बौद्ध धर्म : बुद्धपूर्वकालीन भारतात वैचारिक खळबळ जोरात सुरू झालेली होती. बौद्धांच्या पाली त्रिपिटाकांतील ‘ब्रह्मजालसुत्त’ ह्या नावाच्या एका सूत्रावरून तर निरनिराळ्या तऱ्हेचे ६२ दृष्टिवाद समाजात प्रचलित होते असे सविस्तर वर्णन आहे. वैदिक यज्ञसंस्थेबद्दल शंका प्रदर्शित केल्या जात होत्या. ‘प्लवा होते अदृढा यज्ञरूपाः’ (हे यज्ञप्रकार जे आहेत ते अस्थिर असून विश्वास ठेवण्याइतके बळकट नाहीत) असे मुंडकोपनिषद (१.२.७) वाक्यावरूनच स्पष्ट होते. निरनिराळ्या वैदिक देवतांना संतुष्ट करण्याकरिता म्हणून यज्ञांची आवश्यकता वैदिक ब्राह्मण मोठ्या अट्टाहासाने प्रतिपादन करीत होते, तर त्याच्या उलट तितक्याच जोराची प्रतिक्रिया म्हणून अरण्यात राहून चिंतन करणारे किंवा सारखे भटकत राहून आपल्या धार्मिक मतांचा पुरस्कार करणारे व त्याकरिता शारीरिक कष्ट किंवा परिश्रमाची तमा न बाळगणारे श्रमण हे ⇨यज्ञसंस्था  फोल आहे हे आवर्जून सांगत होते.

अक्रियावादी पूर्ण काश्यप, निरनिराळ्या योनींतून गेल्याने अंती शुद्धी मिळते असे प्रतिपादन करणारा मस्करी गोशाल [⟶आजीवक], उच्छेदवादी केशकंबली, काही तत्त्वांचेच शाश्वत अस्तित्व मानणारा पकुध कात्यायन, चातुर्याम संवराचा पुरस्कार करणारा निर्ग्रंथ ज्ञातृपुत्र, चतुष्कोटिविनिर्मुक्तच विधाने असावी असा आग्रह करणारा संजय वैराटीपुत्र (पाली-बेलद्विपुत्त) व यज्ञसंस्थेतून प्राणिहत्येची हकालपट्टी करावी असे म्हणणारा गौतम बुद्ध हे ह्या श्रमण-संस्कृतीचे प्रमुख म्हणून बौद्ध व जैन ग्रंथांतून दाखविलेले आहेत. हे सर्व श्रमण-संस्कृतीचे अभिमानी व वैदिक परंपरा न मानणाऱ्या पंथाचे पुढारी म्हणून समजले जात. ह्या निरनिराळ्या अवैदिक परंपरेच्या अनुयायांच्या पैकी जैन व बौद्ध ह्यांचेच धार्मिक ग्रंथ स्वतंत्रपणे उपलब्ध असून इतरांच्या धार्मिक मतांचा उल्लेख अनुषंगानेच किंवा प्रसंगोपात्तच उपलब्ध होतो. जैन व बौद्ध ह्यांना केवळ वैदिक ब्राह्मणांची यज्ञसंस्था व देव-देवता एवढेच मान्य नव्हते असे नसून, ब्राह्मणांनी प्रतिपादन केलेली जन्मजात उच्च-नीचता हीही मान्य नव्हती. म्हणूनच ह्या उभयपंथांच्या ग्रंथांतून यंज्ञसंस्थेबरोबर जन्मजात उच्च-नीचतेवरही कोरडे ओढले आहेत.

असल्या वैचारिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गौतम बुद्धाचा उदय झाला तसेच त्याला असेही आढळून आले, की ह्या जगातील माणसे लोभाविष्ट होऊन एकमेकांविरूद्ध झगडत असून थोडक्या पाण्यात तडफडणाऱ्या मत्स्याप्रमाणे दुःखीकष्टी होत आहेत (सुत्तनिवास ९३५-३६), सर्व जगात अस्तित्वात असणारे हे दुःख पाहून त्याचे मन पिळवटू लागले व ते दुःख नाहीसे कसे होईल हे शोधून काढण्याचा त्याला ध्यासच लागला. घरदार सोडून, निरनिराळे ध्यान मार्ग, तपश्चर्येचे मार्ग ह्यांचा अनुभव घेतल्यानंतर एके रात्री (वैशाख शुद्ध पौर्णिमेला) त्याला ज्ञान (संबोधी) प्राप्त झाले व त्याला दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.

भारतातील बौद्ध धर्माचा अभ्युदय, विकास व लोप तसेच भारताबाहेर त्या धर्माचा प्रसार व विकास हा सर्व इतिहास फार मनोरंजक व बोधप्रद आहे. बौद्ध धर्माच्या स्वरूपात जी अनेक स्थित्यंतरे झाली त्याच्या बुडाशी बुद्ध, धर्म, जीविताचे अंतिम ध्येय व ते प्राप्त करून घेण्याचे मार्ग ह्यांच्या संबंधीच्या कल्पनांमध्ये विलक्षण फेरबदल होत गेले आणि त्या त्या फेरफाराला अनुसरून बौद्ध धर्माच्या स्वरूपात फेरबदल होत गेले, असे बौद्ध धर्माचा इतिहास सांगतो [⟶ बुद्ध].

बोरोबूदूर (जावा) येथील प्रसिद्ध स्तूप : ८ वे शतक, एक विहंगम दृश्य.


प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म : आरंभीचा प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करूणा व समानता ह्यांचा पुरस्कार करणारा असा होता. ह्या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्याला बोधिवृक्षाखाली संबोधिज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्याला ह्या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, ह्यासंबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्याला प्रथम चार आर्य-सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात, खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे ह्या पहिल्या आर्य-सत्याची जाणीव झाली. हे दुःख कशामुळे उत्पन्न होते, ह्या संबंधी विचार करता त्याला आढळून आले, की हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनांत तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी ही आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य-सत्य त्याला उमजले आणि ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, निरोध पावते, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य-सत्य त्याला समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्गही असलाच पाहिजे, हे चौथे आर्य-सत्यही त्याला कळून आले. ह्यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.

सर्व भारतीय धर्माप्रमाणे बौद्धांचाही कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास आहे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, ह्याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्याला समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, ह्याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.

ह्या बरोबरच सर्व सृष्टी ही नाम-रूपात्मक किंवा पंचस्कंधात्मक आहे. ह्याशिवाय दुसरे काही नाही. पाच स्कंध म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. ह्यातील शेवटचे चार स्कंध ह्यांचा अंतर्भाव ‘नाम’ मध्ये होतो. ही सर्व सृष्टी व (त्यातील वस्तूही) चिरकाल टिकणारी नाही. ती अनित्य आहे. ती आज आहे उद्या नाहीशी होईल किंवा तीत फेरफार घडून येईल. ती विपरिणामधर्मी आहे. जी गोष्ट कायमची टिकणारी नाही, ती नाहीशी झाली म्हणजे साहजिकच ती बाळगणाऱ्या इसमास दुःख होते. म्हणून ती वस्तूही दुःखकारकच आहे. जी वस्तू अनित्य व दुःखकारक ती वस्तू ‘आपली’ असेही कोणी म्हणू इच्छिणार नाही. म्हणजे त्या वस्तूला ‘आत्मा’ किंवा ‘आत्मीय’ असेही म्हणणार नाही. तेव्हा ह्या सृष्टीतील सर्व वस्तू किंवा व्यक्ती अनित्य, दुःखकारक व अनात्म आहेत. असे जरी असले, तरी त्यांना खरे अस्तित्व आहे, हा भावना मात्र पक्की होती.

तत्त्वज्ञानाची एवढीच साधी विचारसरणी होती. दुःखापासून मुक्त व्हावे हेच ध्येय व तशा रीतीने दुःखमुक्त व्हावयाचे म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातूनही मुक्त व्हावयासच पाहिजे व ती स्थिती प्राप्त होण्याकरिता बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचे आचरण करणे. बुद्धाने उपदेशिलेल्या मार्गावर तीन पायऱ्या आहेत : शील, समाधी व प्रज्ञा. शील हे सर्व प्रयत्नांच्या बुडाशी आहे. शील ठीक असेल तर पुढील पायऱ्यांवरील प्रगती सुकर होते.

शील : गृहस्थाश्रमी लोकांना ⇨पंचशील सांगितले आहे. म्हणजे प्राणिहत्या, चोरी, लबाडी, परस्त्रीगमन व सुरापान ह्यांपासून निवृत्ती सांगितली आहे. गृहस्थाश्रमात राहून धुतल्या तांदळासारखे स्वच्छ राहणे कठीण, म्हणून भिक्षुधर्म स्वीकारण्याची शिफारस केलेली आहे. भिक्षूला आठ किंवा दहा प्रकारची शीले सांगितली आहेत. पंचशीलांपैकी परस्त्रीगमनाच्या जागी अब्रह्मचर्य शब्ध घालून त्यास पाचही शीलांचे पालन करावयाचे आहे. याशिवाय माला-गंध-विलेपन,उच्च प्रकारचे शयनासन व नृत्य-गीत-वादितादी असलेले बीभत्स जलसे ह्यांपासून दूर रहावयाचे असते. एवढ्याने आठ शीले संपादन होतात. ह्याच्याही पुढे जाऊन सोन्या-चांदीचा स्वीकार करणे व खरेदीविक्रीचा व्यवहार करून त्यात मापावजनाची लबाडी करणे ह्या गोष्टींपासून दर राहणे वगैरेंचा अंतर्भाव केल्यास दशशील संपादन केले असे होते. दुसऱ्याही प्रकारचा दशकुशल कर्मपंथ मानलेला आहे. हिंसा, चोरी, मिथ्या कामसेवन, खोटे बोलणे, चहाडी करणे, कोणाला बोचेल असे बोलणे, वायफळ बडबड करणे, हावरेपणा करणे, दुसऱ्यांचा द्वेष करणे व मिथ्या दृष्टी बाळगणे ह्या कायिक, वाचिक व मानसिक अशा दहा अकुशलापासून दूर राहणे. ह्याशिवाय भिक्षूंकरिता अनेक गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. झाडझडोरा छाटणे, धान्यगोटा साठवणे, नक्षत्रांवरून किंवा आकाशातील चमत्कारांवरून किंवा स्वप्नातील दृश्यांवरून किंवा पशुपक्ष्यांच्या आवाजांवरून भविष्य वर्तविणे किंवा मल्लादिकांचे किंवा जुगारांचे खेल खेळणे किंवा गृहस्थाश्रमीयांप्रमाणे गावच्या कुटाळक्या किंवा वायफळ गप्पा करणे किंवा भिक्षा मिळविण्याकरिता व्याजोक्ती किंवा सूचक शब्दांचा उपयोग करणे, ह्या सर्व गोष्टी त्याज्य आहेत.

