भारतीय तत्त्वज्ञान : विश्ववस्तूच्या म्हणजे मानवी जीवनासह सर्व विश्वाचा अर्थ सांगणाऱ्या सामान्य व मूलभूत संकल्पनांची सुसंगत व तर्कशुद्ध मांडणी करणारी ज्ञानव्यवस्था म्हणजे तत्वज्ञान होय. येथे याच अर्थाने तत्वज्ञान हे पद वापरले आहे. आपल्या म्हणजे माणसाच्या सर्व प्रकारच्या अनुभवाची उपपत्ती लावणे, हे तत्वज्ञानाचे कार्य आहे. तत्वज्ञानाच्या अत्यंत व्यापक साच्यात सर्व प्रकारचा अनुभव बसवता आला पाहिजे. आपण जे जे काही अनुभवतो म्हणजे पाहतो, जाणतो, भोगतो, अपेक्षितो, त्याच्या योगाने प्रवृत्त होतो व निवृत्त होतो, ते ते तत्वज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करण्याचे उदाहरण वाटले पाहिजे. आपल्या संस्था, आपली ध्येये, आपले प्रयत्न, आपल्या कला यांचे योग्यत्व – अयोग्यत्व तत्वज्ञानाच्या योगाने आपणास पारखता आले पाहिजे.
चिंतनाच्या वा चिकित्सेच्या अवस्थेस पोहोचलेला धर्म तत्वदर्शनाची विशाल पार्श्वभूमी प्रथम निर्माण करतो, त्यास विश्वस्थितिशास्त्र (कॉस्मॉलॉजी) म्हणतात. ऐतिहासिक दृष्ट्या तत्वदर्शने धर्मविचारांचा वारसाहक्क आपणाकडे घेऊन धर्माचे उत्तराधिकारी बनतात. भारतीय तत्वज्ञान प्रथम वैदिक धर्माच्या वातावरणात जन्मले. ते प्राचीन उपनिषदांमध्ये ग्रथित केले आहे. उपनिषदांतील प्रौढ तत्वज्ञानाची बाल्यावस्था वेदांतील धर्मात प्रत्ययास येते. उपनिषदांच्या पूर्वी झालेल्या वैदिक वाङ्मयातील विचारांचे स्वरूप बौद्धिक मननासारखे नसून त्यांचा आकार कविकल्पनांचा आहे किंवा देवतांच्या प्रार्थनांचे स्वरूप त्यांना आले आहे. गाढ धार्मिक श्रद्धा व देवकल्पना यांचे प्रभुत्व त्यात सर्वत्र पसरलेले दिसते. उपनिषदांत त्या श्रद्धेला किंवा देवशास्त्राला बदलून टाकणारा विचार प्रथम प्रकट झालेला दिसतो. उपनिषदांतील विचार हे निरनिराळ्या पातळ्यांतील आहेत, हे मात्र समजले पाहिजे. त्या भिन्नभिन्न पातळ्या सहज ओळखता येतात. बौद्धिक अन्वेषण तार्किक निर्णय यांचा तेथेच प्रारंभ झाल्यामुळे सुसंगत तत्वदर्शनाच्या पदवीस ते तेथे पोहोचले नाहीत. उपनिषदे ही संघटित दर्शनांची पूर्वावस्था आहे. त्यातून सुप्रसिद्ध भारतीय प्राचीन संघटित दर्शने म्हणजे तत्वज्ञाने उगम पावली आहेत. [⟶ आरण्यके व उपनिषदे].
उपनिषदांतील भिन्नभिन्न पातळीवरील तात्विक चर्चा आणि सिद्धांत, भिन्नभिन्न विश्वविषयक उपपत्ती, आत्मविषयक व परमात्मविषयक विचार यांना तार्किक सुसंगती देणारे वेदान्त दर्शन म्हणजे बादरायणाची ⇨ब्रह्मसूत्रे होत. उपनिषदांमध्ये सर्वांत प्रभावी आत्मविषयक दर्शन आहे. सर्वच भारतीय दर्शने आत्मा आणि आत्म्याला ज्ञात होणारे सर्व विश्व यांची व्यापक व तात्विक मांडणी करतात. लोकायतिक दर्शन म्हणजे चार्वाकाचा भौतिकवाद वा जडवाद हासुद्धा आत्मा किंवा चैतन्य हे जड किंवा भौतिक तत्वाहून वेगळे आहे किंवा नाही, याच मुद्द्याला महत्व देतो [⟶ लोकायत दर्शन]. एका किंवा अनेक प्रमाणांनी प्रमेयाची निश्चिती म्हणजे सिद्धी होते, असा सर्व भारतीय तत्वज्ञानांचा समान सिद्धांत आहे. भारतीय दर्शनांच्यामध्ये प्रमाणे म्हणजे यथार्थ ज्ञानाची साधने किती आहेत, याबद्दल मतभेद आहेत.
