ब्राँटी, ॲनः (१७ जानेवारी १८२०-२८मे १८४९). इंग्रजी कादंबरीकर्त्री. शार्लट ब्राँटी आणि एमिली ब्राँटी ह्या दोन कादंबरीलेखिका तिच्या ज्येष्ठ भगिनी. ॲनचा जन्म थॉर्नटन येथे झाला. तिचे शिक्षण घरीच झाले. शार्लट, एमिली आणि ॲन ह्या तिघींनी पुरुषी टोपण नावे घेऊन प्रसिद्ध केलेल्या कवितासंग्रहातील ‘ॲक्टन बेल’च्या कविता ॲनच्या होत. या  कवितांतून तिच्या धर्मश्रद्ध मनाचा प्रत्यय येतो. ॲग्नेस ग्रे (१८४७) आणि द टेनंट ऑफ वाइल्डफेल हॉल (१८४८) ह्या दोन कादंबऱ्या ॲनने लिहिल्या. त्यांतून तिचा वास्तववादी लेखनाकडील कल आणि नीतिवादी दृष्टिकोण प्रत्ययास येतो.

क्षयाच्या विकाराने स्कारबरो येथे ती निधन पावली.

 

संदर्भ : 1. Gerin, W. Anne Bronte, London, 1959.

           2. Hale, W. T.  Anne Bronte, Bloomington, 1929,

कुलकर्णी, अ. र.