समाधी : अशा रीतीने शीलसंपन्न झाल्यानंतर मन स्थिर व निश्चल करण्याकरिता समाधीचा टप्पा गाठावयाचा असतो. बौद्धांच्या कल्पनेप्रमाणे जीवन तीन भवांमध्ये किंवा लोकांमध्ये उपलब्ध आहे. हे भव असे : कामभव, रूपभव व अरूपभव. ध्यान-समाधीच्या मार्गाने तशी इच्छा असल्यास रूपभवातील देवांमध्ये व अरूपभवातील देवांमध्ये उत्पत्ती होऊ शकते. ध्यान अडतीस किंवा पुढील काळातील ग्रंथकारांच्या म्हणण्याप्रमाणे चाळीस प्रकारच्या आलंबनांचा (पाली-आरग्मण) उपयोग करून त्याच्यावर मन एकाग्र करून मिळविता येते. रूपावचर ध्याने, सूत्रपिटकाप्रमाणे चार प्रकारची किंवा अभिधर्मांच्या मताप्रमाणे पाच प्रकारची आहेत. ह्यात पहिल्या प्रकारच्या ध्यानात वितर्क, विचार, प्रीती, सुख व एकाग्रता ही पाच अंगे उपस्थित असतात. दुसऱ्या प्रकारच्या ध्यानात ‘वितर्क’ जातो, बाकीची चार अंगे फक्त उपस्थित असतात. तिसऱ्यात ‘विचार’ ही जातो, बाकीची तीन शिल्लक राहतात. चौथ्यात ‘प्रीती’ही नाहीशी होते व सुख व एकाग्रता शिल्लक राहतात. पाचव्यात सुख जाऊन त्याची जागा ‘उपेक्षा’ घेते व त्यातही उपेक्षा व एकाग्रता शिल्लक राहते. सूत्रपिटकाच्या मते दुसऱ्या ध्यानात वितर्क व विचार दोन्ही एकदम नाहीशी होतात त्यामुळे अभिधर्ममताप्रमाणे तिसरे, चौथे व पाचवे ध्यान हे सूत्रपिटकाप्रमाणे अनुक्रमे दुसरे, तिसरे व चौथेच बनते. ही रूपावचर ध्याने झाली. अरूपावचरभूमी ही चार प्रकारची आहे. त्यांची नावे अशी आहेत : आकाशानन्त्यभूमी, विज्ञाननन्तयभूमी, आकिंचन्यायतनभूमी व शेवटी नैवसंज्ञा-नासंज्ञभूमी. आकाशाच्या आनन्त्यावर, विज्ञानाच्या आनन्त्यावर, अ-किंचि-(काहीच नाही) भावावर व शेवटी संज्ञा नसणे किंवा संज्ञेचा संपूर्ण अभाव आहे असेही नाही असल्या भावावर अनुक्रमे मन एकाग्र करण्याचे ही चार अरूपावचर ध्याने प्राप्त करता येतात. ह्या सर्वांच्या पलीकडे गेल्यावरही एक प्रकारची निरोध-समापत्ती नावाची एक समाधि-अवस्था आहे. तीत सर्व हालचाली-श्वासोच्छ्वावसाचीही-बंद पडतात. फक्त शरीरात उष्णता असते व आयुर्मर्यादा खुंटली नसल्यामुळे जीवितेंद्रिय अस्तित्वात असते. ह्या समाधि-अवस्थेत मनुष्य जास्तीत जास्त सात दिवस राहू शकतो.


ह्या समाधिभावनांचा उपयोग चित्ताची चंचलता घालवून ते स्थिर करून प्रज्ञा संपादन करण्याची क्षमता मिळवून देण्याकडे आहे. समाधीची आवश्यकता अटळ आहे असे नाही. तिच्या साहाय्यतेवाचूनही प्रज्ञा प्राप्त करता येईल, पण त्याच्या ठिकाणी समाधीचा ओलावा नसल्यामुळे त्याला शुष्कविपश्यक (पाली-सुक्ख-विपस्सक) असे म्हणतात.

प्रज्ञा : प्रज्ञा संपादन करावयाची म्हणजे वर सांगितलेले बौद्धांचे तत्त्वज्ञान आत्मसात करावयाचे. ह्या सृष्टीत किंवा सृष्टीतील कोणाही एखाद्या व्यक्तींत नाम-रूप किंवा पाच स्कंधे किंवा बारा आयतने (म्हणजे चक्षू, श्रोत, घ्राण, काय व मन तसेच त्यांचे विषय बनलेले अनुक्रमे रूप, शब्द, गंध, रस, स्प्रष्टव्य व ‘धर्म’) किंवा अठरा धातू (म्हणजे वरील बारा आयतनांच्या जोडीला त्या त्या इंद्रियातून काम करणारे विज्ञान म्हणजे चक्षुर्विज्ञान धातू, श्रोत्रविज्ञान धातू, घ्राणविज्ञान धातू, जिव्हाविज्ञान, कायविज्ञान धातू व मनोविज्ञान धातू) ह्याखेरीज दुसरे काही नाही हे सर्व अनित्य, दुःखकारक अनात्म आहेत. चिरकाल टिकणारा, शाश्वत, उपनिषद्कारांनी ज्याचे खालील प्रकारचे वर्णन केले आहे, ‘अंगुष्ठमात्रःपुरूषोऽन्तरात्मा सदा जनानां हृदये संनिविष्टः’ (श्वेता. ३.१३) असा कोणी आत्मा नाही. ह्या जगतातील सर्व वस्तू खऱ्या अस्तित्वात असल्या, तरी विपरिणामधर्मी, प्रतीत्य-समुत्पादातील कार्यकारणभावाने नियमित असून, चार आर्यसत्यांचा अवबोध झाल्यानेच दुःखापासून मुक्ती होऊ शकेल, असा विश्वास बुद्धाचा श्रावक मनाशी बाळगतो. मनुष्यप्राणी दहा प्रकारच्या संयोजनांनी (म्हणजे बंधनांनी) जखडला गेला आहे. ह्या संयोजनांचा क्रमाक्रमाने नाश करूनच श्रावक आपले इच्छित फल गाठू शकतो. ह्या इच्छित फलाकडे नेणाऱ्या मार्गावर चार टप्पे आहेत. दहा संयोजनांपैकी पहिल्या तीन संयोजनांचा म्हणजे सत्कार्यदृष्टी (शरीरात आत्मा आहे अशी दृष्टी), विचिकित्सा (बुद्ध, धर्म व संघ ह्यांच्या बद्दलची शंका) व शील-व्रत-परामर्श (निरनिराळ्या व्रतवैकल्याने शुद्धी होते, ही भावना) ह्यांचा नाश झाला म्हणजे तो ‘स्त्रोतापन्न’ (प्रवाहावर पोहोचला) झाला व त्याने पहिला टप्पा गाठला असे समजतात. हा मनुष्य फार झाले तर पुढे सात जन्म घेईल, अशी बौद्धांची श्रद्धा आहे. त्याच्याही पुढे जाऊन राग, द्वेष व मोहाचा आपल्यावरील पगडा बराच शिथिल केल्यास तो ‘सकृदागामी’ बनतो. म्हणजे फार झाले तर तो इहलोकी एकदाच (सकृत्) परत येतो. पुढील दोन म्हणजे कामराग व द्वेष (पाली-पटिघ) ह्यांचाही नाश केला म्हणजे तो ‘अनागामी’ (पुन्हा इहलोकी न येणारा) बनतो. फार झाले तर वर उच्चतर लोकात जन्म पावतो. ह्याच्याही पुढची पाच संयोजने म्हणजे रूपराग, अरूपराग, मान, औद्धत्य व अविद्या ह्यांसकट सर्व दहाही संयोजनांचा नाश केला म्हणजे तो ‘अर्हत्’ बनतो व तो जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होऊन दुःखमुक्त होतो [⟶अर्हत् ].

अंकोरवात (कंबोडिया) येथील बौद्ध मंदिर : १२ वे शतक

निर्वाण : राग, द्वेष, मोहांचा संपूर्ण नाश झाला म्हणजे निर्वाणप्राप्ती झाली असे म्हणतात (संयुक्त. ४.२५१) पण निर्वाण म्हणजे संपूर्ण सुख आहे व जोपर्यंत माणसाला शरीर आहे तोपर्यंत शारीरिक आधिव्याधीही असणारच आणि ही शारीरिक व्याधी असली म्हणजे संपूर्ण सुख प्राप्त झाले असे कसे म्हणता येईल ? तेव्हा ह्यात पर्याय निघाला. शरीर शिल्लक आहे म्हणजे उपाधी शिल्लक आहे, ह्या जिवंतपणाच्या निर्वाणाला ‘सोपधिशेषनिर्वाण’ असे नाव दिले गेले. ही अवस्था अद्वैत वेदान्त्यांच्या जीवनमुक्तीप्रमाणे आहे. मृत्यू येऊन शरीर नष्ट झाले म्हणजे उपाधी नाहीशी झाली, म्हणजे ते निरूपधिशेष निर्वाण झाले व हेच संपूर्ण निर्वाण होय. ‘निब्बाणं परमं सुखं’ असे धम्मपदात (२०३-२०४) म्हटले आहे व ह्यालाच बुद्ध सर्वांत श्रेष्ठ (अवस्था) असे मानतात. ‘निब्बाणं परमं वदन्ति बुद्धा’ (धम्मपद १८४).


निर्वाण हे केवळ निरोधात्मकच आहे की त्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे, ह्याबद्दल बराच काथ्याकूट झालेला आहे. एवढे मात्र खरे की पाली त्रिपिटकांतच ते अस्तिधर्मी असल्याचे पुरावे सापडतात. उदा., उदान (८०-८१) ह्या ग्रंथात म्हटले आहे – ‘अजात, अभूत, अकृत असे असंस्कृत अस्तित्वात आहे…… म्हणूनच जात, भूत संस्कृत अशांना त्या अवस्थेतून सुटका आहे.’ म्हणूनच ह्या अवस्थेला संस्काराच्या पलीकडील तीर, ‘पारिम तीर’ (संयुत्त. ४.१७५) असे म्हटले आहे. ह्यात कोणत्याही प्रकारचे भय नसून ते सुरक्षित (क्षेम) आहे. ‘ह्याचा उपयोग काय’ वगैरेसारखे प्रश्न अनाठायी आहेत. मिलिन्दपन्ह  ह्या ग्रंथात (३१६) म्हटल्याप्रमाणे त्याचे रंग-रूप, ठाव-ठिकाणा, लांबी –रुंदी किंवा जाडी किंवा वय ह्यासंबंधी काही सांगणे शक्य नाही. ते अनिर्वचनीय आहे. पण ह्या निर्वाणाचा साक्षात्कार होण्याला हा आर्य अष्टांगिक मार्गच उपयोगी आहे. ह्या आठ अंगांपैकी सम्यक् वाक्, सम्यक् कर्मान्त व सम्यक् आजीव ह्यांच्या साहाय्याने शीलाची परिपूर्णता होते. सम्यक् व्यायाम (म्हणजे प्रयत्न), सम्यक् स्मृती व सम्यक् समाधी ह्यांच्या साहाय्याने समाधीची परिपूरि (पूर्ती) होते व सम्यक् दृष्टी व सम्यक् संकल्प ह्यांच्यामुळे प्रज्ञा संपादन करावयाला मदत होते. अशा रीतीने शील, समाधी व प्रज्ञा यांच्या भावनेने भिक्षू संसाररूपी जटेचे विजटन करून त्यातून मुक्त होतो. बुद्धाच्या ह्या मार्गाला ‘मध्यम मार्ग’ असे म्हटले आहे ह्याचे कारण बुद्धाने शाश्वतवाद व उच्छेदवाद ही दोन्हीही आत्यंतिक मते टाळली आहेत. तसेच कामोपभोग व देहदंडन हीही दोन्ही टोके टाळून मधला मार्ग पतकरला आहे.

बुद्धाचे अनुयायी : बुद्धाने आपल्या धार्मिक मतांचा व्यवस्थित प्रचार करून आपले अनुयाची मिळविले. त्याने कधीही भरमसाट विधाने करून किंवा प्रलोभने दाखवून आपले अनुयायी मिळविले नाहीत. ‘माझी मते तुमच्या बुद्धीला पटली तरच ती तुम्ही ग्रहण करून माझे शिष्यत्व पतकरू शकता’, असे तो स्पष्टपणे बजावीत असे. ‘स्वतः या आणि पहा’ (पाली-एहि-पस्सिको) असेच त्याने आपल्या धर्मसंबंधी वर्णन केलेले आहे. त्याचे अनुयायी चार प्रकारचे : घरदार सोडून (१) भिक्षू किंवा (२) भिक्षुणी झालेले किंवा गृहस्थाश्रमात राहून (३) उपासक किंवा (४) उपासिका बनलेले.

