ब्रिटिश कोलंबिया : कॅनडाचा पश्चिमेकडील प्रांत. ४८०१३’ उ. ते ६०० उ. अक्षांश व ११४० प. ते १३९० प. रेखांश यांदरम्यान पसरलेल्या या प्रांताचे क्षेत्रफळ ९४,८५९ चौ. किमी. आहे पैकी १८,०६८ चौ. किमी. पाण्याखाली आहे. लोकसंख्या २६,४२,४०० (१९८० अंदाज). याच्या पूर्वेस ॲल्बर्टा हा कॅनडाचा प्रांत, उत्तरेस यूक्रॉन व नॉर्थ वेस्ट टेरिटरी हे कॅनडाचे प्रदेश, पश्चिमेस पॅसिफिक महासागर व अलास्का, तर दक्षिणेस वॉशिंग्टन, आयडाहो व माँटॅना ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील राज्ये आहेत. याचा किनारा दंतुर असून किनाऱ्याजवळील व्हँकूव्हर व क्वीन शार्लट या बेटांचाही या प्रांतात समावेश आहे. व्हिक्टोरिया (लोकसंख्या २,१८,३०० – १९७७ अंदाज) ही प्रांताची राजधानी आहे.
भूवर्णन : सर्वसाधारणपणे ब्रिटिश कोलंबियाचा बहुतांश भाग हा डोंगरी आहे. याच्या पूर्व व पश्चिम भागांत उंच पर्वत असून, त्या दोहोंच्यामध्ये कमी उंचीचे पर्वत व पठारी भाग आहेत. पूर्वेकडे रॉकी पर्वतरांग आहे. रॉब्सन (३,९५४ मी.) हे या भागातील रॉकी पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर होय. याचा मध्य भाग पठारे तसेच ओमीनेका, बॅबीन, सेलकर्क इ. लहानलहान पर्वतांनी व्याप्त आहे. येथील पठारांची सरासरी उंची १,२१९ मी. आहे. किनारी भागात पर्वतांची उंची २,१३४ मी. ते ३,९६२ मी. यांदरम्यान आहे. या भागात टीडमन (३,९०१ मी.), वॉडिंग्टन (४,४०२ मी.) ही प्रमुख शिखरे आहेत. अलास्का व या प्रांताच्या सरहद्दीदरम्यान असलेले फेअरवेदर (४,६६३ मी.) हे प्रांतातील सर्वोच्च शिखर होय. कोलंबिया, फिल्ली, फ्रेझर, कूटने, पीस, स्कीना, स्टिकीन, निचॅको, चिल्कोटिन, कनेल या ब्रिटिश कोलंबियातील प्रमुख नद्या होत. फ्रेझर व कोलंबिया या नद्यांना जलसिंचन व विद्युत्निर्मितीच्या दृष्टीने महत्व आहे. या प्रांतात अनेक सरोवरे असून त्यांत बॅबीन, ॲट्लिन, तेस्लिन, कनेल, ओकनॉगन, शूस्वॉप, स्टूअर्ट इ. प्रमुख आहेत. येथील हवामानावर जपानी किंवा कुरोसिवो या उष्ण प्रवाहाचा परिणाम झालेला दिसून येतो. असे असले, तरी निरनिराळ्या भागांतील हवामानात पुष्कळच फरक आढळतो. येथील तपमान उन्हाळ्यात ३८० से., तर हिवाळ्यात ३४० से. असते. व्हँकूव्हर बेटावर वृष्टीचे प्रमाण २५० सेंमी. आढळते, मात्र इतर भागात ते केवळ १५ ते ६६ सेंमी. असते. प्रांताचा बहुतेक भाग जंगलव्याप्त असून त्यामध्ये फर, सीडार, स्प्रूस इ. वृक्ष भरपूर प्रमाणात आढळतात. प्रांताच्या अर्थव्यवस्थेत जंगलांना महत्व आहे. येथे बीव्हर, अस्वले, रानमेंढ्या, कॅरिबू, हरिण इ. प्राणी, तर ग्राउझ, तितर इ. पक्षी आढळतात.
