मिचेल, सर टॉमस लिव्हिंग्स्टन : (१५ जून १७९२–५ ऑक्टोबर १८५५). ब्रिटिश समन्वेषक तसेच न्यू साउथ वेल्स या ऑस्ट्रेलियातील राज्याचा महासर्वेक्षक. जन्म स्कॉटलंडमधील क्रेगंड येथे.

स्पेनमध्ये द्वीपकल्पीय युद्धात (१८११–१४) तो भूस्वरूपवर्णनविषयक गुप्तवार्ता विभागात लेफ्टनंट होता. १९२६ मध्ये त्याला मेजरचा हुद्दा मिळाला. पुढच्याच वर्षी तो जॉन ऑक्स्‌ली या महासर्वेक्षकाचा साहाय्यक म्हणून सिडनी येथे काम करू लागला. १८२८ मध्ये ऑक्स्‌लीच्या मृत्यूनंतर प्रथम रस्ते व पूल या विभागाचा प्रमुख म्हणून व १८३० मध्ये महासर्वेक्षक म्हणून नियुक्त. त्याच वर्षी त्याने सिडनी ते पॅरामॅटा, सिडनी ते लिव्हरपूल असे कायमचे मार्ग तयार केले तसेच ब्लू मौंटन्समधून रस्ता बांधला. १८३१–३२ यांदरम्यान मिचेलने कॅसल्‌रे व ग्वायडर या नद्यांचे, तर १८३५ मध्ये डार्लिंग नदीचे समन्वेषण केले. यापूर्वी चार्ल्झ स्टर्टने १८२८ मध्ये डार्लिंग जेथपर्यंत शोधली होती, त्या ठिकाणापासून ती मरी नदीला मिळेपर्यंतच्या मार्गाचे मिचेलने समन्वेषण केले. १८३६ मध्ये त्याने मरी नदीच्या आसमंतीय प्रदेशाचे समन्वेषण करून त्या प्रदेशाला ‘ऑस्ट्रेलिया फेलिक्स-हॅपी ऑस्ट्रेलिया’ (आताचे ‘व्हिक्टोरिया राज्य’) असे नाव दिले. १८४५ पर्यंत त्याने पील, नॅमोई, ग्लेनेल्ग, बार्कू या नद्यांचेही समन्वेषण केले.

मिचेलने १८३८ मध्ये थ्री एक्स्पिडिशन्स इंटू ईस्टर्न ऑस्ट्रेलिया हा ग्रंथ लिहिला. १८३९ मध्ये त्याला ‘सर’ हा किताब मिळाला. पुढल्याच वर्षी त्याने द्वीपकल्पीय युद्धयोजना प्रसिद्ध केल्या. १८४४ मध्ये मिचेल विधानपरिषदेवर निवडून गेला. १८४५–४६ दरम्यान त्याने चौथी अयशस्वी मोहीम आखली तीत पोर्ट एसिंग्टन हे बंदर पुलाने जोडण्याची त्याची योजना होती. १८४७–४८ यांदरम्यान रजाकाळात त्याचा जर्नंल ऑफ ॲन एक्स्पिडिशन इंटू द इंटिरिअर ऑफ ट्रॉपिकल ऑस्ट्रेलिया (१८४८) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. ऑस्ट्रेलियन जिऑग्रफी (१८५०) हे त्याचे उल्लेखनीय शालेय पाठ्यपुस्तक होय. डार्लिंग पॉइट, सिडनी येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Cumpston, J. H. L. Thomas Mitchell, Surveyor General and Explorer, Oxford, 1954. 

गद्रे वि.रा.