बेसेल, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म : (२२ जुलै १७८४ – १७ मार्च १८४६). जर्मन ज्योतिर्विद व गणितज्ञ. त्यांनी ज्योतिषशास्त्रीय मापनांच्या परिशुद्धतेचे आधुनिक आदर्श व मानके प्रस्थापित केली. त्यांनी ताऱ्याच्या अंतराचे पहिले मापन मिळवीले.

बेसेल यांचा जन्म हॅनोव्हरजवळील मिंडल येथे झाला. तेथील शाळेत चार वर्षे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ब्रेमेन येथील एका व्यापारी कंपनीत उमेदवारीस प्रारंभ केला. तेथे काम करीत असतानाच त्यांनी गणिताचा अभ्यास केला व त्याच वेळी त्यांना जहीजाच्या समुद्रातील स्थाननिश्चितीच्या कामातून ज्योतिषशास्त्रासंबंधीची आवड उत्पन्न झाली. टी. हॅरिअट यांनी १६०७ मध्ये हॅली धूमकेतूंच्या केलेल्या निरीक्षणांवरून बेसेल यांनी १८०४ मध्ये या धूमकेतूची कक्षा गणिताने काढली. ही माहिती त्यांनी व्हिल्हेल्म ओल्बर्स या शास्त्रज्ञांना सादर केली. त्यांच्या प्रोत्साहनाने बेसेल यांनी धूमकेतूचे अधि कवेध घेऊन सर्व माहिती एका नियतकालिकात प्रसिद्ध केली. ओल्बर्स यांच्या शिफारसीवरून १८०६ मध्ये बेसेल यांनी जे. एच्‌. श्रटर यांच्या लील्यन्टाल येथील खाजगी वेधशाळेत साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे १८१० मध्ये एफ्‌. एच्‌. फोन हंबोल्ट यांच्या शिफारसीवरून पूर्व प्रशियातील केनिन्झबर्ग (आता रशियातील कालीनिनग्राड) येथे ज्योतिषशास्त्राच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली आणि तेथील वेधशाळा १८१३ मध्ये पूर्ण झाल्यापासून त्यांनी मृत्यूपावेतो वेधशाळेचे संचालक म्हणून काम केले. त्यांनी तेथे केलेल्या कार्यामुळे अचूक स्थाननिर्धारक ज्योतिषशास्त्राच्या (खगोलिय पदार्थांच्या स्थानांची निश्चिती करणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या शाखेच्या) युगास प्रारंभ झाला.

जेम्स ब्रॅडली यांनी १७५५ मध्ये ग्रिनिच वेधशाळेतून ३,२२२ ताऱ्यांचे घेतलेले वेध, ग्रिनिचचा अक्षांश, क्रांतिवृत्ताची तिर्यकता ( क्रांतिवृत्त) इ. विविध बाबी लक्षात घेऊन व गगणितात रूपांतरित करून या ताऱ्यांची माध्य (सरासरी) स्थाने बेसेल यांनी निर्धारित केली आणि ती fundamenta astronomiae pro anno १७५५ या शीर्षकाखाली १८१८ मध्ये प्रसिद्ध केली. Tabulae Regiomontanae या ग्रंथात त्यांनी १८ ताऱ्यांची १७५० – १८५० या कालावधीतील माध्य व आभासी स्थाने प्रसिद्ध केली. या ग्रंथात कोणत्याही विशिष्ट निर्देश क्षणाला ताऱ्यांच्या स्थान निर्धारणासाठी त्यांनी प्रस्थापित केली एकविध (एकसारख्या) रूपांतरणाची पद्धत अद्यापही प्रमाणभूत मानली जाते. १८२० मध्ये त्यांनी वसंत संपातबिंदूचे ( संपात) स्थान ०.०१ सेकंदापर्यंत अचूक काढले. १८२१ – ३३ या काळात त्यांनी -१५० ते + ४५० क्रांती ( क्रांती – १) असलेल्या खगोलीय पट्‌ट्यातील नवव्या प्रतीपर्यंतच्या ( प्रत) सु. ७५,००० ताऱ्यांची स्थाने निर्धारित केली. १८२६ साली त्यांनी सेकंद लंबकाच्या (ज्याच्या एका झोक्याला बरोबर एक सेकंद लागतो अशा लंबकाच्या  लंबक) लांबीसंबंधी महत्वाचे प्रयोग करून काही शुद्धी सुचविल्या. १८३१ – ३२ मध्ये त्यांनी पूर्व प्रशियातील याम्योत्तर वृत्ताच्या (भौगोलिक ध्रुवांतून जाणाऱ्या बृहत्‌ वर्तुळाच्या) चापांची लांबी भूगणितीय पद्धतीने  भूगणित मोजण्याच्या कामाचे संचालन केले. स्वतःच्या व इतरांच्या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी पृथ्वीचा आकार व तिची परिमाणे यांचे महत्वपूर्ण निर्धारण केले आणि त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. पृथ्वीच्या विवृत्ततेचे (चपटपणाचे) मूल्य १८४१ मध्ये त्यांनी १/२९९ इतके अचूक काढले होते.

