बोंबील : या माशाचा समावेश सायनोडिडी कुलात होत असून याचे शास्त्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस आहे. हे मासे साधारणपणे उथळ पाण्यात राहतात. भारतापासून चीनपर्यंत ते नदीच्या मुखात किंवा किनाऱ्याजवळील समुद्रात आढळतात. मुंबईच्या किनाऱ्याजवळ हे मुबलक आढळतात. येथून पश्चिम किनाऱ्यावर जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे यांचे प्रमाण कमी होते. भारताच्या दक्षिण टोकापासून पूर्व किनाऱ्यावर उत्तरेकडे जाताना यांचे प्रमाण कोरोमंडल किनाऱ्यापर्यंत वाढत जाते. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागातही हे मोठ्या प्रमाणात आढळतात.
बोंबिलाचे शरीर दंडगोलाकार असून डोके सरड्याच्या डोक्यासारखे असते. याच्या तोंडात पुष्कळ अणकुचीदार दात असतात. याची लांबी ४१ सेंमी. पर्यंत असू शकते पण सामान्यतः ती यापेक्षा कमी असते. डोक्याच्या, पाठीच्या व कडेच्या बाजूने याचे शरीर अर्धपारदर्शी असते आणि त्यावर काळे तपकिरी ठिपके असतात. याचे उदर रुपेरी पांढरे असते. पक्ष (पर म्हणजे हालचाल व तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी) पक्ष पारदर्शी असतात व कधीकधी त्यांवर काळे ठिपके असतात. याची कनीनिका (बुबूळ) सोनरी असते. खालचा जबडा वरच्या जबड्यापेक्षा लांब असतो. दात आत वळलेले व उभट असतात. पहिला पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) मुस्कट व पुच्छपक्षाच्या (शेपटीच्या पराच्या) मध्यावर असतो. अधरपक्ष (खालचा पर) पृष्ठपक्षाच्या खाली असतो.
बोंबील उघड्या समुद्रात मोठ्या संख्येने थवे करून राहतात. ते शरद-ऋतूत व हिवाळ्यात भक्ष्याच्या शोधार्थ मोठ्या संख्येने किनाऱ्याजवळ येतात व विपुल प्रमाणात जाळ्यात सापडतात. वसंत ऋतूच्या सुरुवातीस ते प्रजोत्पादनासाठी किनाऱ्यापासून दूरवर समुद्रात जातात.
बोंबील ताजे किंवा खारवून खातात. मुंबई व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेशात अन्न म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. खारवलेल्या (सुक्या) बोंबिलाची आमटी करतात व ताजे बोंबील तळून खातात. बंगालमध्ये हा मुंबईइतका लोकप्रिय नाही. याच्या ताज्या मांसामध्ये पुढील मुख्य घटकद्रव्ये असतात : जलांश ८९.३०% प्रथिने ९.०५% आणि प्रत्येक १०० ग्रॅममध्ये ३३४.२० मिग्रॅ. कॅल्शियम, १८.६० मिग्रॅ. फॉस्फरस व १.२० मिग्रॅ. लोह असते.
जमदाडे, ज. वि.
“