ब्रह्मीयुद्धे : १८२४ ते १८८६ या कालावधीत ब्रह्मी राजे व इंग्रज यांमध्ये तीन युद्धे झाली. या युद्धांना इंग्रज ब्रह्मी युद्धे असेही म्हटले जाते. या युद्धांत टप्प्याटप्प्याने ब्रह्मी सार्वभौमत्वाचा संकोच होत जाऊन १८८६ साली या देशाचे स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट झाले आणि ब्रिटिश साम्राज्याची सीमा मलाया, सयाम आणि चीन या देशांच्या सीमांना भिडली. एडन (दक्षिण येमेन), त्रिंकोमाली [→श्रीलंका], सिंगापूर यांमधील सागरी प्रदेशावर ब्रिटिश सागरी सत्ता निर्वैरपणे प्रस्थापित झाली.

ब्रह्मी युद्धांची मूळ कारणे पुढील प्रमाणे होती : आपल्या हिंदुस्थानी साम्राज्याच्या सीमा पूर्वेकडे निर्विघ्न करण्याच्या प्रयत्‍नात इंग्रज होते आणि ब्राह्मी राजे (बोडौपाय: कार. १७८२-१८१९ व बागीदव: कार, १८१९-३७) आसाम, बंगाल, आराकान व सयाम यांवर सत्ता स्थापण्याचे प्रयत्न करीत होते. यांमुळे सीमाप्रांत व सरहद्दी यांसंबंधी तंटे निर्माण झाले. पूर्वेकडील देशांत आपला व्यापार वाढविण्यासाठी बंगालचा उपसागर निर्वैर करणे ब्रिटिशांना आवश्यक वाटत होते. तत्कालीन हिंदुस्थानातील व आग्नेय आशियातील ब्रिटिशांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणजे फ्रेंच. त्यांना संबंधित आशियाई मुलखातून हाकून लावण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर (१७७५ -१७८३) ब्रिटिशांना तेथून जहाजे बांधणीसाठी लागणारे लाकूड मिळणे बंद झाले होते. परिणामतः ब्रह्मदेशातील सागवानी लाकूड मिळाल्यास ब्रिटिशांची ही गरज भागणार होती. यासाठी ब्रह्मदेशाला आपलेराजकीय बाहुले करणे अथवा संधी मिळाल्यास तो देश ताब्यात घेणे, असे एकंदरीत ब्रिटिशांचे राजकीय धोरण होते. ब्रह्मी राजे हिंदुस्थानातील तत्कालीन राज्यकर्त्यांप्रमाणे ब्रिटिश गव्हर्नर जनरलला श्रेष्ठ वा समतुल्य मानण्यास तयार नव्हते. ब्रह्मी राजांच्या व्यापारविषयक अटी उदा., ब्रिटिशांना खास सवलती न देणे, सोने रुपे ब्रह्मदेशा बाहेर पाठविण्यास बंदी इ. ब्रिटिशांना मान्य नव्हत्या. इंग्रजांची सांस्कृतिक श्रेष्ठत्वाची कल्पना व स्थानिक राज्यांच्या कारभारात ढवळाढवळ करण्याची सवय ब्रह्मी गजांना आवडत नसे. इंग्रज ब्रह्मी युद्धांमागील व्यापक पार्श्वभूमी या प्रकारची होती.

