भारतीय मजदूर संघ : भारतातील एक कामगार संघटना. ती १९५५ मध्ये स्थापन झाली. जनसंघाच्या विचारसरणीचे व हिंदू राष्ट्रवाद मानणारे जे कार्यकर्ते कामगार चळवळीत होते, त्यांनी एकत्र येऊन ही संघटना उभारली. निर्भेळ राष्ट्रीयत्व आणि जुन्या परंपरांबद्दल आदर ही या संघटनेची वैशिष्टये आहेत. सर्वसामान्य कामगारांपेक्षा मध्यमवर्गीय कामगारांमध्ये या प्रवृत्ती अधिक आढळतात, त्यामुळे इतरांपेक्षा त्या कामगारांना या संघटनेविषयी अधिक आकर्षण वाटते.

हा एक मुद्दा सोडला, तर भारतीय मजदूर संघामध्ये समाविष्ट झालेल्या अनेक कामगार संघटनांचे कार्य इतर कामगार संघटनांप्रमाणेच चालते. या संघटनेतील कामगारदेखील पगार, भत्ता, बोनस इत्यादींमध्ये वाढ करण्याच्या मागण्या मालकापुढे ठेवतात आणि त्या मिळविण्यासाठी सभा, निदर्शने, संप इ. मार्गांचा अवलंब करतात. त्यांच्याही बऱ्याच राज्यांत प्रादेशिक व इतर संघटना आहेत.

जून १९७५ ते जानेवारी १९७७ या काळात भारतीय मजदूर संघाने धिटाईने आणिबाणीविरोधी कार्य केले. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आणि आज तो भारतीय कामगार चळवळीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करीत आहे. १९७७ मध्ये भारतीय मजदूर संघाची सदस्य-संख्या ८.६ लक्ष होती.

कर्णिक, व. भ.