ब्लॅक, मॅक्स : ( ? १९०९ -). प्रसिद्ध अमेरिकन तत्ववेत्ते. जन्म रशियातील बाकू या शहरी. ब्लॅक यांचे शिक्षण केंब्रिज, लंडन व गटिंगेन या विद्यापीठांत झाले. १९४६ पासून ते अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. १९४६ पासून काही काळ ते द फिलॉसॉफिकल रिव्ह्यू ह्या नियतकालिकाचे एक संपादकही होते.
ब्लॅक यांच्या तत्वज्ञानावर व्हिट्गेन्श्टाइन यांचा प्रभाव प्रामुख्याने आहे. द नेचर ऑफ मॅथेमॅटिक्स (१९३३) या आपल्या पहिल्या ग्रंथात त्यांनी गणिताच्या स्वरूपाविषयी ज्या वेगवेगळ्या उपपत्ती प्रचलित आहेत – रसेल यांची ‘तर्कशास्त्रवादी’, हिल्बर्ट यांची ‘आकारिकतावादी’ आणि ब्राउव्हेर यांची ‘प्रातिभज्ञानवादी’ – त्यांचा परामर्ष घेतला. ब्लॅक यांची नंतरची कामगिरी व्हिट्गेन्श्टाइनच्या उत्तरकालीन तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. भाषा ही एक वस्तू नाही तर भाषा ही भाषिक व्यवहाराद्वारा मूर्त होते आणि भाषिक व्यवहारात भाषिक प्रयोग नियमांना अनुसरून वापरण्यात येतात, हे ह्या तत्वज्ञानामागील मूलभूत विचारसूत्र आहे. ब्लॅक यांच्या तत्वज्ञानात्मक चिंतनात नियम म्हणजे काय, नियमाचा नियम मांडणाऱ्या वाक्याशी काय संबंध असतो, विशेषतः नियम संदिग्ध किंवा अस्पष्ट असूनही त्याचे नियम हे स्वरूप कसे अबाधित राहते आणि ह्या अस्पष्टतेला प्रयोजन कसे असते, ह्या प्रश्नांची चर्चा प्रामुख्याने करण्यात आली आहे. व्हिट्गेन्श्टाइन यांच्या ट्रॅक्टॅटस लॉजिको- फिलॉसॉफिकस ह्या सूत्रवजा शैलीत लिहिलेल्या ग्रंथावरील ब्लॅक यांचे तपशीलवार भाष्यही अत्यंत उपयुक्त असून ते अ कंपॅनियन टू व्हिट्गेन्श्टाइन्स ट्रॅक्टॅटस ह्या नावाने १९६४ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे इतर महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे क्रिटिकल थिंकिंग (१९४६), लँग्वेज अँड फिलॉसॉफी (१९४९), फिलॉसॉफिकल अनॅलिसिस (संपा. १९५०), प्रॉब्लेम्स ऑफ ॲनॅलिसिस (१९५४), मॉडेल्स अँड मेटॅफर्स (१९६२), द इंपॉर्टन्स ऑफ लँग्वेज (संपा. १९६२), फिलॉसॉफी (संपा. १९६४) इत्यादी. त्यांनी कारनॅप व फ्रेग यांच्या मूळ जर्मन ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही प्रसिद्ध केली. त्यांनी डॉक्टरेटसाठी १९३९ मध्ये लंडन विद्यापीठात लिहिलेला प्रबंध ‘थिअरीज ऑफ लॉजिकल पॉझिटिव्हिजम’ हा अद्याप अप्रकाशित आहे.
रेगे, मे. पुं.