भटका पाषाण : (पाहुणा पाषाण). मूळ स्थानिक खडकांपेक्षा अगदी वेगळा व सामान्यपणे हिमनदीने वा हिमनगाने दूरवर वाहून आणलेला मोठा खडक. असे खडक हिमनदीने वाहुन आणलेल्या गाळात रूतलेले, जमिनीवर पडलेले किंवा डळमळीत स्थितीत जमिनीवर उघडे पडलेले आढळतात. असे पाषाण प्रलयकारी पूर अथवा हिम-तराफे यांनी वाहून आणल्याचे पूर्वी मानीत. ते हिमनदीने अथवा हिमनगाने वाहून आणले असावेत, असे सर्वप्रथम जे. एल्. आर्. आगास्सिझ यांनी १८४७ साली प्रतिपादिले. सर्वसाधारणपणे २५ सेंमी. पेक्षा जास्त व्यास वा लांबी असणाऱ्या अशा खडकाला ‘भटका पाषाण’ म्हणतात व ३० मी.पेक्षा जास्त लांबीचे व हजारो टन वजनाचे भटके पाषाण आढळले आहेत. काही प्रचंड आकारमानाचे भटके पाषाण तर स्थानिक खडकाचे उघडे पडलेले भागच वाटतात. भटके पाषाण त्यांच्या मूळ स्थानांपासून ८०० किमी. पर्यंत दूर गेलेले आढळतात (उदा., फ्रान्समधील जुरा पर्वताच्या उतारावरील ग्रॅनाइटाचे भटके पाषाण १०० किमी., तर उत्तर अमेरिकेतील ३२० किमी. दूरवर आल्याचे आढळले आहे). मोठे भटके पाषाण पाण्याच्या प्रवाहाने इतके दूरवर वाहून जाणे शक्य नाही. ते हिमनदीद्वारे वाहून गेल्याचे मानतात. भटके पाषाण धारदार कडांचे असून काहींवर ओरखडे पडलेले आढळतात. ही हिमनदीमुळे होणाऱ्या झिजेचीच वैशिष्ठ्ये आहेत. हिमनदीने झीज होताना खडक फुटतात व घासलेही जातात. त्यामुळे दूरवर गेलेले मोठे भटके पाषाण हे या क्रियांना विरोध करणाऱ्या ग्रॅनाइटामारख्या कठीण खडकांचे असतात.
वैशिष्ठ्यपूर्ण भटक्या पाषाणांच्या मूळ स्थानांचा मागोवा घेता येतो व त्यांच्या साहाय्याने त्यांना वाहून आणणाऱ्या हिमस्तरांच्या सर्वसाधारण हालचालींची दिशा व पर्यायाने हिमनदीचा मार्ग शोधता येतो. अशा तऱ्हेने पूर्वी होऊन गेलेल्या हिमयुगातील हिमस्तरांचा विस्तार व त्यांच्या हालचाली जाणून घेण्यासाठी भटके पाषाण उपयुक्त ठरतात. सु. ६ लाख ते ११ हजार वर्षापूर्वीच्या म्हणजे प्लाइस्टोसीन काळात हिमयुग होऊन गेल्याचे प्रथमतः भटक्या पाषाणांवरून कळून आले तसेच या हिमयुगातील हिमस्तरांचा विस्तार कळण्यासाठी भटके पाषाण उपयुक्त ठरले आहेत.
हिमयुगे होऊन गेलेल्या जगातील बहुतेक प्रदेशांमध्ये भटके पाषाण आढळतात. कॅनडाचा दक्षिण-मध्य व अमेरिकेचा उत्तर-मध्य भाग तसेच इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट येथील पाषाणाचा विशेष अभ्यास झालेला आहे. भारतीय उपखंडात पंजाबच्या मैदानी भागात भटके पाषाण आढळतात. ते प्लाइस्टोसीन हिमयुगाचे अवशेष असल्याचे मानतात. पाकिस्तानातील पोटवार मैदान (विशेषतः अटक जिल्ह्यातील सिंधु नदीच्या डाव्या किनाऱ्यालगतचा प्रदेश), सिक्कीम व भूतान येथील पठारी प्रदेशांत भटके पाषाण आढळले आहेत.