इतिहास व राज्यव्यवस्था: या प्रदेशात प्रारंभी इंडियन लोकांचे वास्तव्य होते. किनारी भागात ह्वान पेरेद हा स्पॅनिश नाविक अधिकारी १७७४ मध्ये प्रथम आला, तर कॅ. जेम्स कुक याने १७७८ मध्ये या भागात प्रवास करून त्यावरील ब्रिटनचा हक्क जाहीर केला. तसेच नुट्का साउंड भागात जॉन मीर्झ याने १७८८ मध्ये लोकर व्यापाराचे केंद्र उघडले. परंतु १७८९ मध्ये स्पॅनिशांनी त्यास पिटाळून लावले. त्यामुळे स्पॅनिश आणि इंग्रज यांमध्ये या प्रदेशाच्या हक्कासंबंधी वाद निर्माण झाला. १७९० च्या करारान्वये तो वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जॉर्ज व्हँकूव्हर याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी या भागाचा ताबा घेतला. त्याने या विभागाचे समन्वेषण करून नकाशे तयार केले. अलेक्झांडर मॅर्केझी हा लोकर व्यापारी १७९३ मध्ये येथे आला तर एकोणिसाव्या शतकात नॉर्थ-वेस्ट कंपनीचे लोकर व्यापारी समन्वेषक येथे आले. १८२१ मध्ये हडसन बे कंपनीमध्ये नॉर्थ-वेस्ट कंपनीचे विलीनीकरण करण्यात येऊन तिच्यामार्फत येथील व्यापाराचे नियंत्रण होऊ लागले. १८४३ मध्ये जेम्स डग्लस याने ‘फोर्ट व्हिक्टोरिया’हा किल्ला बांधला. १८४६ मध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन यांच्यामध्ये या प्रदेशाच्या सरहद्दीवरून झगडे निर्माण झालेपरंतु ४९° उ. अक्षवृत्ताच्या अनुरोधाने सरहद्द निश्चित मानून हा झगडा मिटविण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकनांच्या विस्तारवादी धोरणास प्रतिबंध करणाच्या उद्देशाने हडसन बे कंपनीने १८४९ मध्ये व्हँकूव्हर बेटाचा ताबा घेऊन तेथील कारभार सर जेम्स डग्लस या गव्हर्नरकडे सुपूर्त केला. १८४९ ते १८५८ दरम्यान हा प्रांत न्यू कॅलेडोनिया म्हणून ओळखला जात होता. या प्रदेशातील फ्रेझर नदीच्या खोऱ्यात सोन्याच्या खाणीचा शोध लागल्यामुळे (१८५८) प्रांताच्या विस्तार-विकासास चालना मिळाली. फोर्ट व्हिक्टोरियाचे व्हिक्टोरिया शहरात रूपांतर झाले. या काळातच या प्रदेशास ब्रिटिश कोलंबिया नाव पडले आणि यावरील हडसन बे कंपनीचा ताबा संपुष्टात आला. १८६३ मध्ये स्टिकीन नदीकाठची वसाहत, तर १८६६ मध्ये व्हँकूव्हर बेट यांचा या प्रांतात समावेश करण्यात आला. व्हिक्टोरिया ही या विभागाची राजधानी करण्यात आली. खनिज संपत्तीमुळे दळणवळणाच्या साधनांत (उदा., लोहमार्ग) वाढ होऊन औद्योगिक दृष्ट्या हा भाग संपन्न झाला. व्हँकूव्हर बंदराची सर्वांगीण प्रगती झाली. २० जुलै १८७१ रोजी कॅनडियन प्रजासत्ताकात एक प्रांत म्हणून ब्रिटिश कोलंबियाचा समावेश झाला. पनामा कालव्याच्या निर्मितीमुळे (१९१४) येथील व्यापारास