उपासक किंवा उपासिका बनणाऱ्यांनाही ‘बुद्धाला शरण जातो, धर्माला शरण जातो व संघाला शरण जातो’ अशी त्रिवार घोषणा करावी लागते. उपासक आणि उपासिका वर सांगितलेल्या पंचशीलाचा स्वीकार केल्याची घोषणा करतात व ही घोषणा वरचेवर एकत्र येण्याचे धार्मिक प्रसंग असतात, त्या त्या वेळी केली जाते. उपोसथ (उपवसथ-उपास) असेल त्या दिवशी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्णपक्षाच्या अष्टमीला, पौर्णिमेला किंवा कृष्णपक्षाच्या चतुर्दशीला भिक्षूने नेहमी पाळावयाचे आठही शीलचे जे नियम असतात, ते पाळावयाचे असतात. ते दिवस धार्मिक म्हणून पाळले जातात व त्या दिवशी बौद्ध विहारांत जाऊन स्तूपाची किंवा बुद्धाच्या प्रतिमेची पूजा वगैरे करून भिक्षूंना भोजन दिले जाते, नंतर ते भिक्षू उपासक-उपासिकांना उद्देशून धार्मिक प्रवचन करतात. ही पद्धत अद्यापही श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया वगैरे देशांत प्रचलित आहे.

जे लोक भिक्षू किंवा भिक्षुणी बनतात त्यांना रीतसर धर्मदीक्षा घ्यावी लागते. बौद्ध धर्माच्या आरंभीच्या दिवसांत जेव्हा संघ स्थापन झालेला नव्हता, त्या वेळी बुद्ध स्वतः एकट्यानेच दीक्षा देई किंवा बुद्ध व धर्म ह्या दोघांनांच शरण जाऊन दीक्षा दिली जात असे. पण संघाची स्थापना झाल्यानंतर संघाच्या सभेमध्येच ही दीक्षा देण्यात येऊ लागली. ह्या दीक्षाविधीस ‘उपसंपदा’ असे नाव आहे. ही उपसंपदा वीस वर्षे पूर्ण झालेल्या व आईबापांची भिक्षू होण्याकरिता परवानगी मिळविलेल्या लोकांनाच घेता येते.

बुद्धाची सामाजिक प्रश्नावरील विचारसरणी अशी होती : तत्कालीन समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र ही चतुर्वर्णी समाजव्यवस्था व त्याच्याही खाली अनार्य वंशी समाजरचना होती. ब्राह्मणांमध्ये प्रचलित असलेली जन्मजात शुद्धीची कल्पना बुद्धाला मान्य नव्हती. त्याची भिस्त कर्मावर होती. मनुष्य जन्मामुळे उच्च-नीच ठरत नाही, तर तो आपल्या कर्माने उच्च-नीच ठरतो. ह्या प्रश्नावर त्याचे अनेक ब्राह्मणांशी वादविवाद होऊन त्या सर्व वेळी त्याने आपल्या मुद्याचेच सर्मथन केलेले आहे आणि ह्या त्याच्या मतानुसार त्याच्या भिक्षुसंघात समाजातील सर्व थरांवरचे लोक होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कुलांतून आलेल्या लोकांप्रमाणेच शुद्ध व अनार्य वंशीही होते. सुप्रसिद्ध विनयाचार्य उपाली हा न्हाव्याच्या कुलातून आलेला होता. सुनीत हा झाडूवाला व सोपाक (श्व-पच्) हा चांडाल कुलातून आलेला होता. हे सर्व लोक भिक्षुसंघात आल्यानंतर समान दर्जाचे मानले जात व त्यांत जन्मजात उच्च-नीचभाव मानला जात नसे.

भिक्षूंची दिनचर्या : भिक्षूंचा दोन प्रहरच्या पूर्वीचा वेळ भिक्षा मागून आणण्यातच जात असे कारण भिक्षेचा गाव दूर असे, अतिदूर किंवा अतिजवळ नसे. दुपारचे भोजन मध्यान्हीचे आधी होत असे. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन दुसरे-तिसरे प्रहरी अरण्यात किंवा गुहेत किंवा निर्जन ठिकाणी जाऊन किंवा झाडाखाली ध्यानसमाधी लावली जात असे. ‘एतानि, चुन्द, रुक्खमूलानि, एतानि सुज्जागारानि, झायथ, मा पमादत्थ’ (हे चुन्दा ही येथे वृक्षमुळे व एकान्तस्थळे आहेत तिकडे जा आणि ध्यान-चिंतन कर. गलथानपणा करू नकोस म. नि. सुत्त ८). अशा रीतीने दुपारचा वेळ जाई. क्वचित वेळी संघाच्या सभा होऊन त्यात संघाचे काम होत असे. संध्याकाळ व रात्रीचा पूर्व प्रहर चर्चा व धर्मचिंतनात जात असे. कधी चंक्रमावर (शतपावलीची जागा) ह्या टोकापासून त्या टोकापर्यंच टेहळताना भिक्षू लोक चिंतन करीत.


सारनाथ येथील अशोक स्तंभ शीर्ष : इ.स.पू. ३ रे शतक.

 

संघाची स्थापना व संघाचे व्यवहार लोकमतानुवर्ती पद्धतीने होत असत. बहुमताचा विचार करून सर्व कारभार होत असे. एका सीमेत राहणाऱ्या सर्व भिक्षूंचा विचार घेतला जात असे. एखादा भिक्षू आजारीपणामुळे सभेला येऊ शकला नाही, तर त्याचे मत मागविले जात असे. धर्मप्रसाराच्या कामात कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या निःस्वार्थी भिक्षूंचा फार मोठा उपयोग झाला. ‘मा एकेन द्वे अगमित्थ’ (तुमच्यापैकी कोणीही दोघांनी एकाच मार्गाने जाऊ नये. विनय. १.२१) अशी बुद्धाची ताकीद होती. त्यामुळे निरनिराळ्या भिक्षूंना आपल्या धर्मप्रसाराच्या कार्यकरिता निरनिराळी क्षेत्रे निवडली व ह्यांचा परिणाम म्हणून बौद्ध धर्माचा प्रसार भारतात व भारताबाहेर फार झपाट्याने झाला. भिक्षूंचा जसा संघटित संघ स्थापन झाला तशीच स्त्रियांच्याही धार्मिक संघटनेची सोय व्हावी म्हणून भिक्षुणींच्याही प्रवेशाला व त्यांच्या भिक्षुणी-संघाला थोड्याशा नाखुषीने का होईना, बुद्धाने परवानगी दिली. बुद्धाचा धर्म ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय, लोकांनुकंपाय’ व्हावा म्हणून बुद्धाने धर्मोपदेशाचे माध्यम म्हणून त्या त्या लोकांमध्ये प्रचलित असलेल्या बोलभाषेचा (सक-निरूत्ति = स्वक-निरुक्ति) उपयोग केला. त्याच्या काही ब्राह्मण शिष्यांनी बुद्धाचे उपदेश छांदस (वैदिक) भाषेत रूपांतर करण्याची परवानगी मागितली असताना त्यांनी ती एवढ्याच करिता नाकारली (विनय, चुल्लवग्ग-नालंदा-आवृत्ती-२२९).

अनुयायातील फाटाफूट : बुद्धाच्या हयातीतच छन्न, उपनद ह्यांसारखे, बुद्धाला प्रतिकार करणरे काही लोक निघाले. ‘षड्वर्गिक भिक्षू’ नावाचा एक गट बुद्धाने घालून दिलेल्या नियमांचा पद्धतशीर रीतीने प्रतिकार करीत होता असे दिसते तसेच बुद्धाचा ‘देवदत्त’ नावाचा चुलत भाऊ होता. तो बुद्धाने पुढारी होण्यात जे यश मिळविले त्याबद्दल त्याचा मत्सर करीत असे. कित्येक वेळा राजघराण्यातील लोकांच्या मदतीने बुद्धाचा जीव घेण्याचेही प्रयत्न केले गेले पण ते सर्व फसले. पण शेवटी भिक्षुसंघांत फूट पाडण्याच्या प्रयत्नदत तो यशस्वी झाला. (१) जन्मभार भिक्षा मागून आणलेल्या अन्नावरच भिक्षूने कालक्रमणा करावी, (२) वर्षाचे बाराही महिने भिक्षूने अरण्यातच रहावे व तेथेही (३) झाडाच्या बुडाशीच वास करावा, (४) मत्स्य व मासांचा आहार सदैव वर्ज्य करावा, (५) इकडून तिकडून गोळा करून आणलेल्या चिंध्यांचीच कंथा वापरावी.


हे पाच नियम देवदत्त प्रतिपादन करू लागला. बुद्धाने घालून दिलेल्या नियमांपेक्षा हे नियम कडक आहेत. ह्यातील साधेपणा, अल्पेच्छता व कडकपणा ह्यांमुळे अनेक भिक्षू आपले पुढारीपण मान्य करतील, अशी देवदत्ताची अपेक्षा होती. बुद्धाच्या निर्वाणानंतर ‘हे करा, ते करू नका’ असे सांगणाऱ्या बुद्धाच्या काचातून सुटल्याबद्दल समाधानकारक उद्गार काढणारे सुभद्रासारखे काही निघाले. त्यामुळे काश्यपासारख्या बुद्धाच्या पट्टशिष्याला चिंता वाटू लागली. म्हणून त्याने बुद्धाचे सर्व उपदेश एकत्र करून त्यांना व्यवस्थित रूप देण्याकरिता राजगृह येथे ‘संगीती’ बोलावली. त्या संगीतीत मान्य केलेले निष्कर्षदेखील ‘संमत नाहीत’ असे म्हणणारे ‘पुराण’ व ‘गवांपति’ निघाले. पुढे शंभर वर्षांनी तर संघामधील फूट जगजाहीर होऊन वैशालीतील दुसऱ्या संगीतीच्या वेळी एक भला मोठा गट-ज्यांना बुद्धाचे कडक नियम मान्य नव्हते-मूळ संघातून बाहेर पडून ‘महासंघिक’ नावाचा पक्ष तयार झाला. ह्याच पक्षातून पुढे ⇨महायान पंथ  अस्तित्वात आला. नंतर दक्षिण आशियातील बौद्धांच्या परंपरेप्रमाणे आणखी १३६ वर्षांनी म्हणजे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर २३६ वर्षांनी, सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत व त्याच्याच उत्तेजनामुळे तिसरी संगीती भरली. ह्याचे कारण सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्माच्या पुरस्कारामुळे बौद्ध धर्मात अनेक पाखंडी लोक शिरले व आपापली धार्मिक मते बुद्धाचीच मते आहेत असे प्रतिपादू लागले. त्या लोकांची हकालपट्टी करणे जरूर होते. त्यावेळी तयार झालेल्या कथावत्थु नावाच्या ग्रंथात त्या काळी बौद्ध अनुयायांत प्रचलित असलेल्या निरनिराळ्या मतप्रवाहांचा परामर्ष घेतलेला आहे. ह्या ग्रंथाच्या टीकात्मक अर्थकथेवरून त्या वेळी बौद्धांच्या मध्येच १८ निरनिराळ्या मतप्रणाली अस्तित्वात होत्या, असे दिसते. ह्यांचे दोन मुख्य गट पडतात : एक स्थविरवाद्यांचा व दुसरा महासंघिकांचा. पहिल्यात बारा मतप्रणाली येतात, तर दुसऱ्यात सहा.

बौद्ध धर्माच्या भारतातील पुढील इतिहासात ज्या बौद्ध संप्रदायांनी विशेष नाव गाजविले आहे ते ह्या दोन गटांपासून निघालेले आहेत. स्थविरवाद्यांपासून सर्वास्तिवादी निघाले व सर्वास्तिवाद्यांपासून वैभाषिक व सौत्रांतिक असे संप्रदाय निघाले. ह्या दोन संप्रदायांनाच पुढे ‘हीनयान’ असे तुच्छतादर्शक नाव त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी दिले. महासंघिकांच्या मतप्रणालीतूनच कालांतराने ‘माध्यमिक’ व ‘योगाचार’ संप्रदाय उद्भवले. ह्याचेच प्रस्थ भारतात पुढे वाढले. हे लोक आपल्याला श्रेष्ठतर समजू लागले व स्वतःकरिता त्यांनी ‘महायान’ हे नाव धारण केले व दुसऱ्या गटाला कमी प्रतीचे लेखून त्यांना ‘हीनयान’ हे नाव दिले. [⟶हीनयान पंथ]. दक्षिण आशिया खंडातील स्थविरवादी बौद्धांना हे नाव साहजिकच अपमानास्पद वाटते. म्हणून ते येथे न वापरता महायान ग्रंथांतूनच वापरले गेलेले ‘श्रावकयान’ हे नाव आम्ही येथे स्वीकारत आहोत. ह्याला स्थविरवादी लोकांची कोणतीही हरकत असण्याचे कारण नाही.