भारतीय दर्शनांची आस्तिक व नास्तिक अशी विभागणी करतात. वेद हे ज्ञानाचे प्रमाण आहे, सत्यनिश्चयाचे साधन आहे, असा सिद्धांत स्वीकारणारी मुख्यतः सहा दर्शने आहेत : ⇨गौतमाचे ⇨न्यायदर्शन, ⇨कणादाचे ⇨वैशेषिक दर्शन, ⇨कपिलाचे ⇨सांख्य दर्शन, ⇨पतंजलीचे ⇨योग दर्शन, ⇨जैमिनीची धर्ममीमांसा किंवा कर्ममीमांसा आणि ⇨बादरायण आचार्यांची ब्रह्ममीमांसा ही सहा दर्शने वेद हे सत्यज्ञानाचे साधन आहे, असे मानतात. [⟶ पूर्वमीमांसा]. मात्र न्याय, वैशेषिक, सांख्य व योग ही चार आस्तिकदर्शने आपल्या विश्वविषयक तत्वांचा व्यूह वेदांच्या आधाराने न मांडता, स्वतंत्र रीतीने, तार्किक पद्धतीने सिद्ध करतात. बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांवर अनेक आचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत. ज्यांनी भाष्यद्वारा आपली निरनिराळी तत्वज्ञाने मांडली आहेत, ती पुढीलप्रमाणे : ⇨शंकराचार्य यांनी ⇨केवलाद्वैतवाद, ⇨रामानुजाचार्य यांनी व नीलकंठ यांनी ⇨ विशिष्टाद्वैतवाद, ⇨ मध्वाचार्य यांनी ⇨द्वैतवाद, ⇨निंबार्क यांनी भेदाभेदब्रह्मवाद इ. वेदान्त दर्शने सिद्ध केली आहेत. या वरील षड्दर्शनांपैकी कपिलांचे सांख्य दर्शन व ⇨कुमारिल भट्टांचे कर्ममीमांसा ईश्वराचे अस्तित्व मान्य करीत नाहीत परंतु कर्मसिद्धांत आणि जीवात्म्याचे अमरत्व मान्य करतात. वेदांचे प्रामाण्य न मानणारी बौद्ध, जैन व चार्वाक यांची दर्शने होत. [⟶ जैन दर्शन बौद्ध दर्शन].
माधवाचार्यांना सर्वदर्शनसंग्रहनामक ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी एकंदर सोळा तत्वदर्शने परिगणित केली आहेत : चार्वाक, बौद्ध, जैन, रामानुज, पूर्णप्रज्ञ (मध्व), नकुलीशपाशुपत, शैव, प्रत्यभिज्ञा किंवा काश्मीर शैव, रसेश्वर, वैशेषिक, नैयायिक, जैमिनी, पाणिनी, सांख्य, योग आणि शांकर.
आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानेतिहासकार ⇨ भगवद्गीता आणि ⇨ योगवासिष्ठ यांमध्ये निराळी महत्त्वाची तत्त्वज्ञाने आहेत, असे मानतात. चरकसंहितेमध्ये म्हणजे आयुर्वेदातदेखील विशिष्ट तत्त्वज्ञान प्रतिपादले आहे, असे दाखवून देतात.
ज्ञानाकरिता ज्ञान’ ही प्रेरणा पश्चिमी तत्त्वज्ञानामध्ये प्रमुख आहे, असे जे म्हटले जाते त्याला फारसा आधार नाही. उदा., प्लेटो-अँरिस्टॉटल माणसाच्या अंतिम हिताच्याच शोधासाठी विश्वाच्या अंतिम सत्याचा शोध घेतात. हीच गोष्ट आधुनिक तत्त्वज्ञानाचे प्रणेते देकार्त यांच्या तत्त्वज्ञानापासून कांट-हेगेलपर्यंतच्या तत्त्वज्ञानामध्येही स्पष्टपणे दिसून येते. अंतिम सत्य व अंतिम हित यांचे अद्वैत शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
जेव्हा एखादे साधन निश्चितपणे साध्याकडे नेते, ज्या साधनांनी निश्चितपणे साध्याची सिद्धी होते, असा माणसांना वारंवार नियमित अनुभव येतो, तेव्हा साध्य किंवा साधने हीसुद्धा साध्येच बनतात. ज्ञानेंद्रिये ही प्रत्यक्ष अनुभवाची साधने आहेत, प्रत्यक्ष अनुभव हे साध्य आहे. ज्ञानेंद्रियाची जपणूक मनुष्य किंवा प्राणी पुढील साध्याचा विचार न करता प्रणपणाने करतो. म्हणून ज्या साधनांचा व साध्यांचा नियत संबंध असतो, ती साधनेसुद्धा साध्येच असतात. ज्ञान हे जीवनाच्या यशाचे, सर्वपुरुषार्थसिद्धीचे मुख्य साधन असल्यामुळे ते माणसाचे साध्यही आहे. म्हणून ज्ञानाकरिता ज्ञान हा विचार सर्वच सुसंस्कृत माणसांना मान्य होण्यासारखाच आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्येसुद्धा ज्ञान हे निःश्रेयसाइतकेच इष्ट मानले आहे.
