ब्राए, ट्यूको : (१४ डिसेंबर १५४६-२४ ऑक्टोबर १६०१). डॅनिश ज्योतिर्विद. नवताऱ्याचे (ज्याची तेजस्विता अचानकपणे १० हजार ते १.५ लाख पटींनी वाढते अशा ताऱ्याचे) व धूमकेतूचे वेध स्वतः बनविलेल्या उपकरणांनी घेऊन त्यांच्या विवेचनाद्वारे त्यांनी ‘अवकाश हे अविकारी (ज्यांच्यात बदल होणार नाही अशा) व घन गोलांनी भरलेले आहे’या पारंपारिक मताचे खंडन केले. ⇨निकोलेअस कोपर्निकस यांच्या सूर्यकेंद्रीय (सूर्य हा विश्वाच्या मध्याशी आहे हे मानणाऱ्या) कल्पनेला या वेधांमुळे पुष्टी मिळालीतसेच या वेधांवरून केप्लर यांनी ग्रहांच्या गती व कक्षा यांविषयीचे आपले नियम मांडले. परिणामी न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या उपपत्तीचा पाया घातला गेला. अशा तऱ्हेने ब्राए हे सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वांत महत्त्वाचे ज्योतिर्विद होते.

ट्यूको ब्राए

ब्राए यांचा जन्म हल्ली स्वीडनमध्ये असलेल्या नुडस्टुप येथे झाला. त्यांचे शिक्षण कोपनहेगन, लाइपसिक, व्हिटन्ब्रेक, रॉस्टॉक, बाझेल व औक्सबुर्ख येथील विद्यापीठांत झाले. (१५६२-७०). १५६२ साली ते न्यायशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी लाइपसिक विद्यापीठात दाखल झालेपरंतु याच वेळी ते फावल्या वेळात चोरून ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास करीत असत. १५६३ सालच्या ऑगस्टमधील गुरू व शनी यांची युती [दोन्ही ग्रहांचे भोग समान असल्या वेळची स्थिती⟶युति]त्यांच्या जीवनास वेगळे वळण लावण्यास कारणीभूत झाली. युतीच्या वेळी गुरू व शनी सर्वांत जवळ आल्याची प्रत्यक्ष वेळ व दोन कोष्टकांवरून काढलेल्या युतीच्या वेळा यांमध्ये पडलेल्या भिन्न फरकांचा ब्राए यांच्यावर विशेष परिणाम झाला व अचूक कोष्टके बनविण्याच्या हेतूने त्यांनी स्वतःच वेध येण्याचे ठरविले. यासाठी दोन साध्या रेखांकित सरकत्या पट्ट्या अधिक चिन्हाप्रमाणे बसवून त्यांच्या साहाय्याने त्यांनी स्वतःच वेध घेण्यास आरंभ केला. तसेच तारकासमूहांच्या अभ्यासासाठी ते खगोल म्हणून छोटा गोल वापरीत असत.

२५ ऑगस्ट १५६० चे खग्रास व ९ एप्रिल १५६७ चे खंडग्रास सूर्यग्रहण आणि २८ ऑक्टोबर १५६६ चे चंद्रग्रहण ही ग्रहणे अगोदर वर्तविलेल्या वेळी लागली याचे त्यांना आश्चर्य वाटले व ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. पितळ व लाकूड यांचे सु. ६ मी. त्रिज्येचे मोठे तुरीय यंत्र बनवून त्यांनी १४ एप्रिल १५६९ रोजी पहिला वेध घेतला. ११ नोव्हेंबर १५७२ रोजी संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहात अचानकपणे नव्यानेच प्रकट झालेला शुक्राएवढा तेजस्वी तारा त्यांना दिसला. तो दिवसाही स्वच्छ सूर्यप्रकाशात दिसत असे. ६०० चा विस्तार असलेला कंस आणि दोन लाकडी पट्ट्यांच्या कोणादर्शकाच्या [⟶कोनमापक यंत्राच्या कोणादर्श] साहाय्याने त्यांनी मार्च १५७४ मध्ये हा तारा सहाव्या प्रतीचा होईपर्यंत [नुसत्या डोळ्यांनी दिसण्याइतका तेजस्वी असेपर्यंत⟶ प्रत] या ताऱ्याचे वेध घेतले. हा तारा याम्योत्तर वृत्तावर (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक माथ्यावरील बिंदू यांतून जाणाऱ्या वर्तुळावर) असताना, त्यांनी शर्मिष्ठेतील आल्फा व इतर नऊ ताऱ्यांपासून त्याची अंतरे काढली. यावरून इतर ताऱ्यांच्या सापेक्ष या ताऱ्याच्या स्थानात काहीही बदल होत नाही, हे दिसून आले व हा ग्रह नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. हा तारा चंद्राच्याच नव्हे तर सूर्यकुलाच्याही पुष्कळ पलीकडे असल्याचे त्यांनी दाखविले. हा इतर ताऱ्यांप्रमाणे चमकत असे त्याला शेपूट व पराशयही (दोन भिन्न ठिकाणांहून पाहिले असता पार्श्वभूमीच्या संदर्भात खस्थ पदार्थ सरकल्याचा होणारा आभासही) नव्हता. अशा प्रकारे या ताऱ्यांसंबंधीची सर्व निरीक्षणे व माहिती त्यांनी De Nova Stella (१५७३) या पुस्तकात प्रसिद्ध केली आहे. या वेधांचे विवेचन करून ब्राए यांनी तेव्हा रूढ असलेल्या ॲरिस्टॉटलप्रणीत अविकारी विश्वाच्या कल्पनेला धक्का दिला. यामुळे ब्राए हे सत्ताविसाव्या वर्षीच प्रख्यात ज्योतिर्विद गणले जाऊ लागले. या ताऱ्याला ‘ट्यूको तारा’ असे संबोधिण्यात येऊ लागले. अशा प्रकारच्या ताऱ्यांना ‘नोव्हा’ (नवतारा) ही संज्ञा देण्यात आली आहे. तथापि अलीकडच्या वर्गीकरणानुसार हा तारा पहिल्या प्रतीचा अतिदीप्त नवतारा [ज्याची तेजस्विता अचानकपणे सु. ४ कोटीपट वाढते असा तारा⟶ नवतारा व अतिदीप्त नवतारा] मानला जातो. अलीकडे याच्या स्थानानजिकच एक रेडिओ उद्गम आढळला आहे.