बौद्ध धर्माचे पंथ व संप्रदाय : पाटलिपुत्र येथील संगीतीनंतर परदेशात धर्मदूत पाठवावयाचे ठरले व त्याप्रमाणे अशोकाचा पुत्र महेन्द्र (पाली-महिंद) ह्याच्या अध्यक्षतेखाली ताम्रपर्णी किंवा सिंहलद्वीप येथे धर्मदूत मंडळ पाठविले गेले. त्यानंतर थोडक्याच काळात स्थविरवादी लोकांचा त्या देशात चांगलाच जम बसल्यानंतर भारतात त्या संप्रदायाचा हलके हलके प्रभाव कमी होत गेला व सर्वास्तिवादी संप्रदाय प्रामुख्याने पुढे आला. श्रावकयानाची धुरा ह्याच संप्रदायाला वहावी लागली. भारतातील इतर तात्त्विक सांप्रदायिकांना आपली बाजू पटवून देण्याकरिता संस्कृत भाषेची कास धरणे जरूर पडले. ह्या संप्रदायाचे सर्व उपलब्ध ग्रंथ संस्कृत भाषेतच लिहिलेले आहेत. ह्या संप्रदायाचा प्रसार पंजाब, काश्मीर, गांधार व त्याच्याही पलीकडे मध्य आशियातील देशांपर्यंत झाला. कुशाण वंशीय ⇨कनिष्क  राजाचा ह्या संप्रदायाला भरपूर पाठिंबा मिळाल्यामुळे तो संप्रदाय त्याच्या राज्यात भरभराटीला आला. त्याच्याच कारकीर्दीत (इ. स. सु. १००) आणखी एक संगीती भरवण्यात आली त्या वेळी ह्या संप्रदायाच्या त्रिपिटकांवर ‘विभाषा’ रचण्यात आल्या, ह्या विभाषांवर भर देणाऱ्या सर्वास्तिवाद्यांना ‘वैभाषिक’ म्हणण्यात येऊ

 

अंकोरवास (कंबोडिया) येथील बुद्धाचे पाऊल : एक शिल्पांकन, सु. १२ वे शतक.


लागले व त्याच्या उलट विभाषांना महत्त्व न देता केवळ मूळ ‘सूत्रां’चाच आधार मानणाऱ्यांना ‘सौतांत्रिक’ असे नाव पडले. अभिधर्मंकोश व त्यावरील ‘भाष्य’ ह्यांचा लेखक आचार्य ⇨वसुबंधू ह्याने आपले वरील ग्रंथ काश्मीर वैभाषिकांच्या पठडीला अनुसरून लिहिले आहेत असे म्हटले असले, तरी जागजागी त्याने आपल्या वैयक्तिक सौत्रांतिक मतांचे आविष्करण केलेले आहे.

श्रावकयानाचे दोन्ही संप्रदाय-स्थविरवाद आणि सर्वास्तिवाद बुद्धाच्या ठिकाणी असामान्य गुणवत्ता किंवा दैवी शक्ती असल्याचे मानीत असले, तरी त्याला मानुषी अस्तित्व होते असे मानतात. स्थविरवाद्यांच्या पाली ग्रंथांत ह्यासंबंधीचे पुरावे जागोजाग आढळतात. उदा., मज्झिमनिकायातील ‘सेख-सुत्तां’त (अनुक्रम ५३) बुद्ध एका ठिकाणी म्हणतो ‘माझी पाठ दुखते आहे, मी जरा पाठ ताणून पडतो’ असे म्हणून त्याने आपला शिष्य आनंद ह्यालाच धर्मोपदेश करण्यास सांगितले आहे. दुसऱ्या एका सुत्तांत (मज्झिमनिकाय, चातुमसुत्त, अनुक्रम ६७) ‘चातुमा’ ह्या गावी बौद्धभिक्षू एकत्र जमले असता भयंकर गोंगाट करू लागले. ‘हा काय मछलीबझार आहे’ असे म्हणून संतापून त्याने त्या भिक्षूंना घालवून दिले. ह्यावरून मनुष्यप्राण्याच्या ठिकाणी असलेल्या त्रुटीही त्याच्यात आढळतात. ह्याच्या उलट महासांघिकाच्या दृष्टीने बुद्ध हा लोकोत्तर होता व त्याच्या लोकोत्तरपणाला साजेसेच गुण त्याला चिकटवले गेले.

श्रावकयानाच्या दृष्टीने स्वतःचे निर्वाण प्राप्त करून घेणे हेच ध्येय मानले जात असे, तर महासांघिक करूणेने प्रेरित होऊन, इतरांचे दुःख दूर करण्याकरिता जरूर तर आपली स्वतःची निर्वाणप्राप्ती लांबवावयास तयार असत. त्यांना बोधिसत्वाचे उदाहरण अर्हतापेक्षाही जास्त माननीय वाटत असे. श्रावकयानी भिक्षू विनयांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याकरिता झटत असत,तर महासंघिक ह्यांना विनयांच्या नियमांचा काच वाटून त्यातून शक्य तितक्या पळवाटा काढण्याचा प्रयत्न करीत असत. ह्या वृत्तीतूनच महायानी पंथामध्ये विनयाला कमी महत्त्वाचे स्थान मिळाले. तत्त्वज्ञानावर त्यांचा मोठा भर असे.

 श्रावकयानाच्या मते सत्य हे एकच (एकं हि सच्चं न दुतियमत्थि-सुत्तनिवात ८८४), तर महायानिकांनी दोन प्रकारची सत्ये मान्य केली आहेत : एक सांवृतिक [संवृत्ति = (पाली) सम्मुति] म्हणजे लोकसंमत, तर दुसरे पारमार्थिक म्हणजे निष्पर्याची. श्रावकयानी पंथाच्या मते बाह्य सृष्टी ही अनित्य, विपरिणामधर्मी असली तरी तिला खरे अस्तित्व नाही, कारण ती विपरिणामधर्मी असल्यामुळे स्व-भाव-शून्य आहे. स्वतंत्र अस्तित्व नाही, परतंत्र आहे किंवा ती परिकल्पित आहे म्हणजे कल्पनाजन्य आहे.

श्रावकयान पंथीयांनी जगाच्या बुजाशी अनेक तत्त्वे प्रतिपादली आहेत. थेरवाद्यांच्या मते चित्त १, चैतसिक ५२, रूप व निर्वाण अशी ५५ तत्त्वे मानलेली आहेत. सर्वास्तिवादी ही तत्त्वे ७५ मानतात. रूप ११ प्रकारचे, चित्त १, चौतसिकांमध्ये चित्त-संप्रयुक्त ४६, चित्त-विप्रयुक्त १४ मिळून ७२ व असंस्कृत धर्म ३ (प्रतिसंख्यानिरोध, अप्रतिसंख्यानिरोध व आकाश). महायानिकांच्या मते परमार्धतः सर्व वस्तूंमध्ये स्व-भाव-शून्यता दाखविणारी ‘शून्यता’ हे एकच तत्त्व आहे. योगाचीर जरी सांवृतिक दृष्ट्या १०० तत्त्वांना मान्यता देत असले व ही सर्व सांवृतिक दृष्ट्या एकाच विज्ञान तत्त्वाची परिणत स्वरूपे आहेत असे मानीत असले, तरी परमार्थतः शून्यता हेच एक तत्त्व मान्य करतात.

बौद्ध धर्माची देणगी : ब्राह्मण धर्माच्या तत्त्वज्ञानी आचार्यांनी बौद्ध मताचे खंडन करताना वैभाषिकवादी व सौत्रांतिकवादी, सर्वास्तिवादी, माध्यमिक व योगाचार संप्रदायी महायान ह्यांच्याच मतांचा परामर्श घेतलेला आहे आणि स्थविरवादाकडे दुर्लक्ष केलेले आहे. ह्याचे कारण त्यांच्या वेळी भारतात स्थविरवाद बहुधा लुप्तच झालेला होता. पण बौद्ध धर्माने भारताला तत्त्वज्ञान, वाङ्मय, न्यायशास्त्र, स्थापत्य, मूर्तिकला, चित्रकला इ. क्षेत्रांत अमोल देणगी दिलेली आहे. जागतिक वाङ्मयात ज्याला स्थान मिळाले आहे असे पाली त्रिपिटकांतील धम्मपद, अशोकाने आपल्या शिलालेखात उल्लेखिलेल्या सात धर्मपर्यायांपैकी तीनचा अंतर्भाव ज्यात आहे असे सुत्तनिपात, सर्वास्तिवादाचे समर्थन करणारा वसुबंधूचा अभिधर्मकोश आणि त्यावरील ‘भाष्य’, माध्यमिक संप्रदायाचे तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या मूलमध्यमककारिका, विज्ञानवादाचे विवेचन करणारे लंकावतारसूत्र आणि असंगाचे योगाचारभूमिशास्त्र, विज्ञानवादाचे समर्थन करणारी वसुबंधूची  विंशतिकात्रिशिका, अश्वघोषाचे सुंदर काव्य बुद्धचरित ह्या सर्वांना भारताने मानाचे स्थान दिले आहे. भारतीय न्यायशास्त्रात बुद्धपालित, भावविवेक, ⇨दिङ्नाग व ⇨धर्मकीर्ती  ह्यांनीही मानाचे स्थान पटकाविले आहे. अशोकाचे शिलास्तंभ, ⇨सांची  येथील बौद्धस्तूप, कार्ले येथील लेणी, बुद्धगयेतील बुद्धमंदिर, आंध्र राज्यातील अमरावती व नागार्जुनकोंडा येथे सापडलेली बुद्धमूर्ती, निरनिराळ्या बौद्ध स्मारकांवरील खोदकाम ही जगातील सर्व रसिक तज्ञांच्या कौतुकाचा विषय बनलेली आहेत. ह्यावरून दिसून येईल, की भारताच्या संस्कृतीला बौद्ध धर्माची फार मोठी देणगी आहे.

महायान बौद्ध धर्मात करूणेला प्राधान्य मिळाले, बोधिसत्त्वांचे प्रस्थ माजले व भक्तीला महत्त्व दिले गेले. अनेक तऱ्हेच्या देवदेवतांचा समावेश व्हावयाला वाव मिळाला. निरनिराळे बुद्ध, बोधिसत्त्व आणि इतर देवदेवतांच्या मूर्ती घडवून त्यांची पूजा होऊ लागली. ह्याच महान पंथाने लोकप्रियता मिळविण्याकरिता आदिवासी लोकांच्या देवदेवता मान्य करण्यास सुरुवात केली व ह्या देवघेवीत त्यांच्या धार्मिक कल्पना, आचारविचार, पूजाप्रकार, मुद्रा, मंडले, जादूटोणा ह्यांचा स्वीकार होऊन तांत्रिकांच्या मंत्रयान, सहजयान, वज्रयान आदी प्रकारांना वाव मिळाला. तांत्रिकांच्या काही समाजविघाती आचारविचाराने लोकात बेदिली उत्पन्न झाली. बोधिसत्त्वभूमि ह्या ग्रंथात (बोगिहार संपादित प्रत-पृष्ठ १६७) “गृहस्थश्रमी बोधिसत्त्वाने करुणेने प्रेरित होऊन जिच्यावर कोणाचाही हक्क नाही अशा अनुरक्त न कामार्त स्त्रीशी अब्रह्मचर्यसेवन केले, तरी तो दोषी ठरत नाही (‘न काञ्चन परिहरेत्’ छान्दोग्य उपनिषद २.१३.२ ह्या वाक्यातील गर्भित कल्पनेशी तुलना करण्याजोगी आहे.) एवढेच नव्हे तर उलट पुण्यच संपादन करतो” असे म्हटले आहे. धूर्त लोक ह्याचा फायदा कसा घेत असतील हे सांगण्याची गरज नाही.


