ब्रह्मगिरि : कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. या नावाची टेकडी मोलकालमुरू तालुक्यात सिद्धपूर गावाजवळ आहे. येथे नवाश्मयुगीन, महाश्मयुगीन व प्राचीन ऐतिहासिक काळातील अवशेष उघडकीस आले. बी. लूइस राईस याने ब्रह्मगिरीच्या परिसरात १८९२ मध्ये सम्राट अशोकाचे तीन शिलालेख शोधून काढले. त्यामुळे या स्थानाकडे पुरातत्त्ववेत्त्यांचे लक्ष वेधले गेले. भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे आणि त्या वेळचे म्हैसूर राज्य पुरातत्त्वीय खाते यांच्या विद्यामाने मे १९४७ मधील संयुक्त उत्खननातून अनेक अवशेष उजेडात आले. या ठिकाणी मानवी दफनाचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आढळला. त्यातील अश्मवर्तुळातील दफन आणि चौकोनी अश्मपेटिकेमधील दफन वैशिष्टयपूर्ण असून या उत्खननांत तीन कालखंडांतील वस्तींचा पुरावा मिळाला. त्यांतील पहिली वस्ती हातकुऱ्हाड संस्कृतीची होती. ती. इ. स. पू. सु. १००० ते इ. स. पू दुसरे शतक यात झाली. या वस्तीचे सांस्कृतिक दृष्ट्या दोन विभाग पडत असून पूर्वकाळातील लोक तांब्याच्या छिन्न्या, करड्या रंगाची मडकी, घोटून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, गारगोटीच्या छिलक्यांची क्षुद्राश्मे आणि रंगीत व कोरीव नक्षीची खापरे वापरीत असत. उत्तरकाळातील लोकही करडया रंगाची खापरे वापरीत पण त्यांवर रंगकाम अथवा कोरीव नक्षीकाम केलेले नसे. शिवाय ते मृत मुले कुंभांत घालून ते कुंभ पुरत आणि प्रौढांना जमिनीत पुरीत. पहिल्या वस्तीच्या दोन्ही खंडांत लोखंडाचा वापर नव्हता. इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. चे पहिले शतक या काळता लोखंडाचा वापर सर्रास सुरू झाला. मृतांना अश्मवर्तुळात अथवा चौकोनी अश्मपेटिकेत घालून पुरीत असत आणि त्यांच्याबरोबर काळी-तांबडी मडकी ठेवीत. तिसरी वस्त इसवी सनाच्या सुरूवातीच्या तीन शतकांत झाली. त्या काळातील सातवाहन नाणी, रोमन दिनार, चाकावर बनवलेली व पिवळ्या रंगाने उत्खननाने महाश्मयुगीन संस्कृतीची यूरोपच्या मानाने अर्वाचीनता प्रत्ययास आणून दिली असून पिवळ्या रंगात रंगविलेल्या काळ्या-तांबड्या खापरांच्या काळानुसार इतर ठिकाणच्या खापरांचा काळ निश्चित करण्यास फार मोठी मदत झाली आहे. त्याप्रमाणे दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृती व महाश्मयुगीन संस्कृती यांचा सापेक्ष काळ व या संस्कृतींची वैशिष्टये ठरविण्यास ब्रह्मगिरी उत्खननाने फार मोठी मदत केली आहे.

अश्मपेटीकेतील दफन, ब्रम्हगिरी

संदर्भ : 1. Sri Sathyan, B. N. Ed. Mysore State Gazetteer : Chitradurga District, Bangalor, 1967.

            2. Wheeler, R. E. M. Ancient India,     Bulletin of the Archaeological Survey of India, New Delhi, 1947-48.

 देव, शां. भा

.