ब्रिजटाउन : ब्रिजटाउन : वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील बार्बेडोसची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या १,००,००० (१९८१ अंदाज). बार्बेडोसच्या नैऋत्य भागातील हे शहर कार्लाइल उपसागरावर असून त्याच्या भौगोलिक स्थानामुळे ईशान्य मोसमी वाऱ्यापासून ते सुरक्षित राहिले आहे. १९६१ मध्ये येथे एक खोल बंदर बांधण्यात आले असून त्यात ८ जहाजे राहू शकतात. या शहरापासून १९ किमी. अंतरावर ‘सीवेल’ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
आल्हाददायक हवा, नारळीच्या बागांनी नटलेल्या चौपाट्या, दळणवळणाच्या सुविधा व अमेरिकेसारख्या संपन्न देशाशी समीपता यांमुळे ब्रिजटाउन हे परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण-स्थळ ठरले आहे. वसाहतकाळाच्या आरंभी या शहराजवळच्या खाडीवर एकच दगडी पूल होता, त्यामुळे शहरास‘ब्रिजटाउन’ हे नाव पडले.
प्रारंभी ‘इंडियन ब्रिज’ म्हणून ओळखले जाणारे हे शहर ब्रिटिशांनी १६२८ मध्ये वसविले. १६६६, १७६६ व १८४५ मध्ये आगींमुळे, तर १७८० व १८३१ मध्ये झंझावातांमुळे (हरिकेन) या शहराची मोठी हानी झाली. तथापि बंदराचा विकास झाल्यामुळे व साखर उद्योगधंद्यामुळे, या शहराची उत्तरोत्तर भरभराट होत गेली. साखर उद्योगामुळे मद्यार्क, रम, काकवी, कार्डबोर्ड इ. उद्योग येथे विकसित झाले असून हे सर्व पदार्थ येथून निर्यात केले जातात.
वेस्ट इंडीज विद्यापीठ व इंग्लंडमधील डरहॅम विद्यापीठ यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये येथे आहेत. येथील सेंट मायकेल चर्च, ज्यूंचे सिनॅगॉग, सेंट मेरी चर्च, जॉर्ज वॉशिंग्टन हाउस व ट्रफॅल्गर चौकातील नेल्सनचा पुतळा इ. पर्यटकांची आकर्षणे होत.
गाडे, ना. स.
“