बौद्ध धर्माचा भारतात व भारताबाहेर प्रसार : बौद्ध धर्म हा आरंभीच्या काळात सध्याचे बिहार राज्य व उत्तर प्रदेशातील पश्चिम भागापुरताच मर्यादित असला, तरी खुद्द बुद्धाच्या काळात अंग, मगध, वत्स (पाली-वंस), कोशल, उज्जैनी प्रांत व कदाचित वायव्येकडे तक्षशिलेपर्यंत पसरलेला असावा. पाली त्रिपिटकातील हे क्षेत्र पश्चिमेकडे सोवीर (सिंध), सौराष्ट्र, उत्तरेकडे तक्षशिला व हिमवंत, पूर्वेकडे उत्कल व दक्षिणेकडे दंडकारण्य, गोदावरी नदी व प्रतिष्ठान येथपर्यंतच मर्यादित होते, असे दिसते. पुढील अठ्ठकथाकार बुद्धघोषाच्या काळापर्यंत आंध्र प्रदेश, तमिळनाडूतील कांचीनुर (आधुनिक कांजीवरम्), नागपट्टन (आधुनिक नेगापटम), ताम्रपर्णीद्वीप (सिंहलद्वीप किंवा श्रीलंका), नैर्ऋत्येकडे भरुकच्छ (भडोच), शूर्पारक (सोपारा, अपरांतक न वनवासी (कर्नाटक राज्यातील) व वायव्येकडे यवन व कंबोज (पंजाब, काश्मीर, गांधार) हे सर्व प्रांत व्यापले गेले होते.

भारताच्या बाहेरील देशांचा विचार करता अशोकाने आपले धर्मदूत जे पाठवले ते त्याच्या राज्याच्या सीमेबाहेर पण भारतातील प्रदेशात नव्हे तर भारताबाहेरील देशांतही पाठविले. अशोकाच्या तेरा क्रमांकाच्या शिलाप्रस्तरलेखात पश्चिम आशियातील सिरियाचा दुसरा अँटायओकस (अंतयोको), एपिरस या उत्तर प्रांताचा अलेक्झांडर (अलिकसुंदरो), ईजिप्तचा टॉलेमी (तुरमेयो), मॅसिडोनियाचा अँटिगोनस (अन्तकिनी) आणि उत्तर आफ्रिकेतील सायरीन ह्या ग्रीक वसाहतीतील टॉलेमीचा सावत्र भाऊ मॅगास (मक) ह्यांचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व अशोकाचे समकालीन इ.स.पू. तिसऱ्या शतकाच्या मध्याच्या सुमारास हयात होते. ह्यांच्या राज्यात धर्मदूत पाठवले. दोन क्रमांकाच्या प्रस्तरलेखातही अँटायओकस व त्याच्या पलीकडील राजांच्या मुलखातूनही मनुष्यचिकित्सा व पशुचिकित्सा सुरू केली, असा उल्लेख आहे. अशोककाली झालेल्या तिसऱ्या संगीतीनंतर धर्मदूतमंडळे ज्या बाहेरच्या देशांत पाठविली त्यांत हिमवंतातील प्रदेश, यवनांचा मुलूख, ताम्रपर्णी द्वीप किंवा सिंहलद्वीप व सुवर्णभूमी (ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया किंवा सुमात्रा आदी बेटे) ह्यांचा निरनिराळ्या विद्वानांच्या मते समावेश केला जातो.

वायव्येकडील मुलखातून बौद्ध धर्माला मिनँडर (मिलिंद, इ.स.पू.सु.१००), कनिष्क (इ.स.सु.१००) यांसारख्या राजांचा आश्रय मिळाल्यामुळे तो अफगाणिस्तान (काबूलपासून १५ मैलावर एक खेडे आहे. ते आजही ‘बुद-खाक’ म्हणजे ‘बुद्ध-माती’ म्हणजे ‘बुद्ध-भूमी’ ह्या नावाने ओळखले जाते), बाल्ख (आग्नेय इराणात) मार्गे मध्ये आशियात, तुर्कस्तानच्या पूर्वेकडील मुलखात गेला. ह्या भागात खोतान (गोदान) हे बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते असे दिसते. त्या मुलखात भारतीय भाषा (एक प्रकारची प्राकृत) बोलली व लिहिली जात होती. प्राकृत धम्मपद, ससेच नियाट या भागात सापडलेल्या त्रुटित पोथ्यांतून जो पुरावा मिळतो, तो ह्या गोष्टीचे समर्थन करणाराच आहे. तसेच खोतानच्या पूर्वेकडील गोबीच्या रेताड मैदानातून उत्खनन होऊन पोथ्यांचे अवशेष सापडले आहेत. त्यावरून सर्वास्तिवादी पंथाचे बौद्ध संस्कृत ग्रंथ ह्या भागातील बौद्ध विहारांतून वापरले जात असे दिसते. सर्वास्तिवादी पंथाच्या दिव्यावदान ह्या ग्रंथाची तुर्की व उइगर भाषांत भाषांतरे झाली आहेत. सुवर्णप्रमास ह्या ग्रंथाची उइगर, सोगडिअन, मंगोली, मांचुरी व चिनी भाषेत भाषंतरे झाली आहेत तसेच उदान वर्ग ह्या ग्रंथाच्या सोगडिअन संस्करणाचे त्रुटित भागही सापडले आहेत. ह्या मध्य आशिया भागातून बौद्ध धर्म पुढे चीनमध्ये गेला व पहिला भारतीय विद्वान ⇨काश्यप मातंग हा इ. स. पहिल्या शतकात चीनमध्ये जाऊन त्याने भारतीय ग्रंथांचे चिनी भाषांतर ४२ अनुसंधित केले. हा भारत-चीन संबंध जो येथे सुरू झाला तो पुढे इ. स. च्या दहाव्या-अकराव्या शतकापर्यंत चालू राहिला. ⇨ फाहियान, ⇨यूआन-च्यांग व ⇨इत्सिंग यांच्यासारख्या श्रद्धावान यात्रेकरूंनी भारतात येऊन अनेक वर्षे येथे राहून संस्कृतचे अध्ययन केले आणि ते येथून शेकडो ग्रंथ घेऊन गेले. चीनमध्ये जाऊन त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरे चिनी भाषेत केली. बौद्ध धर्म व त्यातील वाङ्मयाबरोबर बौद्ध कथा व बौद्ध कलाही तेथे गेल्या व त्याचे अवशेष अद्यापही अफगाणिस्तानापासून चीनपर्यंत विखुरलेले आढळतात. अफगाणिस्तानात फ्रेंच विद्वानांनी केलेल्या संशोधनात भारतीय लिपीत पण संस्कृत भाषेत लिहिलेली पोथ्यांची पाने सापडली आहेत. तसेच बामियान येथील प्रचंड उंचीचे (एक ३८ मी. व दुसरा ५६ मी.) बुद्धाचे पुतळ, तेथील गुहांतून परिनिर्वाणवस्थेतील बुद्धाची प्रचंड मूर्ती, अजिंठा लेण्याची आठवण करून देणारे स्थापत्यकलेचे विशेष, चिनी तुर्कस्तानातील मिरान येथे सापडलेल्या जातक-कथांची चित्रे, मध्य आशियातील ‘किझिल’ येथील बौद्ध कलांचे अवशेष, खोतान व काराशहर (कालाशहर) येथील चित्रकला, चीनमधील ‘हजारगुहा’ मधून सापडलेली चित्रकला, ‘माई-चि’ पर्वतगुहांतील भारतीय धोतर व उत्तरीय वापरणाऱ्या व्यक्तींची चित्रे आणि जवळजवळ २,००० भारतीय ग्रंथांची भाषांतरे असलेले चिनी त्रिपिटकही सर्व बुद्धाच्या धर्माचा प्रसार ह्या सर्व आशियातील उत्तरेकडील देशांतून झाल्याची साक्ष देतात. चीनमधून कोरियामार्फत जपानमध्ये बौद्ध धर्म गेला. तसेच तिबंट (भोट प्रदेश) व मंगोलिया हेही बौद्ध धर्माने प्रभावित आहेत. तिबेटात बौद्ध धर्माचा प्रवेश जरा उशिरा (सातवे-आठवे शतक) झाला. पण तिबेटी भाषेतही अनेक बौद्ध ग्रंथांची भाषांतरे झाली असून स्वतंत्रपणे तिबेटी भाषेतही बौद्ध ग्रंथ झाले आहेत. अनेक बौद्ध ग्रंथ, मुख्यतः संस्कृत भाषेत लिहिलेले, भारतात नष्ट झाले आहेत पण त्यांची भाषांतरे चिनी व तिबेटी भाषांत झालेली उपलब्ध आहेत. ह्या तिबेटी ग्रंथांस ‘कांजूर’ व ‘तांजूर’ अशी नावे आहेत. नेपाळमध्येही बौद्ध धर्माचा प्रवेश उशीराच झाला पण अजूनही अनेक बौद्ध मठांत बौद्ध संस्कृत ग्रंथांची हस्तलिखिते आढळतात. बिहारमधील नालंदा, विक्रमशील व ओदंतपुरी येथील विद्यापीठे मुस्लिमांच्या भयानक हल्ल्यानंतर नष्ट झाली तेव्हा अनेक विद्वान आपापल्या जवळील पोथ्यांचा संग्रह घेऊन पळाले आणि ते नेपाळात आले. त्यांपैकी काही पुढे तिबेटातही गेले. नेपाळची राजधानी काष्टमांडू (काठमांडू) येथील राजदरबारचा संस्कृत पोथ्यांचा संग्रह तर अमोल आहे. येथेच एका पाली ग्रंथाची चार त्रुटित पाने भारतीय लिपीत लिहिलेली आढळली बुद्धाची जन्मभूमी लुंबिनी-देई नेपाळ तराईत आहे व तेथे सम्राट अशोकाने, आपल्या तेथील भेटीचे स्मारक म्हणून शिलास्तंभ उभारून तेथील लोकांना जमीनमहसुलाच्या करातून मुक्त केले. [⟶बुद्धमूर्ति बौद्ध कला बौद्ध साहित्य ].

अनुराधपुर (श्रीलंका) येथील थूपाराम डागोबा : इ. स. पू. ३ रे शतक.