पहिले युद्ध (५ मार्च १८२४-२४ फेब्रुवारी १८२६) :आराकान (१७८४), मणिपूर (१८१२-१३) व आसाम (१८१६-१७) ही राज्ये ब्रह्मी राजा बोडौपायने जिंकल्याने ब्रह्मदेशाची सरहद्द हिंदुस्थानच्या सीमेला भिडली. १८१८ मध्ये मराठी सत्तेचा शेवट होऊन ब्रिटिशांना ब्रह्मदेशाकडे वळण्यास अनुकूल परिस्थिती लाभली. आराकानी बंडखोर शेजारील चितगाँगचा आश्रय घेत व आराकानवर हल्ले करून पळून जात. त्यांना ब्रिटिशांची फूस आहे, असे ब्रह्मी राजांना वाटे. १८२३ साली आराकानच्या उत्तर सीमेलगतच्या शायएन मे थू ऊर्फ शापुरी बेट ब्रह्मी तुकडीने घेतले. पहिल्या इंग्रज ब्रह्मी मुलकी युद्धाचे हे तत्कालिक निमित्त होय. जून १८२३ मध्ये आसाम सरहद्दीवरील काचार प्रांत जिंकण्याचे मनसुबे ब्रिटिश करू लागले. नोव्हेंबर १८२३ मध्ये ब्रह्मी सैन्य सिल्हेटजवळ गोळा झाले. जानेवारी १८२४ मध्ये ब्रिटिशांनी त्यावर हल्ले केले. ब्रिटिशांनी युद्धास आरंभ केला, असे समजून आराकानमध्ये ब्रह्मी सेनापती महा बंदूला याच्या नेतृत्वाखाली मोठे ब्रह्मी सैन्य खडे करण्यात आले. तत्कालीन हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲम्हर्स्टने ब्रह्मी राजाला धडा शिकविण्याच्या हेतून ५ मार्च १८२४ रोजी युद्ध पुकारले पण बंगाली पायदळाने सागरी प्रवासास विरोध दर्शविल्याने पायदळातील हिंदी अधिकाऱ्यांना व सैनिकांना ब्रिटिशांनी तोफेच्या तोंडी दिले. आसाम चितगाँग प्रदेशाची दुर्गमता ओळखून सागरी मार्गाने इरावती नदीतून ब्रह्मदेशावर चढाई करण्याचे हुकूम लॉर्ड ॲम्हर्स्टने सोडले. अंदमान बेटावर आरमार व पायदळ एकत्रित केल्यावर इरावतीतून सु. ३५,००० ब्रिटिश हिंदुस्थानी व चार पाच हजारांचे इंग्रज सैन्य रंगूनला पोहोचले (१० मे १८२४). ब्रह्मी सैन्याने रंगूनच्या अर्ध्या भागाला आगी लावल्या व तेथील नागरी वस्ती उठविली. त्यामुळे तेथे ब्रिटिश सैन्याचे फार हाल झाले. रंगूनची कोंडी करण्यात ब्रह्मी लोक यशस्वी झाले. ब्रह्मी सैन्याने गनिमी युद्धतंत्राने ब्रिटिश सैन्याला बेजार केले. रोगराई व अन्नटंचाई यांमुळे ब्रिटिश सैन्याची मोठी हानी झाली. नोव्हेंबर १८२४ मध्ये महाबंदूलाने भर पावसाळ्यात आराकान डोंगर ओलांडला व तो रंगूनपाशी आला. डिसेंबर १८२४ पासून मार्च १८२५ अखेर दोन्ही सैन्यांचे हल्ले-प्रतिहल्ले चालू राहिले. या धुमश्चक्रीत ब्रिटिश आरमाराने २०० ब्रह्मी जहाजे नष्ट केली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दान्यूब्यू येथील लढाईत महा बंदूला ठार झाला (१८२५) व ब्रह्मी सैन्याने माघार घेतली. नोव्हेंबर-डिसेंबर १८२५ मध्ये प्रोम शहर ब्रिटिशांनी जिंकले. रंगूनहून ब्रिटिश आरमाराने व सैन्याने उत्तरेस अवाकडे कूच केली. यांदाबो येथे ब्रिटिश सैन्य पोहोचल्यावर बागीदव राजा तहास तयार झाला. २४ फेब्रुवारी १८२६ रोजी ‘यांदाबो तह’झाला. या तहामुळे (१) ब्रिटिशांना एक कोटी रुपयांची खंडणी मिळाली(२) आसाम, जैंतिया, काचार व मणिपूर वरील सर्व हक्क बागीदवला सोडावे लागले व (३) तेनासरीम, आराकान, रामरी बेट, चेदूवा व सॅन्दोवे हे प्रदेश ब्रिटिशांना कायमचे मिळाले.

ब्रिटिशांच्या दृष्टीने हे युद्ध अत्यंत खर्चिक व अकार्यक्षम ठरले. हिंदुस्थानच्या तिजोरीतून १ कोटी ३० लक्ष रुपये युद्धासाठी खर्ची पडले. ४०,००० सैनिकांपैकी १५,००० सैनिक ठार झाले. त्यात बहुतांश हिंदी सैनिक होते. ब्रह्मी राजाला ब्रिटिशांच्या तत्कालीन सैनिकी, वैज्ञानिक, आर्थिक बळाची तौलनिक कल्पना आली नाही. सयामसारख्या आशियाई देशाविरुद्ध यशस्वी ठरलेले अठराव्या शतकातील ब्रह्मी युद्धतंत्र ब्रिटिशांच्या एकोणिसाव्या शतकातील आधुनिक युद्धतंत्रापुढे निष्प्रभ ठरले. ब्रिटिशांनी आशियात किंबहुना इतरत्रही सैनिकी कारवाईसाठी वाफेच्या नौका वापरून त्यांचे महत्त्व निर्विवादपणे सिद्ध केले. या युद्धामुळे बंगालच्या उपसागरावर ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली व फ्रेंचांच्या नौकानयनावर वचक ठेवणे त्यांना सुकर झाले. या युद्धात आर्चिबाल्ड कॅम्बेल व गॉडविन हे ब्रिटिश सेनाधिकारी होते.

