ब्यिल्यीन स्कई, व्हिससर्यिऑन : (१२ जुलै १८११-७ जून १८४८). श्रेष्ठ रशियन साहित्यसमीक्षक. जन्म फिनलंड मधील स्व्हेआबॉर्य येथे. १८२९ मध्ये मॉस्को विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला तथापि द्मित्री कालिनीन हे रशियातील दास्यपद्धतीवर (सर्फडम) टीका करणारे नाटक लिहिल्यामुळे १८३२ मध्ये त्याची ह्या विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली. परिणामतः तो पदवीधर होऊ शकला नाही. विद्यापीठीय शिक्षण संपुष्टात आल्यानंतर तो पत्रकारीकडे वळला. टेलिस्कोप ह्या वर्तनामपत्रात त्याला नोकरी मिळाली. १८३४ मध्ये ‘लिटररी ड्रीम्स’ (इं. अर्थ) ही त्याने लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांची माला टेलिस्कोपच्या मोल्व्हानामक वाङमयीन पुरवणीत प्रसिद्ध झाली आणि श्रेष्ठ साहित्यसमीक्षक म्हणून तो ख्यातकीर्त झाला. ब्यिल्यीनस्कईच्या ह्या लेखमालेवर विख्यात जर्मन तत्त्वज्ञ शेलिंग ह्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. १८३६ मध्ये टेलिस्कोपवर सरकारतर्फे बंदी घातली गेल्यानंतर काही काळ ‘मॉस्को ऑब्झर्व्हर’ (इं. अर्थ) ह्या नियतकालिकाचा तो संपादक होता. १८३९ मध्ये ‘फादरलँड नोट्स’ (इं. अर्थ) ह्या मासिकात प्रमुख समीक्षक म्हणून त्याला नोकरी मिळाली. ह्या सुमारास शेलिंगवरचा त्याचा प्रभाव सरून हेगेलच्या तत्त्वज्ञानाकडे तो आकर्षित झाला होता. ह्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून त्याने त्याच्या काळी प्रचलित असलेली समाजस्थिती आणि राजवट ह्यांचे समर्थन केले होते. तथापि पुढे हेगेलच्या तत्त्वज्ञानाचाही त्याने त्याग केला आणि फ्रेंच मानवतावादी समाजवादाकडे तो वळला. समाजवादात त्याला नव्या धर्माचे दर्शन झाले. साहित्य हा राष्ट्राच्या आत्म्याचा आविष्कार होय साहित्यकृतींतून समाजाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे तसेच प्रत्येक लेखकाच्या साहित्यातून जे वास्तव सशब्द केले जाते, त्या संदर्भातच त्याच्या साहित्याचे विश्लेषण केले गेले पाहिजे अशी भूमिका त्याने घेतली आणि वास्तववादाचा तो प्रखर पुरस्कर्ता बनला. एकोणिसाव्या शतकातील रशियन साहित्यसमीक्षेची दिशा ब्यिल्यीनस्कईनेच निश्चित केली. सोव्हिएट रशियातील समाजवादी वास्तववादात अनुस्यूत असलेल्या अनेक प्रवृत्तींचा ब्यिल्यीनस्कई हा जनक मानला जातो. मार्क्सवाद्यांना त्याच्या व्यक्तिमत्त्वात क्रांतिकारी लोकशाहीचा प्रतिनिधी दिसला.