भवाई : गुजरात-राजस्थानमधील लोकनृत्यनाट्याचा एक पारंपरिक प्रकार. असाईत ठाकूर या गुजराती साधूला भवाईचा जनक मानतात. गुजराती भवाई नाट्याची कथा बहुधा लोकगीतांवर
आधारलेली असून ती चार टप्प्यांत विभागलेली असते. पहिल्या टप्प्यात हंसोली व नरवाहन यांचा विवाह आणि दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत त्यांच्या हंसराज व वच्छराजनामक जुळ्यांच्या तीन जन्माची कथा, असा तो क्रम असतो.
या मूळ गुजराती लोकनाट्याला मात्र राजस्थान-माळव्यामध्ये नृत्यनाट्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाचगाणे करणाऱ्या एका नागाजी नावाच्या जाटाने सु. चारशे वर्षापूर्वी त्याला हे स्वरूप दिल्याचा उल्लेख मिळतो. तेव्हापासून तेथे भवाईचे संघ निर्माण झाले व ते गावोगावी भवाई नृत्यानाट्याचे खेळ करून लोकानुरंजन करू लागले त्यामुळे तेथील लोकनर्तकांमध्ये भवाईला एक स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. आईन-इ-अकबरीत भवाईचा जो उल्लेख आढळतो, त्यावरून हे स्पष्ट होते. गुजरातमधील तरगाळा ज्ञातीतील लोक परंपरागतरीत्या भवाईचे खेळ अद्यापही करीत असतात.
गुजरातमधील भवाई लोकनाट्य व राजस्थानातील भवाई नृत्यनाट्य यांच्या खेळात फारसा फारक नसतो. दोन्ही प्रकारच्या भवाई-खेळांना विशिष्ट असा रंगमंच नसतोच. एखादा रस्ता वा गल्लीबोळ किंवा धर्मशाळा वा मंदिरासमोरील पटांगण अथवा नदीकाठची मोकळी जागा त्यासाठी पुरेशी ठरते तर फाटकेतुटके मोठेसे फडके किंवा सतरंजी पडद्याचे काम पार पाडू शकते. ज्या पात्रांचे काम संपले असेल, ती पात्रे या पडद्यामागे जातात व त्यांच्या जागी नवी पात्रे येतात.
प्रत्यक्ष खेळाला सुरुवात करण्यापूर्वी सु. १० चौरस फूट (सु. ३.४८ चौ.मी.) जागा एखाद्या विटकरीने स्वच्छ करून तेथे रंगदेवीची स्थापना करतात. या रंगदेवतेच्या आसनाखाली एक शुभचिन्ह म्हणून त्रिशूळ व आसनामागील पडद्यावर कुंकवाने वेलबुट्टी चितारतात. नंतर दिवा लावून दोन प्रार्थना गीतांनी रंगदेवतेची प्रतिष्ठा करण्यात येते. ही रंगभूमी ते अत्यंत पवित्र मानतात. तेथे तेवणारा दिवा प्रारंभापासून अखेरपर्यंत म्हणजे खेळ संपल्यावर दुसऱ्या दिवशी मुख्य पात्राने आपल्या पायातील चाळ सोडीपर्यंत तेवत ठेवण्याची प्रथा आहे.
भवाईतील पात्रांची रंग-वेशभूषादेखील अत्यंत साधी असते. आपल्या चेहऱ्यावरील केस झटून तो स्वच्छ व्हावा म्हणून ते चेहऱ्याला हरताळ फासतात व मगच त्यावर खडू वा पिवळ्या मातीचे रोगण चढवितात. त्यानंतर खडू, कुंकू व काजळ यांच्या रंगरेषा ओढून तो रंगवितात. विदूषकाचा चेहरा इतर पात्रांच्या तुलनेने भडक रंगांनी रंगविण्यात येतो. वेशभूषेसाठी हे लोक वेळेवर उपलब्ध होणारे कपडे व दागिने वापरतात.
