मिझर : (वसिष्ठ). सप्तर्षी तारकासमूहातील चौकटीबाहेरच्या तीन ताऱ्यांपैकी मधला तारा. मिझर हे अरबी नाव असून याचे शास्त्रीय नाव झीटा उर्सी मेजॉरिस असे आहे. याची ⇨ प्रत २·४. विषुवांश १३ तास, २१ मिनिटे, ५० सेकंद क्रांती + ५५° ११′ ४७″ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती] व पृथ्वीपासूनचे अंतर ७५ प्रकाश वर्षे आहे. याच्यापासून अगदीच थोड्या (१२″) कोनीय अंतरावर ४ प्रतीचा नुसत्या डोळ्यांनी सहजासहजी न दिसणारा ‘अरूंधती’ (ॲल्कोर म्हणजे अंधुक) हा तारा असून ही जोडी नुसत्या डोळ्यांनी दिसली, तर ते चांगल्या दृष्टीचे एक लक्षण समजतात. ताऱ्यांची ही जोडी फार प्राचीन काळापासून माहीत आहे. काही लोक या जोडीला घोडा व घोडेस्वार असे संबोधितात. १६५० मध्ये फादर रित्चॉली यांना यातील वसिष्ठ तारा दूरदर्शकातून पाहताना युग्मतारा असल्याचे आढळले होते. १८८९ मध्ये या युग्मापैकी मोठ्या ताऱ्यांच्या वर्णपटीय रेषांत आवर्ती च्युती (सरकण्याची क्रिया) होत असल्याचे पिकरिंग यांना आढळले. यातील दोन तारे त्यांच्या समाईक गुरूत्वमध्याभोवती भ्रमण करताना ⇨डॉप्लर परिणामामुळे अशी च्युती होते. हिचा आवर्तकाल (लागोपाठच्या दोन च्युतींमधील कालांतर) २० दिवस असून ताऱ्याचे वस्तुमान काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अशा युग्मा ला वर्गपटीय युग्मतारा म्हणतात. पुढे यातील दुसरा तारा व अरुंधती हा ताराही वर्णपटीय युग्मतारा असल्याचे दिसून आले. वर्णपटीय युग्मातील तारे कोणत्याही दुर्बिणीने वेगवेगळे दिसत नाहीत. वसिष्ठ व अरुंधती यांच्यामध्ये सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराच्या ३०० पट (म्हणजे ३०० ज्योतिषशास्त्रीय एकके) अंतर आहे.
ठाकूर, अ. ना.