाइन्रिख फोन मोरूंगन, राइनमार आणि सर्वश्रेष्ठ मानला गेलेला मिनस्येंगर वॉल्टर फोन डर फोगेलवायड (सु. ११७० – सु. १२२८) हे प्रमुख मिनस्येंगर होत. आपल्या प्रेमाला मिळणाऱ्या थंड प्रतिसादाचे दुःख हाइनझनच्या काव्यात दिसते, तर मोरूंगनच्या कवितेत स्वप्नदृश्ये येतात प्रियेच्या आणि स्वतःच्याही मृत्यूची लागणारी चाहूल व्यक्त होते. भावनाविष्काराच्या अनेक छटा राइनमारच्या रचनेत दिसतात. फोगेलवायडच्या कवितेत प्रियकर प्रेयसींच्या व्यक्तिमत्त्वांना विलक्षण जिवंतपणा प्राप्त झालेला दिसतो. सरदारांतील उच्चनीच कुळांची जी जाणीव मिनस्येंगरांच्या कवितेतून अनेकदा आढळते, ती फोगेलवायडमध्ये नाही.

ह्या चार प्रमुख कवींखेरीज रुडोल्फ फोन फेनिस, सहावा हाइन्रिख, बेर्गनर फोन होअनहाइम, हाइन्रिख फोन रूग, अल्ब्रेष्ट फोन योहान्सडोर्फ, हार्टमान फोन आउए हे मिनस्येंगर प्रसिद्ध आहेत.

महाजन, सुनंदा