ब्रॅझाव्हिल : आफ्रिकेतील काँगो प्रजासत्ताकाची राजधानी व काँगो नदीवरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ३,१०,५०० (१९८० अंदाज). हे काँगो नदीवरील स्टॅन्लीपूल सरोवराच्या उजव्या तीरावर नदीमुखापासून आत सु. ३८५ किमी. अंतरावर वसले आहे. देशातील हे सर्वांत मोठे शहर असून दळणवळण व उद्योगधंदे यांचे केंद्र आहे.

प्येअर पॉल फ्रांस्वा कामीय साव्हॉर्न्यां द ब्राझा या इटालियन फ्रेंच समन्वेषकाने १८८० मध्ये येथील स्थानिक राजाशी करार करून फ्रान्ससाठी काही मुलूख मिळविला आणि मूळच्या एन्तामोया छोट्या खेडेगावाच्या ठिकाणी ब्रॅझाव्हिल हे शहर वसविले. ब्रॅझाव्हिल हे नाव त्यावरूनच पडले. १९१० पासून १९५८ पर्यंत फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेची ब्रॅझाव्हिल राजधानी होती. १९६० मध्ये काँगो स्वतंत्र झाल्यावरही हीच राजधानी ठेवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धकाळातफ्रेंचांचे हे आफ्रिकेतील प्रमुख ठाणे होते. १९४४ मध्ये येथे प. आफ्रिकेतील फ्रेंच व विषुववृत्तीय आफ्रिकी नेत्यांची एक परिषद भरली होती. त्याच परिषदेत फ्रेंच वसाहत विषयक धोरणात बदल करण्याचे जाहीर करण्यात आले. तेव्हापासूनच या वसाहतींची स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. १९६० मध्येही फ्रेंच भाषिक आफ्रिकी देशांचे (ब्रॅझाव्हिल गटाचे) नेते ब्रॅझाव्हिल येथे एकत्र आले होते.

बांधकामाचे साहित्य, आगकाड्या, कापड, मादक पेये, सिगारेटी, जहाजबांधणी, कातडी कमावणे इ. उद्योगधंदे शहरात चालतात. पृष्ठप्रदेशातील लाकूड, रबर, कापूस, कॉफी, धातू, ताडतेल, कृषि उत्पादने व इतर वस्तू नदीमार्गाने येथपर्यंत आणून अटलांटिकच्या किनाऱ्यावरील प्वँतन्वार शहराकडे लोहमार्गाने पाठविल्या जातात. समोरच स्टॅन्लीपूल सरोवराच्या डाव्या तीरावरील किन्शासा (झाईरेची राजधानी) शहराशी ब्रॅझाव्हिल मोटारबोटींनी जोडलेले आहे. जवळच एक जलविद्युत प्रकल्पही उभारण्यात आला आहे. शिक्षक प्रशिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय कृषी व वैज्ञानिक संशोधनसंस्था इ. शैक्षणिक संस्था शहरात आहेत.

चौधरी, वसंत