भगवई वियाहपण्णत्ति : श्वेतांवर जैनांच्या अकरा अंग -ग्रंथातील क्रमाने पाचवा ग्रंथ. ‘भगवती व्याख्याप्रज्ञप्ती’ हे ह्या ग्रंथाच्या नावाने संस्कृत रुप होय. वियाहपण्णत्ति हे ह्या ग्रंथाचे मूळ नाव.’भगवई’ हे ह्या ग्रंथाचे पूज्यभावनिदर्शक असे विशेषण. ते ह्या ग्रंथनामाचाच एक भाग बनले. तसेच हे विशेषण, परंपरेने ह्या ग्रंथाचे एक पर्यायी नाव म्हणूनही रुढ झाले. ह्या ग्रंथात ४१ शतके (प्रकरणे) असून प्रत्येक शतकात ‘उद्देशक’ अथवा ‘वर्ग’ असे विभाग आहेत. जैन आगमातील अंग-ग्रंथांचा काळ इ. स. पू. ३०० वर्षे होय, असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते. प्रस्तुत ग्रंथाची आरंभीची वीस शतके अत्यंत प्राचीन असून त्यांचा काळ इ. स. पू. ३०० वर्षे होय, असे मानता येईल.

जीव, अजीव, संसार, कर्म, स्वर्ग, नरक इ. ज्ञेय पदार्थांच्या व्याख्यांचे (वियाह) समग्र निरुपण (पण्णत्ति) ह्या ग्रंथात केलेले असल्यामुळे वियाहपण्णत्ति हे त्याचे नाव अन्वर्थक ठरते. हे व्याख्या निरुपण प्रश्नोत्तररुप आहे. गौतम गणधर हे भगवान महावीरांना जैन सिद्धातांविषयी अनेक प्रश्न विचारतात व महावीर त्यांची उत्तरे देतात. त्याचप्रमाणे महावीर गावागावंतून विहार करीत असताना अनेक लोक त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. ह्या प्रश्नांची उत्तरेही ह्यात ग्रथित केलेली आहेत. भिन्न भिन्न गावांतील प्रश्नकर्त्यांनी, भिन्न भिन्न वेळी, भिन्न भिन्न विषयांवर हे प्रश्न विचारलेले असल्यामुळे ह्या संपुर्ण ग्रंथात सुसूत्रपणा आढळत नाही परंतु काही शतकांत मात्र विचारांची सुसूत्रता आढळते. श्वेतांबर जैन संप्रदायाचे स्वरुप ह्या ग्रंथात स्पष्ट केलेले आहे. प्राचीन सिध्दांत आणि परंपरा ह्याबरोबरच अनेक नव्या गोष्टींचीही भर त्यात घातलेली असून पन्नवणा, जीवाभिगम, उववाइय, रायपसेणइय, नंदी, दसाओ ह्या ग्रंथांचा त्यात निर्देश आहे. तसेच ह्या ग्रंथात जीवन शुद्धीची मीमांसा असून त्या अनुषंगाने विश्वविचार अथवा सृष्टिविज्ञानासंबंधीची महत्त्वाची चर्चा करण्यात आली आहे.पार्श्वाचे अनुयायी, गोशाल (मकखालिपुत्त गोसाल, आजीविक), जामाली ह्यांसारख्या अन्य पंथांच्या नेत्यांशी अथवा संस्थापकांशी महावीरांचे झालेले ऐतिहासिक वादविवादही ह्यात अंतर्भुत आहेत. भारतीय धर्मांच्या व तत्वज्ञानांच्या इतिहासाच्या दृष्टिने ते महत्त्वाचे आहेत. तथापि ते एकतर्फी असल्यामुळे विवेचक दृष्टिने सत्य इतिहास त्यांतून वेगळा काढावा लागतो. एके काळी ह्या पंथाचे अनुयायी एकमेकांना फार जवळचे होते, असे अनुमान ह्या संवादांवरुन निघते. ह्या ग्रंथातून महावीराच्या जीवनासंबंधी खूप माहिती मिळते. त्यांच्या भव्योदात्त व्यक्तिमत्वाचे जे प्रत्ययकारी दर्शन ह्या ग्रंथाने घडविले आहे, तसे जैनांच्या अन्य आगमग्रंथांत क्कचित घडविलेले दिसेल. ह्या ग्रंथात महावीरांना वैशालीचे रहिवासी व त्यांच्या श्रावक शिष्यांना वैशालीय श्रावक म्हटले आहे, अनेक ठिकाणी प्रार्श्वनाथांचे शिष्य व अनुयासी चातुर्यास धर्मांचा त्याग करुन महावीरांच्या पाच महाव्रतांचा स्वीकार करतात, असे उल्लेख आले आहेत. त्यावरुन महावीरांपूर्वी निर्ग्रंथ प्रवचन अस्तित्वात असल्याचे सिद्ध होते. महावीरांच्या अनेक अनुयांविषयीची माहितीही ह्या ग्रंथात मिळते.

श्वेतांवर जैनांच्या नऊ अंगग्रंथांवर अभयदेवाने टीका लिहिल्याचे प्रसिद्धच आहे. भगवई वियाहपण्णत्ति ह्या अंगग्रंथावरील आपली वृत्ती त्याने १०७१ मध्ये लिहिली. ती पांडित्यपूर्ण नसली, तरीही हा ग्रंथ समजून घेण्याच्या दृष्टीने उपकारक ठरते .

कुलकर्णी,वा.म.