पाकिस्तानात कँपवेलपूरपासून वायव्येस काही किमी. अंतरावर असलेल्या नुरपूर कामालिया येथे गाळाच्या जमिनीवर आढळलेल्या भटक्या पाषाणांपैकी ग्रॅनाइटाचा एक पाषाण १५ मी. घेराचा व सु. २ मी. उंच, तर बेसाल्टाचा एक १४ मी. घेराचा व सु. ४ मी. उंच आहे. कँपवेलपूरच्या पूर्वेस पट्टिताश्मी ग्रॅनाइट, व स्लेट खडकांचे भटके पाषाण मूळच्या स्थानिक चुनखडकांवर, तर वायव्य पोटवारमधील जंड खेड्याभोवतीचे ग्रॅनाईट, सायेनाइट, सुभाजा इ. प्रकारच्या खडकांचे भटके पाषाण मूळच्या वालुकामय खडाकांवर आढळले आहेत. शिवाय या प्रदेशात काही ठिकाणी गाळाखाली काही मीटर खोलीवर २५ मी. पर्यत घेराचे भटके पाषाण बारीक मृत्तिकेत रुतलेले आढळले आहेत. येथील भटक्या पाषाणांभोवतालच्या कित्येक किमी. पर्यतच्या परिसरात, ज्यांच्यापासून भटके पाषाण यावेत असे खडक कोठेही उघडे पडलेले आढळत नाहीत. मात्र या भटक्या पाषाणांचे प्रकार व संघटन पाहता ते हिमालयातील खडकांपैकी असावेत, असे मानले जाते. माठे भटके पाषाण हिमस्तरांद्वारेच इतक्या दूर अंतरापर्यंत वाहून येणे शक्य आहे. मात्र अटक जिल्ह्यात हिमयुगाचा दुसरा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
हिमालयाच्या पायथ्यालगत आढळलेल्या भटक्या पाषणांच्या उत्पत्तीविषयी पुढिल स्पष्टीकरण दिले जाते. सिंधू व तिच्या उपनद्यांच्या उगमाकडील अरूंद दऱ्यांसारख्या भागात भूमिपाताने अथवा हिमनदिने नदीच्या आडव्या दिशेत आणून टाकलेला गाळ व डबर साचल्याने नैसर्गिक बंधारा तयार होतो आणि त्याच्या मागे प्रचंड सरोवर निर्माण होते. हिमयुगातील शीत हवामानाने हिवाळ्यात अशा सरोवरांतील पाणी गोठून जाई. त्यामुळे सरोवरांतील व बंधाऱ्यातील मोठे खडक व खडकांच्या राशी बर्फात गुरफटल्या जात. उन्हाळ्यात बर्फ वितळून बंधाऱ्यामागील पाण्याचा दाब वाढल्याने किंवा इतर कारणाने हा बंधारा फुटला की, पूर येई आणि पाण्यामधील बर्फाबरोबरच त्यात गुरफटले गलेले खडकही वाहून खाली येते. नदी जेथे डोंगराळ भागातून मैदानी भागात प्रवेश करते, तेथे सामान्यपणे हे दगड पडलेले आढळतात. कारण बर्फ वितळून पाणी बनल्याने बर्फात गुरफटलेले खडक सुटे होत आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग घटल्याने पाण्याने खडक वाहून वा ढकलून पुढे नेले जाणे शक्य नसे. १८४१ व १८५८ साली असे पूर आल्याच्या नोंदी आहेत. नंगा पर्वताचा सुळका तुटून नदीत पडल्याने निर्माण झालेला बंधारा भूकंपाने फुटून १८४१ सालचा पूर आल्याचा उल्लेख आहे.
ठाकूर, अ. ना.