ब्लॉक, कॉनरॅड एमिल : (२१ जानेवारी १९१२ – ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. ⇨ कोलेस्टेरॉल व ⇨ वसाम्ले यांच्या चयापचयाची (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक रासायनिक घडामोडींची) यंत्रणा व नियंत्रण यांसंबंधीच्या शोधांबद्दल १९६४ सालचे वैद्यक वा शरीरक्रयाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक ब्लॉक यांना
⇨ फेओडोर लायनेन यांच्या समवेत विभागून मिळाले.
ब्लॉक यांचा जन्म जर्मनीतील निसे येथे झाला. १९३४ मध्ये म्यूनिका येथील तांत्रिक विद्यालयातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी या विषयाची पदवी मिळवली. काही काळ स्वित्झर्लंडमध्ये राहून १९३६ मध्ये ते अमेरिकेला गेले. १९३८ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची जीवरसायनशास्त्राची पीएच्. डी. पदवी मिळविली व तेथेच १९४६ पर्यंत त्यांनी संशोधन केले. १९४२ मध्ये त्यांनी डेव्हिड रिटेनबर्ग यांच्या सहकार्याने कोलेस्टेरॉलच्या जैव संश्लेषणासंबंधीच्या (सजीवाच्या शरीरात घटक द्रव्यांपासून तयार होणाऱ्या प्रक्रियेसंबंधीच्या) संशोधनास प्रारंभ केला. १९४४ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. १९४६ मध्ये शिकागो विद्यापीठात ते जीवरसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक व १९५० मध्ये प्राध्यापक झाले. १९५४ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात जीवरसायनशास्त्राचे हिगिन्स प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि १९६८ साली ते त्या विभागाचे अध्यक्ष झाले.
ब्लॉक १९४० पासून कोलेस्टेरॉलावर संशोधन करीत होते. उंदरावरील प्रयोगान्ती ॲसिटिक अम्ल हा कोलेस्टेरॉलाचा पूर्वगामी पदार्थ असल्याचे त्यांनी रिटेनबर्ग यांच्या सहकार्याने दाखविले. कोलेस्टेरॉलच्या जैव संश्लेषणात एकूण छत्तीस रासायनिक रूपांतरणे असल्याचे अनेक प्रयोगान्ती त्यांनी सिद्ध केले.
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ सर्व प्राण्यांच्या कोशिकांत (पेशींत) आढळतो तसेच आहारातील वसायुक्त (स्निग्ध पदार्थयुक्त) अन्न पदार्थाचा घटक असतो. तो वसाविद्राव्य (वसेमध्ये विरघळणारा) असून जठरांत्र मार्गातून (जठर, लहान आतडे व मोठे आतडे मिळून बनलेल्या, अन्नमार्गातून) त्याचे आतड्यांतील लसीका वाहिन्यांद्वारे [→ लसीका तंत्र] हळूहळू अभिशोषण होते. या बहिर्जात कोलेस्टेरॉलाशिवाय शरीरातील कोशिका संश्लेषणानेही तो तयार करतात व त्याला अंतर्गत कोलेस्टेरॉल म्हणतात. ब्लॉक यांनी या अंतर्जात कोलेस्टेरॉलाच्या जैव संश्लेषणासंबंधी संशोधन केले.
रोहिणीविलेपीविकार या विकृतीत शरीरातील प्रामुख्याने मोठ्या रोहिण्यांच्या अंतःस्तराखाली जागजागी कोलेस्टेरॉलाचे थर साचतात आणि या थरांमध्ये कॅल्शियमाचा संचय होऊन रोहिणी भित्ती कठीण बनतात. यालाच रोहिणी काठिण्य म्हणतात. जवळजवळ निम्मी मानवजात या रोगामुळे मृत्यू पावते. ब्लॉक यांच्या शोधामुळे या विकृतीवरील इलाजांना योग्य दिशा मिळणे शक्य झाले असून अन्नातील कोलेस्टेरॉलाचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.
⇨ अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकापासून उत्पन्न होणारी हॉर्मोने (उत्तेजक स्त्राव) ⇨ अंडकोशाची प्रगर्भरक्षी व स्त्रीमदजन ही हॉर्मोने आणि वृषणात (पुं जनन ग्रंथीत) तयार होणारे वृषणी हे हॉर्मोन यांच्या निर्मितीकरिता कोलेस्टेरॉल अल्प प्रमाणात वापरले जाते. या शरीरक्रियाविज्ञानविषयक ज्ञानाशिवाय टर्पिने, कॅरोटिने, रबर इ. औद्योगिक रासायनिक पदार्थांच्या संश्लेषणाच्या ज्ञानातही ब्लॉक यांच्या संशोधनाने भर पडली आहे.
कोलेस्टेरॉलाशिवाय ग्लुटाथायोन या प्रथिनाच्या चयापचयातील महत्त्वाच्या पदार्थांवर त्यांनी संशोधन केले आहे. अतृप्त (ज्यांच्या शृंखलेतील कार्बन अणू एकमेकांस दोन किंवा तीन बंधांनी जोडले गेलेले असल्याने ज्यात इतर अणूंचा वा अणुगटांचा समावेश होऊ शकतो अशा) वसाम्लांचा जैव उद्गम तसेच जीवरासायनिक क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) विविध बाबी या विषयांवरही त्यांनी संशोधन केले आहे.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा फिट्स पुरस्कार (१९६४), ओहायओ राज्य विद्यापीटाचा विल्यम लॉइड एव्हान्झ पुरस्कार (१९६८) वगैरे बहुमानात्मक पुरस्कार तसेच ब्राझील, नॅन्सी, कोलंबिया इ. विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या मिळालेल्या आहेत. ते अमेरिकन केमिकल सोसायटी, अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स इ. संस्थांचे सदस्य आहेत. ते अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्चे अध्यक्ष (१९६७), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष (१९६६ – ६९) व इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्रीच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष (१९६८) होते.
जीवरसायनशास्त्रासंबंधी अनेक निबंध त्यांनी लिहिले असून लिपीड मेटॅबॉलिझम हा त्यांचा ग्रंथ १९६१ मध्ये प्रसिद्ध झाला.
भालेराव, य. त्र्यं.