हवेच्या माध्यमाद्वारे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पती यांच्यावर अवकाशाचा परिणाम होत असतो, असे मानून त्यांनी काही काळ फलज्योतिषशास्त्रातही लक्ष घातले होते. डेन्मार्कचे राजे दुसरे फ्रेडरिक यांनी १५७६ साली मोठी वेधशाळा उभारण्यासाठी ब्राए यांना व्हेन बेटावर सु. ८०० हेक्टर जमीन व काही रक्कम दिली. या बेटाचा कारभार ब्राए यांच्यावर सोपवून राजांनी त्यांना काही वार्षिक नेमणूकही करून दिली होती. या बेटाच्या मध्यभागी सु. ५० मी. उंचीच्या टेकडीवर वेधशाळा उभारून तिला ब्राए यांनी ‘उरानिबर्ग’ (स्वर्गीय किल्ला) हे नाव दिले. तेथे मोठा, मजबूत व भिंतीमधील कोणादर्श बसविण्यात आला. त्यांनी उपकरणाचा आकार वाढवून व त्याच्या वरील मापनाचे रेखांकन अधिक काळजीपूर्वक करून वेधांत येणारे चुकांचे प्रमाण १ कलेपर्यंत खाली आणले. स्थिर ताऱ्यांचे वेध परत घेऊन त्यांची स्थाने निश्चित करणे आणि सूर्य, चंद्र व ग्रह यांच्या गतींच्या उपपत्तींमध्ये सुधारणा करण्याच्या हेतून त्यांचे वेध घेणे ही मुख्य कामे त्यांनी या वेधशाळेत सु. २१ वर्षे केली. १५७६ साली त्यांनी मंगळाचे वेध घेतले होते. त्यांचा केप्लर यांना उपयोग झाला. १३ नोव्हेंबर १५७७ रोजी लांब शेपूट असलेला मोठा धूमकेतू त्यांनी प्रथम पाहिला व २६ जानेवारी १५७८ पर्यंत त्याचे वेध घेतले. सूर्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या शेपटाच्या दिशेवरून शेपूट म्हणजे धूमकेतूच्या शीर्षातून बाहेर पडणारे सूर्यकिरण होत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. व्हेन बेटावर त्यांनी नुसत्या डोळ्यांनी दिसतील असे सहा धूमकेतू पाहिले होते. मुक्तपणे संचार करणाऱ्या धूमकेतूंमुळे अवकाश अविकारी घन स्वस्थ पदार्थांनी भरलेले आहे, ही जुनी कल्पना खोटी ठरली. त्यांच्या अल्प पराशयावरून ते पृथ्वीपासून उद्भवले नसून पृथ्वीपासून खूप दूर व शुक्राच्या पलीकडे आहेत, असे त्यांनी दाखविले. १५८२ पासून ६ वर्षे त्यांनी सूर्य व शुक्र यांच्यातील अंतरे व काही निवडक ताऱ्यांपासूनची शुक्राची अंतरे मोजली. १८५४ साली या वेधशाळेजवळच दुसरी स्टारबर्ग (तारकीय किल्ला) नावाची वेधशाळा त्यांनी बांधली. दोन्ही वेधशाळांत त्यांनी ७७७ ताऱ्यांची स्थाने निश्चित केली व नंतर त्यांत २२३ ताऱ्यांची भर घातली. १५८२ – ९५ या काळात त्यांनी चंद्रकक्षेवरील निरनिराळ्या स्थानी चंद्राचे वेध घेऊन स्थिर ताऱ्यांच्या संदर्भात चंद्राच्या स्थानाची नोंद केली. २१ चंद्रग्रहणांच्या व ९ सूर्यग्रहणांच्या काळात वेध घेतले आणि त्यांच्या अभ्यासाने अर्ध्या सांवासिक महिन्याचा आवर्तकाळ असलेला व एक वर्षाचा आवर्तकाळ असलेला असे चंद्राच्या गतीत होणारे आणखी दोन विक्षोभ त्यांनी शोधून काढले.