दुसरे युद्ध (१२ एप्रिल १८५२-१८ फेब्रुवारी १८५३) : हिंदुस्थानचा साम्राज्यवादी गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स डलहौसी व ब्रह्मी राजा पगानमिन (कार. १८४६-५३) यांचा या युद्धाशी संबंध होता. पहिल्या युद्धानंतरच्या काळात चिंद्विन नदी व मणिपूर यांमधील प्रदेशाबाबत नवे वाद निर्माण झाले होते. चीन, सयाम व खुद्द ब्रह्मदेश यांच्याबरोबरचा व्यापार वाढविण्यासाठी खास सवलती व सुविधा मिळविण्याच्या प्रयत्नात ब्रिटिश होते. १८४६-१८५२ या काळातील पगानमिनची राजवट अस्थिर होती. १८५० पर्यंत हिंदुस्थानातील इंग्रज-शीख युद्धे व इतर राजकीय उलाढाली यांमुळे लॉर्ड जेम्स डलहौसी याला ब्रह्मदेशावर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले नाही. १८५० ते १८५१ मध्ये ब्रह्मी राजा यांदाबो तहाच्या अटी तंतोतंत पाळीत नाहीब्रिटिश व हिंदुस्थानी व्यापाराला नाहक अडथळा करीत आहे व रंगून येथे जहाज बांधण्याच्या कामात अडचणी निर्माण करण्यात येत आहेत इ. सबबी पुढे करून युद्धाची पार्श्वभूमी तयार करण्यास ब्रिटिशांनी आरंभ केला.


१८५१ च्या मध्यास दोन ब्रिटिश नाविक अधिकाऱ्याना खुनाच्या आरोपावरून दोषी ठरवून ब्रह्मी सरकारने दंड केला. याउलट डलहौसीने ब्रह्मी सरकारकडेच नुकसानभरपाई मागितली आणि ती न दिल्यास युद्धाची धमकी दिली. याबरोबरच डलहौसीने युद्धाच्या दृष्टीने आरमार व सैन्य सुसज्ज करण्यास सुरुवात केली. १८५१ च्या शेवटी डलहौसीने कमोडर लँबर्ट या नाविक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली दोन युद्धनौका रंगूनला पाठवून शक्तिप्रदर्शन केले. ब्रह्मी सरकारने ब्रिटिशांच्या तक्रारी दूर करण्याचे आश्वासन दिलेतथापि ब्रिटिश आरमार पाहून रंगूनच्या ब्रह्मी अधिकाऱ्याने काही सैन्य तयार ठेविले. लँबर्टने रंगूनची नाकेबंदी करून ब्रह्मी नौकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. ब्रह्मी लोकांनी थोडा गोळामार करताच लँबर्टने सर्व ब्रह्मी नौका बुडविल्या व तो कलकत्त्यास परतला. पुढे डलहौसीने ब्रिटिश आरमार व सैन्य रंगूनला आणले व पूर्वीची नुकसानभरपाईची मागणी दहा लक्ष रुपयांपर्यंत वाढवून ती मार्च अखेर चुकती करण्यास ब्रह्मी राजाला बजावले आणि त्याप्रमाणे ब्रह्मी राजाच्या उत्तराची वाट न पाहता १२ एप्रिल १८५२ रोजी हल्ले सुरू केले. ब्रह्मी प्रतिकार कडवा नव्हता. त्यामुळे डिसेंबर १८५२ पर्यंत बासेन, मार्तांबान, रंगून व पेगू हे प्रांत ब्रिटिशांनी जिंकले. याच सुमारास पगानमिनविरुद्ध त्याच्या सावत्र भावाने (मिंडोंमिन) बंड करून ब्रह्मदेशाची गादी बळकाविली. परिणामतः १८ फेब्रुवारी १८५३ च्या सुमारास दुसरे इंग्रज-ब्रह्मी युद्ध समाप्त झाले. या युद्धाकरिता हिंदुस्थानी तिजोरीतून एक कोटी रुपये खर्च झाले. बंगाल प्रांत ते तेनासरीम या प्रदेशांवर ब्रिटिश अंमल प्रस्थापित झाला. उत्तरेकडील ब्रह्मदेश कोंडीत पकडला गेला. डलहौसीने या युद्धाची जय्यत तयारी केल्यामुळे इंग्रजांची सैन्यहानी किरकोळ झालीमात्र ब्रह्मी सैन्यहानी बरीच मोठी असावी. या युद्धसमाप्तीनंतर तहाच्या वाटाघाटी झाल्या (मार्च-मे १८५३)तथापि ब्रिटिशांनी नवीन मुद्दे उपस्थित केल्याने तह झालाच नाही.