अधिकच चालना मिळून या प्रातांची उत्तरोत्तर भरभराट होत गेली. इ. स. १९५२ पर्यंत लिबरल व काँझर्व्हेटिव्ह या प्रमुख पक्षांकडे राजकीय सत्ता असे, परंतु १९२२ मध्ये डब्लू. ए. सी. बेनेट याच्या नेतृत्वाखाली सोशल क्रेडिट पक्षाची नव्याने स्थापना करण्यात आली आणि १९७२ पर्यंत हाच पक्ष सत्तेवर होता. पुढे डेव्हिड बॅरेट याच्या नेतृत्वाखाली १९७२ मध्ये न्यू डेमॉक्रॅटिक पक्षाची स्थापना करण्यात येऊन १९७२ मधील निवडणुका या पक्षाने जिंकल्या. तथापि १९७५ च्या व १९८१ च्या निवडणुकांत विल्यम एच्. बेनेट याच्या नेतृत्वाखालील सोशल क्रेडिट पक्षच सत्तेवर आला. देशाच्या गव्हर्नर जनरलने नियुक्त केलेला लेफ्टनंट गव्हर्नर या प्रांताचा कारभार पाहतो. प्रांतिक विधानसभेत ५५ लोकनिर्वाचित सदस्य असून त्यांची मुदत ५ वर्षांची असते. देशाच्या सीनेटवर येथून सहा सीनेटर व हाउस ऑफ कॉमन्सवर २९ प्रतिनिधी पाठविले जातात.
आर्थिक व सामाजिक स्थिती : ब्रिटिश कोलंबियातील केवळ ४% जमीन लागवडयोग्य असून ती फ्रेझर, कोलंबिया, पीस या नदीखोऱ्यांत व अंतर्गत पठारी भागात आहे. गहू, मका ही धान्ये आणि सफरचंद, चेरी, पीच इ. फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. फळांची निर्यात कॅनडातील इतर प्रांतात व जपान, ग्रेट ब्रिटन या देशांत होते. पशुसंवर्धन व कुक्कुटपालन हे शेतीचे पूरक उद्योग म्हणून सर्वत्र केले जातात. मच्छीमारी व्यवसायात हा प्रांत अग्रेसर असून सामन, हेरिंग, हॅलिबट इ. मासे येथील जलाशयात व समुद्रात विपुल आहेत. प्रांताचा ५८% भाग जंगलमय असल्याने वनसंपत्तीबाबत हा प्रांत समृद्ध आहे. देशातील एकूण लाकूडउत्पादनाच्या निम्मे उत्पादन याच भागातून होते. त्यामुळे लाकूडकटाई, लाकडाचा लगदा व त्यापासून कागदनिर्मिती यांचे कारखाने बरेच असून तोच येथील प्रमुख उद्योग ठरला आहे. प्रांतात खनिज संपत्ती विपुल असून चांदीच्या खनिजाची मोठी खाण किंबर्ली येथे आहे. त्याशिवाय तांबे, सोने, लोखंड, जस्त इत्यादींच्या खनिजांचेही साठे आहेत. कोलंबिया नदीवरील माइका धरणापासून व पीस नदीवरील डब्लू. ए. सी. बेनेटधरणापासून मिळणाऱ्या जलविद्युत् शक्तीच्या विपुलतेमुळे, तसेच नैसर्गिक वायू, खनिज तेल, कोळसा यांमुळे औद्योगिकीकरणास चालना मिळत असून किटिमॅट येथे ॲल्युमिनियम कारखाना तसेच अन्नप्रक्रिया, रसायने, विद्युत्साहित्य इ. उद्योग विकास पावले आहेत. प्रांताचा बहुतेक भाग डोंगराळ असल्याने रस्ते व लोहमार्ग यांत अडथळे निर्माण होतात. १९८० मध्ये ४१,७२० किमी. लांबीचे रस्ते होते. तसेच अलास्का हायवे, ‘ट्रान्स-कॅनडा हायवे’ इ. राष्ट्रीय मार्गही या प्रांतातून