बोमन, सर विल्यम : (२० जुलै १८१६ – २९ मार्च १८९२). इंग्रज वैद्य, शरीररचनाशास्त्रज्ञ आणि नेत्रविशारद. शरीर-रचनाशास्त्राच्या सूक्ष्मशारीर अथवा ⇨ ऊतकविज्ञान (ऊतकांची म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समुहांची सूक्ष्मरचना, त्या रचनेचा ऊतक कार्याशी असलेला संबंध वगैरे गोष्टींचा सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अभ्यास करणारे शास्त्र) या शाखेतील विशेष कामगिरीबद्दल, तसेच नेत्रशस्त्रक्रिया तंत्राच्या प्रगतीस कारणीभूत असणारे एक शास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

बोमन यांचा जन्म नँट्‌विच (चेशर) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण बर्मिंगहॅम येथे झाल्यानंतर त्यांनी तेथील जनरल हॉस्पीटलमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला. या रुग्णालयातील सुप्रसिद्ध शस्त्रक्रियाविशारद जोसेफ हॉजसन यांच्याकडे उमेदवारी करीत असताना बोमन यांना त्या काळात नव्यानेच वापरात आलेल्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावयास मिळाला. १८३७ मध्ये ते लंडन येथील किंग्ज कॉलेजच्या वैद्यकीय विभागात काम करु लागले. १८४१ मध्ये म्हणजे वयाच्या पंचविसाव्या वर्षीच त्यांना रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वाचा बहुमान मिळाला. रुग्णालयात काम करीत असतानाच ऊतकविज्ञानाचा त्यांचा अभ्यास चालू होता. ऐच्छिक स्नायु-ऊतकांची सूक्ष्मरचना व क्रिया, यकृताची सूक्ष्मरचना व वृक्काची (मूत्रपिंडाची) सूक्ष्मरचना व कार्य या विषयांवर त्यांनी महत्त्वाचे निबंध प्रसिद्ध केले.

वृक्काच्या सूक्ष्मरचनेत केशिका गुच्छावर (वृक्क एककातील सूक्ष्म केशवाहिन्यांच्या वेटोळ्याच्या गुच्छावर) जे संपुट असते त्याचे सूक्ष्म वर्णन त्यांनी केले. या संपुटाला ‘बोमन संपुट’ असे नाव देण्यात आलेले आहे. या सूक्ष्मरचनेवर आधारित असा वृक्काच्या कार्याबद्दलचा सिद्धांत त्यांनी मांडला होता. त्यांच्या कार्यांचे वैशिष्ट्य हेच की, ते सूक्ष्मशरीर व शरीरक्रिया यांची उत्तम सांगड घालीत.

किंग्ज कॉलेज रुग्णालयात १८४० मध्ये साहाय्यक शस्त्रक्रियाविशारद म्हणून काम करीत असतानाच त्यांचे लक्ष डोळ्यांच्या विकृतीकडे ओढले गेले होते. १८४६ मध्ये रॉयल लंडन ऑप्थॅल्मिक हॉस्पीटलमध्ये साहाय्यक शस्त्रक्रियाविशारद म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे त्यांनी डोळ्याची शरीररचना, शरीरक्रियाविज्ञान आणि डोळ्यावरील शस्त्रक्रियांच्या ज्ञानात पुष्कळ भर घातली. डोळ्यातील स्वच्छमंडलाचे (बुबुळाच्या पुढील पारदर्शक भागाचे) त्यांनी सूक्ष्म वर्णन केले. स्वच्छमंडलावर अग्रभागी असलेले एककोशिकीय पातळ पटल आजही ‘बोमन कला’ म्हणून ओळखतात [⟶ डोळा]. नेत्रवैद्यकातील काही शस्त्रक्रिया व विशिष्ट उपकरणे त्यांच्या नावाने ओळखली जातात.

बोमन यांना १८५१ मध्ये नेत्रशस्त्रक्रियाविशारदाचा स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला. त्याच वर्षी जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक एच्. एल्. एफ्. फोन हेल्महोल्ट्स यांनी नेत्रवैद्यकात क्रांतिकारक ठरलेल्या ‘नेत्रपरीक्षक’ या उपकरणाचा शोध लावला. हे उपकरण डोळ्याच्या आतील भागाची तपासणी करण्यास फार मोलाचे ठरले आहे. या उपकरणाचे महत्त्व बोमन यांनी अगदी सुरुवातीपासूनच ओळखले होते.

बोमन यांना १८४२ मध्ये रॉयल सोसायटीच्या रॉयल पदकाचा बहुमान मिळाला. ब्रिटनमध्ये त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचे ते १८८०-८३ मध्ये अध्यक्ष होते. १८८१ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेतील नेत्रवैद्यक विभागाचे ते अध्यक्ष होते. ब्रिटनमधील ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीतर्फे त्यांच्या सन्मानार्थ प्रतिवर्षी नेत्ररोगावरील व्याख्याने त्यांच्या नावाने आयोजिली जातात. १८८४ मध्ये त्यांना नाइट हा किताब मिळाला. त्यांनी अनेक वैद्यकीय विषयांवर निबंध लिहिले होते. आर्. बी. टॉड व त्यांनी मिळून लिहिलेला आणि ऊतकविज्ञानाचा समावेश असलेला शरीरक्रियाविज्ञानावरील द फिजिऑलॉजिकल ॲनॅटमी अँड फिजिऑलॉजी ऑफ मॅन (१८४५-५६) हा एक अग्रेसर ग्रंथ म्हणून गणला जातो. ते डार्किंग (सरी) येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.