सम्राट अशोकाच्या नंतरही भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून वेळोवेळी (इ. स. च्या दुसऱ्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत) सांस्कृतिक लाटा पूर्वेकडे दक्षिण ब्रह्मदेशात व आग्नेयेकडील थायलंड, कंबोडिया, सुमात्रा, जावा (यवद्वीप) वगैरे देशांत आढळल्या. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र ह्याच्या अध्यक्षतेखाली पाठविलेल्या धर्मदूत मंडळाने सिंहलद्वीपात बौद्ध धर्मात पाया पक्का रोवला. भारतात आंध्र प्रदेशात अमरावती व नागार्जुनकोंडा येथे नामांकित बौद्ध केंद्रे होती. तेथून थेट पूर्वेकडे जाऊन समुद्र ओलांडला म्हणजे दक्षिण ब्रह्मदेशाचा किनारा लागतो. भारतातील ह्या भागातील लोकांचा व्यापारी संबंध दक्षिण ब्रह्मदेशाशी सुरू झाल्यानंतर आणि काही काळाने, महासंघिक बलवत्तर झाल्याने, स्थविरवादी बौद्ध लोकही तेथे गेले व त्यांनी त्या भागांत आपली छोटी छोटी राज्ये (इ. स. दुसऱ्या व तिसऱ्या शतकांत) स्थापन केली. तेथे वसाहत करून राहण्याऱ्या ह्या लोकांना ‘तलैंग’ ह्या नावानेच ओळखत असत. ह्याच लोकांच्या पुढील वंशजनांना ‘मोन’ हे नाव पडल्याचे दिसते. हे मोन लोक उंच, सरळ नाकाचे अद्यापही ब्रह्मदेशात विखुरलेले दिसतात. ह्या मोन लोकांचा विस्तार थायलंडच्या मध्यापर्यंत जाऊन पोहोचला. ह्यांचा धर्म स्थविरवादी होता असे दिसते. दक्षिण ब्रह्मदेशात पेगू (हंसवती), थातोन (सुधम्मवती) आणि रामंत्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात हा धर्म प्रचलित होता. इ. स. च्या अकराव्या शतकात उत्तर ब्रह्मदेशातील पगान येथील राजा अनुरूद्ध ह्याने दक्षिणेतील थातोन येथील राजा मनुहा ह्याच्या राज्यावर स्वारी करून त्या राजाला व त्याच्या बरोबर त्याचे धार्मिक ग्रंथ (त्रिपिटक), भिक्षू व त्याच्या दरबारी असलेले स्थापत्य व मूर्तिविज्ञान ह्यात वाकबगार असलेले कलाकार ह्या सर्वांना उत्तरेतील आपली राजधानी पगान येथे नेले. ह्या जित राज्यांतील लोकांची धर्म व संस्कृती उच्चतर असल्याने पगान येथील राजदारबाराने लवकरच त्यांचा धर्म व संस्कृती उचलली व आत्मसात केली. अशा रीतीने ब्रह्मदेश स्थविरवादी बौद्ध बनला.

इ. स. चवथ्या-पाचव्या शतकात गुप्त राजाच्या कालात भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून मलाया, कंबोडिया, थायलंड, सुमात्रा, जावा वगैरे बेटांपर्यंत सांस्कृतिक लाटा पसरल्या. व्यापारी, धर्मोपदेशक, कलाकार ह्यांच्या मार्फत ह्या देशांशी दळणवळण वाढले व बौद्ध व ब्राह्मण धर्म ह्यांचाही प्रभाव दिसू लागला. सहाव्या ते आठव्या शतकांत पल्लव राजांच्या कारकीर्दीत व नवव्या-दहाव्या शतकांत बिहार व बंगाल येथील पाल वंशीय राजांच्या प्रोत्साहनाने हे दळणवळण घनिष्ठ होत गेले व ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म ह्यांचा प्रभाव घनिष्ठ होत गेला. मलाया, समात्रा, बोर्निओ, जावा येथे सापडलेल्या मूर्ती, शिलालेख, यूपस्तंभ किंवा बोरोबूदूर येथील स्तूप व त्यावरील बौद्ध जातक-कथा किंवा पौराणिक कथा किंवा थायलंडच्या दक्षिणेस व कंबोडियाच्या अगदी उत्तर सीमेवर असलेले अंकोरवात नावाचे प्रचंड नामांकित देऊळ, त्याची कारागिरी, त्यातील बौद्ध किंवा ब्राह्मण धर्मीयांच्या मूर्ती हे सर्व भारतीय प्रभावाचे पुरावे उपलब्ध आहेत. तांत्रिक धर्मही सुमात्रा, बोर्निओ व यवद्वीपापर्यंत पोहोचला होता, ह्याचेही पुरावे उपलब्ध आहेत.

बौद्ध धर्माच्या वरील धावत्या परीक्षणावरून दिसून येईल, की आशिया खंडातील भारताच्या उत्तरेकडील प्रांतांत व भारातबाहेरील उत्तरेकडील देशांत म्हणजे अफगाणिस्तान , इराणचा आग्नेय भाग, मध्य आशिया, चीन, मंगोलिया, कोरिया, जपान, तिबेट व नेपाळ ह्या देशांत स्थूलमानाने सर्वास्तिवादी व महायान पंथी बौद्ध धर्माचा म्हणजे ज्या संप्रदायाने संस्कृत भाषेत आपले ग्रंथ रचले त्या संप्रदायांचाच प्रभाव पडला. भगवान बुद्धाचीच कथा मध्य आशियापर्यंत पोहोचून तेथे निरनिराळ्या धर्मांच्या लोकांत प्रसूत झाली. त्याच कथेची रूपांतरे पेहलवी भाषेत, हिब्रू, अरेबिक, ग्रीक भाषांत झाली व ख्रिस्ती धर्मोपदेशतकांनी त्यात जरूर ते फेरफार करून त्या कथेला ख्रिस्ती कलाटणी दिली. ‘बर्लाम व जोसाफात’ ह्या नावाने हल्ली प्रसिद्ध असलेल्या कथेतील बर्लाम व जोसाफात ह्यांना ख्रिस्ती संत बनविले व त्यांच्या नावाने २७ नोव्हेंबर हा दिन साजरा करू लागले. पण ह्या गरीब बिचाऱ्या ख्रिस्ती लोकांना हे ठाऊक नाही, की बर्लाम हा भगवानाचा आणि जोसाफात किंवा त्याच्याच पूर्वपरंपरेतील युआसाफ किंवा बुदासाफ हा बोधिसत्त्वाचाच अवतार आहे.

आशियातील दक्षिण देशांत म्हणजे श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड व कंबोडिया ह्या देशांत स्थूलमानाने हल्ली स्थविरवादी किंवा थेरवादी संप्रदायाचा बौद्ध धर्म प्रचलित आहे.

बौद्ध धर्म हा भारतात सु. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून ते इ. स. सातव्या-आठव्या शतकांपर्यंत म्हणजे सु. हजार वर्षे ब्राह्मण धर्माचा प्रतिस्पर्धी म्हणून राहिला. आठव्या-नवव्या शतकापासून जरी त्या धर्माला उतरती कळा लागली, तरी तो निरनिराळ्या प्रांतांत संकुचित क्षेत्रात बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होता. बख्तियार खलजीने बिहारमधील नालंदा, विक्रमशील वगैरे ठिकाणची बौद्ध विद्यापीठे व बौद्ध मठ इ. स. च्या तेराव्या शतकाच्या आरंभीच उद्ध्वस्त केल्यानंतर बौद्ध भिक्षूंना उत्तरेकडे नेपाळ व तेथून पुढे तिबेटात पळून जावे लागले. पण भारतीय लोकांचा व विशेषतः राजघराण्यांच्या उदार धोरणामुळे बौद्ध देवदवतांबद्दल व मठांबद्दल आदर दाखविण्याकरिता व तेथील पूजेकरिताही देणग्या किंवा वर्षासने दिल्याचा उल्लेख असणारे लेख चौदाव्या शतकापर्यंत सापडतात. अलीकडे कोरियात सापडलेल्या लेखावरून चौदाव्या शतकातही कांचीपुरम (आधुनिक कांजीवरम्) येथे ध्यानभद्र नावाच्या बुद्ध भिक्षूने एक अवतंसकसूत्रा  वरील प्रवचन ऐकल्याचा उल्लेख आहे.

ब्राह्मण धर्मांत घडून आलेली प्रतिक्रिया : बौद्ध धर्माने घडवून आणलेल्या आचारविचारांतील क्रांतीची निदर्शने भारताच्या बुद्धोत्तर इतिहासात आढळून येतात. हिंसायुक्त यज्ञांविरुद्ध बुद्धाने उघडलेल्या आघाडीचे परिणाम महाभारतात  आढळून येतात. हिंसायुक्त यज्ञांच्या जोडीली हिंसाविरहित यज्ञांचा उल्लेख असून त्यांचीच शिफारस केलेली आहे. हिंसायुक्त यज्ञ देवांना प्रिय असत, तर हिंसारहित यज्ञ मुनींना प्रिय असत. तुलाधार व जाजली ह्यांच्या संवादत हिंसायुक्त यज्ञाचा निषेध केला असून त्यात होणाऱ्या मांसाशनाची प्रथा कोणातरी धूर्त लोकांनी प्रचारात आणली, असा उल्लेख आहे (१२.२५७.९). यज्ञात जर पशूची हत्या झाली, तर मुनींच्या प्रभावामुळे शंभर रोग देशात पसरतात (१२.२५४.४५-४७). अहिंसेला सर्वांत श्रेष्ठ धर्म म्हटले आहे (१२.२५७.६). भागवतपुराणात (१.८.५२) तर यज्ञातील हत्यादेखील क्षम्य नाही असे म्हटले आहे. पुढे पिष्ठमय-पशूची योजना होऊ लागली हे सर्वश्रुत आहे.


त्याचप्रमाणे जन्मजात उच्च-नीचतेवरची बुद्धाची मतेही समाजात, काही लोकांना तरी संमत होऊ लागली, हे महाभारतातील (३.२.७७३) खालील श्लोकावरून दिसून येईल :

‘शृणु यक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतम् lकारणं हि द्विजत्वे च वृत्तमेव न संशयः ll’

 

भागवतातही ह्याच तत्त्वाचे समर्थन केलेले आहे (७.११.३५ ९.२.२३).

तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात बौद्धांचा महायान धर्म ब्राह्मण धर्माला जवळ येत चालला. श्रावकयानाच्या बहुविध तत्त्वांच्या ऐवजी जगाच्या बुडाशी एकच तत्त्व आहे हे महायानिकांनी ग्राह्य केले. विरक्ततेनंतर प्रव्रज्या घेणे हेच संयुक्तिक आहे, असे बुद्धाचे मत होते. त्यालाच बुद्धोत्तर जावालोपनिषदात  नेहमीच्या ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ आश्रमानंतर प्रव्रज्या घेण्याच्या प्रथेच्या जोडीला ‘यदहरेव विरजेत् तदहरेव प्रव्रजेत’ असे म्हणून विरक्त होताच प्रव्रज्या घेण्याची परवानगी दिलेली आहे. शंकराचार्यांनी ह्या प्रथेची संमतीच दिलेली आहे. महायानिकांचा मायावाद व अजातिवाद हा गौडपाद व शंकराचार्य ह्यांना संमतच आहे. बौद्ध संघाच्या व मठांच्या धर्तीवर शंकराचार्यांनीही दशनामी सेवकांची व मठांची स्थापना केली. बौद्धांच्या सांवृतिक व पारमार्थिक सत्यांना ब्राह्मण धर्मीयांकडून मान्यता मिळाली. महायानिक धर्माने भक्तीचा स्वीकार केला व देवदेवतांच्या मूर्तीची पूजा अमलात आली. ब्राह्मण धर्मानेही युद्धाची महती जाणून त्याला विष्णूच्या दशावतारांत स्थान दिले. अशा रीतीने दोन्ही धर्मातील भेद कमी होत होत बौद्ध धर्म नवीन हिंदू धर्मात विलीन झाला. तांत्रिक बौद्ध धर्मीयांच्या पंच‘म’कार (मद्य, मत्स्य, मांस, मुद्र व मैथुन) सेवनासारख्या अनिष्ट आचारविचारामुळे उत्पन्न झालेली प्रतिक्रिया ह्या प्रक्रियेला पुष्टिदायकच ठरली.

बुद्धाचे धर्मोपदेशार्थ संचार होऊ लागले व त्यावेळी अनेक तरूण घरदार, बायकामुले सोडून जाऊ लागले त्या वेळी बुद्धाविरूद्ध जे काहूर माजले त्याचा उल्लेख पालिवाङ्मंयातील विनयपिटकाच्या ‘महावग्गा’त (पृ. ४३) स्पष्टपणे केलेला आहे तो असा : ‘श्रमण गौतम हा लोकांना निपुत्रिक करायला निघाला आहे, (स्त्रियांना) विधवा बनवू लागला आहे, कुलाचा उच्छेद करावयाला निघाला आहे.’ समाजात दिसून येणारी ही प्रतिक्रिया एका बाजूला व दुसऱ्या बाजूला बुद्धाने आपल्या धर्मप्रसाराच्या कार्यात मिलविलेले यश ह्यांची सांगड घालून संन्यस्त वृत्तीच्या लोकांकरिताही काही सोय आपणास करता आली तर ती करावी, अशी चिंता समाजातील ब्राह्मण धुरीणास लागली असल्यास नवल नाही. तेव्हा समाजाच्या धारणेकरिता आपण अशा प्रकारची काही तरी व्यवस्था करावी, की जेणेकरून लोकांकडून बुद्धाविरुद्ध घेतलेल्या आक्षेपासारखे आक्षेप तर येऊ नयेत व संन्यस्त वृत्तीच्या लोकांच्या आकांक्षाही तृप्त व्हाव्यात. ह्याच विचारसरणीतून चार आश्रमांची कल्पना निघाली हे उघड आहे.