जातात. कॅनडियन पॅसिफिक रेल्वे, कॅनडियन नॅशनल रेल्वे, ब्रिटिश कोलंबिया रेल्वे हे प्रांतातील तीन प्रमुख लोहमार्ग आहेत. व्हँकूव्हर व व्हिक्टोरिया येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. सागरी वाहतुकीस प्राधान्य असून, व्हँकूव्हर, न्यू वेस्टमिन्स्टर, व्हिक्टोरिया, प्रिन्स रूपर्ट या बंदरांतून मोठ्या प्रमाणात सागरी वाहतूक केली जाते. प्रांतात १९८० मध्ये १८ लक्ष दूरध्वनी होते. येथे १० दूरचित्रवाणी केंद्रे व १३८ नभोवाणी केंद्रे आहेत. प्रांतातून १९७० मध्ये १७ दैनिके व १०० साप्ताहिके प्रकाशित होत होती. त्यांपैकी द सन, द प्रॉव्हिन्स, व्हिक्टोरिया डेली टाइम्स ही प्रमुख दैनिके होत. प्रारंभीच्या काळात लोकर व्यापारासाठी या प्रदेशात गोऱ्या लोकांचे आगमन झाले. ब्रिटिश कोलंबियात ८०% लोक शहरी भागात राहतात. एकूण लोकसंख्येपैकी ५८% लोक ब्रिटिश असून इतरांत जर्मन, फ्रेंच, डच, इंडियन, एस्किमो इत्यादींचा समावेश होतो. शालेय शिक्षण ६ – १५ वर्षे वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत असून प्रांताच्या अंदाज पत्रकातील सु. ३२% रक्कम शिक्षणासाठी खर्च होते. ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया’(स्था. १९०८), ‘यूनिव्हर्सिटी ऑफ व्हिक्टोरिया’ (स्था. १९६३), ‘नोत्रदाम यूनिव्हर्सिटी ऑफ नेल्सन’, ‘सायमन फ्रेझर यूनिव्हर्सिटी’, तसेच इतर महाविद्यालयांतून उच्च शिक्षण दिले जाते. ब्रिटिश कोलंबिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना १९६४ मध्ये करण्यात आली असून त्यामुळे तांत्रिक शिक्षणाची सोय झाली आहे.
जपानी (कुरोसिवो) उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळे व्हँकूव्हर बेटाचे हवामान आल्हाददायक बनले आहे. तसेच कॅनडाच्या राष्ट्रीय उपवनांत समाविष्ट असलेली ग्लेशर नॅशनल पार्क, मौंट रेव्हल्स्टोक नॅशनल पार्क, कूटने नॅशनल पार्क, योहो नॅशनल पार्क ही उपवने पर्यटकांच्या दृष्टीने विशेष आकर्षक आहेत. व्हँकूव्हर (लोकसंख्या ११,७२,२०० – १९७७ अंदाज) हे सर्वांत मोठे शहर बंदर म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील कलावीथी, संग्रहालयातून आढळणाऱ्या इंडियन कलाकृती व क्वीन्स एलिझाबेथ पार्क महत्त्वाचे असून दरवर्षी ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या प्रारंभी भरणारा ‘पॅसिफिक नॅशनल’ हा प्रदर्शन सोहळा विशेष उल्लेखनीय असतो. व्हिक्टोरिया हे राजधानीचे शहर असून येथे अनेक संग्रहालये, कलावीथी आढळतात. यांशिवाय न्यू वेस्ट मिन्स्टर, प्रिन्स जॉर्ज, प्रिन्स रूपर्ट इ. शहरेही प्रसिद्ध आहेत.
ओक, द. ह. गाडे, ना. स.