मिचेल, पीटर डेनिस : (२९ सप्टेंबर १९२० –). ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ, जीवनाच्या प्रक्रियांसाठी लागणाऱ्या ऊर्जेची साठवण व स्थानांतरण (संक्रमण) कोशिका (पेशी) कशा प्रकारे करतात, याविषयीच्या ज्ञानात बहुमोल भर घातल्याबद्दल त्यांना १९७८ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. जिवंत कोशिकांना ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या रासायनिक विक्रियांविषयीचे त्यांचे संशोधनही महत्त्वाचे आहे. 

मिथेल यांचा जन्म इंग्लंडमधील मिचॅस (सरे) येथे आणि शिक्षण क्वीन्स कॉलेज (टाँटन) व जीझस कॉलेज (केंब्रिज विद्यापीठ) येथे झाले. १९५० मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली. या विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागात अध्यापनाचे (१९४३–५५) व एडिंबरो विद्यापीठाच्या प्राणिविज्ञान विभागाच्या ‘केमिकल बायालॉजिकल युनिट’ चे संचालक म्हणून (१९५५–६३) काम केल्यावर १९६४ मध्ये त्यांनी बॉडमिन (कॉर्नवॉल) येथे ग्लिन रिसर्च लॅबोरेटरी नावाची स्वतःची खाजगी संशोधन संस्था स्थापन केली. ते तेथे प्राध्यापक व संशोधन विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहेत.

एटीपी (ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट) हे चयापचयातील (शरीरात सतत घडणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीतील) असंख्य प्रक्रियांमध्ये भाग घेणारे आणि त्यांतील ऊर्जेशी निगडित असलेले महत्त्वाचे संयुग आहे. हे संयुग तयार करण्यासाठी सजीवांच्या कोशिका ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश यांतील ऊर्जेचे कसे स्थानांतरण करतात, या विषयीचा सिद्धांत मांडण्याच्या दृष्टीने त्यांनी संशोधन केले. अंतःकोशिकी रासायनिक विक्रियांमधील एटीपीची निर्मिती हा या विक्रियांतून मुक्त होणाऱ्या काही ऊर्जेचे संरक्षण (साठवण) करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा जीवाला आवश्यक असलेल्या द्रव्यांच्या निर्मितीसाठी बाहेरून ऊर्जा पुरविली जाणे आवश्यक असते अशा वेळी हे संयुग या विक्रियांत भाग घेते व कोशिकांद्वारे त्यातील राखीव ऊर्जेचा उपयोग करून घेतला जातो. 

कोशिकांमधील खास संरचनांच्या (घटकांच्या) कार्याद्वारे एटीपीच्या आयव्ययात समतोल राखला जात असतो. प्राणिकोशिकेतील कलकणू या संरचनेमार्फत ऑक्सिजन रेणूची ऊर्जा एटीपी रेणूच्या निर्मितीकडे वळविली जाते, तर वनस्पतिकोशिकेतील हरितकणू (हरितद्रव्ययुक्त व प्रकाशसंश्लेषण व प्रथिन संश्लेषण यात भाग घेणाऱ्या) या संरचने मार्फत असेच कार्य होते व त्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा प्रकाशकणांपासून (फोटॉनांपासून) मिळते. एडीपी (ॲडिनोसीन डायफॉस्फेट) हे संयुग कोशिकेतील चयापचयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून ते नेहमी एटीपीबरोबर आढळते. एडीपीचे एटीपीत रूपांतर कसे होते हे निश्चित माहिती नव्हते. याविषयी संशोधन करताना मिचेल यांनी कलकणूंवर अधिक लक्ष केंद्रित केले. कलकणूमधील पटलांद्वारे अंतरंगाचे कप्पे पडतात व त्यांतील द्रव्ये एकमेकांत मिसळू शकत नाहीत. अशा प्रकारे अलग झालेल्या एंझाइमांपैकी (जीवरासायनिक विक्रियांमध्ये मदत करणाऱ्या प्रथिनांपैकी) एकामुळे एडीपीचे एटीपीत रूपांतर होताना प्रोटॉन (हायड्रोजनाचे आयन म्हणजे विद्युत् भारित अणू) मुक्त होतात आणि त्याच वेळी दुसऱ्या एंझाइमाच्या परिणामी सुरू झालेल्या ऑक्सिडीभवन-क्षपण [→ ऑक्सिडीभवन क्षपण] विक्रियेत हे प्रोटॉन वापरले जातात. अशा तऱ्हेने कलकणूंमधील प्रोटॉनांच्या भासमान स्थानांतरणाने एकमेकींवर अवलंबून असलेल्या दोन एंझाइमी क्रिया एकमेकींशी जोडल्या जातात आणि प्रोटॉनांचा वापर करणाऱ्या विक्रियेतील (उपलब्ध) ऊर्जा एटीपीच्या संश्लेषणाला चालना देण्यास उपयुक्त ठरते, असे मिचेल यांनी दाखवून दिले.

नोबेल पारितोषिकाखेरीज सीबा पदक व पारितोषिक (१९७३), वॉरेन ट्रायएनियल (१९७४) व फ्रीडमान फाउंडेशन (१९७४) ही पारितोषिके लुइस अँड बेर्ट (१९७७), व्हिल्हेल्म फेल्डबर्ग फाउंडेशन (१९७७) आणि रोझेनस्टाइल (१९७७) हे पुरस्कार, लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलोपद (१९७४), अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व (१९७७), बर्लिनच्या नॅशनल टेक्निकल युनिव्हर्सिटीचे मानसेवी संचालकपद व मानसेवी डी. एस्‌सी. पदवी (एक्झिटर, १९७७) इ. सन्मानही त्यांना मिळाले आहेत.

केमिऑस्मॉटिक कपलिंग इन ऑक्सिडेटिव्ह अँड फोटोसिंथेटिक फॉस्फोरिलेशन (१९६६) व केमिऑस्मॉटिक कपलिंग अँड एनर्जी ट्रान्सडक्‌शन (१९६८) ही त्यांची पुस्तके असून त्यांनी वैज्ञानिक नियतकालिकांतून संशोधनपर अनेक लेखही लिहिले आहेत.

मिठारी, भू. चिं.