ब्रॅडफर्ड-२ : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्याच्या मकीन परगण्यातील शहर. हे बफालोच्या आग्नेयीस १०५ किमी., ॲलेगेनी तेलक्षेत्रात टुनुंगवांट नदीच्या फाट्यावर वसलेले आहे. लोकसंख्या १२,६७२ (१९७०). खनिज तेल व तद्जन्य इतर उत्पादने यांसाठी ब्रॅडफर्ड प्रसिद्ध आहे.
हे शहर इ. स. १८२३ मध्ये वसविण्यात आले. कर्नल एल्. सी. लिट्ल याच्या नावावरून १८७३ पर्यंत ‘लिट्लटन’ म्हणून ते ओळखले जाई. येथील बहुतेक रहिवासी न्यू हँपशरमधील असल्याने त्याचे ब्रॅडफर्ड असे नामकरण करण्यात आले. शहराच्या परिसरात १८७१ मध्ये खनिज तेलाचा शोध लावला. १८८१ मध्ये येथे जगातील एकूण तेल उत्पादनाच्या ४०% तेल उत्पादन होत असे. येथे तेलशुद्धीकरण, रसायने, विद्युत्साहित्य, पोलादी युग्मक, खाणकाम यंत्रे, कटलरी, स्फोटक द्रव्ये इ. उद्योगधंदे विकास पावले आहेत. शहराच्या जवळच असलेले ॲलेगेनी नॅशनल फॉरेस्ट व त्यातील धरण, ॲलेगेनी स्टेट पार्क इ. उल्लेखनीय असून हा परिसर शिकार व मासेमारीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
लिमये, दि. ह.
“