पगान (ब्रह्मदेश) येथील आनंदमंदिर : ११ वे शतक.

आश्रमसंस्थेतील ‘आश्रम’ हा शब्द ‘संहिता’ व ‘ब्राह्मणां’त सापडत नाही (हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र – पी. व्ही. काणे खंड २ रा, भाग १, पृष्ठ ४१८). छान्दोग्य उपनिषदात (२.२३.१) तीन ‘धर्म-स्कंध’ सांगितले आहेत. ते असे : १ यज्ञ, अध्ययन व दान २ तप व ३ आचार्य कुलात राहणारा ब्रह्मचारी. ह्यामध्ये अर्थात एका मागून एक ठराविक क्रम जो आश्रमसंस्थेत अपेक्षिला आहे तो नाही. ऐतरेय ब्राह्मणात (३३.२१) ‘किं न मलं किमजिनं किमु श्मश्रूणि किं तपः’ असे जे वचन आहे, त्यावरून काणे अनुमान काढतात, की ‘अजिन’ हे ब्रह्मचर्याश्रमाचे सूचक आहे. ‘मल’ गृहस्थाश्रमाचे, ‘श्मश्रूणि’ वानप्रस्थाचे व ‘तप’ हे संन्यासाचे सूचक आहे. पण ‘अजिन’ किंवा ‘मल’ हे शब्द विशिष्टाश्रमाचेच सूचक आहेत, असे म्हणणे रास्त होईलसे वाटत नाही.


‘अजिन’ किंवा ‘मला’ चा पर्याय शब्द ‘रज’ किंवा ‘पांशु (पंसु) हे बौद्ध वाङ्मयात अनेक वेळा येतात (धम्मपद ३९४-९५.१४१) किंवा सुत्तनिपात (२४९). ह्या ठिकाणी योजलेल्या ‘अजिन’, ‘रज’ किंवा ‘पंसु’ शब्दावरून, ते केवळ जटा अजिन धारण करणाऱ्या व राख अंगास फासणाऱ्या ‘वैराग्या’शीच संलग्नू आहेत. ह्या चार आश्रमांचा स्पष्ट उल्लेख प्रथम जावालोपनिषदात (४) येतो. ह्याचबरोबर असेही तेथे म्हटले आहे, की ‘ज्या दिवशी वैराग्य प्राप्त होईल त्याच दिवशी प्रव्रज्या घ्यावी’, नाहीतर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ ह्या आश्रमांतून जाऊन प्रव्रज्या घ्यावी. गौतम धर्मसूत्र (३.२), वसिष्ठ धर्मसूत्र (७.१–२) व बौधायन धर्मसूत्र (२.६.१७) ह्या ठिकाणी चारही आश्रमांचा स्पष्ट उल्लेख आहे पण बौधायन धर्मसूत्रांत ह्या आश्रमसंस्थेसंबंधी जे विधान केलेले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे असे म्हटले आहे, की ही आश्रमसंस्था प्रल्हाद याचा मुलगा ‘असुरकपिल’ ह्याने देवाविषयीच्या द्वेषबुद्धीने स्थापन केलेली आहे आणि म्हणून त्या संस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे कारण नाही. त्याच्या म्हणण्याचा उपदेश हा दिसतो, की सर्व लोक गृहस्थाश्रमातच राहिले तर देवांना त्यांच्या नित्याच्या यज्ञांतून हविर्भाग हा मिळतच राहील. पण त्यातील काही वानप्रस्थ किंवा संन्यासी जर बनले, तर देवांचा हविर्भाग कमी होईल. म्हणून ह्या आश्रणसंस्थेप्रमाणे न वागता प्रचलित असलेल्या ‘गृहस्था’ वस्थेमध्येच लोकांनी राहावे.

बौद्धांच्या जुन्या पाली त्रिपिटकांत व जैनांच्या प्राचीन धर्ममागधी आगमग्रंथांत चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा उल्लेख वारंवार येतो. ‘आश्रमसंस्था’ जर त्या वेळी अस्तित्वात असती, तर तिचाही उल्लेख खात्रीनेच आला असता. त्या काळी ‘गृही’ किंवा ‘ब्रह्मचाही’ असे दोनच प्रकारचे लोक दिसतात. ‘ब्रह्मचारी’ म्हणजे शुद्ध व पवित्र जीवनाचे आचरण करणारा एवढाच अर्थ आहे आणि हाच अर्थ अथर्ववेद (११.६) ह्या ठिकाणी काळवीटाचे चर्मधारण करणाऱ्या व लांब दाढी असणाऱ्या ब्रह्मचाऱ्याच्या वर्णनात अभिप्रेत आहे.

ह्यावरून असे दिसून येईल, की चार आश्रमांची योजना ही बुद्धोत्तर असावी आणि ती केवळ बौद्ध धर्मांविरुद्ध ब्राह्मण धर्मांची प्रतिक्रिया म्हणून, बौद्धांच्या संन्यास धर्माला प्रतिटोला म्हणून ब्राह्मण धर्माच्या धुरीणांनी संकल्पून आपल्या समाजव्यवस्थेशी निगडित केली. जाबालोपनिषद हे बुद्धोत्तर कालीन उपनिषदांपैकीच एक आहे, असे विद्धानांचे मत आहे. बौधायनसूत्रांवरून आश्रमसंख्या नुकतीच अस्तित्वात आली असल्याचे स्पष्टच आहे.

अशा रीतीने बौद्ध धर्म हिंदू धर्मात विलीन झाला असला, तरी त्याने आपली छाप भारतातील उत्तरकालीन धार्मिक संप्रदायांवर व सामाजिक आचारावर कायमची ठसवलेली आहे. भारतातील सर्व प्रांतांतील मध्ययुगीन (१४ वे ते १७ वे शतक) संतांनी म्हणजे ज्ञानदेव, रामानंद, चैतन्य, नानक, कबीर, एकनाथ आदी संतांनी जन्मजात उच्च-नीचतेला फाटा देऊन सर्व मानवजातीला समान मानले आहे. बुद्धाच्या शिष्यांमध्ये ज्याप्रमाणे न्हाव्याच्या कुळातून आलेल्या उपालीला किंवा झाडूवाल्याच्या कुळातून आलेल्या सुनीताला किंवा चंडाल योनीत जन्मलेल्या सोपाकाला समानतेने वागवले जाते असे, त्याप्रमाणे संतांच्या मेळाव्यात शूद्र तुकाराम, मोची रोहीदास व न्हावी सेना ह्यांनाही मानाचे स्थान असे. ‘कर्मचांडालापासो जन्मचांडाळ चांगु’ ही महानुभावांचीही भूमिका आहे. ⇨वीरशैव संप्रदायही जन्माला महत्त्व देत नाही.

प्राचीन बंगाली वाङ्मयातील रामानंद पंडित ह्यांचे शून्यपुराण, कानुभट्ट ह्याचे चर्याचर्यविनिश्चयधर्ममंगल नावाने प्रसिद्ध असलेले काव्य ह्यांवर बौद्ध धर्माचा निश्चित प्रभाव आहे. ओरिसातील महिमाधर्मी लोकांच्या वाङ्मयावर चैतन्याबरोबर नागार्जुनाचीही छाप आहे.  ह्या प्रांतांतील वैष्णवांमध्ये चैतन्याच्या जोडीला नागार्जुनालाही मानतात. वैष्णवांतील श्यामानंद, नरोत्तमदास, रघुनाथदास हे जरी हलक्या कुळात जन्म पावले होते, तरी अनेक ब्राह्मणांचे गुरू बनले. बाह्याशुद्धीपेक्षा अंतःशुद्धीवर बुद्धाप्रमाणे नानक, कबीर, तुकाराम आदी संतांनीही जोर दिला आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडूत मणिमेखलै (ला) नावाच्या ग्रंथात दिङ्नागाच्या तर्कशास्त्राची छाप दिसते. तसेच बुद्धमित्र नावाच्या ग्रंथकाराने लिहिलेले वीरसोळिंब, अरुनंदीचे शिवज्ञान सिद्धियर कुंडल-केशी-वस्तु नावाचे काव्य हे सर्व बौद्ध विषयांवर आहेत. कुंडल-केशी-वस्तूचे खंडन नालकेशीवस्तू नावाच्या एका जैन ग्रंथात केलेले असून त्यातील उतारे नीलकेशीवस्तूवरील एका टीकेत (वामन मुनिकृत समयदिवाकर) उद्धृत केलेले आहेत. मूळ कुंडल-केशी-वस्तु हे काव्य आता नष्ट झाले आहे.

सांची येथील प्रख्यात बौद्ध स्तूप : इ.स.पू. ३ रे ते १ ले शतक.


नाथ संप्रदायाचा व बौद्ध तांत्रिक संप्रदायाचा घनिष्ठ संबंध होता. नाथ संप्रदायामार्फत बौद्ध धर्माचा मध्ययुगीन हिंदी साहित्यावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे व ह्या विषयावर हिंदीत अनेक ग्रंथही प्रसिद्ध झालेले आहेत. महानुभावांच्या सूत्रपाठांत जात्यंधांनी हत्ती पाहिल्याची कथा आहे. ही कथा बौद्धांच्या पाली त्रिपिटकांतील उदान ग्रंथातील (६.४) अशाच तऱ्हेच्या जात्यंधांच्या कथेची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. महानुभावांची पूजास्थाने ‘ओटे’ आहेत. ही बौद्धांच्याच स्तूपांची छोटीशी व विकृत स्वरूपातील आवृत्ती नाहीना ? ही शंका आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीत (१३.१५१.५२) बौद्धांच्या पाली वाङ्मयातील मिलिन्दपन्ह ह्या ग्रंथात आलेल्या ‘रथ’ व ‘सेना’ ह्यांच्या उपमा आलेल्या आहेत. ‘शून्य’ किंवा ‘महाशून्य’ (नागार्जुनाच्या पंचक्रम ह्या ग्रंथात शून्य, अतिशून्य, महाशून्य व सर्वशून्य हे शब्द आले आहेत) ह्यासंबंधीचे विवरण ज्ञानेश्वरीत (६.२७३, १३.९२५-२६, १४.९२४) आले आहे व एके ठिकाणी (१३.९२५) तर ते ‘श्रुतिवचन-संमत’ म्हणून गौरवले आहे. इतर संतकवींनीही त्याचा उल्लेख केला आहे. जनाबाईंच्या अभंगात त्याची उठाठेव केलेली आहे. उलट मुकुंदराजाने परमामृत  ग्रंथातील आठव्या प्रकरणात ‘शून्यखंडन’ करून ‘ब्रह्मा’ ला शून्य ही संज्ञा देणे बरोबर नाही, असे म्हटले आहे. ज्ञानदेवाचा नाथ संप्रदायाशी शिष्य-गुरू संबंध सुप्रसिद्धच आहे. तेव्हा हे शून्यतेचे लोण बौद्ध संप्रदायापासून नाथ संप्रदायामार्फत आले नसेलच असे म्हणता येईल का?

‘चिंचेचे पानावर देऊळ बांधिलं खालती कळस वर पाया रे’ किंवा ‘आंधळ्यानं पाहिलं, बहिऱ्यानं ऐकलं’ अशी कोडीवजा संतवचने व कबीराची ‘उलटी वाणी’ ह्यांची नाथ संप्रदाय व सिद्ध साहित्य व तांत्रिकांची ‘संध्याभाषा’ ह्यांच्या मार्फत बौद्ध पाली वाङ्मयातील धम्मपदात आलेल्या खालील कूट वचनापर्यंत सांगड घालता येते. उदा., मातरं पितरं हन्त्वा………. अनीघो होति ब्राह्मणो (धम्मपद २९४-९५, माता-पितरांची हत्या करून…. ब्राह्मण क्लेशातून मुक्त होतो) इत्यादी.

