ब्रॅडशॉ, जॉर्ज: (१८०१ – १८५३). आद्य रेल्वे वेळापत्रककार. इंग्लंडमधील सॅलफर्ड (लँकेशर परगणा) येथे जन्म. याला शालेय शिक्षणात विशेष रस नव्हता पण नकाशे काढण्याकडे मात्र त्याचा ओढा होता. त्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने मँचेस्टरमध्ये नोकरी पतकरली. त्याने काढलेले नकाशे टेलफर्ड व ब्रूनेल या तत्कालीन प्रसिद्ध अभियंत्यांच्या प्रशंसेस पात्र ठरले. लिव्हरपूल अँड मँचेस्टर रेल्वे १८३० साली सुरू झाल्यावर त्याने आपल्या नकाशात रेल्वे दाखविण्यास प्रारंभ केला.

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम व लिव्हरपूल यांदरम्यान आगगाडी चालविणाऱ्या ग्रँड जंक्शन रेल्वेने एक वेळापत्रक प्रसिद्ध केले होते, पण त्यात एका बाजूला गाड्या सुटण्याच्या वेळा व दुसऱ्या बाजूस दोन स्थानकांमधील अंतर आणि ते कापायला लागणारा वेळ, एवढेच दिलेले असे.

लोहमार्गांच्या वाढत्या प्रसारामुळे असे वेळापत्रक लोकांना गैरसोयीचे ठरत होते. काही तरी वेगळे करू इच्छिणाऱ्या ब्रॅडशॉने ब्रॅडशॉज रेल्वे कंपॅनियन नावाचे पुस्तिकावजा वेळापत्रक काढले (१८३९). या वेळापत्रकात लिव्हरपूल, मँचेस्टर व लीड्स यांच्या परिसरातील नकाशे होते. या वेळापत्रकाचे लोकांनी स्वागत केले तथापि आगगाड्या वेळेवर चालविल्या गेल्या नाहीत, तर लोकांना या वेळापत्रकामुळे ते कळेल, म्हणून रेल्वे कंपनीने त्याचा निषेध केला. ब्रॅडशॉच्या ॲडम्स नावाच्या मित्राला याची गंमत वाटून पुढच्याच वर्षी जाहिरात गोळा करून त्यांच्या बळावर आणखी एक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. जांभळ्या कापडाची बांधणी असलेले आणि १० सेंमी. × ७.५ सेंमी. आकाराचे हे वेळापत्रक कमालीचे रेखीव होते. त्यात इतर माहिती बरोबर प्रमाणानुसार काढलेले व सर्व स्थानके दाखविणारे बारा नकाशे होते. हल्लीच्या वेळापत्रकात एखाद्या स्थानकापुढे गाडी जात नसल्यास, त्याच्या नावाखाली त्या गाडीपुढे जी रेघ मारली जाते, त्याची सुरुवात या वेळापत्रकापासूनच झाली.

ब्रॅडशॉने ॲडम्सच्या विनंतीनुसार दरमहा ३२ पानी वेळापत्रक (ब्रॅडशॉज मन्थली जनरल रेल्वे अँड स्टीम नॅव्हिगेशन गाइड) प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. रेल्वेबरोबरच त्यात आगबोटींचीही माहिती असे.

या वेळापत्रकाची पाने व आकार यांत १८४३ पासून वाढ झाली आणि रेल्वे कंपनीच्या भागांसंबंधीची तसेच इतर माहिती त्यातून देण्यात येऊ लागली. सप्टेंबर १८४४ पासून वेळापत्रकाची पृष्ठसंख्या १४६ पर्यंत वाढली. त्यात ४८ गाड्यांचे वेळापत्रक होते. ब्रॅडशॉने १८४७ साली यूरोपचे काँटिनेंटल गाइड प्रसिद्ध केले. याच प्रकाशनातील माहिती अद्ययावत करण्यासाठी तो यूरोपच्या दौऱ्यावर असताना ऑस्लो (नॉर्वे) येथे कॉलऱ्याची लागण होऊन निधन पावला. भारतात आगगाड्या, विमाने व काही मार्गांवरील जहाजे आणि मोटारी यांचे वेळापत्रक असणारा इंग्रजी ब्रॅडशॉ पूर्वी प्रसिद्ध होत असे. यात श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ वगैरे शेजारील राष्ट्रांतील गाड्यांचे वेळापत्रकही असे. सांप्रत दर महिन्याला प्रसिद्ध होणारा इंग्रजीतील इंडियन ब्रॅडशॉ फक्त भारतातील आगगाड्या, विमाने व काही मार्गांवरील मोटारी यांच्या वेळापत्रकाची माहिती देतो. नेपाळ रेल्वेबद्दल त्यात माहिती असते. फक्त भारतीय आगगाड्यांपुरता हिंदी भाषेत बिनसरकारी ब्रॅडशॉ प्रसिद्ध होतो. दोन्ही भाषांच्या ब्रॅडशॉ मध्ये रेल्वेप्रवासविषयक इतर विपुल उपयुक्त माहिती असते.

पंडित, अविनाश