तिसरे युद्ध (११ नोव्हेंबर १८८५—१ मार्च १८८६): दुसऱ्या युद्धानंतर इंग्रजांनी ब्रह्मी राजा मिंडोमिन (कार. १८५३-७८) याच्याशी दोन व्यापारी तह केले (१८६२ व १८६७). मिंडोंमिनचे धोरण ब्रह्मी सार्वभौमत्व ठेवून ब्रिटिशांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे होते. इंग्रजांनी मिंडोंमिनची अनुमती न घेता पूर्व व पश्चिम कारेन येथील ब्रह्मदेशाच्या मांडलिक राजांशी परस्पर राजकीय व व्यापारी संबंध स्थापण्याचे प्रयत्न सुरू केले. इरावती किंवा सॅल्वीनमार्गे पश्चिम चीनशी व्यापार सुरू करण्याच्या दृष्टीनेही संशोधन सुरू केले. ब्रह्मी पद्धतीप्रमाणे युद्धसमाप्ती होऊन शांतता प्रस्थापित झाल्यानंतर इंग्रजांनी घेतलेला आपला मुलूख परत करावा, असे मिंडोंमिनने डलहौसीला सुचविले. डलहौसीने ही सूचना अर्थातच झिडकारली. शान, चीन, काचीन व कारेन यांबाबत ब्रह्मी राजसत्तेला अनिष्ट ठरणारी जी नीती इंग्रजांनी अवलंबिली, त्यामुळे मिंडोंमिनला आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली. मिंडोंमिनने फ्रान्स, इटली इ. देशांकडे तसेच राणी व्हिक्टोरियाकडे आपले राजदूत पाठविले. इंग्लंडमध्ये या मंडळाला एक स्वतंत्र राष्ट्राच्या राजदूताप्रमाणे सन्मानाने वागविण्यात आले नाही परंतु फ्रान्स व इटली या देशांनी राजकीय, व्यापारी, सांस्कृतिक व शैक्षणिक देवाणघेवाणीचे करार मदार ब्रह्मदेशाबरोबर केले. मिंडोंमिनचे हे उद्योग पाहून इंग्रज व्यापाऱ्यांनी ब्रिटिश सरकारवर दडपण आणण्यास सुरुवात केली. १८७४ पासून उत्तर ब्रह्मदेशात शिरकाव करण्याच्या योजना इंग्रज आखू लागले. तत्कालीन इंडोचायनामध्ये फ्रेंच सत्तेचा पाया घातल्यावर मेकाँग नदीमार्गे चीनशी व्यापार करण्याचा प्रयत्न फ्रेंचांनी सुरू केला. अमेरिकादेखील यात सहभागी होती. फ्रेंच अमेरिकन स्पर्धा नष्ट करण्यासाठी ब्रह्मदेशातील निसर्ग संपत्तीचा निर्वेधपणे उपभोग घेण्याकरिता उरलेला ब्रह्मी प्रदेश व त्याची मांडलिक राज्ये ताब्यात घेण्यासाठी इंग्रज व्यापारी व राजकीय पुरस्कर्ते यांनी हालाचाली सुरू केल्या. राजकीय डावपेच करून इंग्रजांनी मिंडोंमियन राजाच्या राजवटीला पोखरून टाकले. मिंडोंमिनच्या मृत्यूनंतर थिबा हा रक्तरंजित स्पर्धेत यशस्वी होऊन गादीवर आला (१८७८). थिबाने मिंडोंमिनचे ब्रिटिशांशी सलोखा राखण्याचे धोरणच पुढे चालविले तथापि १८६२-६७ मधील व्यापारी करार ब्रह्मी शासन योग्य रीतीने पाळत नाही, असा आरोप हिंदुस्थानचा तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड एडवर्ड लिटन याने केला. १८८० साली थिबा राजाने केलेले वाटाघाटीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. १८८२ मध्ये नवा व्यापारी करार व्हिक्टोरिया राणी व ब्रह्मी राजा यांच्यामध्ये व त्यांच्या नावाने व्हावा, ही थिबा राजाची अपेक्षा वाजवी व आंतरराष्ट्रीय नीतीशी सुसंगत अशीच होती तथापि लॉर्ड जॉर्ज रिपनने ती धुडकावून लावली. १८८३ साली थिबाने फ्रान्स, इटली इ. यूरोपीय