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे तिची ही गती निदान काही ताऱ्यांच्या स्थानातील आकाराच्या पार्श्वभूमीवरील वार्षिक बदलाच्या स्वरूपात प्रत्ययास येईल, हे कोपर्निकस (१४७३ – १५४३) यांच्या काळापासून ओळखण्यात आले होते पण बेसेल यांच्या काळापर्यंत असा बदल शोधून काढण्याचे अनेक ज्योर्तिहवदांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. या ज्योर्तिविदोनी सर्व तेजस्वी तारे पृथ्वीपासून जवळ आहेत या चुकीच्या समजूतीवर आपले प्रयत्न आधारलेले होते. बेसेल यांनी ताऱ्याचा जवळपणा ठरविण्यासाठी त्याची निजगती ( तारा) विचारात घेऊन ६१ – सिग्नी (वार्षिक निजगती ५.२) या जवळच्या ताऱ्याचे सु. तीन वर्षे वेध घऊन १८३८ मध्ये स्थिर ताऱ्याकरीता पहिले निश्चित पराशयमान ( पराशय) केले. या ताऱ्याचा पराशय ०.३१ असल्याचे त्यांनी दाखविले व त्यावरून त्याचे अंतर सु. ११ प्रकाशवर्षे येते, असे नंतर दिसून आले. १८४४ साली त्यांनी व्याध व प्रश्वा (प्रॉसियान) या ताऱ्यांच्या बदलत्या निजगतीवरून ते युग्मतारे असावेत असे अनुमान काढले होते व पुढे ते खरे ठरले. मृत्युपूर्वी काही काळ त्यांनी प्रजापती (युरेनस) या ग्रहाच्या गतीतील अनियमिततेचा अभ्यास करण्यास सुरूवात केली होती (या अनियमिततेच्या अभ्यासातून पुढे वरूण (नेपच्युन) या ग्रहाचा शोध लागला.) फ्राउनहोफर सूर्यबिंबमापक ( सूर्य -बिबेमापक) या उपकरणाचा त्यांनी पराशयमापनासाठी परिणामकारकपणे उपयोग केला. निरीक्षणातील व्यक्तिगत निरीक्षकाच्या त्रुटींकरीता शुद्धी लावण्याची पद्धत त्यानीच प्रचारात आणली. तसेच मापक उपकरणामुळे येणाऱ्या त्रुटींचा त्यांनी पद्धतशीर अभ्यास केला होता. योहानेस केप्लर योनी सूर्यांभोवतील ग्रहांच्या गतीसंबंधी मांडलेल्या समस्येवर बेसेल यांनी केलेल्या आपल्या विवरणात बेसेल फलन ( फलन) या त्यांच्याच नांवाने नंतर ओळखण्यात येणाऱ्या फलनांचा १८१७ मध्ये प्राथमिक उपयोग केला आणि सात वर्षांनी या फलनाचा पूर्ण विकास करून ग्रहांच्या गतीतील विक्षोभावरील अभ्यासात त्यांचा उपयोग केला.

बेसेल यांची ग्रहांची गती, ज्योतिषशास्त्रीय उपकरणांसंबंधीचा सिद्धांत, गणित, भूगणित, भूभौतिकी इ. विषयांवरील अनेक निबंध रूडोल्फ एंगेलमान यांनी तीन खंडात संकलीत करून १८७५ मध्ये Abhandlungen Von Friedrich Wilhelm Bessel   या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. त्यांनी घेतलेले ज्योतिषशास्त्रीय वेध Astronomishe Beobachtungen auf der sternwarte zu Konigsberg   (२१ खंड, १८१५-४४) या ग्रंथाद्धारे आणि त्यांची लोकप्रिय व्याख्याने populare vorlesungen uber wissenshaft liche Gegenstande(१८४२) या शिर्षकाखाली प्रसिद्ध झाली. बर्लिन ऍकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १८१२ मध्ये बेसेल यांची निवड झाली. ते केनिग्झबर्ग येथे मरण पावले.

मोडक, वि. वि.