जपानी बौद्ध धर्मातही ह्या कोड्यांचा (जपानी क्वान) प्रचुर उपयोग आढळतो. उदा., ‘मन असेल तर बुद्ध, नसेल तर बुद्ध नाही’, ‘पुण्यांचा स्वीकार करू नाक, पापांचा त्याग करू नका’. ह्या बौद्धांच्या वैशिष्ट्याला ‘शॉक थेरपी’ (धक्क्याची चिकित्सा) असे नाव दिलेले आहे. त्या धक्का देणाऱ्या शब्दांचा विशिष्ट अर्थ परंपरेनेच समजून घ्यावयाचा असतो. खुद्ध पुण्यातही १९१६-१७ च्या सुमारास एक फकीर ‘एक पैसा लेऊंगा, सौ गाल्या देऊंगा’ असे मोठ्याने ओरडत भिक्षा मागत जात असे, हे अनेक लोकांना आठवत असेल. तेव्हा ही एक परंपरा समाजात पिढ्यानपिढ्या प्रचलित आहे असे दिसते.

मुक्तेश्वराने (१७ वे शतक) विराट पर्वातील पहिल्या अध्यायात बौद्धांच्या ‘तारा’ देवीचा उल्लेख करून तिला शैवधर्मी, कौलिक धर्मी, जैनधर्मी, वेदधर्मी, मुख्य देवतेच्या व सांख्य धर्मी ‘आदि’ शक्तीच्या बरोबर लेखिले आहे.

“तारा तूंचि उक्ता आगमीं। गौरी भगवती शैव धर्मी।वज्रादेवी यथानामीं । कौलिकाचारें बोलिजे ॥७६॥जैन म्हणती पद्मावती। ‘त्रिपदा गायत्री’देवमतीसांख्य बोलती तुजप्रति ।‘आदि-शक्ति’ व्यापके ॥७७॥”

ह्यावरून हिंदू धर्माने बौद्ध धर्माला विलीन करून घेऊन आत्मसात केल्याचेच दिसते.

बौद्ध धर्माची अभ्यासकेंद्रे : बौद्ध धर्माच्या अभ्यासाला यूरोपात एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच जरी सुरुवात झाली असली, तरी शेवटल्या दोन दशकांत विशेष चालना मिळावयास सुरुवात झाली. १८८१ मध्ये ‘पाली टेक्स्ट सोसायटी’ नावाची संस्था टी. डब्ल्यू. ऱ्हिस डेव्हिड्झ ह्यांच्या अध्यक्षतेखाली इंग्लंडमध्ये स्थापन झाली. ऱ्हिस डेव्हिड्झ व पुढे कालांतराने त्यांच्या पत्नी मिसेस ऱ्हिस डेव्हिड्झ ह्यांनी ह्या संस्थेची धुरा अनेक वर्षे वाहिली व उभयतांच्या पश्चात् मिस होर्नर ह्यांनी तेच कार्य पुढे चालू ठेवले आहे. ह्या काळात त्या सोसायटीतर्फे बौद्ध धर्मासंबंधीच्या उपलब्ध असलेल्या वाङ्मयात सर्वांत जुने पाली भाषेतील मूळ त्रिपिटक ग्रंथ व त्यांच्या वरील बऱ्याचशा ⇨अट्ठकथा  प्रसिद्ध झाल्या. त्यांतील महत्त्वाच्या पुस्तकांची इंग्रजी भाषांतरे त्या सोसायटीतर्फे किंवा तत्-संलग्न संस्थांतर्फे प्रसिद्ध झाली. पाली त्रिपिटक ग्रंथ उपलब्ध होण्यापूर्वी बुद्ध, त्याचा धर्म व संघ ह्या संबंधीची कल्पना केवळ काही बौद्ध संस्कृत ग्रंथांतूनच उपलब्ध होती व ह्या संस्कृत ग्रंथांपैकी बहुतेक महायान पंथीय असल्यामुळे त्यांत भरमसाट दैवी चमत्कार बुद्धाला चिकटविले जाऊन त्याला अलौकिकत्व प्राप्त झाले होते. बुद्धाचे मानुषी अस्तित्व व त्याची इहलोकीची कर्तबगारी ह्यांना त्या ग्रंथांत वावच नव्हता. पाली त्रिपिटक ग्रंथाच्या प्रकाशनाने बुद्ध, धर्म व संघ ह्या संबंधी जास्त वास्तववादी माहिती उपलब्ध झाली. इंग्लंड पाली भाषेतील साहित्याच्या अभ्यासाचे केंद्र बनले.

नेपाळमधील बोधनाथ स्तूप


यूरोपात फ्रान्स व बेल्जियम येथे बौद्ध संस्कृत ग्रंथांच्या अध्ययनाची केंद्रे सुरू झाली. सिल्वाँ लेवी व लुई द ला वाले पूसँ ह्यांची नावे ह्या कार्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य त्यांचा पुढील शिष्यवर्ग चालू ठेवीत आहे. ह्याशिवाय तिबेटी व चिनी ह्या क्षेत्रांतही तेथील विद्वान काम करीत आहेत. जर्मनीत मॅक्स म्यूलर, वालेसर, विन्टरनिट्झ, वाल्डश्मिट वगैरेंनी व त्यांच्या शिष्यगणांनी बौद्ध धर्माच्या पाली, संस्कृत, तिबेटी व चिनी ग्रंथांच्या अध्ययनाची प्रथा पाडलेली आहे. रशियात शेरबाट्स्की व त्यांच्या ओबरमिलर आदी शिष्यांनीही बौद्ध संस्कृत व तिबेटी ग्रंथांवर भर दिला आहे. अमेरिकेत प्रथमतः हार्व्हर्ड, येल व कॅलिफोर्निया येथील विद्यापीठांत बौद्ध-अभ्यास सुरू होते. अलीकडे बऱ्याचशा प्रमुख विद्यापीठांतून भारतीय अभ्यासाची सोय असून बौद्ध-अभ्यास हा त्याचा अंश म्हणून मानला जातो. जपानमधील सर्व विद्यापीठांतून बौद्ध धर्माचा अभ्यास होतो व त्यात पाली, संस्कृत, तिबेटी व चिनी ह्या भाषांचा अभ्यास आवश्यक असतो.

भारतातही पाली भाषेच्या अध्ययनाच्या रूपाने बौद्ध धर्माच्या अभ्यासाला सुरुवात झाली. ⇨धर्मानंद कोसंबी   ह्यांच्या खटपटीने कलकत्ता व मुंबई विद्यापीठांत पाली भाषेच्या अभ्यासाला सुरुवात झाली व पुढे ते कार्य आता इतर अनेक विद्यापीठांतून म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, लखनौ, शांतिनिकेतन, काशी, दिल्ली, मगध, मराठवाडा आदी विद्यापीठांतून चालू आहे. दिल्ली विद्यापीठात तर १९५७ पासून ‘बौद्ध-अभ्यासा’चा स्वतंत्र विभागच उघडला असून तेथे पाली, संस्कृत, तिबेटी व चिनी ह्या क्षेत्रांतील बौद्ध-अभ्यास व्हावेत अशी योजना आखलेली आहे. ह्याच विभागातर्फे पु. वि. बापट संपादित तिबेटी ग्रंथ (धुतगुणनिर्देश) व त्याचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झाले आहे (१९६४). पंडित ⇨राहुल सांकृत्यायन ह्यांनी तिबंटात जाऊन तेथील मठांतून उपलब्ध असलेल्या संस्कृत पोथ्यांची छायाचित्रे घेऊन ती व तिबेटी बौद्ध ग्रंथ (कांजूर व तांजूर) भारतात आणून पाटणा येथील ‘के. पी. जयस्वाल संशोधन संस्थे’ मध्ये ठेवलेले आहेत. त्यांत बौद्ध वाङ्मयात नावाजलेले ग्रंथ आहेत-महासंघिकांचे प्रातिमोक्षसूत्र, वसुबंधूचे अभिधर्मकोशभाष्य, अभिधर्मदीप व त्यावरील विभाषाप्रमावृत्ति, मध्यान्तविभाग व त्यावरील भाष्य, न्यायबिंदुटीका, मूलसर्वास्तिवाद्यांचे विनयसूत्र व त्यावरील त्रुटित वृत्ति, नागार्जुनाची विग्रहव्यावर्तनी, धर्मकीर्तीचे प्रमाण वार्तिकवादन्याय, प्रज्ञाकरगुप्ताचे वार्तिकालंकार आणि कोकापंडिताचे रतिरहस्य वगैरे ग्रंथ आहेत. त्यांतील काही प्रसिद्ध झाले आहेत, काही प्रसिद्धीच्या वाटेवर आहेत व काही योग्य संपादकाची वाट पाहत आहेत.

नालंदा येथील संस्थेने समग्र पाली त्रिपिटकाची आवृत्ती देवनागरी लिपीत भिक्षू जगदीश काश्यप ह्यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली संपादून प्रसिद्ध केली. तसेच दरभंगा येथील मिथिला इन्स्टिट्यूटतर्फे प. ल. वैद्य ह्यांच्या संपादकत्वाखाली अनेक बौद्ध संस्कृत ग्रंथांची आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. ह्यामुळे भारतीय बौद्ध धर्माच्या अभ्यासकांची फार मोठी सोय झाली.

शांतिनिकेतन येथील संस्थेनेही मूळ भारतीय भाषेत नष्ट झालेले, पण तिबेटी व चिनी भाषांत उपलब्ध असलेल्या ग्रंथांची संस्कृत किंवा इंग्रजी भाषांतरे उपलब्ध केलेली आहेत.

पहा : बुद्ध, बौद्ध दर्शन.

संदर्भ : 1. Bapat, P. V. Ed. 2500 Years of Buddhism, Delhi, 1959.

           2. Chen, Kenneth, K. S. Buddhism : The Light of Asia, Woodbury. N.Y., 1968.

           3. Conze, Edward, Buddhism, Its Essence and Development, New York, 1951.

           4. Dasgupta, Shashibhusan, Introduction to Tantric Buddhism, Calcutta, 1958.

           5. DUtt, Nalinaksha, Early Monastic Buddhism, Calcutta, 1960.

           6. Eliot, Charles Norton, E. Hinduism and Buddhism : AN Historical Sketch, 3 Vols., London, 1962.

           7. Haffmann, Helmut, The Religions of Tibet, New York, 1961.

           8. Kern, H. Manual Of Indian Buddhism, Strnssbury, 1896.

           9. Kitigawa, J. M. Religions of the East, Philadelphia, 1960.

           10. Mitra, R. C. The Decline of Buddhism in India, Vishvabharati, 1954.

           11. Morgan, Kenneth, Ed. The Path of the Buddha, New York, 1956.

           12 Rhys Davids, T. W. Buddhism : Its History and Literature, New York, 1927.

           13. Robinson, R. H. The Buddhist Religion : a Historical Introduction, Ventura, Calif. 1970.

          14. Sankrtyayana, Rahul, Ed. Abhidharm-Kosh, Benaras, 1955.

          15. Smith, F. J. The Buddhist Way of Life, London, 1934.

          16. Thomas, E. J. Early Buddhist Scriptures, London, 1955.

          17. Waley, Sir Arthur, “New Light on Buddhism inMediaeval India”. Melanges Chinois et bouddhiques, Vol I, 1931-32.

          18. Walshe, M. O’C. Buddhism for Today, London, 1962.

          19. Welbon, Guy, The Buddhist Nirvan and Its Western Interpreters, Chicago,  1968.          20.लाड, पु. भ. अनु. बापट, पु. वि. संपा. धम्मपद, मुंबई, १९७५.

बापट, पु. वि.