खेळाच्या प्रारंभी पाचसात गाणी गाऊन ते देवीची स्तुती करतात. नंतर गणेशाचा प्रवेश होतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्याभोवती काकड्याचा भडक प्रकाशझोत फिरविण्यात येतो. त्यानंतर पाठोपाठ अशी इतर काही प्रसंगदृश्ये दाखविण्यात येतात. प्रत्येक दृष्यात ‘रंगलो’ म्हणजे विदूषक हा असतोच. तो आपल्या अभद्र थट्टामस्करीने, अशिष्य हालचालीने व ग्राम्य हावभावाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत हसवीत ठेवतो. भवाई खेळाचे यश बऱ्याच अंशी या ‘रंगलो’ वरच अवलंबून असते. भवाई नाट्यतील प्रत्येक पात्राचे संभाषण उत्स्फूर्त असते. त्यामुळे ऐनवेळेवर आठवले ते बोलले जाते. क्वचित एखादे पात्र आपल्या काही विशिष्ट संकेतांची नोंद करुन ठेवते. अर्थात ती त्याच्या स्वतःपुरतीच असते. स्त्रीवेशधारी पात्र नाचताना प्रेक्षकांना सामोरे जाऊन अभिनय करते. त्यावेळी ते तेलात भिजविलेला काकडा स्वःभोवती कौशल्याने फिरविते, त्यामुळे प्रेक्षकांना त्याचा चेहरा उजळून दिसतो. कोणत्याही खेळात नायक, नायिका व विदूषक अशी तीनच पात्रे असतात. भवाई नृत्यनाट्यातील गीते तालासुरात गायिली जातात. प्रायः ती पंचमात वा धैवतात असतात. पात्रांचे शब्दोच्चार स्पष्ट व शुद्ध असतात. हावभावही वेधक वाटतात. संवाद बहुधा पद्यात्मकच असतात. कधी कधी ते गद्यात्मक असले, तरी तालासुरावरच लयबद्धतेने म्हटले जातात. आपल्या जीभेवर सरस्वती आणि मुद्रेवर शक्तीचा वास आहे अशी त्यांची गाढ श्रद्धा असते.
भवाईची संहिता मौखिक परंपरेनेच आलेली असते. तिला ‘वेश’ म्हणतात. त्यांची संख्या ३६० पर्यत जाते. झुला झुलण नो वेश हा ‘भवाई वेश’ गुजरातमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. प्रायः या सर्वच वेशांतून (भवाई खेळांतून) दैनंदिन जीवनातील सामाजिक-धार्मिक घटना-प्रसंगांवर उपरोधिक भाष्य केलेले असते. उदा., बोराबोरी (लोकांना लुबाडणारे व्यापारी दांपत्य), सूरदास (आंधळ्या कुप्रसिद्ध साधूची कथा), डोकरी (तरुण मुलीचा वृद्ध नवरदेवाशी विवाह), लाडालाडी (बहुपत्निकत्वाचे दुष्परिणाम) आणि शंकरिया (गारूडी प्रियकर व जोगीन प्रेयसी यांची भडक शृंगारकथा) इत्यादी. यांखेरीज हास्याबरोबरच प्रेमभावाची उत्कटताही प्रदर्शित करणारी बीकाजी, बाधाजी वा ढोलामारू या व्यक्तिरेखांतून आणि केवळ मनोरंजन करून सोडणारा तलवारीचा नाच, सात मडक्यांचा नाच, जळत्या बाटलीचा नाच व सप्तरंगी पगडयांचे कमल-नृत्य इ. नृत्यांतून भवाईचे खास वैशिष्टय प्रकट होते. या नृत्यांच्या वेळी लोकगीतांच्या साथीला सारंगी, नफीरी (सनई), ढोल व मंजीरा (चिपळ्या) या वाद्यांचा वापर करण्यात येतो. भवाईच्या नृत्यनाटयांत अश्लील मुखध्वनी व अभद्र पदन्यास हे अपरिहार्यपणे असतातच.
ही अश्लीलता व ही अभद्रता पाहून तिचा कायापालट करण्याचा प्रयत्न गेल्या शतकात काही समाजधुरीणांनी केला. त्यांपैकी गुजरातचे रणछोडभाई उदयराम हे प्रमुख होत. १८६१ मध्ये ते भवाईच्या निराशाजनक स्वरूपामुळे चांगल्या नाट्यलेखनाकडे वळले व त्यांनी जयकुमारी, हरिश्चंद्र, ललिता दुःखदर्शन इ. नाटकांची निर्मितीही केली. तसेच जनसामान्यांतील भवाईचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने दलपतराम, नर्मदाशंकर, मणिभाई, नभुभाई, विभाकर प्रभृतींनी रंगभूमीला नवे रूप देण्याचा प्रयत्न केला. सुप्रसिद्ध नाटककार ⇨ चंद्रवदन मेहता यांनी तर भवाईच्या धर्तीवर हो-होलिका या नव्या लोकनाट्याचींही निर्मिती केली, तथापि भवाईचा प्रभाव थोडादेखील कमी झाला नाही. या नवीन नाटकांनी नागरजनांची मने काबीज केली असली व ही नवीन रंगभूमी नागरी संस्कृतीमध्ये विकास पावू लागली, तरी ग्रामीणजनांत भवाईच्या ‘भवादू’ परंपरेने आपले अस्तित्व टिकवून धरले होतेच. खरे तर भवाईमध्ये साहित्याच्या दृष्टीने मूल्यमापन करण्याजोगी बरीच सामग्री आहे, परंतु तिचा अंतर्भाव मात्र साहित्यात केला जात नाही.
पहा : लोकमान्य.
संदर्भ : परमार, श्याम, लोकधर्मी नाट्य-परम्परा, वाराणसी, १९५९.
जोशी, चंद्रहास
“