बोर्‌लॉग, नॉर्मन अर्नेस्ट : (२५ मार्च १९१४ – ). अमेरिकन वनस्पति-आनुवंशिकीविज्ञ, वनस्पतिरोगवैज्ञानिक, कृषिवैज्ञानिक व मानवतावादी कार्यकर्ते. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे जगता हरितक्रांती घडून आली. उपासमारीचे उच्चाटन करण्यासाठी केलेले प्रयत्न व जगात धान्याची सुबत्ता निर्मिण्यासाठी केलेले कार्य यांकरिता त्यांना १९७० सालचे शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या प्रयत्नामुळेच मेक्सिको या देशाचे गव्हाचे उत्पन्न सहा पटींनी वाढले आणि १९५६ साली हा देश गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या बुटक्या वाणांचा वापर कोलंबियात १९५२ साली तर भारत व पाकिस्तानात १९६३ सालापासून आणि तदनंतर जगातील विविध देशांतून करण्यात येऊ लागला. त्यामुळे भारत व पाकिस्तान या देशांचे गव्हाचे उत्पन्न ६० टक्क्यांनी वाढले. अशा तऱ्हेने भारतात हरितक्रांती होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे शक्य झाले. त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या व भाताच्या वाणांमुळे विकसनशील देशांतील अन्नधान्याची टंचाई संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बोर्‌लॉग यांचा जन्म अमेरिकेतील क्रेस्को (आयोवा) येथे झाला. १९३७ साली त्यांनी मिनेसोटा विद्यापीठाची बी. एस्. व १९४० साली एम्.एस्. पदवी मिळविली. गव्हाच्या तांबेरा रोगाविषयीचे जागतिक कीर्तीचे तज्ञ एल्विन सी. स्टॅकमन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी याच विद्यापीठाची वनस्पतिरोगविज्ञानाची पीएच्.डी. पदवी मिळविली (१९४२). १९४२-४४ या काळात बोर्‌लॉग हे ई. आय्. द्यू पाँ द नमूर फाउंडेशनमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व नंतर १९६४ पर्यंत रॉकफेलर फाउंडेशनमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून होते. १९६४ सालापासून ते रॉकफेलर फाउंडेशनच्या मेक्सिकोतील इंटरनॅशनल मेझ अँड व्हीट इंप्रुव्हमेंट सेंटरचे (आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधार केंद्राचे) संचालक आहेत. वनस्पतिरोगविज्ञान, वनस्पतिप्रजनन, कृषिविद्या व वनविद्या या विषयांतील त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे.

बोर्‌लॉग यांनी १९४० पासूनचा तांबेरा प्रतिकारक्षम असे गव्हाचे वाण शोधण्याचे प्रयत्न केले. एका संकरित वाणाच्या पैदाशीसाठी ते हजारो संकर मिळवितात. त्यांची संकर करण्याची पद्धती पुढीलप्रमाणे आहे : ते गव्हाचा जास्त उत्पन्न देणारा एक प्रकार घेऊन त्याचा तांबेऱ्याला कमीअधिक प्रमाणात प्रतिकारक्षम असलेल्या इतर हजारो प्रकारांशी संकर करतात व या नव्या संकराचा पुन्हा मूळ प्रकाराशी संकर करतात. अशा संकरातून प्रत्येक वेळी जास्त उत्पन्न देणाऱ्या व अधिक तांबेराप्रतिकारक्षमता असलेल्याची निवड करतात. शेवटी १२ ते १६ निवड वाण काढतात. त्यांनी गव्हाच्या मेक्सिसन प्रकारांच्या ठिकाणी बुटकेपणा व प्रकाश-असंवेदीपणा (वाढीवर प्रकाशाचा परिणाम न होण्याचा गुणधर्म) हे गुण आणले. पिटिक, पेन् जामो व सीएट सेरॉस हे त्यांनी शोधून काढलेले गव्हाचे प्रकार जगप्रसिद्ध झाले आहेत.

गहू व राय यांच्यात संकर घडवून आणून त्यांनी ‘ट्रिटिकेल’ नावाचा प्रकार बनविला आहे तो नेहमीच्या गव्हापेक्षा अधिक पोषक असून त्याचे उत्पन्न गव्हाएवढेच येते. त्यांनी जादा उत्पन्न देणारे भाताचे वाणही शोधून काढले आहेत. खत व पाणी यांचा अधिक कार्यक्षमपणे कसा उपयोग करता येईल, याविषयीही त्यांनी संशोधन केले आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या निमंत्रणावरून बोर्‌लॉग १९६२ साली भारतात एक महिना राहिले होते. तेव्हा त्यांनी भारतातील गहू पिकविणाऱ्या राज्यांना भेटी दिल्या आणि भारताची अन्नधान्याची समस्या सोडविण्यास विज्ञानाचा कसा उपयोग होऊ शकेल, याविषयी चर्चा केली. ते दरवर्षी रब्बी हंगामात भारताला भेट देतात. अशाच प्रकारे विकसनशील देशांना भेटी देऊन ते अन्नधान्यविषयक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात आणि गव्हाचे उत्पन्न वाढविण्याच्या बाबतीत सल्ला देतात.

मेयो-६४, सोनोरा-६३, सोनोरा-६४ व लर्मा रोहो-६४ ए या चार उत्तम प्रकारांचे १०० किग्रॅ. बी व इतर ६१३ निवड नमुने भारतात लावण्यासाठी त्यांनी पाठविले होते. भारतीय कृषी संशोधन संस्था (नवी दिल्ली), गोविंद वल्लभपंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी (पंतनगर) व पंजाब कृषी विद्यापीठ (लुधियाना) येथे या बियांचे परीक्षण, प्रजनन (पैदास) व गुणन करून (बियाण्याचे उत्पन्न वाढवून) सोनोरा-६४, सरबती सोनोरा, सफेद लर्मा, छोटी लर्मा, कल्याण-सोना व सोनालिका हे प्रकार मिळविले. त्यामुळे भारतातील गव्हाच्या उत्पन्नामध्ये क्रांती घडवून आली. यांशिवाय लाल बहादूर, यू. पी. ३०१ व हीरा हे तिहेरी बुटके प्रकारही शेतकऱ्यांना पेरणीसाठी देण्यात आले [⟶ गहू वनस्पतिप्रजनन]. बोर्‌लॉग यांनी ७० हून जास्त शास्त्रीय लेख लिहिले आहेत.

मिनेसोटा विद्यापीठाचे आउटस्टँडिंग अचिव्हमेंट ॲवॉर्ड (१९५८), पाकिस्तानचे सितारा-इम्तेआज (१९६८), मेडल ऑफ फ्रिडम (१९७७), तसेच विविध संघटना व सरकारे यांच्याकडून ३० पेक्षा जास्त सेवा पुरस्कार बोर्‌लॉग यांना मिळाले आहेत. पंजाब कृषी विद्यापीठ (१९६९), रॉयल नार्वेजियन ॲग्रिकल्चर कॉलेज (१९७०), मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी (१९७१), युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॉरिडा (१९७३) इ. विविध संस्थांनी त्यांना सन्माननीय पदव्या बहाल केल्या आहेत. इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंगचे फेलो (१९६८), पॉप्युलेशन क्रायसिस कमिटीचे संचालक (१९७१), शिवाय अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६८), रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री (१९७१), तसेच रिन्यूएबल नॅचरल रिर्सोसेस फाउंडेशन, सिटिझन्स कमिशन ऑन सायन्स, लॉ अँड फूड सप्लाय, कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी आणि इतर अनेक संस्थांचे सदस्य म्हणून निवड झाली आहे.

जमदाडे, ज. वि.