राष्ट्रांशी मदतीची बोलणी सुरू केली. ब्रिटिशांना हे रूचले नाही. थिबाच्या राज्यात शान जमातीने व चिनी लोकांनी पुंडावे केल्याने अंतर्गत अशांतता निर्माण झाली. रंगून येथील चिनी, इंग्रज व हिंदी व्यापाऱ्यांनी आपला व्यापार धोक्यात आला आहे, म्हणून उत्तर ब्रह्मदेश खालसा करण्याची प्रचार मोहीम सुरू केली. इरावती व सॅल्वीन नद्यांतील वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या. बर्मा ट्रेडिंग कंपनीने बेकायदेशीर जंगलतोड केल्याने ब्रह्मी सरकारने त्या कंपनीस दंड करून नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या सर्व घटनांची परिणती म्हणून हिंदुस्थानचे तत्कालीन ब्रिटिश मंत्री रॅन्डॉल्फ चर्चिल (विन्स्टन चर्चिल यांचे वडिल) यांनी २२ ऑक्टोबर १८८४ रोजी थिबा राजाला धमकीचा खलिता पाठविला. हिंदुस्थानच्या व्हाइसरॉयद्वारे ब्रह्मी शासनाने परराष्ट्रीय संबंध ठेवावेत, अशी एक अटही त्यात होती. ब्रह्मी सरकारला ही अट मान्य नव्हती. ही अमान्यता म्हणजेच थिबाला युद्ध करावयाचे आहे, हे गृहीत धरून इंग्रजांनी मद्रास व कलकत्ता येथे सु. १०,००० सैन्य व आरमार एकत्र केले. थिबानेही ब्रह्मी जनतेला परकीय इंग्रजांना प्रतिरोध करण्याचे आव्हान केले. ११ नोव्हेंबर १८८५ रोजी रॅन्डॉल्फ चर्चिलने मंडालेवर हल्ला करण्याचा हुकूम तत्कालीन  व्हाइसरॉय लॉर्ड फ्रेडरिक डफरिन यास दिला. राजधानी मंडालेच्या नैऋत्येला इरावतीच्या काठी म्यिंजान येथे ब्रह्मी सैन्याने थोडा प्रतिकार केला. म्यिंजान इंग्रजांनी घेतल्यानंतर थिबाने शरणागती पतकरली (२४ नोव्हेंबर १८८५). थिबाचे सैन्य उत्तर ब्रह्मदेशात इतस्ततः विखुरल्यामुळे इंग्रजांना प्रतिकार करण्यासाठी त्याचा उपयोग झाला नाही. थिबाला युद्ध पेटेल असे वाटत नव्हते. डिसेंबर १८८५ अखेर इंग्रज सैन्याने उत्तर ब्रह्मदेशातील सर्व शहरे काबीज केली व तेथूनच शांतता स्थापण्याच्या सैनिकी कारवाया करण्यात आल्या. थिबाला ⇨ रत्नागिरी(महाराष्ट्र) येथे नजरकैदेत ठेवण्यात आले. १८८६ पासून उत्तर ब्रह्मदेश (शान प्रांत वगळून) हिंदुस्थानला जोडण्यात आला. चीनने ब्रह्मदेश व चीन यांच्यातील १७६९ सालच्या तहान्वये ब्रह्मदेश चीनचे मांडलिक राष्ट्र आहे, असा दावा केला (१९ मार्च १८८६). एखादा नवीन ब्रह्मी राजा नेमावा असेही चीनने सुचविले. इंग्रजांनी हे सर्व अमान्य केले. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनात ब्रह्मदेशाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये, असा ठराव संमत झाला होता. १८८६ ते १८९५ या काळात ब्रह्मदेशात ब्रह्मी जनतेने गनिमी युद्धतंत्र पद्धतीने अनेक उठाव केले.

संदर्भ : 1. Hall, D. G. E. A History of South East Asia, London, 1964.

           2. Headrick, D. R. The Tools of Empire, Oxford, 1981.

           3. Stewart, A. T. Q. The Pagoda War, London, 1972.

           4. Woodman, Dorothy, The Making of Burma, London, 1962.

दीक्षित, हे. वि.