नंतर सत्तेवर आलेल्या चवथ्या ख्रिश्चन राजांनी मदत थांबविल्याने ब्राए १५९९ साली प्रागला गेले. तेथील राजे दुसरे रूडोल्फ यांनी ब्राए यांना काही नेमणूक करून दिली व बेनाटकीचा किल्ला वेधशाळा उभारण्यासाठी दिला. येथील वेधशाळेत ब्राए यांनी सु. १५० सेंमी. व्यासाच्या गोलावर १६०० साली असणारी ताऱ्यांची स्थाने दर्शविली. ग्रहांच्या गतीचा अभ्यास करण्यासाठी या गोलाचा उपयोग ब्राए करीत असत.

येथेच त्यांची कोपर्निकस यांच्याशी भेट झाली व शास्त्रीय उपपत्तीकरिता वेधांचा उपयोग करणारा सहकारी ब्राए यांना लाभला. ब्राए यांनी कोपर्निकस यांच्या सूर्यकेंद्रीय कल्पनेचे कौतुक केले होते मात्र ती त्यांना पूर्णपणे मान्य नव्हती. ब्राए यांच्या मते पृथ्वीही  सूर्याभोवती फिरत असेल, तर वर्षभरात ताऱ्यांचा पराशय मोजता आला पाहिजे. तथापि  तारे अतिशय दूर अंतरावर असल्याने तेव्हाच्या उपलब्ध साधनांनी ताऱ्यांचा अल्पसा पराशय लक्षात येऊ शकत नव्हता, हे त्यांच्या लक्षात आले नाही. परिणामी ब्राए यांनी भूकेंद्रीय (पृथ्वी विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी) कल्पना आणि कोपर्निकस यांची सूर्यकेंद्रीय कल्पना या दोहोंचा मेळ घालण्याचा प्रयत्न करून नवीनच ‘ट्यूको प्रणाली’ पुढे मांडली. पृथ्वी स्थिर असून इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात व त्यांच्यासकट सूर्य पृथ्वीभोवती फिरतो अशी त्यांची कल्पना होती. कोणत्याही स्थळाचे अक्षांश काढण्यासाठी त्यांनी पुढील पद्धती वापरली होती. परिध्रुवी (दृश्य ध्रुवापासून ज्यांची कोनीय अंतरे ध्रुवाच्या उन्नतांशाहून क्षितिज सापेक्ष कोनात्मक उंचीहून कमी असतात असे) तारे याम्योत्तर वृत्तावर असताना त्यांचे धन व ऋण उन्नतांश काढावे. यांची सरासरी म्हणजे ध्रुवबिंदूचा उन्नतांश होय व हाच त्या स्थळाचा अक्षांश असतो. सूर्यास्ताच्या सुमारास सूर्याच्या गतीत भासणारी घट लक्षात घेऊन प्रकाशाच्या प्रणमनामुळे (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना होणाऱ्या दिशाबदलामुळे) वेधांमध्ये होणारी चूक काढून टाकण्यासाठी त्यांनी प्रणमन कोष्टके बनविली होती.

नवतारा, धूमकेतू, वेधपद्धती, वेधसाधने इ. विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांचे समग्रलेखन १५ खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांचा स्वतःचा छापखाना होता व तेथेच आपले लेखन ते छापीत असत. त्यांची पुढील पुस्तके महत्त्वाची आहेत. De Mundi aetherel recentioribus phenomenis (१५७७) या पुस्तकात १५७७ चा धूमकेतू चंद्राच्या अंतराच्या सहापट तरी दूर असल्याचे त्यांनी दाखविले असून त्यातच ‘ट्यूको प्रणाली’ दिलेली आहे. Astronomiae instauratae mechanica (१५९८) मध्ये आत्मचरित्र व त्यांनी बनविलेल्या उपकरणांचे वर्णन आलेले आहे आणि Astronomiae instauratae progymnasmata (१६०-०३) त्यात त्यांच्या ज्योतिषशास्त्रीय कार्याची संकलित माहिती आहे.

मराठे, स. चिं. नेने, य. रा.