भारीतय तत्त्वज्ञाने, चार्वाकचे भौतिकवादी दर्शन वगळल्यास, तत्त्वज्ञानाने बंधमुक्ती किंवा मोक्षप्राप्ती होते असे मानतात. ज्ञानाकरिता ज्ञान अशी प्रवृत्ती असली, तरच सत्याचा मोकळेपणाने शोध येणे अधिक शक्य होते परंतु विशिष्ट उद्देशाने सत्याचा शोध घेण्याने त्या शोधाच्या प्रेरणेला मर्यादा पडतात, असा भारतीय तत्त्वज्ञानावर पश्चिमी चिकित्सक आक्षेप घेतात. परंतु सत्यानुभवाच्या ऐवजी सत्याभास झाला, तर ⇨ मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, असाही विचार भारतीय मोक्षसिद्धांतामध्ये गर्भित आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य असे, की सर्वच परस्परविरोधी दर्शनांचे मुक्त चिंतन या दर्शनांच्या मुख्य प्रतिपादनामध्ये केलेले असते. मोक्ष हे अंतिम उद्दिष्टसुद्धा साधकबाधक प्रमाणांनी चर्चिलेले असते. कोणत्याही एका तत्त्वदर्शनामध्ये स्वतःशी विरोधी असलेले तत्त्वदर्शनांचे सिद्धांत युक्तिवादासह समर्पित करून खंडित केलेले असतात. वेदप्रामाण्य मानणाऱ्या दर्शनांमध्ये वेद का प्रमाण नाहीत यासंबंधी अवैदिकांचा पूर्वपक्ष मांडलेला असतो आणि ईश्वर न मानणाऱ्या दर्शनांमध्ये ईश्वराचे समर्थन करणारा विविध प्रकारचा युक्तिवादही विवेचिला असतो. अशी ही भारतीय तत्त्वदर्शने म्हणजे विचारस्वतंत्र्याचे जग होय, असे म्हणता येते. द्वैतवादी दर्शने अद्वैतसमर्थक युक्तिवादाचा संपूर्ण परामर्श घेतल्याशिवाय राहत नाहीत. ही वादपद्धती वाराणसी, कांची इ. ठिकाणच्या भिन्नभिन्न मतवादी आचार्यांच्या मठांमध्ये अजूनही अवलंबली जाते, हे दृश्य लक्षात घेण्यासारखे आहे.माधवाचार्यांच्या सर्वदर्शनसंग्रहाच्या प्रारंभी चार्वाकदर्शनाची मांडणी केली असून त्यात चार्वाकप्रणीत किंवा बृहस्पतिप्रणीत वेदनिंदाही मुक्तपणे उद्धृत केली आहे.
बहुतेक महत्त्वाच्या भारतीय तत्त्वदर्शनांचे वैशिष्ट्य असे, की त्यांत प्रमाणविद्या किंवा ज्ञानसाधनांची तत्त्वे प्रतिपादिलेली असतात. माणसाची जीवनयात्रा ज्ञानसाधनांच्या म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान व शब्द यांच्या योगाने चालते. ज्ञानसाधनांच्या मध्ये दोष राहिल्यास यथार्थ ज्ञान म्हणजे सत्याचे ज्ञान न होता विपरित भान किंवा ⇨ भ्रम होतो. त्यामुळे पुरुषार्थसिद्धी होत नाही. माणसाच्या जीवनयात्रेच्या सफलतेसाठी ज्ञानसाधने युक्त रीतीने वापरण्याची आवश्यकता सिद्ध होते असा विचार मनाशी बाळगून सांख्य, योग, न्याय-वैशेषिक, वेदान्त, पूर्वमीमांसा, बौद्ध, जैन व चार्वाक ही दर्शने प्रमाणविद्येची मांडणी करतात. या मांडणीला तर्कशास्त्र किंवा न्यायशास्त्रही म्हणतात. भारतीय प्रत्येक दर्शनाचे विशिष्ट तर्कशास्त्र असते. [⟶ प्रमाणमीमांसा ].
संदर्भ : 1. Dasgupta, S. N. A History of Indian Philosophy, 5 Vols., Delhi, 1975.
2. Radhakrishnan S. Indian Philosophy, 2 Vols., London, 1923, 1927.
३. माधवाचार्य, सर्वदर्शनसंग्रह : , आनंदाश्रम प्रत, पुणे, १९२८.
जोशी, लक्ष्मणशास्त्री